शनिवार, ११ मे, २०२४

विश्वचैतन्य आणि विज्ञान

मी शाळेत असताना हा किस्सा घडला होता. बरेच दिवस सांगायचं सांगायचं म्हणत होतो, पण कागदावर मांडण्यासाठी शब्द सापडत नव्हते. हा किस्सा नेहमीच माझी श्रद्धा वाढवत आला आहे.

 

मी ९ वी च्या वर्गात असताना माझ्या विज्ञानाच्या पुस्तकावर स्वामी विवेकानंदांचा फोटो होता. स्वामी विवेकानंदांचं व्यक्तिमत्व म्हणजे अध्यात्मिक परंपरेचं केंद्र म्हणायला हरकत नाही.

एक दिवस वर्गात विज्ञानाच्या शिक्षकांनी (ज्यांना स्वताला नास्तिक म्हणून घेणं म्हणजे अभिमानास्पद वाटत होतं आणि स्वतःचा नास्तिकपणा जगापुढे आणायचा होता) त्यांनी माझ्या पुस्तकावरचा विवेकानंदांचा फोटो पाहिला, आणि मला वर्गात उभ केलं.

"तुझ्या पुस्तकावर हा फोटो कोणाचा आहे?" ...सरांनी प्रश्न केला.

"काय झालं सर...? स्वामी विवेकानंद आहेत..." ...मी पुस्तक हातात घेत म्हणालो.

"विवेकानंद म्हणजे कोण माहित आहेत का?"

"हो सर, ज्यांनी हिंदू धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवला... वेदांत आणि भारतीय संस्कृतीची ओळख जगाला करून दिली होती.."

"म्हणजे तुझा देवावर विश्वास आहे तर?" ...त्यांनी पुढचा प्रश्न केला.

"हो सर निश्चितच!" ...मी हातातील पुस्तक बघत म्हणालो.

"देव हा चांगला आहे का?" ...सरांनी दुसरा प्रश्न केला.

"हो सर!" ...मी अगदी सहज उत्तरं देत होतो.

"देव हा सर्व शक्तिमान आहे का?" ...माझी उत्तरं ऐकून सरांच्या प्रश्नांमध्ये नास्तिकता तीव्रतेने जाणवत होती.

"हो सर, अर्थातच!" ...प्रत्येक उत्तरासोबत माझाही आत्मविश्वास वाढत होता.

"माझा भाऊ कॅन्सरने गेला, त्या आधी त्याने खूप पूजा - प्रार्थना केली होती." ...सरांनी स्वतःची बाजू मांडायला सुरुवात केली.

"कोणी आजारी असेल तेंव्हा आपण देवाच्या मदतीला धावतो, मग देवाने का मदत केली नाही माझ्या भावाला? मग देव चांगला नाही का?" सरांनी आपलं परखड मत मांडलं. त्यांचे शब्द ऐकून सर्व वर्ग स्तब्ध झाला.

"कोणी याचं उत्तर देऊ शकतं का?" ...सरांनी संपूर्ण वर्गाला उद्देशून एक प्रश्न केला, पण सर्व वर्ग शांत होता.

"ठीक आहे. मी अजून काही विचारतो."

सर पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाले... "राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्ती चांगल्या असतात का?"

"नाही" ...मी म्हणालो.

"राक्षसी प्रवृत्ती कोणी बनवली ...देवानेच ना..."

"होय..."

"दुष्ट शक्ती किंवा लोक ते चांगले असतात का?"

"नाही सर ..."

"त्यांनाही देवानेच बनवले. हो ना?"

"हो..."

"या जगात आजारपण, दु:ख, क्रूरता या सर्व वाईट गोष्टी आहेतच ना? कोणी निर्माण केल्या?" ...मी आता शांत झालो होतो. सर मात्र बोलतच होते.

"विज्ञान सांगते की, आपल्याला ५ ज्ञानेंद्रीय असतात. ज्याने आपण जग समजून घेऊ शकतो. मग सांग तू कधी देवाला बघितलं आहे का?'

"नाही सर..." ...मी पुन्हा बोलता झालो.

"कधी देवाला ऐकलं आहेस का? ...स्पर्श केलाय का? ...अशी कोणतीही गोष्ट सांग ज्याने तुला देवाविषयी ज्ञान झाले आहे?"

"नाही सर... असं काहीही नाही." ...मी त्यांच्या नजरेला नजर देत बोलत होतो.

"मग निरीक्षणार्थ, परीक्षणार्थ विज्ञान असा निष्कर्ष लावू शकतो की 'देव' ही संकल्पनाच अस्तित्वात नाही." ...सरांनी विज्ञानाचा दाखला देत स्वतची नास्तिकता परखड पणे व्यक्त करणं सुरूच ठेवलं.

"मग याला तू उत्तर काय देशील?"

"मी म्हणेन माझी श्रद्धा आहे." ...मी थोड्या शांत चित्ताने म्हणालो.

"हो अगदी... इथेच श्रद्धा आणि विज्ञानाचं घोडं अडतं. माणूस विचार करणं सोडून देतो. आणि सगळं श्रद्धेवर सोपवून मोकळा होतो."

सरांचं विद्यांनाची पुंगी वाजवणं चालूच होतं.

"मी तुम्हाला काही प्रश्न विचारु का सर.." ...मी माझ्या हातातील पुस्तक खाली ठेवलं.

"हो हो, विचार की.." ...बराच वेळ उभे असलेले सर स्वतःच्या खुर्चीत बसत म्हणाले.

"सर उष्णता अस्तित्वात आहे का?.." ...सरांच्या विज्ञानाचा आधार घेत मी पहिला प्रश्न केला.

"हो आहे की..." ...सरांनी काहीही विचार न करताच उत्तर दिलं.

"आणि शीतलता?" ...सरांच्या उत्तरानंतर लगेच मी पुढचा प्रश्न केला.

"हो अर्थातच ..." ...सरांनी ही तितक्याच पटकन उत्तर दिलं.

"नाही सर... असं काहीच अस्तित्वात नाही." ...माझे शब्द ऐकताच वर्गातील शांतता पुन्हा वाढली.

"सर आपण उष्णता कितीही निर्माण करु शकतो. पण शीतलता कधीच नाही. आपण शून्य अंशाचा ४५८ अंश खाली जातो आणि त्या तापमानाला No Heat तापमान म्हणतो. म्हणजेच उष्णतेची कमतरता... म्हणजे शीतलता."

"तूम्ही विज्ञानाचा दाखला देत ज्या पाच ज्ञानेंद्रियांचा उल्लेख केलात, त्याच प्रमाणे हे दृष्य विश्व सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेले आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश. या पंचमहाभूतांमध्ये सत्व, रज आणि तम या तीन गुणांची मिळून प्रकृती निर्माण झाली आहे आणि ती ब्रम्हस्वरूपात विसावलेली आहे."

"प्रत्येक प्राणीमात्रांचे शरीर हे ह्याच प्रकृतीने बनलेले आहे. त्याच प्रकृतीचा विस्तार केला तर अनेक तत्वे निर्माण झालेली दिसतील. हा झाला जड वास्तू जी डोळ्यानां दिसते तीचा अभ्यास, पण या अनंत ब्रम्हांडी, जो परमात्मा अनेक वर्षे साधना करूनही समजत नाही.. जो अदृष्य आहे... पण त्याच्याच सत्तेने हे विश्व चालते. ते विश्व चैतन्य.. तो ब्रम्हांडनायक.. परमात्मा.. भगवंत याच चराचरात व्यापलेला आहे. जो प्रत्येक जिवामध्ये ह्रदयात सामावलेला आहे. त्याला समजून घेणं आणि अभ्यास करणं इतकं सहज सोपं नाही सर.."

शांत झालेला वर्ग माझ्या शब्दांकडे लक्श देऊन होता. सरांनाही त्यापुढे काय बोलावं सुचत नव्हतं..

"अंधाराबद्दल काय मत आहे तुमचं. ते अस्तित्वात आहे का?" ...मी आता दुसरा प्रश्न केला.

"हो आहे ना.. रात्र म्हणजे काय अंधारच की?" ...सरांनी आता सावध पणे उत्तर दिलं.

"तुम्ही पुन्हा चुकत आहात." ...मी सरांच्या उत्तराला तिथेच तोडत म्हणालो.

"आपलं तर्कशास्त्र थोडंसं चुकतंय."

"कसं काय..? सिद्ध करुन दाखव." ...सरांनी विश्लेषण मागितलं.

"जर आपण सृष्टीच्या द्वैत तत्वावर भाष्य करत असाल तर जिथे जन्म आहे तिथे मृत्यु आहेच. चांगला देव वाईट देव ही संकल्पनाच मुळात चुकीची. तुम्ही देवाला एखादी मोजता येणारी किंवा स्पर्श करता येणारी गोष्ट समजत आहात."

मला कळत नव्हतं की, इतकं मी कसं बोलू शकत होतो. त्या वेळी माझ्या प्रत्येक शब्दाचा साक्षीदार कदाचीत स्वतः विश्वचैतन्यच असेल.

"जिथे तुमचं विज्ञान विचारांबद्दल सर्वोच्च नोबेल पारितोषिक देऊन सन्मान करते. तेच विज्ञान डोक्यात येणारे विचार कसे असतात हे देखील विश्लेशीत करु शकत नाही... हे जरा विचित्र नाही का? ...

संपूर्ण वर्ग अजूनही शांतच होता.

"विज्ञान फक्त चुंबकीय आणि विद्युत शक्तीचा वापर करतं. त्याचा उगमस्त्रोत माहीत नसणं हे वेडेपणाचे नाही का?... मी तर म्हणेन की जिथे तुमचं विज्ञान संपतं तिथे अध्यात्माची सुरुवात होते.."

सरांनी कदाचित आता माघार घेतली होती.

"मृत्यु हा काही जीवनाचा विरुद्ध अर्थी शब्द नाही... फक्त जीवनाची कमतरता म्हणजे मृत्यु."

"सर तुम्ही ही गोष्ट मानता का... की आपण माकडांचे वंशज आहोत?"

"हो नक्कीच... उत्क्रांतीचा सिद्धांत आहे तसा." ...सरांना बऱ्याच वेळाने बोलायची संधी मिळाली होती.

"मला सांगा सर आपण कोणीही उत्क्रांती स्वताच्या डोळ्यांनी पाहीली आहे का? मी तरी नाही पाहिली.. मग याचा अर्थ असा होतो का, की आपण अजूनही माकडच आहोत ..."

शांत असलेल्या वर्गात अचानक हशा पिकला.

"सर शेवटचा प्रश्न मी सर्व वर्गाला विचारतो.. तुम्ही कधी सरांची बुद्धी पाहीली आहे का... कधी स्पर्श केलंय का ? नाही ना ?"

संपूर्ण वर्ग नाही... म्हणून जोरात ओरडला.

"माफ करा सर, मग आता तुम्ही जे शिकवता ते सगळं बुद्धीहीन आहे असं अम्ही म्हटलं तर..."

"त्यासाठी तुम्हाला माझ्यावर श्रद्धा ठेवावी लागेल ..." ...आता मात्र सरांच्या चेहऱ्यावर स्मित होतं.

त्यांना सुद्धा पटलं होतं...

"अगदी बरोबर बोलत आहात सर... श्रद्धा असली पाहिजे.." ...मी सरांचा तोच शब्द पकडला .... "संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून रेड्यामुखी वेद वदवले होते. संत नामदेवांनी सुद्धा तीच श्रद्धा ठेवून साक्षात विठ्ठलाला जेऊ घातलं होतं.. देव आणि माणूस या मधील दुवा म्हणजे श्रद्धा... देव आहे की नाही असा प्रश्न पडतो म्हणजे दुर्दैवच... म्हणजे श्रद्धेचा आभाव दुसरं काही नाही..."

माझ्या शेवटच्या काही शब्दांनंतर सर्व वर्गाने टाळ्या वाजवल्या त्यावेळी शिकागो मधील धर्म परिषदेत "my sisters and brothers of America" असं म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताच पहिली काही मिनिटं संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा वर्षाव केला होता त्या क्षणाची आठवण झाली..


...अपूर्ण

शनिवार, १७ जून, २०२३

आई.. ❤️

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.


प्रस्तावना -
जवळपास दोन अडीज वर्षांच्या विश्रांती नंतर पुन्हा एक ब्लॉग आपल्यासाठी.

या कथेतील "सतिश" ही केवळ एक व्यक्ती नसून, संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे जो आपल्या आईपासून आणि आपल्या घरापासून दूर राहतो.

मी हा ब्लॉग माझ्या त्या मैत्रिणीला समर्पित करतो जिने काही महिन्यांपूर्वी या जगाचा निरोप घेतला. मैत्रीण असली तरीही मी तिची तुलना "आई" सोबत करणार नाही पण तिच्या वाट्याचं फळ तिच्या पदरात नाही टाकलं तर तिने माझ्यासाठी केलेल्या कृतार्थतेला मी कुठेतरी विसरून गेल्यासारखं होईल.
 
विशेष आभार -
शैलेश सावंत, सुरज परमेकर, निहारीका किरवीड आणि शंतमी पाटील.

 

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

कविता ..

कवितेला शब्दांचं किंवा यमकांच बंधन नसतं, त्यात असते फक्त गुंतागुंत भावनांची.
कविता मुक्त असते, एखाद्या ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यासारखी. वाहत्या प्रवाहाच्या बाहेर पडलेल्याला स्वतःचा मार्ग दाखविणाऱ्या दिव्या सारखी.

कविता ही मधासारखी असते, कित्येक मधमाशांनी गोळा करून आणलेल्या फुलांच्या रसासारखी.
कविता कधीही येते, आपल्यापाशी राहून जाते, तिला काळ वेक काहीच नसते. कधी झोपेतून उठवते, तर कधी झोपूच देत नसते.

कविता कधी विनोद बनून चेहऱ्यावर हसू फुलवते, तर कधी भावनीक होऊन अश्रूंचे बांध फोडून टाकते.
कविता आली तर दिवसभर सोबत असते, तर कधी तोंडही दाखवत नसते.

कविता ही प्रत्येकाचा श्वास असते, कोणाला ती व्यक्त करता येते, तर कोणाला याचा गंध ही नसतो.
कवितेला स्वतःचं रंग रूप नसतं, लिहिणारा प्रत्येकजण स्वतःच्या परीनं तिला घडवत असतो.

कवितेला स्वतःच्या भावनाही नसतात, लिहिणाऱ्यांच्या मनचे भाव स्वतः घेऊन ती जगत असते.
कविता ही कविता असते, कधी तुमच्यासाठी कधी माझ्यासाठी कधी आपल्या सगळ्यांसाठीच मन मोकळं करण्याचा आधार असते.

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

१४२७, सदाशिव पेठ


DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंब स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतातयाव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

Birthday Gift 🎁🎉

 

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

 

शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

क्रांति सूर्य !

टाळ्यांच्या कडकडाटातच तो तरुण खाली बसला. तरुण कसला, १५ वर्षांचा मुलगाच तो! तब्बल दोन मिनिटे टाळ्या वाजत होत्या. सलग! पण नुसत्या टाळ्याच नव्हत्या बरं..! त्या कडकडाटातही श्रोत्यांचे आवाज येतच होते.

कुणी म्हणत होतं, "काय बोललाय छोकरा.. आजवर एवढी व्याख्यानं ऐकली पण एवढ्या लहान मुलाने असं भाषण दिलेलं..? अंहं! कधीच ऐकलं नव्हतं!!"

त्यावर एकजण म्हणाला - "दुसरा लोकमान्य होणार हा, लिहून घ्या!!" तर तिसऱ्याचे, "पण केवढा सुकुमार आहे नाही? देखणा.. राजबिंडा!" यावर चौथा, "हो ना, वाटतंय की आपल्या या छोट्याश्या दहिवली गावात कुणी राजपुत्रच अवतरलाय. देखणा, विद्वान आणि खिळवून ठेवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा धनी..!"

लहानग्यांची आणि किशोरांची वक्तृत्वस्पर्धा होती ती. होता होता स्पर्धा संपली. सूत्रसंचालकाने तसे घोषित केले आणि त्यासोबतच स्पर्धेच्या अध्यक्षांना विनंतीही केली - निकाल संपण्यापूर्वी दोन शब्द बोलण्याची!

अध्यक्षमहोदय बोलायला उभे राहिले. एकवार सगळ्यांवरून नजर फिरवली त्यांनी. मऊशार भात खाताना अचानकच खडा लागावा, तशी त्यांची नजर मघाशीच्या "त्या" मुलावर अडली! एक नि:श्वास सोडून ते बोलू लागले,

"आमच्यावेळी अश्या स्पर्धा फारश्या होत नसत. पण जेव्हा व्हायच्या, त्यावेळी आम्ही अतिशय उत्साहाने भाग घ्यायचो. चार-चार दिवस खपून स्पर्धेची तयारी करायचो आणि बेधडक बोलायचो! आजदेखील सर्वांचीच भाषणे उत्तम झाली. साजेशी झाली. परंतू हल्ली काही मुलांमध्ये आळस फार भरलाय. वक्तृत्वस्पर्धेतली भाषणे पालकांकडून लिहून घेऊ लागलीयेत ती मुलं. पाठ केलेलं उसनवार भाषण म्हणून टाळ्या मिळवल्या जातायत.

आमच्या अनुभवी नजरेतनं अश्या हुशाऱ्या सुटत नाहीत. इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी मांडूच शकत नाही, हे लागलीच लक्षात येते. पण काय करणार? स्पर्धेचे नियम आहेत. काही बंधनं आहेत. ती पाळण्यासाठी मला अश्याच एका मुलाला प्रथम क्रमांक देणं भाग पडतंय. पण माझी अशी इच्छा आहे की, इथून पुढे त्याने स्वत:हून तयारी करून स्पर्धेत उतरावे. भले साधेच भाषण करावे, पण स्वत:चे करावे".

बोलता बोलता त्यांनी "त्या" मुलाच्या दिशेने हात केला, "बाळ पुढे ये.."

सगळ्यांच्या नजरा त्याच्या दिशेने वळल्या. त्याची चर्या शांत होती. परंतू नीट पाहिले असते तर त्याच्या कानांच्या पाळ्या लाल झालेल्या दिसल्या असत्या, नाकपुड्यांची थरथर जाणवली असती! पण टाळ्यांच्या गजरात अश्या सूक्ष्म तपशीलांकडे कुणाचे लक्ष जाते?

तो पुढे आला. अध्यक्ष महोदयांनी त्याच्या हातात प्रथम क्रमांकाचे बक्षिस दिले. पुन्हा एकवार टाळ्यांचा कडकडाट झाला. आवाज जरासा थांबल्यावर "त्या"ने अध्यक्षांच्या दिशेने पाहिले आणि मनातली खळबळ आवाजात किंचितही जाणवू न देता म्हणाला,

"महोदय, आपली काही हरकत नसेल तर मी थोडंसं बोलू का"?

"अवश्य! बोल ना.."

बक्षिसपत्र बाजूला ठेवले आणि पुन्हा एकवार तो व्यासपीठावर जाऊन उभा राहिला. सभागृहात टाचणी पडली तरी कानठळ्या बसतील अशी शांतता पसरली. सगळ्यांचे लक्ष "तो" काय बोलतो याकडे लागलेले. खोल श्वास घेऊन तो बोलू लागला,

"मला पारितोषिक मिळाले हा माझा सन्मान आहे. त्याबद्दल मी सन्माननीय व्यासपीठ, स्पर्धेचे संयोजक आणि उत्तम श्रोतागण यांच्या सगळ्यांच्या चरणी प्रथमत:च कृतज्ञता व्यक्त करतो".

क्षणभर थांबला. पण पुन्हा निर्धारपूर्वक बोलू लागला,

"परंतू मा. अध्यक्ष महोदयांना वाटते की, ते भाषण मी लिहिलेले नाही - पालकांनी लिहून दिलेय. ते म्हणतात की, इतक्या लहान वयात इतके प्रगल्भ विचार कुणी कसे मांडू शकेल? मी त्यांना विचारू इच्छितो की अध्यक्ष महोदय, तुम्ही उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही असाच कोटीक्रम लावणार आहात काय? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेली नसून ज्ञानेश्वरांच्या आई-अण्णांनी त्यांना लिहून दिलीये - कारण इतक्या लहान मुलाला असे प्रगल्भ विचार सुचणेच शक्य नाही - असेच म्हणणार आहात काय"?

अवघी सभा दचकली. "त्या"ने अध्यक्षांकडे एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली,

"तरीदेखील अध्यक्ष महोदयांना शंका असेल तर मी संयोजकांना विनंती करतो की, मला याच क्षणी - आत्ताच्या आत्ता वक्तृत्वासाठी एखादा विषय द्या आणि तयारीसाठी घटकाभराचा वेळ द्या. आणि मी माझा अभ्यास पणाला लावून त्याही विषयावर भाषण करून दाखवतो की नाही पहाच! मगच ते बक्षिस मला द्यायचं की नाही ठरवा"!!

अभावितपणे कुणीतरी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि पाहाता-पाहाता सारे सभागृह पुन्हा एकवार टाळ्यांच्या गजराने कुंद होऊन गेले. इतका वेळ धीराने बोलणारा "तो" आता मात्र घाबरला. आपण चुकून या व्यासपीठाच्या मर्यादेचा भंग तर नाही ना केला? एवढे विद्वान अध्यक्ष महोदय, पण आपल्या या उद्धट वर्तनाने चिडले तर नसतील ना? त्याने हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून त्यांच्याकडे पाहिले. त्यांची नजर स्थिर होती. परंतू सूर्य उगवण्यापूर्वी नभांत जशी हळूवार लालिमा चढत जाते, अगदी तश्याच हळूवारपणे त्यांच्या चर्येवर हास्यप्रभा फाकू लागली होती! शांत चेहऱ्याचे रुपांतर हळूहळू प्रसन्नतेत झाले आणि हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी त्याला जवळ येण्याचा इशारा केला. तो अवघडून आला तर त्यांनी त्याला मिठीच मारली. त्याच्या पाठीवर थाप देत ते बक्षिसपत्र - "काळ" या गाजणाऱ्या नियतकालिकाचे वर्षभराचे मोफत सभासदत्व - त्याच्या हाती दिले. म्हणाले, "बाळा तू आज माझे डोळे उघडलेस. विद्वत्ता, बुद्धिमत्ता वयावर अवलंबून नसते, तर ती व्यक्तीच्या मेहनतीवर आणि अभ्यासावर अवलंबून असते, हे तू आज मज पढतपंडिताला दाखवून दिलेस. या बक्षिसावर अधिकारच आहे तुझा. फक्त तुझा!!"

सारी सभा अवाक होऊन पाहात होती. तो आनंदाने उत्साहित होऊन व्यासपीठावरून उतरला. गर्दीतून वाट काढत जाऊ लागला.

तेवढ्यात अध्यक्षांनी हाक मारली, "अरे बाळा, मला तुझे नाव नाही सांगितलेस"?

हाक ऐकताच तो थबकला. वळाला. त्याची छाती अभिमानाने फुलून आली होती. त्याने मान उंचावली आणि म्हणाला...

"माझं नाव, विनायक दामोदर सावरकर!" 🚩

मन सुद्ध !!

प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ट्रेनने दादर सोडलं. ट्रेन चालू होताच धावत धावत ५०-५५ वयाचे एक गृहस्थ लेडिज डब्यात चढले. डोळे अगदी डबडबलेले, चेहरा त्रासलेला, चेहऱ्यावर प्रचंड थकवा स्पष्ट दिसत होता. एरवी असं कोणी लेडीज डब्बायत चढलं तर बायकांचा एकदम गदारोळ सुरु होतो. उतरो उतरो, असा त्रागाही करू लागतात. पण या भल्या माणसाकडे पाहून सगळ्याजणी एकमेकींकडे पाहायला लागल्या.

ते गृहस्थ आत येऊन एका मोकळ्या बाकड्यावर बसले. खिडकीतून बाहेर एकटक पाहत होते. डोळ्यातून येणारं पाणी लपवायचा प्रयत्न सुद्धा त्यांनी केला नाही.. डोळ्यांत ताराळलेलं पाणी गलांवरून ओघळून खाली उतरलं होतं.. ते बघून समोरच्या बाकड्यावर बसलेल्या एक मुलीने त्यांना स्वतःहून विचारलं, "काय.. झालं? रडताय का तुम्ही??"

या अनोळखी जगात कोणीतरी आपली चौकशी करतंय हे बघून त्यांना हुंदका अनावर झाला.. ते म्हणाले, "केईएममध्ये हिला अॅडमिट केलंय अन् टाटामध्ये थोरला मुलगा व्हेंटिलेटरवर आहे.. आधी मुलाला कोरोनाने गाठलं, आणि त्याचा धसका घेऊन हिची सुद्धा प्रकृती बिघडली.."

त्या काकांच्या शब्दांतील ओलावा बघितला तर कित्येक दिवसांनी त्यांना कोणीतरी आपुलकीचं भेटलं आहे आणि ते आपलं मन मोकळं करत आहेत असं जाणवलं.. स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ते सांगत होते..

"दोघींना होणारा त्रास पाहून सकाळपासून माझं मला काही सुचत नाही. एकीकडे हिच्यासाठी जीव तुटतो, तर दुसरीकडे ऑक्सिजन मास्क तोंडावर लावलेला मुलाचा चेहरा डोळ्यांसमोरून जात नाही.. पण मी घरातला कर्ता पुरुष.. मला कुणाला सांगता येत नाही. खरं तर रडायचं होतं मोकळेपणाने.. म्हणून ठरवून लेडिज डब्यात चढलो.."

डब्ब्यात फारशी गर्दी नव्हती. प्रत्येक बाकड्यावर मोजक्याच स्त्रिया मुली बसल्या होत्या.. त्या काकांचं बोलणं ऐकण्यासाठी म्हणून काहीजणी काकांच्या जवळ येऊन बसल्या..

काकांनी खिशातून रुमाल काढला आणि चष्माच्या आतून डोळे टिपले.. काही जणींनी बॅगेतलं चॉकलेट दिलं, काहींनी पाण्याची बाटली पुढे केली.. काका थोडे सावरले.. म्हणाले, "आपल्यात पुरुष रडत नाही, खरं तर त्याने रडायचं नसतंच. पण तुम्हा मुळींच मन आणि आम्हा पुरुषांचं मन देवाने वेगवेगळ नाही ना बनवलं.. मन असतंच की आम्हालाही.."

त्या काकांचं बोलणं ऐकून तिथेच बाजूला बसलेल्या एका महिलेने कोणाच्याही लक्षात येणार नाही अशा बेताने स्वतःचे डोळे टिपले..

"माझ्या मागे भक्कमपणे उभ्या राहणाऱ्या त्या दोघांनीही होणारा त्रास पाहून माझं आजवर खंबीर असणारं मन जरा हेलावलंय. लेडिज डब्ब्यात चढलो म्हटल्यावर तुम्ही आरडाओरडा कराल, असा विचारही आला नाही.. उलट तुम्ही सगळ्याजणी विचारपूस करतायत.. थॅक्स.."

काकांनी डोळ्यांवरचा चष्मा काढून रुमालाने संपूर्ण चेहरा पुसला.

खरच पुरुषांना इतकं अवघड असतं का रडणं? रडून मन मोकळं करणं..?? भगवंतानि मन सगळ्यांना सारखाच दिलं असेल ना.. सगळ्यांसाठी कायम खंबीर असलेल्या त्या कर्त्या पुरुषांचही जगणं समजून घ्यायला पाहिजे की कोणीतरी.

विलेपार्ले येताच काका उतरून निघून गेले.. ते उतरताना त्यांच्या मनावरचं ओझं कमी झाल्याचं जाणवलं. आणि जाता जाता डब्यातील प्रत्येक महिलेला स्त्रियांना ते काका अप्रत्यक्षपणे सांगून गेले की, तुम्ही मुलांना वाढवताना त्यांना जरूर सांग, पुरुषानेही मोकळेपणाने रडायचं असतं. हक्काने कोणाच्यातरी खांद्यावर डोकं ठेवून मनातलं सांगायचं असतं. मन मोकळं झालं नाही तर हृदयावर एक बॉम्ब घेऊन जगण्यासारखं आहे, ज्याचा कधीही स्फोट होऊ शकतो..


.. अपूर्ण