रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Birthday Gift 🎁🎉

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

सोहम म्हणजेच सोनू... पुण्यालगत पर्वतीच्या पायथ्याशी त्याचं घर आहे. त्या दिवशी सोनू धावतच शाळेतून घरी आला. पाठीवरचं दप्तर तिथेच सोफ्यावर टाकून सोनू भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरकडे धावला आणि २९ ऑक्टोबरच्या तरखेवर त्याने स्केच पेनने गोल केला.. स्केच पेनने गोल केल्यानंतर त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक झळकली होती. कारण पुढच्या १०-१२ दिवसांनी म्हणजे ८ नोव्हेंबरला त्याचा १० वा वाढदिवस होता.


दोन तीन वेळा पुढच्या दिवसांचा हिशोब लावून तो कॅलेंडरचं पुढचं पान पलटणार तेवढ्यात सोनूच्या आईचा म्हणजेच सुनंदाचा आवाज आला.. "अरे... सोनू ... कितीदा सांगितलं तुला.. चपला.. बुटं.. घराबाहेर काढून ठेवीत जा... सगळी चपलांची घाण घरभर घेऊन फिरतोस तू... तुला काही कळतच नाही का?"

आईचा राग बघता सोनूने पटकन पायातून बूट काढले आणि दाराकडे फेकले.. आणि दुसऱ्या कॅलेंडरची पानं पलटली.. "कदाचीत यात वाढदिवस थोडा लवकर येईल.." सोनूच्या बालमनाने त्याच्या बीद्धीला साजेसा विचार केला. सोनूच्या घरात खूप कॅलेंडर आहेत. जवळपास घरातील प्रत्येक भिंतीवर.. ते सगळे कॅलेंडर भिंतींवरचे पोपडे आणि उडालेला रंग लपवण्याचा प्रयत्न करत होते.

दोन खोल्यांच्या घरात एक जुना सोफा, सोफ्याखाली एक दोन अर्धवट फाटक्या गोधड्या आणि एक दोन चादरी.. एक जुनं घड्याळ... त्या घड्याळाचा दोलक सुद्धा स्वतःच्या जगी गेली कित्येक वर्षे स्थिर होता.. पाण्यासाठी एक छोटासा माठ... थोडी भांडी आणि एक स्टोव्ह.. घरातील एकंदर साहित्य बघता सोनूच्या बाबांची घरची परिस्थिती तशी बेताचीच.. हे स्पष्ट दिसत होतं.

घरातील सर्व कॅलेंडरवर स्केच पेनने त्या दिवशीच्या तरखेवर गोल करून झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक निराळाच आनंद झळकला आणि तो खेळायला गेला.

थोड्या वेळाने सोनूचे बाबा सोपान कामावरून घरी आले. ते पुण्यात मिळेल तिथे बांधकाम मजुरीचं काम करतात. त्यामुळे नेहमी त्यांच्या हातात काम मिळेलच याची खात्री नसते. पण त्या दिवसात एक मोठ्या इमारतीचं काम चालू होतं. त्यामुळे काही महिन्यांची मजुरी पक्की होती.

सुनंदाने सोपानला पाणी देत विचारलं, "आज जरा जास्तच दमलेले दिसतात तुम्ही."

"होय, सायलाची चैन तुटली, सायकल ढकलतच यावं लागलं " सोपान पाण्याचा ग्लास घेत म्हणाले.

"किती वेळा सांगितलं की नवीन सायकल घ्या आता.. सोनूपेक्षा सुद्धा २ वर्षाने मोठी असेल ती सायकल.." सुनंदा म्हणाली..

"कुठून आणू नवीन सायकल? नवीन सायकलसाठी आठ - दहा हजार तरी लागतील की.. ही सायकल आहे सोबत म्हणून थोडा आराम तरी आहे, नाहीतर इतक्या लांब रोज रोज जायचं तर किती पैसे लागतील गाडी भाड्याला.." ... सोपान पाणी पिता पिता बोलत होते.

तेवढ्यात सोनू खेळून घरी आला. सोनूने लाडात येऊन बाबांना विचारलं.. "बाबा... बाबा... माझ्यासाठी काय आणलं?"

"हे तू रोज काय आणलं काय आणलं का विचारतो रे..? रोज काय आणू तुझ्यासाठी, जा जाऊन अभ्यास कर.." सोपान चिडक्या स्वरात सोनूला म्हणाले.. सोपानच्या आवाजात त्या दिवशीचा थकवा दिसत होता. तेंव्हा सोनू अभ्यास न करता गपचूप कोपऱ्यात जाऊन रुसून बसला होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी सोनू शाळेत पोहोचला.. हजेरी घेऊन झाल्यानंतर वर्गातील एक मुलगा सागर अचानक उभा राहिला, "बाई, आज माझा वाढदिवस आहे.."

बाईंच्या सांगण्यावरून सर्व मुलांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि बाई सगळ्यांचा गृहपाठ बघू लागल्या.. तेंव्हा सोनूला अचानक काहीतरी आठवलं.. काल बाबांसोबच्या रुसव्या फुगव्यात तो गृहपाठ करायलाच विसरला होता..

सोनूच्या उजव्या हातावर छडीचा प्रसाद मिळाला.. मधल्या सुट्टीची घंटा झाली. आपल्या लाल हाताला गोंजारत सोनू बाहेर आला तर त्याने पाहिलं की, त्याच्या वर्गातील अर्धी मुलं सागरला घेरून उभी होती.. सगळे त्याला विचारत होते की कोण कोण त्याला काय काय गिफ्ट देणार आहेत..

सागर सुद्धा ऐटीत सांगत होता, "बाबा सायकसल देणार, मामा रिमोटची कार, आई नवीन ड्रेस, काका क्रिकेट किट, आणि बरच काही.."

सगळं ऐकून सोनूच्या नजरेत एक चमक दिसली.. मनातच तो आतापर्यंत त्याला मिळालेल्या गिफ्टची यादी बनवू लागला... दोरीने ओढायचा लाकडाचा ट्रक, पतंग, दोन चार प्लास्टिकचे बॉल, एक दुसरं गोष्टीचं पुस्तक.. बस्स... पण हे सगळं सागरच्या गिफ्टसमोर अगदी सामान्यच होत.

सोनूने मनातच ठवरलं, यावेळी तो सुद्धा बाबांकडून एक अस गिफ्ट घेणार की, तो पण सगळ्या मित्रांना तितक्याच ऐटीत सांगू शकेल... सोनूचा पूर्ण दिवस याच विचारात निघून गेला.

संध्याकाळी शाळा सुटली. थंडीचे दिवस असल्याने सूर्य थोड्या लवकरच आपली ड्युटी संपवून अस्थाला गेला होता. पुढच्या काही दिवसात दिवाळी सुद्धा आली असल्याबे जागोजागी रस्त्यावर आकाश कंदील, लाईटची तोरणं, ररांगोळी, फटाके, पणत्या यांची दुकानं गजबजलेली होती.. सोनू रस्त्यावर इकडे तिकडे बघत घरी जात होता. त्या सगळ्या दिवाळीच्या गजबजाटात अचानक त्याची नजर एका खेळण्याच्या दुकानाकडे गेली. दुकानातील शोकेशच्या काचेवर एक विमान सोनूने पाहिलं. संध्याकाळच्या वेळी ते विमान सुद्धा त्यावरील संपूर्ण लाईटमुळे झगमगून गेलं होतं.. "वाह...! काय विमात आहे..." सोनू त्याकडे बघतच राहिला.. एक विमानतळ, धावपट्टी एअरपोर्टची इमारत, रिमोट वर उडणारं एक मोठं विमान आणि काही लहान मोठी विमानं विमानतळावर बाजूला पार्क केलेली. हेच तर ते गिफ्ट आहे जे सोनूला हवं होतं, सोनूने ठरवलं होतं की, यावेळी तो बाबांकडून हेच विमान मागेल.

सोनू त्याच विमानाचं स्वप्नं घेऊन घरी परतला. त्याला माहिती होतं की, बूट बाहेर काढूनच घरी जायचं आहे. आणि तो घरात जाऊन दप्तर तिथेच टाकून त्या दिवशीच्या तरखेवर स्केटच पेनने गोल करायला कॅलेंडरकडे गेला आणि त्या दिवसाला भूतकाळ घोषित करून त्या तारखेला स्केच पेनने गोल केलं आणि त्याने आईला विचारलं, "आई बाबा कधी येतील..?"

"काम पूर्ण झालं की येतील बाळा." सुनंदा अगदी प्रेमाने म्हणाली..

काही वेळाने सोनूने पुन्हा आईला विचारलं, "आई बाबा कधी येणार..?"

"एकदा सांगितलं ना, काम संपवून येतील ते.. सारखं विचारून काय लवकर येणार नाहीत.." सुनंदा थोड्या रागातच म्हणाली..

चप्पल बाहेर काढून काही जास्त फायदा होत नाही... सोनू मनातच म्हणाल.

तेवढ्यात सोपान आले. घराच्या बाहेर भिंतीला सायलाक लावून ते घरात आले... तेवढ्यात सोनू धावत त्यांच्याकडे गेला, "बाबा माझ्यासाठी ....."

"भोपळा आणलाय तुझ्यासाठी, रोज रोज काय आणू तुला.." सोपान सोनूचं बोलणं मध्येच तोडून म्हणाले..

"नाही नाही.. आज मी तुमच्यासाठी कायतरी आणलंय.." ... सोनूचं बोलणं ऐकून सोपानला आश्चर्य वाटलं.

"तू माझ्यासाठी काय आणलंयं? बघू तर.."

सागरने दिलेली दोन चॉकलेट सोनूने खिशातून काढली आणि एक सोपानच्या हातात दिलं आणि एक सुगंदाच्या.

चॉकलेटकडे बघून सोपान प्रश्नार्थक नजरेने म्हणाले, "हे कोणी दिलं?"

"माझ्या शाळेतल्या मित्राचा वाढदिवस होता आज, त्याने वाटल्या संपूर्ण वर्गात." ... सोनू हसत म्हणाला..

"मग तुझं चॉकलेट कुठं आहे?" सुनंदाने आपलं चॉकलेट पुन्हा सोनुकडे देत विचारलं..

"मी शाळेतच खाऊन टाकलं.." ... सोनू आपली बत्तीशी दाखवत म्हणाला..

थोडा वेळ गेल्यानंतर सोनू म्हणाला.. "बाबा तुम्हाला माहिती आहे ना ८ तारखेला काय आहे..?"

"हो माहिती आहे, यावेळी आमचा पगार उशिरा होणार आहे. कदाचित ८ तारीखलाच मिळेल." ... सोपान म्हणाले.

सोनूला या उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. "बाबा नाही, ते नाही... त्या दिवशी माझा वाढदिवस आहे. विसरला का तुम्ही?"

सोपानने एकदा शून्यात पाहिलं आणि म्हणाले, "अरे हो तुझा वाढदिवस पण आहे नाही का!"

"बाबा या वेळी तुम्ही वाढदिवसाला मला काय देणार?" ... सोनूने विचारलं.

"सगळंच तर दिलंय की तुला आणि आता काय वेगळं हवं..? तसंही आज दिलं तर उद्या ते एकतर तुटलेलं असतं किंवा शेजाऱ्यांच्या घरात... मागच्या वेळेला बॅट दिली होती.. दोन दिवस तरी वापरलीस का? तिसऱ्या दिवशी तो शेजारचा बंटी घेऊन गेला त्याने परत अणुनच नाही दिली.."

"आता काहीतरी वेगळं द्या.." सोनू म्हणाला..

"वेगळं...! वेगळं काय? आकाशातला चंद्र तोडून देऊ तुला.?" सोपान म्हणाले.

"नाही बाबा मला विमान हवंय.." सोनू म्हणाला.

"विमान..!"

"हो बाबा त्या काकांच्या खेळण्याच्या दुकानात आहे ते विमान, रिमोटचं.. आकाशात उडणारं.." सोनूने एका दिशेला बोट दाखवत सांगितलं.

लहान मुलांची निरागसता कमालीची वेगळी असते.. त्यांच्या लेखी आकाशातील चंद्र तारे सुद्धा बोटाने दाखवता येतील इतक्या जवळ असतात त्यांच्यासाठी.

"कशाला हवं विमान?" सोपानने विचारलं.

"खेळायला बाबा..!" सोनू म्हणाला..

"आता तुला विमान दिलं तर दुसऱ्या दिवशी त्याची चाकं पण जागेवर नसतील.. आणि म्हणे विमान हवं.." सोपान नकाराची घंटा वाजवत म्हणाला.

"नाही बाबा मी खूप सांभाळून ठेवेन." सोनूने विमान जपून वापरण्याचं आश्वासन दिलं.

"हे बघ मी खूप दमलोय आता.. तुझ्या विमानाचं नंतर बघू जा आता अभ्यासाला बस.. अभ्यास नको नसतं खेळ पाहिजे.."

सोपानच्या बोलण्याने सोनू गपचूप पुस्तक घेऊन बसला..

दुसऱ्या दिवशी सोनू शाळेत गेल्यावर सुनंदा सोपानला म्हणाली.. "काल सोनू म्हणत होता ते विमान द्या की त्याला घेऊन, वर्षातनं एकटाच तर हट्ट करतो तो."

"हे बघ कालच मी म्हणालोय की, या वेळेला पगार उशिरा येणार आहे. तेवढे पैसे आता नाहीत तर मी तरी काय करू?" सोपानने परिस्थितीची जाणीव करून देत सुनंदाला सांगितलं.

"तुम्ही एकदा ते विमान बघून तरी या.. कदाचित ते जास्ती महागडं नसलंही.." सुनंदा म्हणाली.

"ठीक आहे बघतो संध्याकाळी येताना.." काही क्षण विचार करून सोपान म्हणाले, "थोड्या दिवसांनी दिवाळी आहे, त्यासाठी सुद्धा खर्च आहेच की, घरी गोड-धोड करायला हवं, त्यासाठी पैसे लागतीलच की.." ...आणि सायकल घेऊन कामावर निघून गेले.

संध्याकाळी घरी परतताना सोपानला सकाळची विमानाची गोष्ट आठवली, आणि ते त्या खेळण्याच्या दुकानाकडे वळले.. "बघू तरी असं कोणतं विमान आहे ज्याचं वेड लागलंय सोनूला.." असा विचार करतच सोपान दुकानात शिरले.

दुकानात ते विमान शोकेशची शोभा वाढवत होतं, सोपनला ला सुद्धा वाटलं की खरच खूप सुंदर आहे ते विमान. पण त्या विमानाच्या संदर्यकडे बघण्यात जास्त वेळ घालवणं सोपणला पटत नव्हतं.. म्हणून पुढच्या क्षणी त्यांची नजर त्यावरच्या किमतीकडे गेली.. "२००० रुपये!! अरे देवा!! या प्लास्टिकच्या डब्यांची किंमत २००० रुपये..! कोणी वेडाच असेल जो यासाठी २००० रुपये मोजेल.." सोपान स्वतःच बडबड दुकानातून बाहेर पडले आणि सायकल घेऊन सरळ घरी पोहचले. घरी दारातच सोनू सोपानची वाट बघत उभा होता..

"दारात काय उभा आहेस? खेळायला नाही गेला?" सोपानने विचारलं.

"गेलो होतो, पण बॅटींग वरून भांडण झालं आणि बंटीने राजुची बॅट तोडली, म्हणून मॅच बंद झाली." ... सोनू म्हणसला.

सोपानने सोनूच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही.

"बाबा आई महणाली की, तुम्ही आज ते विमान बघायला जाणार म्हणून.. बघितलं का?" ... सोनूने उत्साहात विचारलं.. "आवडलं का तुम्हाला..?"

"हो, पण काही खास नाही वाटलं.." सोपानने अंगातील शर्ट भिंतीवरच्या खिळ्याला अडकवत उत्तर दिलं..

"बाबा, चांगलं आहे की, द्या की मला ते विमान" ... सोनूने हट्ट धरला.

"बघूया..!" सोपान काही क्षण विचार करून म्हणाले. "आता हट्ट बास कर आणि जा अभ्यासाला बस."

सोनूने बाबाच बोलणं ऐकलं आणि तो दप्तर उघडून बसला.. यावेळी सोनूने अभ्यास मनापासून केला सुद्धा.. रात्री सोनू झोपल्यानंतर सुनंदाने सोपानला विचारलं.. "मग तुम्ही देणार ना विमान सोनुला..?"

सोपानने उदास नजरेनं सुनंदाकडे पाहिलं, आणि म्हणाला.. "दोन हजार रुपये किंमत आहे त्याची. कुठून येतील एवढे पैसे आपल्याकडे..?"

हे ऐकून सुनंदा सुद्धा शांत झाली, तिला पुढे काय बोलायचं कळेना. तिने एक वेळ सोनूकडे पाहिलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून ती सुद्धा झोपी गेली.

सोनू आणि सुनंदा आता गाढ झोपी गेले होते. पण सोपानच्या डोळ्यांसमोर मात्र सोनूच्या स्वप्नातील विमान दिसत होतं. त्याची नजर त्या कॅलेंडर वरच्या गोल गोल खुणांकडे गेली. कॅलेंडरवरच्या गोल गोल खुणा सोपानसाठी नवीन नव्हत्या.. सोन्याच्या वाढदिवसाच्या आदल्या पंधरा दिवसापासून नेहमी कॅलेंडरवर गोल खुणा बघण्याची सोपानाला सवय होती, पण आज मात्र त्या गोल गोल खुणा सोपानला काही वेगळ्याच दिसत होत्या..

दुसऱ्या दिवशी सोनूने संपूर्ण वर्गात सांगून टाकलं होतं की, त्याच्या वाढदिवसाला त्याला नवीन विमान मिळणार आहे. वर्गातील बऱ्याच मुलांना आश्चर्य वाटलं, कारण वर्गातील जवळपास सगळ्याच मुलांची ते विमान मिळवण्याची इच्छा होती. आणि सोनुला ते आला मिळणार होतं.

त्यातलाच एक मुलगा उपहासाने सोनुला म्हणाला, "तुला माहिती तरी आहे त्या विमानाची किंमत किती आहे.. दोन हजार रुपये!! मी माझ्या वडिलांना किती दिवस मागे लागलोय विमान घेऊन द्या.. पण त्यांनी मला नाही दिलं आणि तुझे बाबा तुला घेऊन देणार... चल जा.. काहीही बोलतो..!"

"तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्या बाबांमध्ये खूप फरक आहे, माझे बाबा जगातले सगळ्यात चांगले बाबा आहेत.. ८ तारीखला या सगळेजण संध्याकाळी मग बघा.." सोनूने अगदी आत्मविश्वासाने सांगितलं.

दिवसामागून दिवस जात राहिले आणि सोनूचा उत्साह सुद्धा वाढत गेला.. आणि कॅलेंडर वरच्या तारखांवरचे गोल एक एक करून वाढत गेले.

सोनू आपल्या विचारांमध्ये त्याचं विमान सोबत घेऊन जगत होता. ते विमान.. धावपट्टी.. ती लहान लहान विमानं... विमानतळ... सगळं काही त्याच्या डोळ्यांसमोर दिसत होतं.

तो रोज त्या खेळण्याच्या दुकानाजवळ जायचा आणि डोळे भरून त्या विमानाला बघायचा. कधी कधी तर तो दुकानात शिरून दुकान वाल्या काकांकडून त्या विमाना बद्दल माहिती घ्यायचा, ... "काका हे विमान कसं चालतं? हे आकाशात सुद्धा उडतं का? त्यावरच्या सगळ्या लाईट पेटतात का??"

एक दिवस दुकानवाल्या काकांनी वैतागून त्याला विचारलं, "अरे तुला घ्यायचं आहे का..? की उगाचच फक्त चौकशी करतो आहेस.."

दुकानदाराचे शब्द ऐकून सोनू गांगरला.. पण दारिद्रय लहानग्या जीवलाही धिटाई शिकवते. तो लगेच सावरुन म्हणाला, "अहो मी कशाला घेऊ हे विमान.. माझे बाबा घेऊन देणार आहेत माझ्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणून."

"हे विमान आणि तुझे बाबा घेऊन देणार..?" डोळ्यांसमोर प्रश्नचिन्ह ठेवून दुकानदाराने सोनूला विचारलं..

बघता बघता ७ तारीख उजाडली. सकाळी सोनू शाळेत जाण्यासाठी तयार होत होता. आणि शाळेत जाता जाता त्याने त्या दुकानासमोर जाऊन दुकानाच्या काचेत नजर टाकली.

"फक्त आजच्या दिवसासाठी हे विमान काचेमध्ये असणार. उद्या तर ते माझ्या घरी असेल.." ... असं काहीतरी स्वतः बडबड सोनू शाळेकडे निघाला. तेवढ्यात दुकानासमोर एक कार येऊन थांबली. त्या कारमधून एक सूट बूट घातलेली व्यक्ती आणि एक सोनूच्याच वयाचा लहान मुलगा बाहेर पडले आणि दुकानात शिरले. त्या लहान मुलाने आपल्या वडिलांना त्या विमानाकडे बोट दाखवलं. ती सूटबूट वाली व्यक्तीसुद्धा त्या विमानाकडेच बोट दाखवून त्या दुकानवाल्या काकांसोबत काहीतरी बोलत होती. हे दृश्य बघून सोनूच्या हृदयाचे ठोके जोरजोरात धडकत होते.

सोनूने पाहिलं की, तो लहान मुलगा आताच ते विमान खरेदी करण्यासाठी बाबांकडे हट्ट करत होता.

"अरे बाळा तुझा वाढदिवस तर पुढच्या आठवड्यात आहे, ४-५ दिवसांनी घेऊ आपण." त्याचे वडील त्याला समजावत होते आणि दोघेही दुकानाच्या बाहेर आले. दोघांना मोकळ्या हाती बाहेर येताना बघून सोनूचा जीव भांड्यात पडला.

"उद्या माझे बाबा हे विमान घेऊन जाणार आहेत मग तुला काय ठेंगा मिळणार...." सोनू स्वतःशीच बोलत होता आणि खूश होऊन शाळेकडे निघून गेला.

त्या सगळ्या आनंदी आणि उत्साही वातावरणात तो दिवस कसा तरी निघून गेला.


८ नोव्हेंबरचा दिवस उजाडला.. आज सोनूचा वाढदिवस..! सकाळी सकाळी सोनूच्या वाढदिवसासाठी सुनंदाने त्याच्या आवडीची तांदळाची खीर बनवली होती.. पोट भरून सोनूने खीर खाल्ली, नाष्टा केला आणि तो शाळेत निघाला.

सोनूने शाळेत जाता जाता वडिलांना आठवण करून दिली, "बाबा आज माझा वाढदिवस आहे." सोपानने सुद्धा त्याच्या डोक्यावर हात ठेऊन आशीर्वाद दिला आणि म्हणाले .. "हो माहितीये की.."

सोनू शाळेला निघून गेला होता. सोपानने कॅलेंडरकडे बघितलं, ८ नोव्हेंबर या तारखेवर त्यांच्या नजरा जशा की एकदम खिळून राहिल्या होत्या.

सोपानने सुनंदाकडे बघितलं, दोघांच्याही नजरेमध्ये फक्त एक हतबलता दिसत होती. काहीतरी वेगळेपणा त्यांच्या नजरेत होता. स्वतःच्या असहाय्यतेचा जास्त विचार न करता डोळ्यांमध्ये काहीतरी स्वप्न घेऊन सोपान सायकल घेऊन कामावर निघाले.

तिकडे सोनू शाळेकडे जाता जाता त्याच दुकानाच्या काचेमध्ये नजर टाकून पुढे गेला. ते विमान आत्तासुद्धा त्या शोकेशमध्ये काचेवरची शोभा वाढवत होतं. त्याला खात्री पटली की, त्याचं विमान सुरक्षित आहे. त्याला कोणीच घेऊन गेलं नव्हतं. त्याने जरा सुटकेचा निश्वास टाकला आणि तो आनंदातच शाळेकडे निघाला.

शाळेत दिवसभर सोनू सगळ्या मित्रांना सांगत होता की, "संध्याकाळी या माझ्या वाढदिवसाला आणि माझं नवीन विमान बघा.."

त्या दिवशी त्याचं कुठल्याच वर्गामध्ये लक्ष लागत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी सोनूला फक्त विमातच दिसत होतं.

शाळेची घंटा वाजली. शाळा सुटली. आणि सोनूने दप्तर उचललं. तो धावतच घरी निघाला.. सोनूने जाता जाता दुकानातल्या काचेकडे पाहिलं तर तिथे ते विमान त्याला दिसलं नव्हतं.. त्याला पूर्ण खात्री झाली की, ते विमान आता त्याची घरी वाट बघत आहे.

सोनू तिथून निघणार तेवढ्यातच, त्याने पाहिलं की, तोच त्या दिवशीचा मुलगा आणि त्याचे वडील त्या दुकानातून बाहेर येत होते. आणि त्या मुलाच्या हातात होतं तेच विमान... जे तो घेण्यासाठी जिद्द करत होता आणि दोघेही गाडीत बसून निघून गेले. सोनूच्या पायाखालची जमीन सरकली.. सोनूच्या डोळ्यात पाणी ताराळलं होतं. तो तिथेच थांबून ती कार दिसेनाशी होईपर्यंत फक्त त्या कारला निघून जाताना बघत राहिला.

"हे असं कसं झालं? ते विमान तर माझं होतं.. त्याला अजून कोणी कसं काय घेऊन जाऊ शकतं..?" सोनू तिथेच उभा राहून स्वतःशीच भांडत होता.. जवळपास एक आठवडा ज्या विमानाचं स्वप्न घेऊन सोनू जगत होता तेच विमान आज त्याच्या वाढदिवसा दिवशी कोणीतरी दुसराच घेऊन गेला होता.. सोनू पूर्णपणे हतबल झाला होता.. तो बराच वेळ तिथे उभा राहिला.. त्याला वाटत होतं की, तो कुठलतरी एक वाईट स्वप्न बघतोय आणि काही क्षणातच त्याला जाग येईल त्या स्वप्नातून... पण ते स्वप्न नव्हतं.. सत्य होतं.. एक कडवं सत्य... जे पचवणं त्याला खूप जड जात होतं.. तेच कडव सत्य पचवण्याचा प्रयत्न करत सोनू घरी परत आला.

सोनू घरी पोहोचताच त्याला बघून सुनंदा त्याला म्हणाली, "बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय..?" सोनूच्या उत्तराची वाट न बघताच तिने सोफ्याखाली दडवलेली एक प्लास्टिकची बॅट त्याच्या हातात दिली.

कदाचित सोनूला याच प्लास्टिकच्या बॅटवरच आता समाधान मानावं लागणार होतं. चेहऱ्यावर खोटं हसू आणत हातातील बॅटकडे बघत सोनू म्हणाला.. "मस्त आहे आई बॅट.."

सोनू हातातील बॅटकडे शून्य नजरेने बघत विमानाचा विचार करत होता, तेवढ्यात दारावर टक टक आवाज आला.. सुनंदाने दार उघडलं.. दारात सोनूचे बाबा उभे होते.. दारात सोपानला बघून सुनंदाला एकदम आश्चर्य वाटलं.. ती ओठांमधील शब्द ओठांमध्येच अडखळत म्हणाली.. "अहो..! तुम्ही.... हे काय... कसं...?"

सोनू हातातील बेट बघत भिंतीकडे तोंड करून बसला होता. त्याने मागे वळून पाहिलं तर बाबांच्या हातात तेच होतं ज्याचं कित्येक दिवसांपासून सोनू स्वप्न बघत जगत होता.. सोनूचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याला वाटत होतं की, तो पुन्हा एकदा एक सुंदर स्वप्न बघत आहे. पण ते स्वप्न नव्हतं... ते सुद्धा एक सत्य होतं... त्याच्या वडिलांच्या हातात होतं तेच विमान जे सोनूला कित्येक दिवसापासून व्हावं होतं.. तेच विमान जे काही मिनिटांपूर्वी त्याने स्वतः पासून दूर जाताना पाहिलं होतं.... पण आता ते विमान त्याच्या बाबांच्या हातात होतं, अगदी त्याच्यासमोर... सोनूच्या डोळ्यांमध्ये त्या क्षणांचा आनंद मावत नव्हता..

सोनू धावतच बाबांजवळ आला आणि म्हणाला, "बाबा हे विमान तर तो मुलगा घेऊन गेला होता.. तुम्हाला परत कसं मिळालं..?"

सोपानने सोनूच्या डोक्यावर हात ठेवला, केसांमध्ये हात फिरवत ते म्हणाले.. "दुकानात एका प्रकारचं एकच विमान असणार का..? वेडा कुठला!!" ... सोपानने एक पैशांचं पाकीट सुनंदाच्या हातात दिलं आणि म्हणाले, "काही दिवसांनी दिवाळी पण आहे, बाजार भर दिवाळीचा.."

सोनू स्वतःला सावरू शकला नाही, त्याने पटकन बाबांना मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागला. सोपानने सुद्धा डोळ्यांमधले पाणी पापण्यांच्या आतच अडवलं होतं. सुनंदाच्या नजरेत सुद्धा ओलावा तितकाच दिसत होता. तिने हातातील पाकिडकडे पाहिलं तेंव्हा तिच्या डोळ्यांतील एक थेंब त्या पाकिटावर पडला आणि पडताक्षणी विरून गेला..

संध्याकाळी सोनूचे सगळे मित्र त्याच्या वाढदिवसासाठी त्याच्या घरी आले होते. सोनूने आपलं नवीन विमान आणि आईने दिलेले नवीन बॅट सगळ्या मित्रांना अगदी उत्साहाने दाखवली. सर्व मित्र सोनूच्या आनंदात सहभागी झाले.

वाढदिवस झाल्यानंतर त्यारात्री उशिरापर्यंत सोनू विमानासोबत एकटाच खेळत बसला होता. असं वाटत होतं की, सोनूला ते विमान त्या दिवशी संपूर्ण मनामध्ये उतरवून घ्यायचं होतं. थोड्या उशिरा सोपान सोनूला ओरडले.. "रात्रभर खेळत बसणार आहेस का आता? झोप... उद्या सकाळी लवकर शाळेत पण जायचंय."

तेंव्हा कुठे सोनूने विमान बाजूला ठेवलं आणि संपूर्ण विमान डोळ्यांत साठवून तो झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी सोनूला उठायला थोडा उशीर झाला. शाळेत जाण्यासाठी त्याला बराच उशीर होत होता. सोपान सुद्धा कामावर जायला तयार होत होते. तेवढ्यात सोनूने मागून सोपानला आवाज दिला... "बाबा... बाबा थांबा.. मी पण येतोय तुमच्यासोबत.. आज उशीर झाला मला."

"रात्रभर खेळत बसला होतास ना.. म्हणून झाला उशीर.. चल आवर लवकर.." ... सोपान जरा चढ्या आवाजातच म्हणाले.

दोघेही घरातून बाहेर निघाले. सोपान पुढे चालू लागले.. तेवढ्यात सोनू अचानक जागीच थांबला.. सोपानने मागे वळून पाहिलं.. आणि म्हणाले, "अरे काय झालं, चल लवकर..!"

सोनूने आजूबाजूला पाहिलं.. आणि शांत आवाजात महालाला, "बाबा तुमची सायकल..?"

"अरे... ती.. चोरी झाली.." सोपान कसतरी स्वतःला सावरत म्हणाले.

"काय, पण कसं?" सोनू जवळजवळ ओरडतच म्हणाला..

"अरे चोराला आवडली असेल माझी सायकल.. घेऊन गेला तो.. तू काय पोलीस आहेस का? तुला सगळं माहिती असायला.. चल लवकर, उशीर झालाय ना आधीच." ... एवढं बोलून सोपान शून्य नजरेने समोर बघत जलद पावलांनी चालू लागले. सोनू पुढे काही बोलला नाही, त्यांच्या मागून त्यांच्या सावलीचा पाठलाग करत आपल्या वडिलांच्या पावकडे बघत बघत त्यांच्या पावलावर पाऊल ठवेत खाली मान घालून चालत राहिला.. चालता चालता सोनूने रस्त्यावर असलेल्या रांगोळीच्या स्टॉलकडे पाहिलं तर, ते सर्व रांगोळीचे रंग सोनूच्या नजरेला रंगहीन दिसले.

... अपूर्ण




       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा