शनिवार, १७ जून, २०२३

आई.. ❤️

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.


प्रस्तावना -
जवळपास दोन अडीज वर्षांच्या विश्रांती नंतर पुन्हा एक ब्लॉग आपल्यासाठी.

या कथेतील "सतिश" ही केवळ एक व्यक्ती नसून, संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे जो आपल्या आईपासून आणि आपल्या घरापासून दूर राहतो.

मी हा ब्लॉग माझ्या त्या मैत्रिणीला समर्पित करतो जिने काही महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. मैत्रीण असली तरीही मी तिची तुलना "आई" सोबत करणार नाही पण तिच्या वाट्याचं फळ तिच्या पदरात नाही टाकलं तर तिने माझ्यासाठी केलेल्या कृतार्थतेला मी कुठेतरी विसरून गेल्यासारखं होईल.
 
विशेष आभार -
शैलेश सावंत, सुरज परमेकर, निहारीका किरवीड आणि शंतमी पाटील.

 


... सकाळी साडे सहा - सात ची वेळ. शेजारी चालू असलेल्या कार्यक्रमाची गाणी लाऊड स्पीकरवर गेले दोन दिवस सकाळ संध्याकाळ वाजत होती. खिडकीतून येणारा आवाज थांबविण्यासाठी खिडक्यांवर उशा बांधून रात्रीपासूनच सतिशने तयारी केली होती. थोडा फार गाण्यांचा आवाज कानांवर पडत असताना सुद्धा तो आपल्या स्वप्नांमध्ये आकाशात चंद्र चांदण्यांसोबत बेधुंदपणे फिरत होता. तेवढ्यात अचानक कुठल्याशा आवाजाने एका चांदणी सोबत गप्पा मारत असलेला सतिश धाडकन अंथरुणात परतला. खिडकीवर लावलेल्या उशा बाजूला सारत आई म्हणाली, "सतिश, उठ आता सात वाजले."


सगळ्या आई मंडळींचं काही कळतच नाही.. सकाळी जर त्यांना ७ वाजता उठव म्हणून सांगितलं तर ६ वाजताच उठवायला येतील आणि ८ वाजले म्हणतील.

"अरे आज वाढदिवस ना तुझा? निदान आजच्या दिवशी तरी लवकर उठावं"

डोळ्यात अर्धवट झोप असलेल्या सतिशच्या कानांवर आईचे शब्द धडकत होते. "उठ लवकर, तयारी करून देवासमोर दिवा लााव. चल उठ बाळा.."

आईचे शब्द ऐकून चिडलेला सतिश गडबडीत उठून बसला. खिडकीतून येणाऱ्या किरणांकडे बघून डोळे मिचकावत तो म्हणाला, "काय करतेस आई, निदान आज तरी झोपू दे की.."

आईने सतिशचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि टेबलवरचा कप उचलून ती निघून गेली. जो कप माहिती नाही सतिशने कधीचा चहा पिऊन तिथेच ठेवला होता.

आई खोलीतून निघून जाताच सतिशने पुन्हा कानांवर हात ठेऊन झोपायचा प्रयत्न केला, पण खिडकीतून येणाऱ्या आवाजाने त्याला झोपू दिले नाही. नाईलाजाने त्याची पावलं बाथरुमच्या दिशेने वळली.

सांगलीच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयात कला शाखेत शिकणाऱ्या सतिशचं आणि कॉलेजच्या वेळेचं गणित तसं कधी जुळलंच नव्हतं, पण त्याबद्दल त्याला कधीच काही वाटलं नाही. मुळात कॉलेजच्या काही तासांना तो स्वतःच उशिरा जायचा, तर काही तासाचे शिक्षक स्वतःच त्याला बाहेर काढायचे. पण ड्रॉईंगचा तास आणि नाटकाच्या तालमी कधीच त्याने चुकवल्या नव्हत्या. गणितातील सूत्रं, भूमिती मधील सिद्धता, रसायन शास्त्रामधील संयुगं कधी त्याला जमलीच नाहीत, पण सतिशची ड्रॉईंग आणि नाट्य शास्त्र या विषयातील गोडी अवीट होती.

आयुष्याला कंटाळलेल्या भावात अंघोळ आवरून कपाटातून इथे तिथे पडलेले कपडे त्याने कसे तरी अंगावर गुंडाळले आणि तो दिवाण खाण्यात आला. आईने नाश्त्याची प्लेट पुढे करताच सतिश पुन्हा हिरमुसला.

"आई, काय हे, आज सुद्धा मेथीचे पराठे ? मला नाही आवडत. आज तरी वेगळं काहीतरी करायचं होतं."

"बाबांना आवडतात ना मेथीचे पराठे.. म्हणून केले.." ... हिरव्या चटणीचा डब्बा स्वयंपाकघरातून घेऊन येताना आई म्हणाली... "आज नुसते मेथीचे नाहीत.. तर त्यात पनीर सुद्धा आहे.." चमचाभर चटणी सतिशच्या प्लेटमध्ये वाढत ती म्हणाली.

आईची पाककृती ऐकून सतिश अजूनच चिडला.

"तुला काही कळतं की नाही, पराठ्यामध्ये पनीर कोण घालतं का..?" ... सतिशच्या बोलण्याने आईला थोडं वाईट वाटलं होतं. तसही आपली नाराजी लपवणं ह्या आयांना चांगलच जमतं. सतिशचं बोलणं मनावर न घेता ती म्हणाली, "तुला का आवडत नाहीत हे पराठे कळत नाही, तुझ्या बाबांनी तर हेच पराठे खाऊनच मला पसंत केलं होतं.."

पराठ्या बद्दलची ही स्टोरी घरात कितीतरी वेळा सतिशने ऐकली होती.. "आई, नाही ऐकायची मला तुमच्या पराठ्याची गोष्ट.." ... सतिश जरा चिडक्या स्वरात म्हणाला.. "आज माझा वाढदिवस आहे तर आज तरी काही वेगळं करायचं ना.." ... सतिशने प्लेटमधील पराठा चिमटीने उचलला, "हे बघ.. किती तेल गळतंय यातून, मला नको, खा तूच.."

सतिशच्या ताटातील पराठा तसात राहिला. दोन-तीन पराठे स्वयंपाघरात चुलीवर शिल्लक होते. आईने चष्मा सावारण्याचं नाटक करत पाणावलेले डोळे कोणाच्याही नकळत पुसून टाकले, आणि सतिशच्या ताटातील पराठा घेऊन स्वयंपाकघरात निघून गेली.

सतिशची आई अगदी अन्नपूर्णाच... वरणाची डाळ आणि भाताचे तांदूळ आईच्या हातून शिजायला पडले की आपोआपच त्यातून पंच पकवानं तयार व्हायची. कौटुंबिक कार्यक्रमात तिने सढळ हाताने पाणी जरी वाढलं तरी ते चवीचं लागायचं.
 
सतिशचे बाबा ऑफिसला गेले होते आणि सतिश कॉलेजला. आईला घरातील कामांमध्ये एकटीलाच आपला दिवस घालवावा लागत होता. ना तिच्याकडे स्मार्टफोन होता ना कोणतही सोशल मीडिया. खरं तर आपली ही शेवटचीच पिढी आहे ज्यांचे आई वडिल कुठेच सोशल मीडियावर दिसत नाहीत.

किचनमधली थोडी कामं, बाजार, आणि बरच काही. तिच्या कामांची कधी तिने यादी नव्हती करून ठेवली. तसही कोण आई आपल्या कामांची यादी करते. प्रत्येक आई साठी तिच्या घरची कामं म्हणजे निस्वार्थी पणे पार पाडायच्या जबाबदाऱ्याच असतात. जसं की कुठेच लिहिलेलं नसतं की सकाळी उठल्यावर सगळ्यांसाठी चहा नाश्ता करून ठेवायचा. कुठेच लिहिलेलं नसतं की घरची सफाई करायची. कुठेच नसतं लिहीलं की घरच्या मंडळींचे कपडे धुऊन त्यांना इस्त्री करून ठेवायची. कोणत्याच कॅलेंडरमध्ये आई साठी सुट्टीचा दिवस सुद्धा कधी कोणी नोंदवलेलानाही.

आईला मुळात स्वतःची ओळख सुद्धा नसते. ती कोणाची तरी आई असू शकते, कोणाची तरी बायको असते, कोणाची सून असते तर कोणाची मुलगी, पण ती स्वतः ह्या चार पाच नात्यांमध्ये अगदी दडून गेलेली असते. काही गोष्टी लिहून ठेवल्या जात नाहीत, त्या तशाच असतात. का तर त्या असतात. त्यांना तुम्ही आम्ही बदलू शकत नाही.

सकाळी सतिशचं बोलणं थोडं आईला लागलं होतं. पण कदाचीत तिला सवयच झाली असावी की, घरच्या कामाच्या रगाड्यात ही गोष्ट सुद्धा तिच्या मनातून निघून गेली होती.

तिची त्या संध्याकाळसाठी उत्सुकता थोडी वाढली होती. आज सतिशचा वाढदिवस. आज ती सतिशसाठी खूप छान छान जेवण बनवणार होती. का...? तर फक्त एका कौतुकासाठी. तिची एकच अपेक्षा असेल की सतिशने फक्त एकदा म्हणावं की, आई खूप छान जेवण बनलं आहे.. मग काय.. सतिशच्या त्याच चार शब्दांमुळे पुढचे कित्येक दिवस ती न थकता पुन्हा लढायला सज्य होती.

घरातील सर्व कामं आवरून झाल्यावर ती बाजारात निघाली. थकवा, कंटाळा या गोष्टी आईच्या शब्दकोशात कधी दिसल्याच नाहीत. तर त्यांना तिनं कधी जवळच केलं नव्हतं. प्रत्येक आईकडे सगळी कामं पूर्ण झाली तरीही अजून खूप काही करण्याची ताकद नेहमीच शिल्लख राहते. संध्याकळच्या तयारी साठी लागणारं साहित्य घेऊन आई घरी आली. लहानग्या सतिशसाठी त्या वेळी जितकी तयारी करत होती तितकीच तयारी आज सुद्धा आईने केली होती. सगळ्या आयांवर एक संशोधन केलं पाहिजे, की त्यांच्या ताकदीचं नेमकं गुपित तरी काय असावं.

संध्याकाळी दारावरची बेल वाजली. आईने खूप उत्सहात दरवाजा उघडला. घरात येताच बाबांच्या चेहऱ्यावर एक स्मित झळकलं. घरातील सजावट बघून ते हसत म्हणाले.. "हे काय केलंय.."

आई तितक्याच उत्सहात म्हणाली.. "असुद्या.. आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे.. म्हणून थोडी तयारी.."

"आता तो लहान आहे का इतकी सजावट करायला ?" ...हातातील घड्याळ काढून टेबलवर ठेवत बाबा म्हणाले.

पण आईचं हळवं मन त्याला कोण काय करणार. तिच्यासाठी करावी तेवढी तयारी कमीच होती. रात्री आठ साडेआठ पर्यंत सतिश घरी आला नाही, तेंव्हा तिने सतिशला फोन लावला. "बाळा कुठे आहेस..? तुझ्यासाठी तयारी करून ठेवली आहे. तांदळाची खीर पण केलीय, ये लवकर."

"आई मी मित्रांसोबत आहे, येतो थोड्या वेळात.." ... पलीकडून सतिशचा आवाज आला.

"तुझ्या मित्रांना पण बोलाव की मग घरी.." ... पण आईचं बोलणं न ऐकताच सतिशने फोन ठेवलाहोता. आई फोन शेजारीच बसून सतिशची वाट बघत राहिली. बाबांना दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असल्याने ते जेऊन झोपून गेले होते. घड्याळात १० वाजून गेले.. आईने पुन्हा एकदा सतिशला फोन केला, पण फोन बंद झाला होता. आईच्या नजरा दरवाज्याकडे लागून होत्या. खूप वेळाने जवळपास ११ वाजता दारावरची बेल वाजली. आणि दिवसभराच्या कामामुळे आईच्या थकलेल्या डोळ्यात एक चमक दिसली.

सतिश घरी पोहचता पोहचता रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. आईने गडबडीत फ्रिजमधून केक काढला आणि म्हणाली.. "बाळा, आज तरी घरी लवकर ययाचं होतं.."

"आई, मी म्हणालो होतो ना उशीर होईल.." ... सतिशने मोबाईल चार्जिंगला लावत उत्तर दिलं.

आईने सतिशच्या केसात हात फिरवला.. "चल केक कापून घे. मला वाटलं की तू लवकर येशील. म्हणून तयारी केली..."

"आई माझं पोट भरलंय खूप. उद्या कापू हा केक.." ... सतिश आईचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला आणि आपल्या खोलीत निघून गेला.

आईची जी पावलं दिवसभराच्या धावपळीत अजिबात थकली नव्हती त्याच पावलात आता मात्र थकवा जाणवत होता. आईने त्याच थकलेल्या पावलांनी हळू हळू चालत जाऊन टेबलवर ठेवलेली खीर फ्रिजमध्ये ठेऊन दिली. आईला वाईट नव्हतं वाटलं, पण तिचा कंठ एकदम दाटून आला होता. सतिशचे लहानपणापासूनचे सगळे वाढदिवस तिच्या डोळ्यांसमोरउभे राहिले. कसं ती रडत्या सतिशला शांत करत होती. कशाप्रकारे वाढदिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत त्याच्यासाठी आणलेले गिफ्ट ती लपवून ठेवत होती. काम करता करता शरीर थकत नव्हतं, पण हसता हसता पोट दुखत होतं. आईला वाटलं सतिश आता मोठा झालाय. काळासोबतच्या वाहत्या प्रवाहात तो सुद्धा कुठेतरी दूर निघून चाललाय. हे तेच घर आहे जिथे वाढदिवसाची तयारी चार दिवसांपूर्वी पासून चालू व्हायची आणि वाढदिवसाच्या चार दिवसानंतर सुद्धा त्याच्या पाऊलखुणा तश्याच राहायच्या.

आज घर थोडं उदास का वाटत आहे..? काहीच उत्साहात दिसत नाही. कदाचीत सतिशचं विश्वं आता या घराच्या चार भिंती पलीकडे जाऊ पहात होतं. जेव्हा मुलांचं विश्वं हे मोठं होऊ लागतं तेव्हा आई वडिलांचं जग आपोआपच कमी व्हायला लागतं. त्या रात्री आईला झोप लागली नव्हती, पण सकाळ होताच ती पुन्हा कधी न थकणारं यंत्र बनून गेली होती. सगळेजण आपापल्या कामात मग्न राहिले. कोणीच विचार केला नाही, की काल रात्री आईला काय वाटलं असेल? खरंतर आई सुद्धा त्या गोष्टीला पूर्णपणे विसरून गेली होती. सतिश सुद्धा ४ दिवसांच्या नाटकाच्या स्पर्धेसाठी पुण्याला निघून गेला होता.

जे प्रेम आपल्याला कुठल्याही स्वार्था विना मिळत असतं त्याला गृहीत धरणं ही आपली सगळ्यांची सवय बनून गेली आहे. आई तर आपल्या लेकरांसाठी करताना काही विचारच करत नाही की त्याबदल्यात आपल्याला काय मिळेल? खरं तर सगळ्या आया अशाच असतात. मुलांकडून तितक्याच मायेची अपेक्षा ठेवतात, पण जर ते मिळालं नाही तर त्या निराश देखील होत नाहीत.

आईने सगळी कामं आवरली आणि अंगणात असलेली टपाल पेटी बघायला गेली. लाईट बिल, सतिशच्या बाबांची कोणती कोणती मासिकं, चुकून आलेली शेजाऱ्यांची पत्रं, सगळं बघता बघता एक लिफाफा तिला सतिशच्या नावाने सुद्धा दिसला. तेवढ्यात तिला आठवलं की सतिश मागच्या काही दिवसांपूर्वी कुठल्यातरी चिठ्ठी बद्दल बोलत होता. घरात जाऊन तिने लगेच सतिशला फोन लावला.

"बाळा तू कुठल्यातरी चिठ्ठी बद्दल बोलत होतास ना, ती आली आहे.."

पलीकडून फोनवर सतिश एकदम आश्चर्यचकीत होऊन म्हणाला... "खरंच! जरा वाचून दाखव काय आहे.."

काही क्षण आईकडून काहीच प्रत्युत्तर न आल्याने तो म्हणाला, "बरं ठीक आहे, त्यात इंग्रजी असेल तर नाही समजणार तुला. मी येतो थोड्या वेळात."

सतिशचे ते शब्द ऐकून आईचं मन नकळत का होईना पण दुखावलं होतं. थोड्या वेळाने सतिश घरी आला. घरी येताच त्याने चिठ्ठी हातात घेतली आणि तो मोठ्याने ओरडला... "आई माझी निवड JJ School of Art मध्ये झाली आहे, पुढच्या पंधरा दिवसातच मला तिकडे जावं लागेल.."

आपल्या मुलाची एका मोठ्या कॉलेजमध्ये निवड झाल्याचं कळताच आईच्या नजरेत उमटलेले ते आनंदाचे भाव अचानक एकदम नाहीसे झाले. सतिश आता आपल्यापासून दूर जाणार याबद्दल तिला थोडं वाईट वाटलं होतं.

जेव्हापासून सतिशची निवड JJ School मध्ये झाल्याचं त्याला कळलं होतं तेव्हापासून त्याचे पाय जमिनीवर टिकत नव्हते. कधी इथे, कधी तिथे, मित्रांमध्ये, कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी तो याबद्दलच चर्चा करत होता.

सतिशची सर्व पॅकिंग आईनेच करून ठेवली होती. सतिशला कुठे काय येत होतं. गणितातील सर्व आकडे जरी एकत्र करून त्यांची बेरीज केली तरीही त्याचं उत्तर शून्यच यावं असं त्याचं जग होतं. चित्र आणि नाटक यापलीकडे त्याला जग माहितीच नव्हतं. आईने आठवणीने एक एक वस्तू बॅगेत भरली होती.

जायच्या आधी सतिशने बॅग उचलून पाहिली, तर त्याला ती अपेक्षेपेक्षा थोडी जडच वाटली. त्याने बॅग उघडून पाहिली आणि खोलीतून ओरडला. "आई.. हे लोणचं चटणी पापड.. काय आहे सगळं? मी नाही घेऊन जाणार हे काढ ते आधी.."

आई सतिशला समजावत म्हणाली, "अरे मी हे सगळं स्वतः बनावल आहे. आवडेल तुला" तरीही सतिशच्या चेहऱ्यावर काही भाव उमटले नाहीत.

शेवटी तो जाण्याचा दिवस उजाडला. त्या दिवशी पर्यंत बॅग इतकी भरली होती की सतिशसोबत आईला सुद्धा स्टेशनवर जावं लागलं. जवळपास अर्ध्या तासाने सतिश आणि आई दोघेही ट्रेनमध्ये बसले होते.

"ट्रेन मध्ये कोणी काही खायला दिलं तर खाऊ नको. तिथे वेळेवर जेवत जा. पैसे लागले तर बाबांना फोन कर. आणि हां, लोणचं ह्या कप्प्यात आहे, खा ते.. डाळ-भाता सोबत लोणचं छान लागतं. थोडा इंद्रायणी तांदूल सुद्धा दिलाय, सुट्टीच्य दिवशी खीर बनवून खा."...

सीट खाली ठेवलेली बॅग सावरत आई सतिशला सांगत होती. आईचं सगळं बोलणं ऐकून घेत सोबत असणाऱ्या लोकांमध्ये सतिशला थोडं अवघडल्या सारखं वाटत होतं.

"होय की, मला कळतं आई आता सगळं.. मोठा झालोय मी.." ... सतिश आईचं बोलणं मध्येच तोडून म्हणाला. पण आई कुठे ऐकणार होती. आपलं मूल कितीही मोठं झालं तरीही, आईसाठी लहानच. ट्रेन प्लॅटफॉर्म वरून निघाली. तरीही आई खिडकीतून सतिशला काही ना काही समजावत होती. "वेळेवर खात जा.. कपडे धूत बसू नकोस laundry ला दे.. हॉस्टेल मध्ये नीट नाही वाटलं तर एखादं घर घे भाड्याने.." ... जस-जशी ट्रेन प्लॅटफॉर्म वरून वेग घेत होती तस तसा आईचा आवाज सुद्धा मोठा होत होता.

"आई, जा तू.. मी बघेन सगळं...."

बाबा प्लॅटफॉर्मच्या एका वाजुला खूप लांब राहिले होते. पण आई मात्र ट्रेनच्या वेगाशी आपला वेग जुळऊन खिडकीला पकडून ट्रेन सोबत पळत होती. आईचं बोलणं संपतच नव्हतं. पण प्लॅटफॉर्मचा शेवट बघून आई म्हणाली.. "बाळ कधी कधी फोन तरी करत जा आईला...."

सतिशने खिडकीतून वळून मागे पाहिलं, आई, प्लॅटफॉर्म, स्टेशन, शहर, सगळं मागे पडलं होतं. आणि समोर दिसत होतं ते फक्त नव्यानं अनुभवायला मिळणारं आयुष्य.

दुसऱ्या दिवशी सतिश हॉस्टेलवर पोहचला. हॉस्टेलची रूम इतकी चांगली नव्हती पण तिथे त्याला सगळं स्वातंत्र्य दिसत होतं. हॉस्टेल बद्दलच्या खूप गोष्टी त्याने इतरांकडून ऐकल्या होत्या, त्याचाच तो शोध घेत होता. सकाळी सकाळी ब्रेड ऑमलेट. चहा-कॉफी.. म्हणजे जे हवं ते खायचं.. जे हवं ते करायचं.

एक दिवस तास संपऊन मेसमध्ये पोहचता पोहचता सतिशला थोडा उशीर झाला होता. मेस मधलं जेवण पण संपलं होतं. सतिश मन मारून तिथून निघाला. आणि हॉस्टेल वर आपल्या रूम वर पोहचला. रूम वर पोहचताच त्याने पाहिलं की, रूम मध्ये त्याचे मित्र त्याच्या आईने दिलेलं लोणचं ब्रेडला लाऊन खात आहेत. रूम पूर्ण अस्ताव्यस्त पसरलेली होती. सतिशला बघून मित्र म्हणाले "Sorry यार खूप भूक लागली होती.. तुझ्या बॅगेत काही मिळालं ते खाल्लं.." ... सतिशने ज्या लोणच्याला घरी हात देखील लावला नव्हता, तर इथे त्याचे दोस्त तेच लोणचं ब्रेडला लाऊन अगदी चवीनं खात होते. भूक तर सतिशला पण लागली होती. त्यानेही एक तुकडा ब्रेडचा घेतला आणि खाल्ला.

खरं तर भूक चवदार असायला हवी. नुसतं जेवण असून भागत नाही. आईचे हे शब्द सतिशला आठवले. आणि त्याच दिवशी सतिशच्या चवदार भुकेला आईच्या हातचं लोणचं खूप आवडलं. घरापासून दूर असलेल्या सतिशला त्या दिवशी पहिल्यांदाच आपल्या आईची कमतरता जाणवली.

हॉस्टेलच्या त्या चार भिंतींच्या आत मुलांच्या बऱ्या वाईट सवयींवर लक्ष द्यायला कोणीच नसतं. ... म्हणून की काय, रूममध्ये कपड्यांचे ढीग पडलेले असतात. सगळं सामान इकडे तिकडे विखुरलेलं असतं आणि गरजेच्या वेळेला एखादी आवश्यक गोष्ट मिळणं तितकंच दुर्लभ होऊन जातं. अशात काहीशा स्वातंत्र्याची आस बाळगणाऱ्या सतिशला आता हे असलं स्वातंत्र्य नकोसं वाटू लागलं होतं.

दोन चार दिवसात सतिशच्या पहिल्या सेमीस्टरची परीक्षा होती. सकाळी अंघोळ अवरल्यावर कपड्यांच्या त्या ढिगातून सतिशने स्वतःचे कपडे शोधून अंगावर चढवले. आणि तो जसा तयार झाला तसं त्याच्या लक्षात आलं की, त्याच्या बॉक्समध्ये एक पेन्सिल कमी आहे. ड्रॉइंगच्या परीक्षेत एक जरी पेन्सिल कमी असली तरीही त्याला वाटे की त्याच्या आयुष्यात एखादी महत्वाची गोष्ट कमी आहे.

त्याने खूप शोधलं, पण पेन्सिल कुठेच नाही मिळाली. त्याला आठवलं की घरी सर्व गोष्टी कशा आपोआप आपल्या जागी सापडत होत्या. त्याच्या लक्षात आलं की वस्तू आपोआप सापडत नव्हत्या, तर त्यांना कोणीतरी सांभाळून ठेवावं लागतं. कोणीतरी त्यांना सांभाळून ठेवत होतं. काही दिवसापासून सतिशला सगळ्या लहान मोठ्या गोष्टीत आईची खूप आठवण येत होती.

घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकाला सगळ्यात जास्त जाणीव होते ती म्हणजे, घरी कधीही कोणत्याही वेळी मिळणारे खायकचे पदार्थ. टापटीप असलेली आपली खोली. आयते धुतलेले कपडे. आणि हो... निस्वार्थपणे मिळणारं घरचं प्रेम...

सतिशची परीक्षा इतकीही चांगली गेली नव्हती. सकाळच्या गडबडीत त्याने नाश्ता सुधा केला नव्हता. चांगला न गेलेला पेपर, पोटातील भूक या सगळ्यामुळे सतिश थोडा चिडचिडा झाला होता, म्हणून पेपर संपतच सतिश मेसमध्ये गेला आणि जेवणाच्या काउंटर वर आपलं ताठ त्याने राखून ठेवलं.

चपाती सारखा दिसणारा तो गोल गोल पदार्थ आणि भाजी सारखं काहीतरी दिसणारा तो पहिला घास तोंडात जाताच सतिशची भूकच नाहीशी झाली. मीठ-तिखट अगदी नावाला असलेलं जेवण. न कोणता मसाला. ना कोणती चव. सतिश रागातच मेसच्या कॉन्ट्रॅक्टर कडे गेला. आणि म्हणाला. "हे काय जेवण आहे. अरे मीठ मसाला काय महाग झालाय का ? हे जेवण जनावरं पण नाही खाणार.."

कॉन्ट्रॅक्टर खाली मान घालून काहीतरी जमा खर्च बघत बसला होता. त्याने मान वर करून पाहिलंही नाही. कारण त्याच्यासाठी असं बोलणं नेहमीचच झालं होतं. तो सतिशकडे न बघताच म्हणाला. "मित्रा हे, हॉस्टेल आहे, तुझं घर नाही.. इथे असच मिळतं. नसेल खायचं तर नको खाऊ.."

कॉन्ट्रॅक्टरचं बोलणं ऐकून सतिशचा पारा अगदी वाढला. पण त्याने स्वतःला सावरलं. आणि तो जेवण तिथेच सोडून बाहेर निघाला. हॉस्टेलच्या बाहेर येऊन त्याने पाहिलं. पण दुपारच्या त्या वेळेस दूर दूर वर खाण्यासाठी त्याला काहीच दिसत नव्हतं. थोडा वेळ इथे तिथे बघून सतिश तेच बिन मीठ मसाल्याचं जेवण जेवला. कॉन्ट्रॅक्टर त्याच्या जवळ येऊन म्हणाला.. "काही दिवस जाऊदे बाळ.. हेच जेवण तुला चवदार वाटायला लागेल.."

सतिश काहीच न बोलता मुकाट्याने खाली मान घालून जेवत राहिला. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोन उचलताच त्याला आईचा आवाज आला.

"कसा होता पेपर बाळा?" ... आईने विचारलं.

"ठीक होता आई.." ... सतिशने फक्त एक दोन शब्दात उत्तर दिलं.

आईने दुसरा प्रश्न केला. "गमतंय ना तिथे..? जेवण मिळतं का चांगलं ?"

आईचे प्रश्न ऐकून सतिशचे डोळे पाणावले. कंठ दाटून आल्यासारखं झालं. हातातील घास ताटातच ठेऊन सतिशने डोळ्यातील पाणी टिपलं.. "हो आई छान वाटतं.. जेवण पण चांगलं असतं.."

त्या दिवशी सतिश बराच वेळ लायब्ररीच्या पायऱ्यांवर बसून राहिला. तो तिथे एकटा नव्हता. घरातील काही आठवणी त्याला घेरून बसल्या होत्या. माणूस जेंव्हा आपल्या घरच्यांच्या आठवणीत रमतं ना, तेंव्हा त्याला डोळ्यांपुढे त्या आठवणींच्या किरणांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही.

सतिशने तिथे बसल्या बसल्या बॅगेतून वही आणि पेन्सिल काढली. वही उघडून त्याने चित्र काढायला सुरुवात केली.

आई हा केवळ शब्द नसून ती एक भावना असते निस्सीम प्रेमाची, त्यागाची, दयेची, ममतेची. निस्वार्थपणे खरं प्रेम देणारा एक मायेचा स्त्रोत असते आई. आई एक अशी व्यक्ती असते की, जिचा चेहरा आपल्या मनावर आपसूकच कोरलेला असतो.. सतिशला सुद्धा चित्र काढण्यासाठी कधी आई समोर असण्याची किंवा तिच्या फोटोचीही गरज पडली नव्हती. बघता बघता सतिशच्या हातातील जादू कागदावर उमटली होती.

चित्र काढता काढता त्याचे डोळे पाणावले. डोळ्यातील अश्रूचा एक थेंब थेट चित्रातील डोळ्यांवर पडला. असं वाटलं की, सतिशचे पाणावलेले डोळे बघून चित्रातील आईच्या डोळ्यांचा सुद्धा बांध फुटला असावा. सतिशला आपल्या चित्रामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी रंगांची गरजच आता पडत नव्हती. कधी काळी इंद्रधनुष्यामधील सात रंगांप्रमाणे उजळून निघणारं सतिशचं जग आता काहीसं रंगही झालं होतं. पेन्सिलीच्या छटांमधूनच तो आपल्या चित्रांमध्ये जीव ओतत होता.

पायऱ्यांवर बसलेल्या सतिशच्या नजरेला कलत्या उन्हात काहीतरी चमकत असल्याचं दिसलं. असेल एखादा काचेचा तुकडा, म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. पण ती चमक सतत सतिशचं लक्ष वेधून घेत होती. हातातील वही पेन्सिल बॅगेत ठेऊन हातावर जोर देऊन तो उठला. तिथे गेला. त्याने निरखून पाहिलं तेंव्हा त्याला त्या चकाकणाऱ्या ठिकाणी त्याच्या काही आठवणी तिथे सांडलेल्या दिसल्या.

सतिश तिथेच बसून त्या चकाकणाऱ्या आठवणींना पाहत राहिला. नकळत त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यातल्याच एका आठवणीनं त्याला विचारलं... "कूठे हरवलास तू ? कधीकाळी स्वच्छंद हसणारा तू आज मात्र आकाशातील चांदण्यांमध्ये स्वतःला शोधत का बरं हिंडत आहेस.." ... पण त्या प्रश्नचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं.

खरं तर काही प्रश्न असे असतात की ज्यांची उत्तरं कुठेच लिहिलेली नसतात. इतिहासातील सगळ्याच प्रश्नांची उत्तरं वर्तमानात किंवा भविष्यात मिळतीलच असं नाही. पण काही प्रश्न असे असतात जे आपली उत्तरं आधीच भूतकाळात सोडून गेलेले असतात. पण त्यांचे प्रश्न मात्र भविष्याच्या गर्भात लपलेले दिसतात. कारण सतिश त्या जगात जगत होता जिथे भावना आणि संवेदनांना सुद्धा आता A.I. द्वारे आपल्या सोयीनुसार बदललं जात होत. आणि त्यात तो एकटा मुळीच नव्हता. त्याच्यासोबत कित्येक आठवणी होत्या ज्या केवळ फक्त आठवणीच बनून राहिल्या होत्या.

माणूस वर्तमानात जगायला नाकबूलच होतो.. कधी कधी वर्तमान आणि भविष्य या पलीकडे तो भूतकाळात रमण्यात धन्यता मानतो.

बराच वेळ आठवणीत रमल्या नंतर सतिश हॉस्टेलवर गेला. सकाळचं उपाशी पोट. दिवसभराची धावपळ. परीक्षेचं टेन्शन आणि भरीस भर म्हणजे मेस मधलं बेचव जेवण. या सगळ्याचा एकत्रीत परिणाम की काय म्हणून, त्या रात्री सतिशचं अंगं तापाने फणफणत होतं.

माणूस जेंव्हा आजारी पडतं ना तेंव्हा त्याचं फक्त शरीर थकतं असं नाही तर त्यापेक्षही त्याचं मन खचतं. त्या मनाला औषधाची नाही तर मायेच्या स्पर्शाची गरज असते. मग त्या मनाला खरी उभारी मिळते. सतिश घरी असता तर आईचा मायेचा हात त्याच्या डोक्यावर फिरला असता.

सतिशच्या रूम मधील दोस्तांनी खाल्लेल्या लोणच्याची आठवण ठेवली होती. त्यांनीच सतिशला रात्री उचलून दवाखान्यात नेलं. पण आजारपण सुद्धा इतकं स्वार्थी की, काळजी घेणारी आई सोबत नसेल तर ते सुद्धा जास्त काळ अंगावर टिकत नाही. सकाळपर्यंत सतिशचा ताप उतरला होता.

घरातून येऊन त्याला जवळपास ४ ६ महिने लोटले होते. पुढच्या काही दिवसांमध्ये तो घरी जाणार होता. त्याने पॅकिंग साठी बेड खाली पडलेली आपली बॅग पाहिली. बॅगेत आईने लहान सहान गोष्टी बांधून ठेवल्या होत्या, ज्या की त्याने अजून बघितल्याच नव्हत्या. प्रेमाने बांधून ठेवलेल्या त्या वस्तूनकडे बघत त्याला जाणीव झाली की हॉस्टेलच्या त्या वेगळ्या आयुष्यात सगळं स्वातंत्र्य आहे. कोणीच विचारणारं नाही की, उशिरा का आला, पसारा का मांडलाय.. पण त्याच बरोबर कोणी हे ही विचारणारं नाही की, "बाळ जेवलास का?" किंवा, "आज काय खाणार..?" ... घरची आठवण येताच सतिशचं मन भाऊक झालं आणि डोळे पाणावले.

एक दिवस सकाळी सतिशचे डोळे उघडले तेंव्हा चहू बाजूला हिरवळ होती आणि मधोमध रेल्वे ट्रॅक. असं वाटत होतं की ट्रेन शेताच्या मधूनच स्वतःसाठी नवीन मार्ग शोधत आहे. सतिशच्या प्रवासाला १० १२ तास होऊन गेले होते. आता फक्त काही वेळ अजून लागणार होता घरी पोहचायला. पण आज त्याचा उत्साह इतका होता की जो कमी होण्याचं नावच घेत नव्हता. बाकी कोणताच विचार तो करत नव्हता. त्याला फक्त घरी पोहचायचं होतं.

हॉर्नचा एक जोरात आवाज झाला आणि ट्रेनने सांगली शहरात प्रवेश केला. सतिश खिडकीतून दिसणाऱ्या इमारती, मैदानं, झाडं अगदी निरखून बघत होता. काही महिन्यांपर्वीच यातूनच स्वतंत्र होऊन तो निघाला होता. आज कसं सगळं त्याला आपलं वाटत होतं. थोड्या वेळाने ट्रेन स्टेशनवर येऊन थांबली. सतिशने प्लॅटफॉर्मवर उतरून एक वेळ स्टेशनवर नजर टाकली. तिथली प्रत्येक गोष्ठ तशीच होती, जशी की तो सोडून गेला होता. बदलला होता तो फक्त सतिश!
 
आपलेपणाला अनुभवायचं असेल तर आपल्या माणसांपासून थोडं लांब जाऊन बघा. तेंव्हा समजून येईल की ज्या गोष्टींबद्दल आपण विचार सुद्धा करत नाही त्यांच्यापासून दूर होताच ती प्रत्येक लहानात लहान गोष्ट किती मोलाची वाटते.

आई प्लॅटफॉर्म वरच उभी होती. सतिश न कळतच आईच्या पाया पडला. आईने आशीर्वाद देत त्याची बॅग उचलली. तेवढयात सतिशने थांबवलं... "थांब आई मी घेतो." ... त्याने बळजबरीने आईच्या हातातून बॅग काढून घेतली. आणि म्हणाला.. "तू का आलीस? मी आलो असतो एकटा.."

आईने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली.. "तुला ४ ५ महिने पाहिलं नाही, म्हणून आले.."

सतिश सुद्धा आईला ४ ६ महिन्यांनी भेटत होता. तरीही दोघांनाही वाटत होतं की ते एकमेकांना कित्येक वर्षांनी भेटत आहेत. यापूर्वी आईकडे सतिशने कधी निरखून पाहिलंच नव्हतं. आता मात्र आईच्या डोक्यात पांढऱ्या केसांच्या छटा स्पष्ट दिसत होत्या. काळाच्या ओघात आणि सरत्या वयासोबत केस पांढरे होणं स्वाभाविकच आहे, पण पांढरे होत चाललेल्या केसांकडे लक्ष जाताच कधीतरी आपल्याला हा चेहरा सुद्धा दिसणार नाही याची जाणीव मनाला खूप मागे घेऊन जाते.

पांढऱ्या होत चाललेल्या केसांसोबत डोळ्यांवरच्या चष्म्याच्या एका काचेला तडा गेल्याचंही सतिशने पाहिलं होतं.

"आई चष्मा फुटलाय की!" ... सतिश म्हणाला.

"त्याला काय होतंय.." आई म्हणाली, "आपल्या मुलांना पुढं जाताना बघायला चष्म्याच्या काचा चांगल्या असायलाच पाहिजे असं कुठे म्हटलंय का ?"

आईच्या याच चार शब्दांनी सतिशच्या काळजात घर केलं. कारण सतिशचा जन्म त्या युगातला होता जिथे थोड्या फार तांदूळ गव्हाच्या दाण्यांसाठी आई कित्येक तास रेशनच्या दुकानासमोर रांगेत उभी राहायची. बाबा चार पैसे वाचावेत म्हणून कामावर जाताना बरचसं अंतर चालतच जायचे. कामाचा थकवा घालवण्यासाठी कपभर चहा साठी १० रुपये कुठून आणायचे म्हणून बाहेरचा चहा टाळायचे.

घरी पोहचताच आईने सतिशची सरभराई चालू केली.. खूप दिवसांनी सतिशला आपल्या आईच्या हातचं जेवण मिळणार होतं. तो त्या दिवशी अगदी पोटभर जेवला.. आई त्याच्या समोर बसून फक्त त्याच्याकडे बघत होती.. 
तिला जाणवत होतं की मागील ४ ६ महिन्यात तिचा मुलगा थोडा मोठा झालाय.

दुसऱ्या दिवशी सतिश आईने न उठवतच उठला होता. सतिशने कित्येक दिवसांनी पुन्हा एकदा पहाट पाहिली होती. आभाळ मोकळं होतं, अन् हलकासा प्रकाश खिडकीतून थेट सतिशच्या खोलीत डोकावत होता. मुक्त होऊन किलबिल करणारे पक्षी आणि त्या अवाजासोबत मंद वाहणारा वारा... आणि नकळतच बरसू लागलेल्या पावसाच्या धारा... पहाटेचं विलोभनीय दृश्य फारच कमी लोकांना अनुभवायला मिळतं, त्यात आता सतिश ची भर पडली होती. कधीही वीरू नये असा वाटणारा तो क्षण, हळूवार निसटून गेला..

खोलीत आपल्या चादरींची घडी घालताना पाहून आई म्हणाली.. "अरे तू इतक्या लवकर उठलास ?"

सतिशने चादरीची घडी कपाटात ठेवत उत्तर दिलं.. "हॉस्टेल मध्ये सकाळी साडेसात नंतर नाश्ता नाही मिळत.. म्हणून लवकर उठायची सवय झाली.."

सतिशकडे टॉवेल देत आई म्हणाली, "आता जर तू लवकर उठलाच आहेत तर अंघोळ करून घे, मी खायला करते पटकन.."

थोड्या वेळाने सतिश आवरून आला. आई स्वयंपाकघरातून भांडी घेऊन बाहेर आली.. "Presenting one of the dish favorite son of the bred omelet.."

सतिशला काही कळेना, त्याने आश्चर्याने एक वेळ ब्रेड ऑमलेटकडे पाहिलं एक वेळ आईकडे पाहिलं, आणि आईचं मोडकं तोडकं इंग्रजी ऐकून थोडं हसतच म्हणाला, ... "आई.. काय हे..?"

आई सुद्धा हसत म्हणाली.. तू गेल्यानंतर मी इंग्लिशचा क्लास सुद्धा लावला. सतिशला त्या सगळ्या गोष्टी आठवल्या ज्या न कळत पणे का होईना पण तो आईला बोलला होता. त्याने कधी विचारही केला नव्हता की तिला सुद्धा मन आहे तिला सुद्धा वाईट वाटू शकतं.

आई सतिशच्या ताटात ब्रेड ऑम्लेट वाढत म्हणाली.. "झालीना तुझी आई स्मार्ट..?"

सतिश जागेवरून उठला, त्याने आईला मिठी मारली. दोघांचेही डोळे पाणावले... "आई तुला माझ्यासाठी वेगळं काही बनायची काहीच गरज नाही.." आईला खुर्चीत बसवत सतिश म्हणाला... "इंग्लिश शिकलं म्हणून कोणी स्मार्ट नाही होत.. तू जशी आहेत तशीच छान आहेस.. आणि हा घे तुझा नवा चष्मा, आता फुटक्या काचेतून जग नाही बघायचं.."

सतिशने घरी येताच आपल्या साठवलेल्या काही पैशातून आईसाठी नवीन चष्मा करून आणला होता.

"हे ऑमलेट मस्त झालंय.. पण मला आता मेथीचा पराठा मिळेल?"

सतिशचे शब्द ऐकून त्याने आणलेल्या नवीन चष्म्याच्या काचा सुद्धा आईच्या आसवांनी भिजल्या होत्या...


...अपूर्ण


#SrSatish🎭

       







1 टिप्पणी:

  1. अतिशय सुंदर सतीश सर. हॉस्टेल पासून आता पर्यंतचे दिवस आठवले.
    बाकी काही नाही कांदे चिरत होतो म्हणून डोळे पाणावले....

    उत्तर द्याहटवा