बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

कविता ..

कवितेला शब्दांचं किंवा यमकांच बंधन नसतं, त्यात असते फक्त गुंतागुंत भावनांची.
कविता मुक्त असते, एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासारखी. वाहत्या प्रवाहाच्या बाहेर पडलेल्याला स्वतःचा मार्ग दाखविणाऱ्या दिव्या सारखी.

कविता ही मधासारखी असते, कित्येक मधमाशांनी गोळा करून आणलेल्या फुलांच्या रसासारखी.
कविता कधीही येते, आपल्यापाशी राहून जाते, तिला काळ वेक काहीच नसते. कधी झोपेतून उठवते, तर कधी झोपूच देत नसते.

कविता कधी विनोद बनून चेहऱ्यावर हसू फुलवते, तर कधी भावनीक होऊन अश्रूंचे बांध फोडून टाकते.
कविता आली तर दिवसभर सोबत असते, तर कधी तोंडही दाखवत नसते.

कविता ही प्रत्येकाचा श्वास असते, कोणाला ती व्यक्त करता येते, तर कोणाला याचा गंध ही नसतो.
कवितेला स्वतःचं रंग रूप नसतं, लिहिणारा प्रत्येकजण स्वतःच्या परीनं तिला घडवत असतो.

कवितेला स्वतःच्या भावनाही नसतात, लिहिणाऱ्यांच्या मनचे भाव स्वतः घेऊन ती जगत असते.
कविता ही कविता असते, कधी तुमच्यासाठी कधी माझ्यासाठी कधी आपल्या सगळ्यांसाठीच मन मोकळं करण्याचा आधार असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा