शनिवार, १७ जून, २०२३

आई.. ❤️

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.


प्रस्तावना -
जवळपास दोन अडीज वर्षांच्या विश्रांती नंतर पुन्हा एक ब्लॉग आपल्यासाठी.

या कथेतील "सतिश" ही केवळ एक व्यक्ती नसून, संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे जो आपल्या आईपासून आणि आपल्या घरापासून दूर राहतो.

मी हा ब्लॉग माझ्या त्या मैत्रिणीला समर्पित करतो जिने काही महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. मैत्रीण असली तरीही मी तिची तुलना "आई" सोबत करणार नाही पण तिच्या वाट्याचं फळ तिच्या पदरात नाही टाकलं तर तिने माझ्यासाठी केलेल्या कृतार्थतेला मी कुठेतरी विसरून गेल्यासारखं होईल.
 
विशेष आभार -
शैलेश सावंत, सुरज परमेकर, निहारीका किरवीड आणि शंतमी पाटील.

 

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

कविता ..

कवितेला शब्दांचं किंवा यमकांच बंधन नसतं, त्यात असते फक्त गुंतागुंत भावनांची.
कविता मुक्त असते, एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासारखी. वाहत्या प्रवाहाच्या बाहेर पडलेल्याला स्वतःचा मार्ग दाखविणाऱ्या दिव्या सारखी.

कविता ही मधासारखी असते, कित्येक मधमाशांनी गोळा करून आणलेल्या फुलांच्या रसासारखी.
कविता कधीही येते, आपल्यापाशी राहून जाते, तिला काळ वेक काहीच नसते. कधी झोपेतून उठवते, तर कधी झोपूच देत नसते.

कविता कधी विनोद बनून चेहऱ्यावर हसू फुलवते, तर कधी भावनीक होऊन अश्रूंचे बांध फोडून टाकते.
कविता आली तर दिवसभर सोबत असते, तर कधी तोंडही दाखवत नसते.

कविता ही प्रत्येकाचा श्वास असते, कोणाला ती व्यक्त करता येते, तर कोणाला याचा गंध ही नसतो.
कवितेला स्वतःचं रंग रूप नसतं, लिहिणारा प्रत्येकजण स्वतःच्या परीनं तिला घडवत असतो.

कवितेला स्वतःच्या भावनाही नसतात, लिहिणाऱ्यांच्या मनचे भाव स्वतः घेऊन ती जगत असते.
कविता ही कविता असते, कधी तुमच्यासाठी कधी माझ्यासाठी कधी आपल्या सगळ्यांसाठीच मन मोकळं करण्याचा आधार असते.

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

१४२७, सदाशिव पेठ


DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंब स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतातयाव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Birthday Gift 🎁🎉

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

क्रांति सूर्य !

टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?

हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला...

"माझं नाव, विनायक दामोदर सावरकर!" 🚩

मन सुद्ध !!

प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ट्रेनने दादर सोडलं. ट्रेन चालू होताच धावत धावत ५०-५५ वयाचे एक गृहस्थ लेडिज डब्यात चढले. डोळे अगदी डबडबलेले, चेहरा त्रासलेला, चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. एरवी असं कोणी लेडीज डब्बायत चढलं तर बायकांचा एकदम गदारोळ सुरु होतो. उतरो उतरो, असा त्रागाही करू लागतात. पण या भल्या माणसाकडे पाहून सगळ्याजणी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

ते गृहस्थ आत येऊन एका मोकळ्या बाकड्यावर बसले. खिडकीतून बाहेर एकटक पाहत होते. डोळ्यातून येणारं पाणी लपवायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही.. डोळ्यांत ताराळलेलं पाणी गलांवरून ओघळून खाली उतरलं होतं.. ते बघून समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एक मुलीने त्यांना स्वतःहून विचारलं, "काय.. झालं? रडताय का तुम्ही??"

या अनोळखी जगात कोणीतरी आपली चौकशी करतंय हे बघून त्यांना हुंदका अनावर झाला.. ते म्हणाले, "केईएममध्ये हिला अॅडमिट केलंय अन् टाटामध्ये थोरला मुलगा व्हेंटिलेटरवर आहे.. आधी मुलाला कोरोनाने गाठलं, आणि त्याचा धसका घेऊन हिची सुद्धा प्रकृती बिघडली.."

त्या काकांच्या शब्दांतील ओलावा बघितला तर कित्येक दिवसांनी त्यांना कोणीतरी आपुलकीचं भेटलं आहे आणि ते आपलं मन मोकळं करत आहेत असं जाणवलं.. स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ते सांगत होते..

"दोघींना होणारा त्रास पाहून सकाळपासून माझं मला काही सुचत नाही. एकीकडे हिच्यासाठी जीव तुटतो, तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क तोंडावर लावलेला मुलाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही.. पण मी घरातला कर्ता पुरुष.. मला कुणाला सांगता येत नाही. खरं तर रडायचं होतं मोकळेपणाने.. म्हणून ठरवून लेडिज डब्यात चढलो.."

डब्ब्यात फारशी गर्दी नव्हती. प्रत्येक बाकड्यावर मोजक्याच स्त्रिया मुली बसल्या होत्या.. त्या काकांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून काहीजणी काकांच्या जवळ येऊन बसल्या..

काकांनी खिशातून रुमाल काढला आणि चष्माच्या आतून डोळे टिपले.. काही जणींनी बॅगेतलं चॉकलेट दिलं, काहींनी पाण्याची बाटली पुढे केली.. काका थोडे सावरले.. म्हणाले, "आपल्यात पुरुष रडत नाही, खरं तर त्याने रडायचं नसतंच. पण तुम्हा मुळींच मन आणि आम्हा पुरुषांचं मन देवाने वेगवेगळ नाही ना बनवलं.. मन असतंच की आम्हालाही.."

त्या काकांचं बोलणं ऐकून तिथेच बाजूला बसलेल्या एका महिलेने कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने स्वतःचे डोळे टिपले..

"माझ्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्या दोघांनीही होणारा त्रास पाहून माझं आजवर खंबीर असणारं मन जरा हेलावलंय. लेडिज डब्ब्यात चढलो म्हटल्यावर तुम्ही आरडाओरडा कराल, असा विचारही आला नाही.. उलट तुम्ही सगळ्याजणी विचारपूस करतायत.. थॅक्स.."

काकांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमालाने संपूर्ण चेहरा पुसला.

खरच पुरुषांना इतकं अवघड असतं का रडणं? रडून मन मोकळं करणं..?? भगवंतानि मन सगळ्यांना सारखाच दिलं असेल ना.. सगळ्यांसाठी कायम खंबीर असलेल्या त्या कर्त्या पुरुषांचही जगणं समजून घ्यायला पाहिजे की कोणीतरी.

विलेपार्ले येताच काका उतरून निघून गेले.. ते उतरताना त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्याचं जाणवलं. आणि जाता जाता डब्यातील प्रत्येक महिलेला स्त्रियांना ते काका अप्रत्यक्षपणे सांगून गेले की, तुम्ही मुलांना वाढवताना त्यांना जरूर सांग, पुरुषानेही मोकळेपणाने रडायचं असतं. हक्काने कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून मनातलं सांगायचं असतं. मन मोकळं झालं नाही तर हृदयावर एक बॉम्ब घेऊन जगण्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो..


.. अपूर्ण

शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

दुसरा अंक 🎭

 

DISCLAIMER

या कथेतील पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असून, काही घटना काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.