शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

१४२७, सदाशिव पेठ


DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंब स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतातयाव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 


"आहो साहेब, ही नोट नाही चालणार.." दुकानदार २०० रुपयांची नोट सिद्धार्थकडे परत देत म्हणाला.

"अरे... का नाही चालणार भाऊ? खोटी आहे का नोट..?" सिद्धार्थ बावचळत म्हणाला.

"साहेब यावर काहीतरी लिहिलं आहे. पुढे नाही चालली तर मी काय करू याचं?"

"अरे २०० ची नोट आहे.. चालणार काशी नाही.."

तुळशी बागेतील दुकानासमोर सिद्धार्थ दुकानदारासोबत बोलत होता..

"अरे.. मग तुम्हीच ठेवा ना तुमच्याकडे.. तुम्ही चालवा कुठेतरी.." ... दुकानदाराने जरा आवाज वाढवला.

दोघांचं बोलणं ऐकून आजूबाजूचे लोक काय चाललंय बघायला तिथे जमले.. बस्स..!! हेच तर पसंत नव्हतं सिद्धार्थला. तो लोकांच्या नजरेपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करायचा. त्याने हळूच हात पुढे करून दुकानदाराकडून नोट परत घेतली आणि आपल्या शर्टच्या खिशात ठेवली.

घरी येऊन त्याने आपल्या खिडकीतून नजर टाकली. समोरच्या तुळशी बागेतील गर्दीत सिद्धार्थ स्वतःला शोधत होता. दिवाळीचे दिवस असल्याने बाजारात बरीच लगबग दिसत होती. नेहमीप्रमाणे त्याने जेवण बनवलं, आणि रेडिओ चालू करून चटई टाकून आडवा पडला. सूर्य मावळतीला गेला असून सुद्धा थोडासा सोनेरी सूर्य प्रकाश त्याच्या खोलीत दिसत होता. अचानक त्याला बाजारात झालेला वादविवाद आठवला. त्याने खिशातून ती नोट काढली, त्यावर लाल रंगाने लिहिलं होतं.. "lonely" ... पुढे एक प्रश्नचिन्ह.. आणि खाली एक मोबाईल नंबर लिहिला होता.

Lonely... म्हणजे एकटेपणा! आणि एकटेपणा तर सिद्धार्थच्या आयुष्याचा अगदी अविभाज्य घटक होता. आई वडिलांचा तर त्याला चेहरा ही लक्षात नव्हता. कोणी भाऊ बहीण नाही. कोण नातेवायकांशी संपर्क नाही. आणि मित्र मैत्रिणी बनवणं तर त्याला कधी जमतच नव्हतं. तुटलेल्या मोत्यांच्या माळेतील विस्कटलेले मोती गोळा करण्याचा एकट्याने प्रयत्न करताना संपूर्ण आयुष्य खर्ची पडू शकतं, याची त्याला कदाचीत कल्पनाही नसावी. असं नव्हतं की, संपूर्ण जग वाईट होतं, पण त्याला वाटत होतं की, तोच या जगाच्या योग्यतेचा नव्हता. कॉलेजनंतर तो गेली कित्येक वर्षांपासून पुण्यात एका पुस्तक प्रकाशन संस्थेत Proofreading चं काम करत होता. ऑफिसमध्ये एका बाजूला त्याचे सर.. मोहिते सर बसत होते, आणि दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ.

मोहिते सरांसाठी सिद्धार्थ जवळपास अदृष्यच होता. फक्त कामाच्या वेळी तो त्यांच्या नजरेस पडायचा. आणि सिद्धार्थ सुद्धा या आपल्या अदृष्यतेत खुश होता. यासाठीच म्हणून की काय, सिद्धार्थ अगदी कमी पगारात गेली कित्येक वर्षे तिथे टिकून होता.

त्याचं आणखीन एक नातं होतं त्या घरासोब जिथे तो कित्येक वर्षांपासून एकटाच त्या खोलीत राहत होता. एका छोट्याशा १० बाय १२ च्या खोलीत आपल्या गावापासून लांब त्याने आपलं छोटंसं जग तयार केलं होतं. त्याचं एकट्याचं एक स्वतंत्र जग! त्याचा एकटेपणा नेमहमी त्याला टोचत असायचा पण ऑफिसमध्ये तो कामाच्या व्यापात कुठेतरी स्वतःला विसरून जायचा, आणि तोच एकटेपणा घराच्या चार भिंतींच्या आत ठेवायचा.

साहसी लोक परिस्थितीशी लढतात! दुबळे पळून जातात! आणि सामान्य लोक त्या परिस्थितीला स्वीकारून हतबल होऊन घड्याळाच्या काट्यांना सोबत घेऊन जगू लागतात! .... सिद्धार्थ सुद्धा यातच कुठेतरी स्वतःला शोधत होता. तो काही मिनिटांपासून त्या नोटेकडे बघत होता. त्याने बरेच किस्से पाहिले होते ज्यात लोकांच्या एकटेपणाचा फायदा घेतला जायचा.. "हे पण तसच काहीसं असेल तर.." .... एक क्षण हा विचार त्याचा मनाला चाटून गेला, आणि पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, आणि तो स्वतःच बडबडला.. "अशा प्रकरणात फसायला माझ्याकडे असं आहे तरी काय?" ... त्या नोटेचा विचार करता करता त्याचा डोळा कधी लागला त्याला कळलं नाही. थोड्या वेळाने जाग आली तर १० वाजून गेले होते. त्याच्या डोळ्यांतसमोर खोलीत सर्वत्र अंधार पसरला होता, आणि त्यात पसरला होता त्याचा एकटेपण.

सिद्धार्थला आशा भयाण शांततेची भीती वाटू लागली होती.. त्याने त्याच भीतीत आपली मूठ आवळली तर त्याच्या लक्षात आलं की, ती नोट अजून त्याच्या हहतच आहे. त्याने पुन्हा एकदा त्या नोटकडे पाहिलं आणि आपला मोबाईल घेऊन त्यावर तो नंबर डायल केला.. चार - पाच रिंग नंतर समोरून आवाज आला, .... "नमस्कार.."

सिद्धार्थने त्या आवाजावरून अंदाज बांधला की, समोर कोणीतरी साठ पासष्टीची व्यक्ती असावी.

"हॅलो.." ... समोरून पुन्हा एकदा आवाज आला..

"हॅलो हा... २०० रुपयांच्या नोटेवर तुमचा नंबर होता." ... सिद्धार्थ थोडा बावचळत म्हणाला.

"अच्छा हा बोला, काय नाव आहे तुमचं?" त्या व्यक्तीने विचारलं.

"सिद्धार्थ  .... सिद्धार्थ पाटील."

"काय करता तुम्ही?"

"एका पुस्तक प्रकाशन कंपनीत नोकरी." ... सिद्धार्थ अडखळत बोलला.

"राहता कुठे?"

"पुण्यात, तुळशीबाग परिवारात.." ... सिद्धार्थ अजाणतेपणी आपला पत्ता सांगून मोकळा झाला..

"अरे वाह..! घरी कोण कोण असतं?" .. त्या व्यक्तीने अगदी आपुलकीने विचारलं.

सिद्धार्थला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारणारे लोक अजिबात पसंत नव्हते. तसं तर इतके वैयक्तीक प्रश्न त्याला नोकरी देण्यापूर्वी मोहिते सरांनीच विचारले होते. सिद्धार्थला वाटलं की, तो फोन बंद करावा, पण काहीतरी होतं त्या आवाजात, ज्याने त्याला फोन बंद करण्यापासून थांबवलं.

"कोणी नाही माझ्या घरी.." ... सिद्धार्थने असं सांगितलं जसं की त्याला हा विषय लवकर बंद करण्याची घाई आहे.

"अच्छा! आज थंडी खूप आहे ना?" ... ती व्यक्ती विषय बदलण्याच्या उद्देशाने म्हणाली..

"हो आहे थंडी.. पण सर तुम्ही कोण आहात? आणि ते..." ....

सिद्धार्थ आपला प्रश्न पूर्ण करणार या आधीच ती व्यक्ती म्हणाली... "मी भाऊसाहेब... भाऊसाहेब पटवर्धन. इथेच सदाशिव पेठेत राहतो. बरं तुमच्याकडे लाईट जातात का?"

"हो जाते.. पण फार नाही.. १५-२० मिनिटांसाठी." सिद्धार्थ म्हणाला.

"मित्र... वाईट नको वाटून घेऊस, पण मी तुला "तू" म्हणणार.." ... सिद्धार्थच्या उत्तराची वाट न बघताच त्याच श्वासात भाऊसाहेब म्हणाले, "मित्रा ... तुझ्याकडे जेवण कोण बनवतं?"

एका अनोळखी व्यक्तीकडून मित्रा असं ऐकून सिद्धार्थला थोडं अवघडल्यासारखं वाटलं.

"मी स्वतःच बनवतो.." ... सिद्धार्थ अगदी हळू आवाजात म्हणाला.

"अरे वाह! जेवणात काय आवडतं तुला?" भाऊसाहेबांनी पटकन विचारलं.

हा प्रश्न ऐकून सिद्धार्थला वाटलं की, त्याच्या पोटात एक मोठा गोळा आला आहे. पुण्यात आल्यापासून मागील कित्येक वर्षात कोणीच त्याला हा प्रश्न विचारला नव्हता. वांग्याची भाजी, भाकरी आणि तांदळाची खीर सिद्धार्थला खूप आवडते.. त्याला समजत नव्हतं भाऊसाहेबांच्या त्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं.. सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी ताराळलं होतं.

"अरे मित्रा बोल की, मला तर तुळशीबागे समोच्या चितळे बंधूंचे डिंकाचे लाडू खूप आवडतात." भाऊसाहेब तिकडून बोलत होते.. "तू तिथेच कुठेतरी रहात असशील ना..?"

सिद्धार्थला स्वतःला सावरणं कठीण होत होतं आणि त्याने तो फोन बंद केला.. तो रात्रभर विचारात होता की, हा काय प्रकार आहे? कोण त्याच्याबद्दल इतकं जाणून घायला उत्सुक असेल? त्याच्या एकटेपणाचं समोरच्या व्यक्तीला काय देणंघेणं? माहिती नाही हा नेमका काय खेळ होता. काहीवेळा विधात्याने मांडलेला खेळ आपण समजू शकत नाही.. हा... एक गोष्टी होती, त्या व्यक्तीने अजाणतेपणी सिद्धार्थच्या हृदयाला कुठेतरी साद घातली होती.

सिद्धार्थ निश्चिंत होता की, आत्या त्या व्यक्तीपासून त्याची सुटका झाली आहे, कारण काही न बोलता त्याने फोन कट केला होता. पण सिद्धार्थचा तो चुकीचा समज होता. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता पुन्हा त्याला त्या नंबर वरून फोन आला. सिद्धार्थने काही वेळ फोनची रिंग वाजू दिली आणि त्यानंतर आपला फोन बंद करून ठेवला. तसंही मोहिते सर आणि कॉलसेंटर वाल्या लोकांशिवाय सिद्धार्थला फोन करणारं कोणीच नव्हतं. 

सिद्धार्थच्या वाढदिवसा दिवशी सुद्धा त्याला फक्त बँकेतून येणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या SMS शिवाय त्याला शुभेच्छा देणारं सुद्धा कोणी नव्हतं.

तिसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी सात वाजता त्याचा नंबर वरून फोन आला. सिद्धार्थने मनाशी ठरवलं होतं की, पुन्हा जर त्या नंबर वरून फोन आला तर त्यांना सांगून टाकायचं की, त्यांच्याशी बोलण्यात सिद्धार्थला काहीच स्वारस्य नाही... आणि सिद्धार्थने वाजत असलेला फोन उचलला. सिद्धार्थने मनाशी ठरवलेलं तो बोलणार या आधीच समोरून आवाज आला, ... "अरे मित्रा कुठे होतास दोन दिवस? एक विनोद ऐकवू का..?"

सिद्धार्थच्या उत्तराची वाट न बघताच भाऊसाहेबांनी एक विनोद ऐकवला. सिद्धार्थ मनातच म्हणत होता की, काय हा माणूस आहे... तेवढ्यात भाऊसाहेबांचा विनोद ऐकून सिद्धार्थ खळखळून हसला.. त्या दिवशी हसणं विसरलेला सिद्धार्थ कित्येक वर्षांनी असा मनसोक्त हसला होता. त्याला वाटलं की, कित्येक वर्षांनी त्याची १० बाय १२ ची खोली एक मोकळं आकाश बनलंय, आणि त्या मोकळ्या आकाशात तो आपले पंख पसरवून स्वच्छंद फिरू लागलाय.

त्यादिवशी भाऊसाहेबांसोबत सिद्धार्थ जवळपास अर्धा तास फोनवर बोलत राहिला. खरंतर त्या वेळी सिद्धार्थ भाऊसाहेबांच्या प्रश्नांची उत्तरं देत होता। सिद्धार्थने बाळासाहेबांना एकही प्रश्न विचारला नव्हता, खरंतर भाऊसाहेबांनी सिद्धार्थला प्रश्न विचारण्याची वेळच येऊ दिली नव्हती. त्या रात्री अंथरुणात पडतातच सिद्धार्थला शांत झोप लागली होती.

आता सिद्धार्थ आणि भाऊसाहेबांचं नेहमी बोलणं व्हायचं, दिवसभर सिद्धार्थ संध्याकाळची वाट बघत असायचा. आपलं जीवन, आयुष्य आणि आसपास घडणाऱ्या गोष्टींवर तो नजर ठेवून असायचा. जेणेकरून संध्याकाळी फोनवर बोलताना त्याला सुद्धा भाऊसाहेबांना आपल्या कडून चार गोष्टी सांगता येतील.

आता सिद्धार्थला जाणीव होऊ लागली होती की, तो सुद्धा या जगाचा एक हिस्सा आहे. सिद्धार्थ तर सदाशिव पेठेत जाऊन चितळे बंधूंचे डिंकाचे लाडू सुद्धा खाऊन आला होता. त्या डिंकाच्या लाडूच्या चवीमुळे सिद्धार्थ कित्येक वर्षे मागे जाऊन आपल्या आजीच्या कुशीत बसला होता. आपल्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांची आठवण झाली किंवा ज्यांच्याबद्दल आपण विचार केला तर मन आपसूकच कित्येक वर्ष आपोआप मागे जाऊ लागतं. जेव्हा सिद्धार्थने लाडू खाल्ल्याचं भाऊसाहेबांना सांगितलं तेंव्हा भाऊसाहेबांनी सुद्धा पुण्यातील जवळपास सगळ्याच मिठाईवाल्यांची नावं सिद्धार्थला सांगितली, जे चांगल्या मिठाई बनवत होते.

सिद्धार्थ आता कधी कधी त्या मिठाईच्या दुकानात जाऊन मनपसंत मिठाई खाऊ लागला होता. त्याच्या बेरंग जीवनात आता एक वेगळाच रंग भरू लागला होता. जवळजवळ तीन चार महिने हा दिनक्रम सातत्याने चालू होता. त्यानंतर एके दिवशी संध्याकाळी सिद्धार्थच्या घरावरची घंटी वाजली. सिद्धार्थने दरवाजा उघडला, तर दारात एक व्यक्ती उभी होती.... "सिद्धार्थ पाटील आपणच का?" त्या व्यक्तीने विचारलं..

"हो मीच सिद्धार्थ, बोला..." सिद्धार्थ म्हणाला.

"मी भाऊसाहेब पटवर्धन यांचा वकील आहे. त्यांनी तुमच्यासाठी हा १ करोड रुपयांचा चेक पाठवला आहे." ... वकिल एक बंद पाकीट सिद्धार्थकडे देत म्हणाले.

सिद्धार्थने पाकीट उघडलं, त्यात १ करोड रुपयांचा एक चेक आणि एक चिठ्ठी होती. सिद्धार्थ चेक न बघताच चिट्ठी वाचू लागला...

"प्रिय मित्रा, तसं तर आपण या जगात येताना एकटेच येतो आणि जाणार सुद्धा एकटेच असतो, पण या येण्याजाण्याच्या मधल्या काळात आपल्या कोणालाच एकट्याला राहायचं नसतं.. काही महिने तू माझ्या सोबत माझ्या जीवनाच्या प्रवासात सोबत चाललास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद!

मागच्या सदुसष्ट वर्षात मी तुझ्या सारख्या फारच कमी लोकांना पाहिलं आहे जे एखाद्या अनोळखी व्यक्तीला आपला वेळ देत असतील. त्या विधात्याने काहीतरी नियोजन करून मला कौटुंबिक नात्यांपासून आतापर्यंत अलिप्त ठेवलं आहे.. मी पटवर्धन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज् चा हयात असलेला आज एकमेव वारस आहे. माझे वडील पटवर्धन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज् चे सर्वेसर्वा होते. माझ्या लहानपणी एका कार अपघातात त्यांचं निधन झालं. त्यानंतर काही वर्षातच आई सुद्धा त्यांच्या सोबत गेली. इतर कोणा नातेवाईकांसोबत माझा फारसा संपर्क राहिला नव्हता. आई-वडिलांच्या निधनानंतर या संपूर्ण इस्टेटीचा मी एकमेव वारस राहिलो होतो. मी २५ वर्षांचा होईपर्यंत कंपनीच्या ट्रस्टीकडून माझा सांभाळ झाला. त्यानंतर पटवर्धन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज् चे सर्व अधिकार माझ्या नावे करून ट्रस्ट सुद्धा त्या जबाबदाऱ्यांतून मोकळी झाली होती..

मी आजपर्यंत सर्व सुखं उपभोगली होती. जग फिरून आलो, सर्व सुखं माझ्या पायांशी होती, पण या सगळ्या सोबत माझ्या सोबत होता तो माझा एकटेपणा.. खरं तर, ती दोनशे रुपयांची नोट माझ्यासाठी एक रस्ता आहे माझ्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा. या जगात सगळ्यात जास्त वेदनादायक असतं ते म्हणजे एकटेपणा, माझ्याकडून एखाद्याचा एकटेपणा कमी होईल, एखाद्या सोबत चार पावलं सोबत चालू शकेन आणि यामूळे कदाचित माझ्या एकटेपणा वर सुद्धा पर्याय निघू शकतो.. हाच एकमेव विचार होता..

तुझ्याकडून माझ्या वाट्याला आलेल्या क्षणांची काही मोल होऊ शकत नाही, तरीसुद्धा मी तुझ्यासाठी हा १ करोड रुपयांचा चेक पाठवत आहे. हा चेक घे आणि उद्यापासून मला फोन नको करू. आणि मी सुद्धा तुला फोन करण्याचा प्रयत्न करणार नाही. आपल्या दोघांचे रस्ते जरी एक असले तरीही ध्येय मात्र विभिन्न आहेत..

तुझा मित्र भाऊसाहेब.."

पत्रातील शेवटच्या काही शब्दांनी सिद्धार्थ हादरून गेला. त्याने वकिलांना विचारलं, "ही कोणती अट आहे की, उद्यापासून आपण बोलायचं नाही.. नको मला हे १ करोड रुपये, नेऊन द्या त्यांना.. त्यांनी माझ्याशी बोलावं किंवा नाही, हा त्यांचा वैयक्तीक विषय... पण हा चेक मी नाही घेऊ शकत."

"१ करोड रुपये खूप मोठी रक्कम असते. एक वेळ पुन्हा एकदा विचार करा." वकील म्हणाले.. "आता तर मी जातोय, पण जर तुम्हाला वाटलं तर मला फोन करा. हा घ्या माझा नंबर..." वकिलांनी जाता जाता आपलं कार्ड सिद्धार्थच्या हातात ठेवलं.

सिद्धार्थसाठी हे नातं म्हणजे कोणतं हंगामी पीक नव्हतं, की जे कापून तो आपलं पोट भरू शकणार होता. त्याच्यासाठी हे नातं म्हणजे एक वटवृक्ष होता, ज्याच्या छायेत बसून तो आपल्या आयुष्यातील काही क्षण मजेने आणि आनंदाने घालवू शकणार होता.. पण वकील सुद्धा बरोबरच बोलले होते... १ करोड रुपये म्हणजे छोटी रक्कम नव्हती सिद्धार्थसाठी..

सिद्धार्थ रात्रभर अंथरुणात पडून त्याबद्दलच विचार करत राहिला आणि सकाळ होताच त्याने वकिलांना फोन केला.

"काय सिद्धार्थ साहेब, तुमचं मन बदललं वाटतं.." वकिलांनी विचारलं..

"नाही... मला भाऊसाहेबांचा पत्ता हवाय." सिद्धार्थने म्हणाला..

"नाही, मी पत्ता नाही देऊ शकत त्यांचा." वकील अडखळतच म्हणाले.

"मला पत्ता हवाय त्यांचा, त्यांनी माझा पत्ता तर मिळवला, पण आपला नाही सांगितला."

सिद्धार्थच्या आवाजातील आत्मविश्वास बघता वकिलांना वाटलं की, हा आता पत्ता घेतल्याशिवाय राहणार नाही.

"चौदाशे सत्तावीस, सदाशिव पेठ..." वकिलांनी सांगितलं.

"धन्यवाद!!" म्हणून सिद्धार्थने फोन कट केला.

सिद्धार्थ समजून चुकला होता की, आता भाऊसाहेब त्याचा फोन घेणार नाहीत आणि त्याला फोन सुद्धा करणार नाही, मग त्यांच्याशी बोलण्याचा हा एकच पर्याय आहे की, त्यांना भेटून त्यांना सांगावं की ते सिद्धार्थच्या आयुष्यातील आता किती अविभाज्य घटक झाले आहे, आणि सिद्धार्थ या घटकाला वेगळं करण्याचा विचार सुद्धा करू शकत नव्हता. संपूर्ण दिवस सिद्धार्थ त्या चिठ्ठी बदलत विचार करत होता.

तो विचार करत होता की, भाऊसाहेबांचं जीवन सुद्धा त्याच्यासारखंच राहिलं असेल... फरक फक्त होतो तो आर्थिक परिस्थितीचा.

संध्याकाळी रिमझिम पाऊस सुरू झाला होता. सिद्धार्थ ऑफिस च्या खुर्चीवर बसून खाली मान घालून आपलं काम करत होता. तेवढ्यात त्याच्या मोबाईल वर एक SMS नोटिफिकेशन आलं.. "Many Happy Returns of the day. May the coming year be full of health, happiness and prosperity. Happy Birthday Siddharth!" .... सिद्धार्थने तो SMS वाचला. त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की, आज आपला वाढदिवस आहे! तेव्हा सिद्धार्थने पटकन मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू कर केला, आणि त्यात स्वतःला बघत तो म्हणाला ... "वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सिद्धार्थ!"

सिद्धार्थच्या आयुष्यात त्याला वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. कधी..?? त्याला याबद्दल काहीच कोणती अपेक्षा त्याने ठेवली नव्हती.. म्हणूनच की काय मोबाईल वर येणारा SMS सकाळी येण्याऐवजी, दिवस संपता संपता संध्याकाळच्या वेळेला आला होता.

ऑफिसमधून सिद्धार्थ शोधत शोधतच चौदाशे सत्तावीस सदाशिव पेठेत पोहचला.. एका प्रशस्त बंगल्याच्या गेटने सिद्धार्थचं स्वागत केलं. तो फक्त बंगला नव्हता, तर एक राज्याचा राजवडच होता. गेट वरच्या सिक्युरिटी गार्डने सिद्धार्थला बंगल्याच्या दाराजवळ नेऊन सोडलं. गेट मधून आत शिरताच काही वेळातच सिद्धार्थच्या लक्षात आलं होतं की, भाऊसाहेब पटवर्धन म्हणजे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांचेच वंशज होते.

सिद्धार्थने दारावरची बेल वाजवली. सदरा पायजमा घातलेल्या एका वृद्ध व्यक्तीने दरवाजा उघडला. पाच फुटांच्या आत बाहेरची उंची, थोडासा सावळा रंग, डोक्यावर विरळ होत चाललेले पातळ पांढरे केस, आणि त्यांच्या चेहऱ्यावर होतं एक निराळच गांभीर्य..

सिद्धार्थ काही बोलण्याआधीच ते म्हणाले.. "मीच भाऊसाहेब... आणि तू सिद्धार्थ आहेस ना...?"

सिद्धार्थने होकारार्थी मान हलवली. भाऊसाहेबांनी सिद्धार्थला आत बोलावलं. सिद्धार्थ घरात जातात त्याने घरात चहूबाजूंना नजर टाकली. घराचा प्रत्येक कोपरा नीटनेटका सजवला होता.

"मला माहित होतं, तू तो चेक घेणार नाहीस.." भाऊसाहेब सिद्धार्थच्या निरीक्षणात खंड पाडत म्हणाले..

"मग तुम्ही तो चेक का पाठवला होता..? काय तुम्हाला थोडाही अंदाज आला नाही की, तुम्ही माझ्यासाठी आता किती महत्वाचे बनले आहात, मला नाही माहित की तुमची काय असहायता आहे की, तुम्ही या पैशांच्या बदल्यात मला स्वतःला तुमच्या पासून वेगळं करू इच्छिता. मी इतका असंवेदनशील नाही की या पैशांच्या बदल्यात या आपल्या मैत्रीच्या वटवृक्षाला तोडून मोकळा होईल.." सिद्धार्थ रागाच्या भरात बोलत तर होता, पण त्याच्या नजरेत ओलावा सुद्धा भाऊसाहेबांना दिसत होता..

भाऊसाहेब त्याच्यासमोर बसून फक्त त्याला एकटक बघत होते. अचानक ते पुढे सरसावले आणि त्यांनी सिद्धार्थचा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, "माफ कर मित्रा.. चूक झाली. इथून पुढे तू हवं तेव्हा मला भेटायला येऊ शकतोस.."

त्या संध्याकाळी त्यांच्या दोघांमधल्या मैत्रीच्या, स्नेहाच्या बंधनाचं औपचारिक बंधन असलेली भिंत आपोआप वाहून गेली..

आता नेहमीच सिद्धार्थ रोज संध्याकाळी ऑफिस मधून सुटल्यावर भाऊसाहेबांकडे जायचा. रोज संध्याकाळी दोघं मिळून चहा प्यायचे. कधी दोघांमध्ये खूप सार्‍या गप्पा व्हायच्या तर कधी दोघेजण शांत बसून पुस्तक वाचायचे..

कित्येक महिने सिद्धार्थचा हा प्रवास सातत्याने चालू होता. आता भाऊसाहेबांच्या बंगल्याच्या अंगणात नवीन सोनेरी किरणं दिसू लागली होती.. त्याच अंगणात कित्येक वर्षांनी बकुळेच्या झाडाला फुलं सुद्धा उमलली होती..

एक दिवस संध्याकाळी माहिते सरांनी सिद्धार्थला सांगितलं, "सिद्धार्थ उद्या सकाळी तू सांगलीला जा.. तिकडे एक काम आहे... दोन-तीन दिवसात परत येशील.."

संध्याकाळी सिद्धार्थने त्याबद्दल भाऊसाहेबांना सांगितलं तेव्हा भाऊसाहेबांनी सिद्धार्थला सांगली मधील फिरण्याची आणि चांगल्या मिठाई मिळतील आशा ठिकाणांची नावं सांगितली..

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सिद्धार्थ उठला तेव्हा त्याला वेगळीच अस्वस्थता जाणवली. सकाळी ११ च्या दरम्यान तो स्टेशनवर पोहचला. समोर प्लॅटफॉर्मवर ट्रेन लागली होती.. पण त्याला ट्रेनमध्ये बसण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. यापूर्वी सुद्धा तो बऱ्याच वेळा पुणे सोडून शहराबाहेर कामासाठी गेला होता, पण या वेळेस जाणं त्याला खूप वेगळा अनुभव करून देत होतं.. पण मोहिते सरांचं काम आणि नोकरी जाण्याच्या भीतीमुळे तो ट्रेनमध्ये बसला.. पण त्याचं मन मात्र पुढच्या कामाकडे लागत नव्हतं. त्याचं मन एका शंकेने घाबरून गेलं होतं की, काहीतरी कुठेतरी अघटित घडणार आहे.

संध्याकाळी सांगलीला पोहोचतात सिद्धार्थने भाऊसाहेबांना फोन केला, पण त्यांचा फोन बंद होता.. कदाचित फोनची बॅटरी संपली असेल.. असा विचार करून सिद्धार्थने पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न नाही केला. रात्री बिछान्यावर पडल्यावर पुन्हा त्याची बेचैनी वाढू लागली होती.. हॉटेलमधल्या रुमच्या घड्याळाचे काटे आणि त्या काट्यांची टिकटिक ऐकत त्याने रात्र घालवली. सकाळ होताच पुन्हा त्याने भाऊसाहेबांना फोन केला... तरीसुद्धा फोन बंदच होता. तो संपूर्ण दिवस सिद्धार्थ भाऊसाहेबांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण काहीच फायदा झाला नाही. त्याची चिंता आता खात्रीमध्ये बदलू लागली होती की, काहीतरी कुठेतरी अघटित घडलं आहे.

त्यादिवशी काम संपवून सिद्धार्थने भाऊसाहेबांच्या वकिलांना फोन केला. तेव्हा त्यांच्याकडून सिद्धार्थला कळालं की, भाऊसाहेबांना हृदयविकाराचा झटका आला आहे, आणि ते आय. सी. यू. मध्ये ऍडमिट आहेत. वकीलांचं बोलणं ऐकून सिद्धार्थच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या परतीच्या प्रवासाची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी होती. पण सिद्धार्थने रात्रीचीच बस पकडली.. पुण्यात पोहोचताच त्याने हॉस्पिटल गाठलं..

हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनवर सिद्धार्थने भाऊसाहेबांबद्दल विचारलं, तेव्हा रिसेप्शन वरच्या नर्सने संहिताल की, 'भाऊसाहेबांना फक्त कोणा सिद्धार्थ पाटील नावाच्या व्यक्तीला भेटण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली आहे.' सिद्धार्थने आपलं ID कार्ड दाखवत आपली ओळख सांगितली.. हॉस्पिटलच्या कोणीतरी एका स्टाफने सिद्धार्थला ICU च्या ७ नंबरच्या बेड जवळ नेऊन सांगितलं की, "यांची तब्येत खूपच नाजूक आहे, पण हे तुमचं नाव सारखं सारखं घेत होते म्हणून डॉक्टरांनी त्यांना तुम्हाला भेटण्याची परवानगी दिली आहे."

आपल्या मित्राला आय. सी. यूच्या बेडवर पाहून सिद्धार्थ हतबल झाला. तो एकच गोष्ट बोलत होता, "तुम्ही नाही जाऊ शकत मला सोडून भाऊसाहेब.."

भाऊसाहेबांनी आपला हात पुढे केला आणि सिद्धार्थचा हात हातात घेतला. कापत्या थरथरत्या आवाजातच ते म्हणाले, "मित्रा मला जावं लागेल.. मी माझं शरीर या हॉस्पिटलला दान केलं आहे.." तिकडे व्हेंटिलेटरवच्या बिप मधील अंतर आता वाढत जात होतं.. तरीही भाऊसाहेब बोलत होते.. "मित्रा माझ्या जाण्यानंतर वर्तमानपत्रात एक जाहिरात दे, आणि शक्य झालंच तर एक शोकसभा सुद्धा भरव.." असं बोलून भाऊसाहेब एकदम शांत झाले.

तिथेच असलेल्या एका नर्सने भाऊसाहेबांच्या व्हेंटिलेटरकडे बघत सिद्धार्थला बाहेर जायला सांगितलं.. सिद्धार्थ आय. सी. यू. मधून बाहेर येऊन तिथेच खुर्चीत बसला.. तो समोरच्या खिडकीतून अस्थाला जाणाऱ्या लालबूंद सूर्याकडे एकटक पापण्या न मिटता बघत राहिला. पंधरा-वीस मिनिटांनी डॉक्टर आय.सी.यू. मधून बाहेर आले.. त्यांनी सिद्धार्थला सांगितलं, "भाऊसाहेब आता नाही राहिले."

सिद्धार्थच्या नजरा त्या अस्ताला जाणार्‍या सूर्याकडे टिकून होत्या. आता तो सूर्य व पूर्णपणे अस्थ पावला होता, यामुळे निर्माण झालेल्या अंधाराची आता पुन्हा सिद्धार्थला भीती वाटू लागली होती.

सिद्धार्थच्या मनात न राहून एक विचार येऊन गेला, भाऊ साहेब जर एकटेच होते तर असं कोण होतं ज्यांच्या पर्यंत त्यांना आपल्या मृत्यूची बातमी पोचवायची होती.

सिद्धार्थने वर्तमानपत्रांमध्ये श्रद्धांजलीच्या पानावर भाऊसाहेबांच्या निधनाबद्दल बातमी दिली, आणि त्यामध्ये पाचव्या दिवशी शोकसभा असल्याचं सुद्धा नमूद केलं. शोकसभा भाऊसाहेबांच्या घरी सकाळी दहाच्या दरम्यान आयोजित केली होती.

या चार पाच दिवसांमध्ये सिद्धार्थ कित्येक वेळा भाऊसाहेबांच्या आठवणीत रडला होता. एक वेळ पुन्हा एकदा त्याचं सुरळीत चाललेला आयुष्य माळेतून तुटलेल्या मोत्यांप्रमाणे विस्कटून गेलं होतं.. आणि या वेळेस सुद्धा तो एकटाच होता, कोणीच नव्हतं त्याच्यासोबत त्या सांडलेल्या मोत्यांना गोळा करणारं.. सिद्धार्थचा तोच एकटेपणा पुन्हा कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात स्वतःची जागा व्यापून घ्यायला तयार होता.

सिद्धार्थने त्या दिवशी सकाळी जाऊन भाऊसाहेबांच्या घरी हॉलमध्ये एक गादी टाकली, त्यावर पांढरी चादर अंथरूण समोरच्या टेबलावर एका भाऊसाहेबांचा फोटो ठेवला आणि त्याला त्यांच्याच अंगणातील बकुळेच्या फुलांचा हार घातला.

सिद्धार्थ तिथेच बाजूला बसून त्या व्यक्तीची वाट बघत होता जिच्यासाठी भाऊसाहेबांनी वर्तमानपत्रात त्यांच्या निधनाची बातमी द्यायला लावली होती. थोड्या वेळाने उघड्या दरवाजातून एक ३०-३२ वयाची व्यक्ती आत आली.. सिद्धार्थने हात जोडून त्याांना बसण्याची विनंती केली. पुढच्या पंचवीस-तीस मिनीटात अजून दोघे तिघे येऊन भाऊसाहेबांच्या फोटोसमो बसले..

काही वेळ गेल्यानंतर सिद्धार्थ उठून उभा राहिला.. "मी सिद्धार्थ पाटील. भाऊसाहेबांचा एक मित्र.. मीच भाऊसाहेबांच्या निधनाबद्दल त्यांची माहिती वर्तमानपत्रात दिली होती. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की, आपण आपला परिचय द्यावा."

सर्वप्रथम आलेली ती व्यक्ती जागेवर उठून उभी राहिली आणि म्हणाली.. "भाऊसाहेब माझे सुद्धा मित्र होते. खूप चांगली व्यक्ती होती, एका २०० रुपयांच्या नोटेवर त्यांचा नंबर होता त्यानंतरच आमची मैत्री झाली होती. एक दिवस त्यांच्या वकीलांकडून त्यांनी निरोप दिला आणि सोबत एक चेक दिला होता. त्यांनी सांगितलं होतं की, हा चेक घे आणि इथून पुढे मला फोन करण्याचा प्रयत्न करू नको."

बाकी आलेल्या दोघा-तिघांची सुद्धा एकसारख्याच अनुभव होता.. आणि त्यांच्या मैत्रीची गोष्ट सुद्धा अगदी एकसारखीच होती. सिद्धार्थ आता समजून चुकला होता की, त्या एका नोटेमुळे कित्येक चांगले लोक भाऊसाहेबांचे मित्र बनले होते.

त्यानंतरचा काही दिवस असेच निघून गेले.. भाऊसाहेबांच्या निधनानंतर सिद्धार्थला डिंकाचे लाडू सुद्धा गोड लागत नव्हते.. एके दिवशी संध्याकाळी सिद्धार्थ घरी येऊन खिडकीतून अस्थाला जाणारा सूर्य बघत विचार करत होता.. "आपल्या निधनाची बातमी वर्तमान पत्रात भाऊसाहेबांनी का बरं द्यायला लावली असेल..?" .... तेवढ्यात दारावरची घंटी वाजली.. सिद्धार्थने दार उघडलं.. दारात भाऊसाहेबांचे वकील उभे होते.. सिद्धार्थने त्यांना आत बोलावलं.. सिद्धार्थ त्या बातमीबद्दल वकिलांना विचारणार त्या आधीच त्यांनी एक फाईल सिद्धार्थच्या हातात ठेवली.

"ही तुमची फाईल. महिनाभरापूर्वी भाऊसाहेबांनी मला दिली होती, आणि त्यांनी सांगितलं होतं की, मला जर काही झालं तर ही फाईल आणि माझा मोबाईल सिद्धार्थला द्या.." इतकं बोलून वकील फाईल आणि भाऊसाहेबांचा मोबाईल सिद्धार्थच्या हातात देऊन निघून गेले..

सिद्धार्थने ती फाईल उघडली, तर त्यात एक इच्छापत्र होतं. भाऊसाहेबांची त्यांची संपूर्ण संपत्ती सिद्धार्थच्या नावे केली होती, आणि सोबत होती एक चिठ्ठी.. सिद्धार्थ चिठ्ठी वाचू लागला..

"जोपर्यंत ही चिठ्ठी तुझ्या हातात पडेल तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. कदाचित मी या जगातही नसेन. जेव्हा तू ही चिठ्ठी वाचत असशील तेव्हा तू माझ्या अजून काही दोस्तांना भेटला असशील.. कारण ते सुद्धा खूप चांगले लोक आहेत, जे माझ्या निधनाची बातमी कळताच नक्की तुला भेटतील."

चिठ्ठी वाचता वाचता सिद्धार्थनेचे डोळे पाणावले..

"..जो आपल्यासोबत चार पावलं चालतो तो चांगला मित्र बनून जातो, पण कोणत्याही मोहाला बळी न पडता जो पुढे चालत राहतो तोच असतो खरा मित्र.. अशी लोकं तुझ्यासारखी क्वचीतच असतात.. जे सगळं माझं होतं ते त्याच दिवशी तुझं होऊन गेलं होतं, ज्या दिवशी तू १४२७ मध्ये येऊन पोहोचला होतास.. ही फाईल फक्त एक कायदेशीर बाब आहे.."

सिद्धार्थनेच्या डोळ्यातील एक पाण्याचा थेंब त्या चिठ्ठीवर पडला होता..

".... तू म्हणाला होतास ना की, ती दोनशे रुपयांची नोट तू कोणालातरी देऊ केली आहेस.. मग माझी एक शेवटची इच्छा म्हणून माझा मोबाईल नंबर आठवण म्हणून तुझ्या जवळ ठेवून दे.. न जाणे पुन्हा एखादा सिद्धार्थ एका भाऊसाहेबांच्या शोधात असेल... नेहमी आनंदी राहा मित्रा.. खुश रहा..!

तुझा एक मित्र, भाऊसाहेब."

चिठ्ठी वाचून सिद्धार्थचा कंठ दाटून आला होता. त्याचा डोळ्यांमधील पाणी बांध फोडून वाहू लागलं होतं. वकिलांनी दिलेली फाईल आणि मोबाईल त्याने टेबलवर ठेवला. चटई अंथरून त्यावर आडवा झाला. खिडलकीतून सूर्य मावळतीला गेल्यानंतर क्षितिजावर शिल्लख राहिलेल्या रंगीत छटांकडे शून्य नजरेने एकटक बघत राहिला.. काही वेळाने त्या रंगीत छटांना डोळ्यांत साठवून त्याने डोळे मिटले.

सिद्धार्थच्या आयुष्यातील तो शेवटचा सूर्यास्थ होता.

सकाळ झाल्यानंतर टेबलवरच्या भाऊसाहेबांच्या मोबाईलवर बराच वेळ रिंग वाजत होती. मोबाईलचा डिस्प्लेवर एक अनोळखी नंबर डिस्प्ले होत होता. न जाणे कोणी एखादा सिद्धार्थ भाऊसाहेबांच्या शोधात असेल.


... अपूर्ण



#SrSatish🎭

    

२ टिप्पण्या: