शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

मन सुद्ध !!

प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ट्रेनने दादर सोडलं. ट्रेन चालू होताच धावत धावत ५०-५५ वयाचे एक गृहस्थ लेडिज डब्यात चढले. डोळे अगदी डबडबलेले, चेहरा त्रासलेला, चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. एरवी असं कोणी लेडीज डब्बायत चढलं तर बायकांचा एकदम गदारोळ सुरु होतो. उतरो उतरो, असा त्रागाही करू लागतात. पण या भल्या माणसाकडे पाहून सगळ्याजणी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

ते गृहस्थ आत येऊन एका मोकळ्या बाकड्यावर बसले. खिडकीतून बाहेर एकटक पाहत होते. डोळ्यातून येणारं पाणी लपवायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही.. डोळ्यांत ताराळलेलं पाणी गलांवरून ओघळून खाली उतरलं होतं.. ते बघून समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एक मुलीने त्यांना स्वतःहून विचारलं, "काय.. झालं? रडताय का तुम्ही??"

या अनोळखी जगात कोणीतरी आपली चौकशी करतंय हे बघून त्यांना हुंदका अनावर झाला.. ते म्हणाले, "केईएममध्ये हिला अॅडमिट केलंय अन् टाटामध्ये थोरला मुलगा व्हेंटिलेटरवर आहे.. आधी मुलाला कोरोनाने गाठलं, आणि त्याचा धसका घेऊन हिची सुद्धा प्रकृती बिघडली.."

त्या काकांच्या शब्दांतील ओलावा बघितला तर कित्येक दिवसांनी त्यांना कोणीतरी आपुलकीचं भेटलं आहे आणि ते आपलं मन मोकळं करत आहेत असं जाणवलं.. स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ते सांगत होते..

"दोघींना होणारा त्रास पाहून सकाळपासून माझं मला काही सुचत नाही. एकीकडे हिच्यासाठी जीव तुटतो, तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क तोंडावर लावलेला मुलाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही.. पण मी घरातला कर्ता पुरुष.. मला कुणाला सांगता येत नाही. खरं तर रडायचं होतं मोकळेपणाने.. म्हणून ठरवून लेडिज डब्यात चढलो.."

डब्ब्यात फारशी गर्दी नव्हती. प्रत्येक बाकड्यावर मोजक्याच स्त्रिया मुली बसल्या होत्या.. त्या काकांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून काहीजणी काकांच्या जवळ येऊन बसल्या..

काकांनी खिशातून रुमाल काढला आणि चष्माच्या आतून डोळे टिपले.. काही जणींनी बॅगेतलं चॉकलेट दिलं, काहींनी पाण्याची बाटली पुढे केली.. काका थोडे सावरले.. म्हणाले, "आपल्यात पुरुष रडत नाही, खरं तर त्याने रडायचं नसतंच. पण तुम्हा मुळींच मन आणि आम्हा पुरुषांचं मन देवाने वेगवेगळ नाही ना बनवलं.. मन असतंच की आम्हालाही.."

त्या काकांचं बोलणं ऐकून तिथेच बाजूला बसलेल्या एका महिलेने कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने स्वतःचे डोळे टिपले..

"माझ्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्या दोघांनीही होणारा त्रास पाहून माझं आजवर खंबीर असणारं मन जरा हेलावलंय. लेडिज डब्ब्यात चढलो म्हटल्यावर तुम्ही आरडाओरडा कराल, असा विचारही आला नाही.. उलट तुम्ही सगळ्याजणी विचारपूस करतायत.. थॅक्स.."

काकांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमालाने संपूर्ण चेहरा पुसला.

खरच पुरुषांना इतकं अवघड असतं का रडणं? रडून मन मोकळं करणं..?? भगवंतानि मन सगळ्यांना सारखाच दिलं असेल ना.. सगळ्यांसाठी कायम खंबीर असलेल्या त्या कर्त्या पुरुषांचही जगणं समजून घ्यायला पाहिजे की कोणीतरी.

विलेपार्ले येताच काका उतरून निघून गेले.. ते उतरताना त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्याचं जाणवलं. आणि जाता जाता डब्यातील प्रत्येक महिलेला स्त्रियांना ते काका अप्रत्यक्षपणे सांगून गेले की, तुम्ही मुलांना वाढवताना त्यांना जरूर सांग, पुरुषानेही मोकळेपणाने रडायचं असतं. हक्काने कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून मनातलं सांगायचं असतं. मन मोकळं झालं नाही तर हृदयावर एक बॉम्ब घेऊन जगण्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो..


.. अपूर्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा