शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

दुसरा अंक 🎭

 

DISCLAIMER

या कथेतील पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत असून, काही घटना काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 


दिवसभराच्या उकड्याला कंटाळून दुपार सरता सूर्य संध्याकाळच्या कुशीत शिरत असतो त्यावेळच्या शांततेत घड्याळाची टिक-टिक आणि typewriter चा आवाज बाजूला सारून ऑफिसला लागून असणाऱ्या नाट्यगृहासमोरच्या प्रेक्षकांची लगबग, नाट्यगृहाच्या रंगमंचावरून येणारा तिसऱ्या घंटेचा आवाज आणि नाटक सुरू होण्यापूर्वी नाट्यगृहात घुमणारी नांदी मनाला खूप मागे घेऊन जाते.. ऑफिसच्या खुर्चीत बसून typewriter वर शब्दांची जुळवाजुळव करता करता काही गोष्टींचा विसर पडला होता. जे काम मी करतो त्यात सगळ्यात आधी माझ्याबद्दल सांगणं मला योग्य वाटतं. खरं तर तीच आपली ओळख असते... सुरुवात असते एखाद्या गोष्टीची.… आणि.... शेवट.... शेवट सुद्धा!


असं काय काम करतो मी..? तुम्हाला उत्सुकता लागली असेलच.. कोल्हापूरात मंगळवार पेठेत एक विद्वान आणि प्रसिद्ध वकील राहतात. देशपांडे वकील! पेठेच्या मध्यावर असणाऱ्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागूनच देशपांडे वकिलांचं घर आणि ऑफिस होतं.. त्यांच्याकडेच काम करतो मी. टायपिंग... नोटरी... स्टेशनरी... आणि बरच काही. असं समजा की वकील साहेबांचा उजवा हातच!!


देशपांडे वकील तसं तर खूप मोठे आणि दिग्गज वकील..!! साठ पासष्टीच्या घरात असतील. तरीही नजर आणि बुद्धी अजूनही कमालीची तल्लख..!! ते जेवढे विद्वान तेवढेच मनाने मोठे आणि दयाळू सुद्धा. माणसं... त्यांचे विचार... त्याचे गुण दोष इतक्या बारकाव्याने समजतात की त्याला तोडच नाही.. म्हणून त्यामुळेच की काय देशपांडे वकिलांकडे कोणी पहिल्यांदा येतं, ती व्यक्ती पुन्हा कधी दुसरीकडे नाही जात, शेवटपर्यंत... हो अगदी शेवटपर्यंतच म्हणावं लागेल. करण जे लोक आयुष्यभर त्यांच्याकडून सल्ले घ्यायला येतात तेच लोक पुन्हा येतात त्यांच्याकडे... आपल्या जीवनानंतर शिल्लख राहिलेल्या आपल्या जीवनाचा हिशोब लिहायला... आयुष्याच्या प्रवासातील जमा खर्च मांडायला... ते सगळे लोक पुन्हा येतात आपलं इच्छापत्र लिहायला... देशपांडे वकिलांकडे!


कित्येक कुटुंबांचं रहस्य देशपांडे वकिलांच्या हृदयात बंद आहे. या सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी मदत करतात देशपांडे सर.. आणि देशपांडे सरांची मदत करतो मी! हजारो इच्छापत्रं type केली आहेत आतापर्यंत.. आणि हो वाचलीत सुद्धा.. त्यात समजून गेलोय की, माणूस जाता जाता सुद्धा आपले हेवेदावे विसरू शकत नाही. स्वतःचं जीवन ज्या विचारांच्या मार्गावर घालवलं आहे त्यांना पुन्हा त्याच मार्गावर भटकताना पाहतो मी.. बंद दाराच्या आड खोलीत देशपांडे सरांचा शांत आवाज एखाद्याला समजावत असतो बऱ्याच वेळा... की कोणासोबत अन्यान न व्हावा... तर कधी कधी आरडा-ओरडा करणाऱ्या व्यक्तीला शांत करत असतात देशपांडे सर... ज्याचा हक्क त्याला योग्य प्रकारे नाही मिळाला.


मानवी मानसिकतेचा प्रत्येक नमुना दर वेळी मला थक्क करून जातो.. आणि विचार करायला भाग पाडतो की, आयुष्य जगता जगता का नाही सुधारत ते स्वतःच जीवन? का नाही करत असं काही की, ते मदत करतील त्यांना आपल्या हेवेदाव्यातून बाहेर पडायला..? का नाही ते भरभरून जगत.. की आपल्या शेवटच्या क्षणी त्यांना त्यांच्या त्या जखमांच्या आठवणींचा विसर पडेल की ज्या आयुष्याच्या धावपळीत त्यांना मिळाल्या आहेत.. का नाही असा विचार करत की, शेवटी शिल्लक राहिल तो फक्त आनंद.. सोबत जाईल तो सुद्धा आनंदच.. आणि मागे राहील ते फक्त समाधान.... नात्यांच्या गोडव्याचं समाधान..!!


पण कुठे मिळणार या सगळ्या गोष्टी... आणि कशा..? हाच विचार करत असतो मी नेमही... आणि हल्ली जरा जास्तच..!!


देशपांडे वकिलांकडे काम करता करता इथेच फाईलने भरलेल्या खोलीत बसण्यात ४-५ वर्षे निघून गेलीत.. दुपारच्या उकाड्यात जेंव्हा पंखा सुद्धा फिरून फिरून कंटाळतो आणि उकाड्याने कासावीस झालेलं शरीर आणि मन थोड्या थंडगार वाऱ्याची झुळूक कुठूनतरी येईल आणि मन शांत करेल असा विचार करता करता त्याच वेळी आणखी एक विचार माझ्या मनाला चाटून जातो... तोच विचार... जगण्याच्या या रहाटगाडग्यात हवी तशी सुख शांती कोठे आहे.. आणि काय आहे..??


सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाच्या झळा समोच्या अंगणातील बकुळेच्या झाडाला सुद्धा थोडीशी सावली शोधायला भाग पाडत होत्या.. कदाचीत त्यामुळेच की काय देशपांडे सरांनी माझ्या खोलीत AC सुद्धा लावला होता काही दिवसांपूर्वी, पण ज्या गारव्याची मला ओढ होती तो अजून सुद्धा माझ्या मनापर्यंत पोहचला नव्हता.. या सगळ्या धावपळीत स्वतःच्या स्वप्नांकडे बघायला आणि ती जगायला वेळच कुठे उरला होता..


कॉलेज संपल्यावर आयुष्याची काही चाकं अशी काही उलटी फिरली होती की, तुटलेला तारा जितक्या हतबलतेने पहावा तशी हतबलता आली होती. नाट्यशास्त्र आणि चित्रपट दिग्दर्शनाच्या व्याख्यानाची वाट चुकून मी एका "व्यवसाय मार्गदर्शन" नावाच्या व्याख्यानात जाऊन बसलो होतो.. आयुष्यात अचानक झालेले बदल इतके त्रासदायक ठरू शकतात याचा विचार कधी केलाच नव्हता.. आणि तिथेच माझ्या स्वप्नांच्या नाटकाचा एक अंक संपला होता.. नाटकाचा पडदा अर्ध्यावरच बंद झाला होता.. समोर दिसत होता तो फक्त दुसऱ्या अंकाचा भग्न झालेला रंगमंच.. एखाद्या काळ्या कुट्ट अंधाऱ्या खोलीसारखा.. त्यातले ते निस्तेज अवशेष, पोपडे उडालेल्या भिंती आणि गळकी कौलं पुन्हा मला रंगमंचावर वावरू देत नव्हती.. बेरजेपेक्षा वजाबाकीची गणितं सोपी वाटू लागली होती..


देशपांडे वकील तिथे Lecture द्यायला आले होते.. त्यावेळी संवादात त्यांच्या बोलण्याने मी प्रभावीत झालो होतो.. आणि माझ्या बोलण्याने ते... त्यामुळे नोकरी करण्याची वेळ आली तेंव्हा नाट्यगृहाला लागूनच असलेल्या त्यांच्या बंगलेवजा घरातील दोन खोल्यांमध्ये त्यांचं ऑफिस असल्याने मनातील सुप्त इच्छेने सर्वप्रथम माझी पावलं त्यांच्याच ऑफिसकडे वळाली होती. त्यांच्याकडे तशी माझ्यासाठी जागा नव्हती, तरीही त्यांनी मला ठेऊन घेतलं होतं. काही दिवसांनी त्यांनी मला ओळखलं होतं, आणि म्हणाले पण होते की, "तुझा रस्ता वेगळा आहे.. तुला हवं तर तुझ्या मार्गाने तू चाल, मी आहे तुझ्या पाठीशी.." .... पण उलट फिरलेल्या चाकांना पुन्हा त्या मार्गावर आणण्याचा कधी मी प्रयत्नच केला नाही.. आणि तेव्हढं बळ सुद्धा उरलं नव्हतं..! कोणाच्या जीवनाला चौकट मानवते तर कोणाचं जीवन रांगोळीच्या प्रत्येक कणांसारखं विस्कटण्यातच रमतं, रांगोळीचा प्रत्येक कण जसा पडेल तिथे रंग घेऊन पडतो.. मग कोणी त्या रंगांचं कौतुक करो तर कोणी रांगोळी पायदळी तुडवून निघून जावो... असा विचार करून मी स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत असायचो.. त्यावेळी मला साहिरच्या ओळी आठवायच्या..

जो पास हैं उसी को मुक़द्दर समझ लिया,

जो खो गया मैं उसको भुलाता चला गया...


चार वर्षे झालीत या गोष्टीला, चार उन्हाळे निघून गेलेत इथे बसूनच.. पण कोण जाणे का, हृदयाची तहान काही जास्तच वाढली आहे, मान्सून अजून खूप लांब आहे पण आतापासूनच जीवनाचा प्रवास आणि त्यातले प्रश्न खूपच जड वाटू लागले आहेत.. एखाद्याच्या आयुष्याच्या सारीपाटावर काही पानं उलटी पडली असतील तर त्याला कोण काय करणार?


त्या दिवशी सुद्धा वेळ असाच निघून जात होता. दुपार झाली होती. देशपांडे सर कोर्टातून येऊन आपल्या केसशी संबंधित लोकांची भेट घेत होते. मी माझ्या खोलीत बसून टाईप करत होतो.. तेवढ्यात typewriter च्या टक टकच्या आवाजावरून एक आवाज माझ्या कानावर पडला.. तो आवाज एका मुलीचा होता.. ती जोरजोरात काही बोलत होती आणि तो आवाज सरांच्या खोलीच्या बंद दरवाज्याचा मुलाहिजा न ठेवता माझ्या खोलीत ऐकू येत होता..


"पण काका ते कसं करू शकतात? ती तर बाबांची वस्तू होती.."


तीचं बोलणं ऐकून मी माझी मान हलवली... अशी बोलणी मी नेहमीच ऐकत असतो.. बाबांची वस्तू, आईची वस्तू, आजोबांचा वारसा, पणजोबांची आठवण... काय पूर्वजांच्या गोष्टींवरून वाद घालणं योग्य आहे..? पण आई वडिलांच्या जाण्यानं सख्या भावंडात दुरावा का निर्माण होतो? नात्याला काहीच मोल नाही का? पैसाच सगळं काही आहे...? ....पण पुढच्या काही शाब्बांनी माझा अंदाज पूर्ण चुकीचा ठरवला..


"काका ती पेटी बाबांची होती..."


आता मला थोडी गोष्ट समजू लागली होती. इथे गोष्ट पैशांची नव्हती तर भावनांची होती.. मी पुढचं बोलणं ऐकायला आपसूकच तयार झालो..


ती मुलगी म्हणत होती, "काका ती पेटी मीच वाजवत होते.. बाबांकडून गाणं शिकत होते ती मी.. दोन्ही भावंडांनी कधी गाण्यात काही सर नाही दाखवला. मोठ्या भावाला तर डॉक्टर बनायचं होतं आणि मधली बहीण.. तिला तर मॉडेलिंग मध्ये स्वतःच भविष्य घडवायचं होतं... त्या गोष्टीच मला काही वाटलं नाही कारण बाबांचं गाणं त्यांचं संगीत आहे माझ्याकडे.. मग त्यांच्या पेटीला तरी माझ्याकडे राहूदे..." .... ती मुलगी सरांच्या खोलीत बसून एकटीच बोलत होती...


"दोघा बहीण भावाचं म्हणणं आहे की, पेटीचा लिलाव करायचा.. आणि येतील ते पैसे तिघांनी वाटून घायचं.. मी त्याबदल्यात त्यांना पैसे सुध्या देऊ केले.. पण त्यांना वाटत की, बाबा इतके दिग्गज होते की, त्यांच्या पेटीचा लिलाव केला तर भरपूर बोली लागू शकते.. जेवढे मी त्यांना पैसे देऊ शकते त्यापेक्षा खूप जास्त..." ती मुलगी इतकं बोलून शांत झाली.


मी बाहेर माझ्या जागेवरच विचारात पडलो.. समोरून देशपांडे सरांचा काहीच आवाज येत नव्हता. ते फक्त ऐकून घेत होते... मी विचार करू शकत होतो की, त्या वेळी त्यांचं डोकं किती वेगाने विचार करत असेल.. देशपांडे सर कधी फारसं बोलणाऱ्यांपैकी नव्हते.. आणि जोपर्यंत एखाद्या केस विषयी ते पूर्ण विचार करत नाहीत तोपर्यंत तर अजिबात बोलत नव्हते..


एकदाचा त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला ... "आता ती पेटी कोणाकडे आहे..?" त्यांनी विचारलं.


"माझ्याकडेच आहे काका.. पण ते दोघे म्हणत होते की एक दोन दिवसात घेऊन जातील ती पेटी.. वडिलांचा ठेवा आहे तो काका.. त्यांची शेवटची निशाणी... कसं जाऊ देऊ माझ्याकडून ती पेटी..?" बोलता बोलता ती मुलगी रडू लागली..


तिच्या हुंदक्यांनी संपूर्ण ऑफिसमधील शांतता व्यापून गेली होती.. देशपांडे सर शांतपणे बसून होते.. रडून रडून तिचं मन हलकं होण्याची वाट बघत होते.. खूप संयम आहे त्यांच्यात. या संपूर्ण केसमुळे मी पूर्ण थक्क होऊन गेलो होतो. मी पुढे काही विचार करेन तेवढ्यात सरांनी माझ्या इंटरकॉम फोनवर रिंग केली..


"सुमित.. जरा आत येतोस? थोड्या नोट्स घे केसबद्दल.." असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.. आणि मी माझं नोटपॅड घेऊन सरांच्या खोलीत गेलो..


सरांच्या खोलीतील खिडकीतून उन्हाची किरणं येऊन त्या मुलीच्या चेहऱ्यावर आणि हातांवर पडत होती. तिच्या मनातील गोंधळ काहीसा शांत झाला होता. मी तिच्या समोर बसताना तिच्या चेहऱ्याकडे पाहण्याचा प्रयत्न केला. तिच्या नजरेत एक कमालीची शांतता होती.. एक साधा गुलाबी पंधरा पंजाबी ड्रेस.. पांढरी शुभ्र ओढणी.... गोंधळलेली ती मुलगी आता मात्र शांत बसून होती.. तिच्या लांबसडक केसांची वेणी एका खांद्यावरून जवळपास खाली जमिनीला लागत होती.. छोटासा गोल चेहरा.. आणि कापाळी छोटीशी टिकली.. सोनेरी किरणांमुळे तिचे केस आणि चेहरा सोनेरी दिसत होता.. वयाने माझ्यापेक्षा लहानच असेल..


देशपांडे सर म्हणाले, "सुमित ही रिद्धी.. पंडित वसंतराव मोहितेंची कन्या.. तू ओळखतच असशील ना.. विख्यात शास्त्रीय गायक वसंतराव मोहिते.. आपल्या शहराचेच काय तर ते देशाचे भूषणच जणू.." .... मी तिच्याकडे बघत सरांचं बोलणं ऐकलं..


"रिद्धी बाळ, सुनीत सोबत जा.. आणि जे काही मला सांगितलं ते त्याला सांग, तो लिहून घेईल.. मी या विषयावर जरा विचार करतो, मग आपण पुढच्या आठवड्यात भेटू.."


"ठीक आहे..!!" ... म्हणत रिद्धी उठली आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत आली.. मी तिला खुर्ची दिली आणि बसण्यास सांगितलं.. मी विचारलं तर तिने आपल्या व्याकुळ झालेल्या आवाजात पुन्हा तीच गोष्ट सांगितली जी मी काही वेळापूर्वी सरांच्या दाराच्या आडून आता थोड्या वेळापूर्वीच ऐकली होती.. मी शांतपणे लिहून घेत होतो आणि मध्येच कधी नजर उचलून तिला पाहत होतो.. या ऑफिसमध्ये पैसे आणि संपत्तीसाठी लढणाऱ्या कित्येक लोकांना मी पाहिलं होतं.. पण आठवणी आणि कलेच्या संपत्तीसाठी लढायला आलेल्याला कदाचित पहिल्यांदाच पाहत होतो..


आपोआपच माझ्या मनात रिद्धी साठी सहानभूती तयार होत होती. पण जिथे रिद्धीसाठी माझ्या मनात सहानभूती तयार झाली त्याच मनाने मला ढिडकरले सुद्धा.. करण जिथे रिद्धी आपल्या वडलांच्या स्वप्नांसाठी लढत होती तिथे मी माझ्या स्वप्नांसाठी काय केलं होतं?? काहीच नाही..??


रिद्धी त्या दिवशी निघून गेली पण मी मात्र विचारात पडलो.. माझ्या साहित्य संग्रहाचा ठेवा जो कित्येक वर्षे मी बंद कुलुपत ठेवला होता तो बाहेर काढला.. त्याच्यावर साचलेली धूळ खिशातील रूमालानेच साफ केली.. जणू माझ्या मानावरची धूळ झाडून निघाल्यासारखं वाटलं.. त्या सगळ्यात काही जुने फोटो होते... ज्यात मी शाळेतील नाट्यलेखन स्पर्धेत बक्षीस मिळवलं होत.. आणि आईने मला उचलून घेतलं होतं.. कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत मला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पहिलं बक्षीस मिळालं होतं.. आणि सोबत बाबा होते.. फोटो काढतानाचा बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला आज सुद्धा आठवतो... पण तो उत्कृष्ट दिग्दर्शक आता मात्र फक्त त्या फोटो मध्येच उरला होता. खऱ्या आयुष्यात मात्र परिस्थितीच्या चक्रात कुठेतरी दूर फेकला गेला होता... मी ते फोटो बंद केले आणि पुन्हा बंद कुलुपात अगदी तळाला कुठेतरी लपवून ठेवले... जेणेकरून माझ्या मनातील भावना त्या स्वप्नांना पुन्हा वर न काढतील.. बऱ्याच वेळा आपली स्वप्नं ही आपली राहत नाहीत.. आपल्यापेक्षाही कोणीतरी जास्त ती स्वप्नं पूर्ण होण्याची वाट बघत असतं..


पण रिद्धीला भेटल्यानंतर तिच्याशी बोलल्यानंतर मी विचार करू लागलो होतो की, आपली स्वप्नं आपल्या आकांक्षा त्यांना जिवंत ठेवण्याची सुद्धा काही मार्ग आहेत.. पहिल्यांदाच माझी हिंम्मत झाली की.. माझ्या स्वप्नांपासून मी पळायला नको.. तर त्यांना आपल्या जीवनात सामावून घेऊन त्यांच्यासोबत पुढे जात राहावं.. कदाचित इथूनच माझ्या स्वप्नांना अर्थ मिळेल... कदाचित इथूनच माझ्या स्वप्नंना वाट मिळेल.. जिच्या मी शोधत होतो.. कदाचित हीच खोल गेलेली मुळं सावरततीळ या स्वप्न हरवलेल्या झाडाला जो आता तिशीच्या पार गेला होता आणि तळपत्या उन्हात वाळवून चालला होता.. हाच विचार करूम मी त्या फोटोंमधील एक फोटो काढून माझ्या ऑफिसमध्ये लावला होता..


एके दिवशी मी काही कामात गुंतलो होतो की, तेवढ्यात धडकन दरवाज्याचा आवाज आला.. मी वर पाहिलं तर रिद्धी उभी होती.. तिच्या चेहऱ्यावरचा रंग आज काही वेगळाच हिता.. काळ्या पांढऱ्या नक्षीचा पंजाबी ड्रेस, कपाळी पांढरी चकमकी टिकली, डोळ्यात तोच शांत भाव.. आणि हातात काहीतरी झाकलेलं ओझं...


मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं... "देशपांडे काका आहेत का?" ती म्हणाली.


"नाही, सर तर नाहीत. कोर्टात गेलेत. काही काम आहे का? मी काही मदत करू का??" ... मी म्हणालो..


"हो... ही माझ्या बाबांची पेटी आहे. ही ठेवा please.." रिद्धी म्हणाली. "माझा भाऊ येणार आहे पण त्यांना मी नाही देणार पेटी.. म्हणून मी इथे घेऊन आले... इथेच ठेवून जाते.."


"हे बघा.. अशा वस्तू आम्ही इथे ऑफिसमध्ये नाही ठेऊ शकत... आणि ही तर इतकी अमूल्य पेटी आहे.. आणि इथे रात्री कोणती security पण नसते.." मी म्हणालो.


"बरं मग तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा.. पण मी आता ही पेटी परत घरी नाही घेऊन जाऊ शकत.." ... रिद्धी आता थोड्या व्याकुळ आणि रडवेला स्वरात बोलत होती. वाटत होतं की कोणत्याही क्षणी रडू लागेल.


"हे बघा! देशपांडे सर येतील संध्याकाळी.. तेंव्हा बोला त्यांच्याशी.."


"अहो मी काकांची किती वाट बघू आणि कधीपर्यंत बघू..? आणि बोलणं तर झालंय ना आधीच.. आणि तुम्हाला पण माहिती आहेच की माझी केस..? तुम्ही पण आहात ना इथे..! मी सांगते तुम्हला ही पेटी तुम्ही घेऊन जा."


मी रिद्धीचं बोलणं ऐकून थक्क झालो. तिच्या नजरेतील शांत भाव आणि मनातील गोंधळ यांची एकमेकांसोबत स्पर्धा रंगलेली दिसत होती.. तिच्या बोलण्यातून तिच्या स्वप्नांचा उडालेला गोंधळ स्पष्ट ऐकू येते होता... मला माझी स्वप्नं इतक्या स्पष्ट दिसतील का? आणि मी कधी त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे टाकू शकेन का? रिद्धीच्या मनातील गोंधळ ऐकता ऐकता मी स्वतः हरवून गेलो.. वादळ हे फक्त भौतिक नसतं तर ते मानसिक सुद्धा असतं.. त्यावेळी मला जाणवलं..


रिद्धीची पेटी माझ्या घरी ठेवण्याविषयी ऐकून मी जरा अडचणीत सापडलो होतो. नाही म्हटलं तर ही रडू लागेल. मान्य केलं तर माहिती नाही देशपांडे सर काय बोलतील. पण आता ती समोरच होती आणि तिचा चेहरा बघता मी म्हणालो.. "बरं ठीक आहे! घेऊन जातो मी.. पण तुम्ही या.. बसा तरी..!"


माझं बोलणं ऐकताच ती शांत झाली आणि आत येऊन बसली. थोडा वेळ ऑफिसमध्ये शांतता पसरली. घड्याळाची टिक टिक स्पष्ट ऐकू येत होती. तेवढ्यात तिची नजर माझ्या फोटोवर पडली.


"हे तुम्ही आहात?" ... तिने फोटो बघत विचारलं.


"हो! कॉलेजमध्ये आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पहिलं बक्षीस मिळालं होतं मला.. आणि सोबत माझे बाबा."


"अरे वाह! छान.. मग तर तुम्ही अजूनच चांगल्या प्रकारे समजू शकता की मला.. माझ्यासाठी किती अमूल्य असेल ही पेटी.. ही फक्त पेटी नाही, तर माझ्या बाबांचं स्वप्न सुद्धा आहे.. त्यांचं स्वप्न होत की मी पेटी शिकावं आणि शिकते पण आहे.. रोज रियाज करते.. सकाळ.. संध्याकाळ.."


रिद्धी बोलत होती आणि मी शांतपणे ऐकून घेत होतो.. तिच्या बोलण्यावरून मला लक्षात येते होतं की, आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवयचं असेल तर यापेक्षा वेगळी गोष्टी काय असू शकते की ती स्वप्नं पूर्ण करावीत.. हाच विचार न राहून माझ्या मनाला चाटून जात होता..


रिद्धीचं बोलणं सतत मला आठवण करून देत होतं की, माझ्या स्वप्नांचं काय झालं...? की, एके दिवशी माझ्या shortfilm साठी (लघुपटासाठी) राष्ट्रीय पुरस्कार घ्यायला मला त्या लाल रंगाच्या कार्पेटवरून राष्ट्रपतींपर्यंत चालत जायचं होतं.. आणि माझा पहिला पुरस्कार त्या व्यक्तीला अर्पण करायचा होता, जिने माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवला होता.. माझी मैत्रीण डॉक्टर ममता..!!


चंद्राचं चांदणं थेट आमच्या अंगणात कधी पडलंच नव्हतं. पौर्णिमेच्या चंद्राला सुद्धा एकच दिवस मिळतो, स्वतःचं पूर्णत्व सिद्ध करायला.. तोच एक दिवससुद्धा कदाचीत प्रत्येकाच्या वाट्याला नसतो. कदाचीत मीच माझ्यातील नकारात्मकतेला अर्पण केली होती ती सर्व स्वप्नं.. काय मला माझ्या स्वप्नांची वाट पुन्हा चालायला हवी होती का? कदाचीत ज्या समाधानाच्या मी शोधत होतो ती वाट इथूनच तर सुरु होत नसेल? कदाचीत त्या वाटा.. ती स्वप्नं जी माझ्या आयुष्यापासून दूर होती, त्यामुळेच आयुष्यात काहीतरी हरवल्याची भावना नेहमी मला जाणवत होती.. कोणताही निष्कर्ष एकमेकांना पूरक नव्हता..


हाच सगळा विचार करत मी शांत बसलो होतो, तेंव्हा रिद्धी म्हणाली, "सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतेय, तुम्ही काहीतरी विचारात आहात वाटतं.. तुम्ही नका चिंता करू, मी घेऊन जाते ही पेटी परत घरी.." रिद्धी म्हणाली. "काल दादाचा फोन आला, म्हणून काही सुचेना... म्हणून सरळ इकडे घेऊन आले."


"नाही नाही.. तसं काही नाही, खरं तर तुमच्या बोलण्याने मला माझ्या स्वप्नांची आठवण करून दिली.. त्याच विचारात गेलो होतो.." मी म्हणालो.


"अच्छा..! तुमचं स्वप्नं! काय आहे..? .... मला पण सांगा." रिद्धी म्हणाली.


"चला.. वाटेत सांगतो." असं म्हणताच रिद्धीला आश्चर्य वाटलं..


"वाटेत..! कुठे जातोय आपण?" रिद्धी म्हणाली.


"माझ्या घरी!" माझ्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटलं होतं... माझा निर्णय झाला होता..


"चला.. माझ्या घरी जाऊया तुमची पेटी घेऊन.. जर तुमच्या स्वप्नांची वाट माझ्या घरातून जात असेल तर त्यासारखी आनंदाची काय गोष्ट.. आणि कदाचीत जाता जाता मला माझ्या स्वप्नांना शोधण्याची आणि पैलू पडल्याची संधी मिळेल.." ... असं म्हणून मी ४ वर्षांपासून कपाटात पडलेली नाट्यशास्त्राची पुस्तकं आणि एक clap board माझ्या बॅगेत ठेवला.. आणि माझ्या स्वप्नांच्या दुसऱ्या अंकात प्रवेश करण्यासाठी ऑफिसचा दरवाजा बंद केला.. आणि आम्ही घरी जायला निघालो...


आठवणींच्या एखाद्या संध्याकाळी मागे वळून पाहिल्यावर आयुष्याच्या रंगमंचावर स्वच्छंदी वावरताना मी स्वतःला पाहतो.. आणि आपसूकच डोळ्यांत पाणी तराळतं.. आयुष्याच्या अंगणात पडलेली सोनेरी सूर्य किरणं दिसतात आणि हसूही येतं... रडूही येतं...!!


कंपाऊंडचा गेट लावताना माझी नजर अंगणातील बकुळेच्या झाडाकडे गेली.. बकुळेच्या फुलांचा सुगंध घेता घेता मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी आठवल्या...


बकुळेच्या झाडाखाली, शुभ्र चांदण्यांत,

हृदयाची ओळख पटली, या सुगंधी क्षणांत,

त्या सगळया बकुळ फुलांची, शपथ तुला आहे !!



... अपूर्ण


       

५ टिप्पण्या: