सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

चाफ्याचा इंद्रधनुष्य !!

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही मोजक्या गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...

 

गुरुवार, १ जुलै, २०२१

मोगरा फुलला

 अनघा आपल्या बंगल्याच्या आवारात झाडांना पाणी घालत होती..

"काय ग.. तू आज परत आलीस.."

"ताय वंजळभरच पायजेती फुलं देवासाठी, द्या की व. तुमच्या झाडाला हायती बी फुलं.. म्हणून मागत्या मी. इथं कुठच येवढी फूलं नायत फकस्त तुमच्याच बंगल्यात हायती."

ती बारा चौदा वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाकडे तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुलं मागत होती.

"नाही म्हणून सांगितलं ना. निघ इथून!" ... असं म्हणून अनघा घरात परत गेली.

"कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?" असं एकटीच बडबडत होती..

तेवढ्यात तिचा नवरा राघव आला.. "काय झालं? कोणाला बडबडतेस? इथे कोणीच दिसतच नाहीय?"

"अहो.. गेले चार दिवस झाले एक मुलगी मोगऱ्याची फुलं मागायला येतेय. देवाला पाहिजेत म्हणे.. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत." ... अनघा थोड्या चिडक्या स्वरात बडबडत होती..

"अग ती फुलंच तर मागतेय, द्यायचीस ना. तसंही मोगरा किती लगडलाय फुलांनी." बाहेर झाडाकडे बघत राघव म्हणाला..

"हो फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत.. अख्ख्या कॉलनीत कोणाच्याच अंगणात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त आपल्याच झाडाला आहेत." अनघाच्या स्वरात थोडा अभिमान अहंकार दिसत होता.. "आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत फुलं. खत-पाणी, वेळेत कटिंग, सगळं वेळेत करावं लागतं.. तुम्हाला माहिती आहे ना मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. सगळ्या देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत."

"अग, एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेस असतं.. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच चरणांशी ना.." राघव अनघाला समाजविण्याच्या प्रयत्नात होता.. "तू वाहिली काय, अन् त्या छोट्या मुलीने वाहिली काय.. देव तर एकच आहे ना.."

"ओ.. तुमचं लॉजिक तुमच्या जवळच ठेवा. माझे कष्ट आहेत त्यामागे." .. अनघा पुन्हा चिडक्या स्वरात म्हणाली..

"एक सांगू.." राघव अनघाला पुन्हा समजावू लागला.. "असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कोणाला.. आणि काय फुलं तर मागतेय ना.. तिने कूठे तुला जेवण किंवा पैसे मागितले.. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं.."

"बरं.. उद्या आली मागायला तर देईन चार फुलं.. तेही ही तुम्ही सांगता म्हणून.." अनघाला राघवच म्हणणं थोडं पटलं होतं..

"बरं पण जरा प्रेमाने दे.. रागे नको भरू. त्या छोट्या मुलीला.." अनघाचं बोलणं ऐकून राघवच्या चेहऱ्यावर हसू उमटलं..

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी दारात ती मुलगी उभी.. अनघाला तर राग आलेला पण राघवसाठी तिने स्वतःला सावरलं..

"ए मुली.. थांब तिथंच देते फुलं." छोट्या पिशवीत अनघाने पंधरा वीस फुलं तोडून टाकली.. आणि तिच्याजवळ जात म्हणाली.. "उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला.."

"ताय ते आठ दिस फुलं पायजेती.. देशीला का?" .. फुलांची पिशवी उराशी धरून ती म्हणाली..

"आठ दिवस.. रोज... कशाला?"

"ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा तिथं द्याला.. माय ला पायजे व्हती." तिची नजर खाली अनघाच्या पायावर होती.. चेहऱ्यावर निर्विकार भाव.. आवाज खूप लाघवी.. आणि ती बोलत होती.. "माय देवाला बोलली हाय आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन."

"देवाला अर्पण करायला मागून फुलं वाहतात का.." अनघाचं स्वर थोडा उंचावला होता.. ती चढ्या आवाजातच त्या पोरीशी बोलत होती.. "घे जा ना विकत देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत."

मुलीचा चेहरा खाडकन उतरला. "ताय.. ते.. पैसं रोज... एवढं.." मुलीला पुढे काय बोलावं सुचेना..

"कळलं.. नाहीत ना पैसे. मग बोलताच कशाला गं असं देवाला.." .. अनघाचा स्वर तसाच होता..

ती काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

अनघाला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. "उद्या येईल का ती परत? नाही येणार बहुतेक.. किती बोलले मी.. ते ही फुलांसाठी." अनघा स्वतःशीच विचार करत म्हणाली..

आज ताजी असणारी फूलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं झाडाकडे एक नजर टाकली.. मोगरा ही थोडा नाराजच दिसला. "जावू दे.. उद्या च उद्या पाहू." असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच.. अनघाला थोडं हायसं वाटलं.. आली बाई आज परत..

"ताय..." तिने हाक मारली..

"हो आले.. देते फुलं.." अनघा हातातलं काम बाजूला ठेवून बाहेर आली.. "कुठं राहतेस गं.."

"गावाच्या बाहेर पडकी साळा हाय तिथ." कुठल्यातरी एका दिशेला बोट दाखवत त्या मुलीने आपला पत्ता सांगितला..

"घरात कोण कोण आहे" फुलं तोडून तिच्या पिशवीत टाकताना अनघाने प्रश्न विचारला..

"माय, बा, मोठी भन, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.." असं म्हणून त्या पोरीने बोट अगदी आकाशाकडे दाखवलं..

"बरं बरं. घे फुलं आणि जा.."

"जी ताय.."
फुलं मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेउन ती निघून गेली..

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती.. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे.. अनघाच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली... स्वतःशी हसत विचार करत होती..

"मी रोज फुकट फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झाला. नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं.. देव ही नकळत आपल्यावर खूष असणारच." अनघा एकटीच बोलत होती.

इतक्यात राघव तिथे आला..
"काय.. एकट्याच गालात हसताय." राघव ने विचारलं..

"काही नाही हो.. ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येत होती पण आता ह्या काही दिवसात कुठे आलीच नाही." बाहेरच्या मोगऱ्याच्या झाडाकडे बघत अनघा म्हणाली..

"अगं.. आता कशाला येईल..? तिला आठच दिवस फुलं हवी होती ना!" राघव म्हणाला.. "तसंही तुला तीचं फुलं मागणं आवडतं नव्हतच की.."

"आहो.. पण एकदा परत येवून आभार तरी तिने मानायचे ना.." डोळ्यात अहंकाराची लकेर ठेऊन अनघा बोलत होती.. "लोकं केलेले उपकार असे विसरतात म्हणून कोणाला काही देवू नये. तुम्ही सांगितलेलं ना म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस. रोज..."

अनघाचं बोलणं ऐकून राघवला हसू आलं..

"काय झालं...?" अनघाने विचारलं..

"काही नाही."

तेवढ्यात बाहेरून हाक आली.. "ताय.. व ताय!"

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघंही बाहेर आले तर दारात ती मुलगी उभी होती..

"काय आज पण फुलं पाहिजेत का" प्रश्नार्थक नजरेनं अनघाने विचारलं.. "आधीच सांगते.. नाही देणार आज फुलं.. थोडी कमीच लागली आहेत.. मला देवपूजेला पाहिजेत."

"फुलं नको ताय... ते.... हे... हे.." हातातलं मळकट फडकं अनघापुढे करत ती म्हणाली..

अनघाने त्या फडक्याकडे बघितलं.. "काय.. .ते... हे...."

"ताय.. ते माझी मोठी भन बाळतपणाला आल्या.. यवस्थित बाळ हु दे म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला." त्या मुलीच्या नजरेतील ओलावा अनघाला दिसत होता.

"तुम्ही फुलं दिली आयचा नवस पुरा झाला.. परवा दिशी मुलगा झाला भणीला.. यवस्थित हाय सगळ.." असं सांगताना मुलीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.. "माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो ताय.. बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी.." हातातलं फडकं अनघाकडे देत ती म्हणाली.. "बा म्हणाला, तुमचं उपकार जन्मभर नाय इसरणार.. अन् माय म्हणली कुणाचबी काय फुकट घेव न्हाय. आपल्या परीनं परत करावं.. म्हणून हे.. घ्या..."

अनघाने ते मळकट फडकं हातात घेतलं.. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मुर्ती होती.. किती तेजस्वी आनंदी, सात्विक आहे ही मुर्ती. अनघा आनंदून गेली..

"अगं ऐक..." हातातील मूर्तीवरची नजर उचलून समोर बघत अनघा म्हणाली..

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मुर्ती देवून निघूनही गेली. अनघाचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली. अनघाचे डोळे पाण्याने डबडबले..

आपण किती खुजे, संकुचित.. एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे.. सारा गर्व अभिमान एका झटक्यात गळून पडला.. एखाद्याची पात्रता ठरवणारे आपण कोण..? का हिने न बोलता आपल्याला आपली पात्रता दाखवली.. अनघाला तिची चूक उमगली होती..

आता मोगऱ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला.. आज तो रोजच्या पेक्षा जास्त टवटवीत बहरलेला वाटला .. 🙏🏻🌹

🌸🌺🌼🌻🌹🍃🌷🍀☘️🍁🍂
📚📖🖋️🙏🏻🌹



अपूर्ण...

गुरुवार, १५ एप्रिल, २०२१

बालगंधर्वांची अखेर!

१४/१५ वर्षांपूर्वी स्वत: पाहिलेली विलक्षण घटना!

त्या दिवशी नेमका मी पुण्यात होतो. दुपारची जेवण वेळ. मी नारायण गेटजवळच्या माझ्या घरून पान खाण्यासाठी बाहेर आलो होतो. गेटजवळच्या पानाच्या दुकानाकडे वळणार इतक्यात माझ्या अगदी समोर चार-सहा फुटांच्या अंतरावर एक प्रेतयात्रा येताना दिसली. मी त्वरेने मागे धावलो. रस्त्याच्या कडेला उभे राहून बघू लागलो, तो त्या प्रेतयात्रेत मोजकीच माणसे सामील झालेली! चौघांनी प्रेताची ताटी खांद्यावर घेतलेली, एकजण पुढे विस्तव धरलेला आणि बाकीची शेलकीच माणसे भरधाव वेगात जात असलेली. ती जवळजवळ सर्वच माणसे परिचित चेहर्‍यांची. पुण्याच्या नाट्यक्षेत्रात प्रत्यही दिसत असलेली. नाट्यक्षेत्रातील सभा-संमेलनात माझे नेहमी जाणे-येणे असायचे. त्यावेळी तेथे दिसणारी प्रमुख माणसे त्या प्रेतयात्रेत दिसली. मी तशा स्थितीतही शेवटून जाणाऱ्या एका परिचितांना हळूच विचारून घेतले.

‘कोण?’

न थांबता त्यांनी कुजबुजत्या स्वरात सांगितले.. ‘अहो… गंधर्व… बालगंधर्व…’

बालगंधर्वाची प्रेतयात्रा अणि ती अवघ्या इतक्या थोड्या माणसांच्या उपस्थितीत!

बालगंधर्व…सौभद्र…स्वयंवर…मृच्छकटिक…एकच प्याला…जोहार मायबाप जोहार…अन्नदाते मायबाप हो..

हे सारे क्षणात डोळ्यांपुढे उभे राहिले. पान खाण्याची इच्छा पार मावळून गेली.

ओंकारेश्वराच्या समोरील नदीच्या किनाऱ्यावरल्या बंदिस्त आवारात प्रेत खाली ठेवण्यात आले. कुणीतरी त्वरेने पुढे झाले. लाकडे रचण्यात आली. प्रेत नदीच्या पाण्यात भिजवून आणले. प्रेताचा गोरापान चेहरा तशा अचेतन अवस्थेतही देखणा दिसत होत. प्रेत ठेवल्यावर सरणाच्या फटी सगळीकडून बंद करण्यात आल्या. मडके धरून आणणार्‍याने अग्नीचे चार निखारे सरणावर टाकले. दुसर्‍या बाजूने रॉकेल ओतण्यात आले. कुणीतरी काडी ओढून ती सरणावर टाकली. आग भडकली. पाहता पाहता आगीच्या ज्वाळा गगनाला भिडल्या. आतून तडतड असे आवाज येऊ लागले. पाहता पाहता जळून गेलेली धगधगती लाकडे चोहीकडून राखेच्या स्वरूपात खाली गळून पडू लागली. एक भलामोठा आवाज झाला. त्यावर कुणीतरी उदासपणे म्हणाले, ‘संपलं! चला आता.’

घरी आलो. चार वाजून गेले होते…बालगंधर्वांची प्रेतयात्रा अशा घाईगडबडीने व पुण्यासारख्या त्यांच्या कर्मभूमीत गाजावाजा न करता गुपचूपपणे का उरकून घेण्यात आली?

त्याचे कारण दुसरेतिसरे काही नसून स्वत: बालगंधर्व नारायणराव राजहंस यांचा लहरीपणा आणि त्यातून उद्भवलेले त्यांचे दुर्दैव हेच आहे!

गोहरबाईसारख्या एका रूपवती नटीशी त्यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात विवाह केला व तिच्या पायावर तन-मन-धन सर्वस्व वाहून टाकले. तिच्यासाठी नारायणरावांनी मुसलमान धर्म स्वीकारला. मुंबईला माहीम भागातील तिच्या वसतिस्थानात नारायणराव राजीखुषीने राहायला गेले. गोहरबाईने महाराष्ट्राच्या या लाडक्या गंधर्वाला जवळ केले त्यावेळी वास्तविक पाहता या गंधर्वाची सारी पिसे गळून गेलेली होती. त्याची गंधर्व नाटक मंडळी कधीच भूतकाळात जमा झाली होती. सारी नटमंडळी त्याला सोडून आपापल्या वाटेने उडून गेली होती. उरला होता तो एक म्हातारा-पिसे गळालेला राजहंस!

कुणीही केली नसती अशी सेवा या गोहरबाई नावाच्या वेश्येने केली. त्याचे लुळेपण तिने भक्तिभावाने जोपासले. कसल्याही सुखाची अपेक्षा न करता! कारण एकच… त्याच्या गळ्यावरील तिचे भक्तियुक्त प्रेम. जे प्रेम राधेने कृष्णावर केले… अहिल्येने रामावर केले… ते प्रेम गोहरने या सुरेल राजहंसावर केले. त्याला त्याच्या अखेरच्या लुळ्यापांगळ्या अवस्थेत सांभाळले. मायेची पाखर दिली आणि स्वत: ही मुसलमान साध्वी अगोदर

अहेवपणाचे लेणे कपाळावर मिरवत दिक्कालापलीकडे निघून गेली. उरला तो आणखीनच

विदीर्ण झालेला राजहंस. त्यावेळी त्याच्या रसिकजनांनी व भगतगणांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. त्याने गोहरबाईसारख्या एका मुसलमान बाईचा घरोबा स्वीकारला. त्यासंबंधी टीकेची हत्यारे त्याच्यावर परजीत पुण्याचे सर्व नाटकी सज्जन त्याला विसरून जाण्याच्या तयारीत होते.

असा हा एकेकाळचा नटसम्राट बालगंधर्व…

मुसलमान झालेला. आपल्या पूर्वीच्या साऱ्या प्रेमिकांना

अव्हेरून त्याने आपण होऊन माहीमचा रस्ता धरलेला होता. अर्थांतर तर झालेच होते, धर्मांतरही झाले! त्यानंतर पहिले काही दिवस, अंगात त्राण होते तोपर्यंत गावोगावच्या जुन्या भगतगणांना बोलावून त्यांच्याकडून सत्कार करवून घ्यायचे, थैल्या घ्यायच्या. एका हाताने घ्यायच्या व दुसऱ्या हाताने देणेकऱ्याच्या स्वाधीन करायच्या असलेही उद्योग या राजहंसाने केले.

एक प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे. सोलापूरचा. याच सोलापूरने पूर्वी बालगंधर्वांना भरभरून लोकप्रियता दिली.

पैशांच्या राशी त्यांच्या पावलावर ओतल्या. मेकॉनकी थिएटर म्हणजे बालगंधर्वांचे जणू माहेर! तिथं नाटक करताना जणू इंद्रपुरीत नाटक करतो असे वाटते असं बालगंधर्व नेहमीच म्हणायचे. पण आयुष्याच्या शेवटच्या प्रहरी जुन्या गिरणीच्या पाठीमागे बांधलेल्या तमाशाच्या थिएटरात या राजहंसाला कबुतराच्या खुराड्यात राहिल्याप्रमाणे रहावे लागले.

नाटके लावता येत नव्हती. पण सोलापूरचे वेडे भक्त रुंजी घालायला तयारच होते. एका भोळ्याभाबड्या बाईने पुढाकार घेऊन गंधर्वाला थैली देण्याचा घाट घातला. तिच्या एकटीच्या पायपिटीने हजार अकराशेची रास जमा झाली. त्याच तमाशाच्या थिएटरात थैली अर्पण करण्याचा समारंभ झाला. राजहंसाला दोन माणसांनी उचलून रंगमंचावरील खुर्चीत आणून बसवले. भाषणे झाली. उजवीकडच्या विंगेत एक परिचित चेहऱ्याचा व्यापारी आशाळभूत मुद्रेने चुळबूळ करीत उभा दिसला. थैली अर्पण करण्यात आली… तो चुळबुळ्या व्यापारी चक्क रंगमंचावर येऊन थैली घेऊन गेला…!

गंधर्वाचे भाषण सुरू झाले. ‘अन्नदाते! मायबाप हो! तुम्हीच मला मोठे केलेत. तुम्हीच मला जगवा… तुमच्या उष्ट्याचा मी महार.’

असे अनेक थैली समारंभ सोलापूरपासून जळगाव भुसावळपर्यंत. चौकोनी कोडी असतात त्याप्रमाणे उभी आडवी तिरपी कशीही बेरीज केली तरी उत्तर येईल शून्य! गंधर्वांना मिळालेल्या अनेक थैल्यांची बेरीज होती शून्य! जमेला होते ते एक गोहरबाईचे नितांत प्रेम. तिने आपल्या ‘गळ्याचा’ व्यवसाय सोडून पतीची वार्धक्यातली सेवा करण्याचा पतिव्रताधर्म स्वीकारला.

परंतु बिचारीचे नशीब खोटे! ती तरी त्याला काय करणार? बालगंधर्वाभोवती त्यांच्या चलतीच्या काळात रुंजी घालणारे कपोतपक्षी त्याच्याजवळून उडून गेले व साऱ्या महाराष्ट्रात गोहरबाईने गंधर्वाचा सत्यानाश केला अशी हाकाटी करीत राहिले.

वास्तविक पाहता, सत्यानाश तिने करून घेतला होता तो स्वत:च्या कलाजीवनाचा मृच्छकटिकातल्या वसंतसेनेची तिने केलेली एक भूमिका मी पाहिली होती. ‘माडीवरी चल ग सये’ हे गाणे ती अशा ढंगात म्हणायची की त्याचे वर्णन करणे मुष्किल आहे.

ज्या काळात मराठी रंगभूमीवर अद्यापही पुरुष नट स्त्रीभूमिका करायचे व त्यांचे ‘कसेही’ दिसणे प्रेक्षक गोड करून घ्यायचे त्या काळात मराठी रंगभूमीवर गोहर नावाच्या गोड गळ्याच्या व भावपूर्ण डोळ्यांच्या एका जातिवंत नटीने गाननृत्यही करून एक आगळा साक्षात्कार घडविला होता तो काळ दृष्टीसमोर आणा म्हणजे माझ्या म्हणण्याची सत्यता पटेल. त्या काळात ज्योत्स्ना भोळे अद्याप चमकायच्या होत्या. हिराबाई बडोदेकर एखाद्या नाटकात काम करायच्या. परंतु हिराबाई म्हणजे केवळ श्रुतिमाधुर्य. त्यांचे गाणे ऐकावे ते डोळे मिटून!

हिराबाईंच्या गानमाधुर्याबद्दल आणि त्यांच्या सालस स्वभावाबद्दल संपूर्णपणे आदर बाळगून मला असे बिनदिक्कत म्हणावेसे वाटते की हिराबाई या गायिका आहेत, नटी नाहीत. मराठी रंगभूमीवरील पहिली अभिनयकुशल आणि नृत्यगानकुशल अशी स्त्री म्हणजे गोहरच होय!

जातिधर्माच्या अभिमानापलीकडे न जाणाऱ्या आपल्या मध्यमवर्गीय नाट्य

समीक्षकांनी आजपर्यंत गोहरला न्याय दिलाच नाही असे खेदाने म्हणावे लागते. नारायणराव राजहंसानी तिच्यातले नाट्यगुण जाणले होते आणि त्यामुळेच ते तिच्याशी एकरूप झाले.

दोन जातिवंत कलावंतांचे हे त्यांच्या जीवनाच्या उत्तर काळातले मीलन गंधर्वांच्या हिंदू चाहत्यांना रुचणारे नव्हते. पृथ्वीच्या पोटातून निघणारे सुवर्ण किंवा लोह हे केवळ आपल्याच उपभोगासाठी आहे असे मानून त्याचे कोडकौतुक करणार्‍या मानवजातीप्रमाणेच गंधर्व हे फक्त आमचेच आहेत, आमच्यासाठी आहेत असा भ्रामक समज त्यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या हिंदू रसिकांनी करून घेतला होता. पृथ्वीच्या गर्भात लोहभस्म आणि सुवर्णभस्म जे दडलेले असते त्यामुळे जमिनीचा कस वाढत असतो व पृथ्वीच्या अंतर्भागात होणारे प्रचंड उत्पात त्यामुळे टळत असतात.

सोने किंवा लोखंड हे माणसांसाठी निर्माण करून दिलेले पदार्थ नाहीत. माणसाने आपली बुद्धी वापरून ते स्वत:च्या वैभवासाठी व उन्नतीसाठी वापरले ही गोष्ट वेगळी! त्याचप्रमाणे नारायणराव बालगंधर्व यांचे दैवी गायन हे काही फक्त चार हिंदू रसिकांपुरतेच नव्हते. त्यांच्या आवाजात जी आर्तता होती ती साऱ्या मानवजातीकरता होती. परधर्मातील गोहर उगीच नाही त्या आर्ततेवर भुलून स्वत:चे सर्वस्व राजहंसाच्या पायावर वाहायला तयार झाली!

तिचे व बालगंधर्वांचे मीलन हिंदू रसिकांना न रुचल्याने त्यांच्यावर जी हीन पातळीवरील टीका व निंदानालस्ती झाली त्यामुळे ती गोहर नावाची ‘अस्मानी परी’ मनोमन कष्टी असे. ती कुरूप होती, हिडीस होती, चेटकीण होती असे नाना प्रकारचे आरोप तिच्यावर गंधर्वांचे संगतीत काही काळ राहिल्याचे भूषण मिरविणारे अद्याप करीत असतात. गंधर्वांच्या नाट्यकंपनीत पोट फुटेपर्यंत खाल्लेली पंचपक्वान्ने अद्यापही या तथाकथित गंधर्वभक्ताच्या अंगावर उठून बाहेर येत आहेत. गंधर्व कंपनीत म्हणे, ‘काळी साळ’ नावाचा सुवासिक तांदूळ आणि शुभ्र लोणकढे तूप खायला मिळायचे! ती काळी साळी आणि तुपाची लोणकढी आता चेहऱ्यावर येऊन बसली आहे व रात्री-अपरात्री अश्‍वत्थाम्यासारखी भ्रमंती करायला लावीत आहे. गोहरला चेटकीण म्हणणारे हे महाभाग कदाचित गोहरच्या तारुण्यात तिचा उपभोग घ्यायलाही गेले असतील व नकार घेऊन परत आले असतील, कुणी सांगावे? कारण बालगंधर्वांची नि तिची प्रेमभेट होण्यापूर्वी ती जर विजापूरची कलावंतीणच होती!

ते काहीही असो. मला मात्र राहून राहून एका गोष्टीची रुखरुख वाटते ती म्हणजे गोहरच्या आणि गंधर्वांच्या शरीरसंबंधातून एखादा अंकुर निर्माण झाला असता तर तो गायनाची पताका

दिगंत घेऊन जाणारा झाला असता! दोन अस्सल कलावंतांच्या मीलनातून परमेश्वराने का नाही तिसरा जीव निर्माण केला?

या रुखरुखीबरोबर पुण्याच्या जहांगीर नर्सिंग होममध्ये अखेरचे क्षण मोजीत पडलेला गंधर्वांचा म्लान चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. गंधर्व अत्यवस्थ… अशी सिंगल बातमी ‘सकाळ’च्या कोपऱ्यात आली होती ती वाचून मी आणि माझा एक मित्र वसंत जोशी दुपारचे जहांगीर नर्सिंग होममध्ये गेलो होतो. एका खोलीत स्वच्छ पांढऱ्या चादरीवर अर्ध्या चड्डीतला गंधर्वांचा गोरापान कमनीय देह पडला होता. जवळपास कुणीही नव्हते. फक्त एक बगळ्याच्या रंगाच्या पोषाखातली परिचारिका डोळ्यांतली कबुतरे उडवीत उभी होती. त्या क्षणी माझ्या मनात आलेली कल्पना अद्याप मी विसरू शकत नाही. परी गेली नि परिचारिका उरली. ही ती कल्पना!

आणि प्रारंभी वर्णन केलेली ती सहा माणसांची भेसूर स्मशानयात्रा आठवली की आजही अंगावर शहारे येतात.

आयुष्यभर ज्याने कला, नाट्य वैभव, मित्रपरिवार याशिवाय दुसरे काही नाही केले त्याच्या अंत्ययात्रेला एखादाही श्रीमंत उल्लू रसिक नव्हता! गंधर्वांशी आज मैत्री सांगणारा एखादाही मित्र नव्हता.

होते ते एका हौशी नाट्यसंस्थेचे पदाधिकारी आणि माझ्यासारखा एक कलंदर!

कलाकाराची अंत्ययात्रा अशीच असायची असा विधिलिखित संकेतच असतो की काय कुणास ठाऊक! मानवजातीला तृप्त करणाऱ्याला मात्र अखेरीस ‘प्यासा’ रहावे लागते.

एक शापित गंधर्व आणि एक शापित अप्सरा यांचे हाल आणि दैना आम्ही पाहिली. गंधर्वांचे भाग्य थोर! त्याच्यावर पुस्तके लिहिली जात आहेत.

पण अप्सरेचा मानवी अवतार तिच्या अखेरच्या श्‍वासाबरोबरच संपला…


लेखक - वसंत शा. वैद्य

शुक्रवार, ५ मार्च, २०२१

वांगं

स्थळ - कोथरूड, पुणे

दिवस - अलीकडचेच


काही दिवसांपूर्वी मी कोथरूड परिसरातील एका लग्नाला गेलो होतो. पुणेकरांचं कसं प्रत्येक गोष्ठीत वेगळं लॉजिक असतं. लग्न - समारंभाला वगैरे ५० व्यक्तींनाच परवानगी असली तरीही सांगताना मात्र सांगणार की, "सगळ्यांनी सहपरिवार यायचं हं लग्नाला, पण जेवण मात्र फक्त ५० लोकांसाठीच आहे."

आता हे असं आमंत्रण मिळाल्यावर कोण हुशार (पुणेकर) मंडळी सहपरिवार लग्नाला जायला तयार होतील? ... त्यामुळे हॉलमध्ये पाहुणे मंडळी जरा कमीच दिसत होती. तरीसुद्धा उगाच रिस्क कशाला... म्हणून मी सुपर ५० च्या पंगतीत जेवायला बसलो.

वाटलं की, जेवायला बसल्यावर मास्क कशाला गळ्यात अडकवून ठेवायचा.. म्हणून तोंडावरचा N95 मास्क 😷 काढुन टेबलवर ठेवला, आणि पंगतीत गुलाबजाम वाढणाऱ्या मुलाला खुणावू लागलो.. तेवढ्यात दुसरीकडून कोणीतरी आला अन् मास्कला द्रोण समजून त्यात पळीभर वांग्याची भाजी वाढून गेला. त्यात आणि हद्द म्हणजे माझ्या शेजारी बसलेले आजोबा त्या मास्ककडे बोट दाखवून जेवण वाढणाऱ्या एका मुलीला म्हणाले, "मला ह्या अशा वाटीतून बासुंदी आणून दे, वाटी जरा मोठी दिसतेय.."

मास्कमध्ये वाढलेली वांग्याची भाजी बघून त्या मुलीच्या डोळ्यांसमोर भर दिवसा तारे चमकल्याचं माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. 🤣🤣😁😁


#तो मी नव्हेच🤣

©® #SrSatish🎭™

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

मासिक पाळी आणि अंधश्रद्धा

“डॉक्टर, घरी पूजा आहे.. पाळी लांबवण्याच्या गोळ्या हव्या होत्या..”

श्रावण महिना सुरु झाला की सगळ्या स्त्रीरोगतज्ञांच्या क्लिनिकमध्ये ऐकू येणारा हा हमखास संवाद!

सध्या जेव्हा स्त्रियांच्या देवळातल्या प्रवेशाबद्दल चर्चा सुरु आहे तेव्हा ह्या सर्वात महत्वाच्या मुद्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसतेय. तो म्हणजे मासिक पाळी चालू असताना स्त्रीला दिली जाणारी संतापजनक वागणूक.

या बाबतीत पेशंट स्त्रियांची समजूत घालण्याचा आम्ही स्त्रीरोगतज्ञ खूप वेळा  प्रयत्न करतो.

मासिक पाळी येणे हे जननक्षमतेचे लक्षण आहे. देवी ही जर आपण स्त्रीरुपातच बघतो तर तिला पाळी येत नसणार का? मग देवीचे दर्शन घेताना पाळी चालू असेल तर काय बिघडले?

देवाला जायच्या आधी इतर शारीरिक धर्म आपण आंघोळ करून जात असू तर पाळी चालू असताना आंघोळ करून दर्शनाला गेले तर काय फरक पडतो?

पण दुर्दैवाने आपल्या समाजातल्या सर्व स्त्रियांच्या मनावर मासिक पाळी म्हणजे अशुध्द, अस्वच्छ अशा अत्यंत चुकीच्या समजुतींचा पगडा इतका पक्का आहे की समजावून सांगूनही स्त्रिया ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

सर्वात चिंताजनक परिस्थिती ही सुध्दा आहे की, करीअर करणाऱ्या, इंजिनीयर किंवा कधीकधी डॉक्टर असलेल्या महिला सुध्दा ह्या गैरसमजुतीतून बाहेर पडू शकत नाहीत. बऱ्याच जणींना हे चुकीचे आहे हे पटते पण घरचे व बाहेरचे काही कर्मठ लोक ‘तू असं केलंस तर देवाचा कोप होईल’ वगैरे तथ्यहीन भयगंड ह्या महिलांना घालतात.

मुळातच मासिक पाळी का येते हे समजून घेणे महत्वाचे आहे.

गर्भाशयाच्या आतील आवरण दर महिन्याला तयार होत असते. गर्भधारणा झाली तर तयार होणाऱ्या गर्भासाठी पोषक द्रव्ये मिळवीत म्हणून ही तयारी असते. गर्भधारणा झाली नाही तर हे आवरण पाळीच्या रूपाने निघून जाते.

मग हे रक्त अशुध्द कसे असेल? आता तर संशोधनाअंती असा सिध्द झालाय की, या रक्तात stem cells असतात जे विविध पेशींमध्ये रुपांतरीत होऊ शकतात. म्हणजे नवनिर्माण करण्याची सृजनशक्ती असलेल्या पेशी या पाळीच्या रक्तात असतात. काही आन्तरराष्ट्रीय कंपन्या हे रक्त जमा करून त्यातून stem cells काढून घेण्यासाठी महिलांना आर्थिक मोबदला पण देण्यास तयार आहेत. आणि आपण मात्र जुन्या पुराण्या बुरसटलेल्या समजुती कवटाळून बसलो आहोत.

मुळात ह्या समजुती पसरवणाऱ्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीचाच हात आहे. स्त्रीच्या शरीराला अपवित्र मानले, तिला त्या चार दिवसात अस्पृश्य मानले की तिचा आपोआप तेजोभंग होतो. तिला मानसिक आणि शारीरिक खचवण्याचा हा उत्तम उपाय त्यावेळच्या कर्मठ लोकांना सापडला असावा.

पाळीच्या वेळी विश्रांतीची गरज असते वगैरे हे युक्तीवाद धादांत ढोंगीपणाचे आहेत. आपल्या समाजात एरवी खरोखर आजारी असलेल्या स्त्रीलाही विश्रांती मिळत नाही मग पाळीच्या वेळी गरज नसताना सक्तीची विश्रांती कशासाठी?

या जुनाट आणि बुरसटलेल्या विचारांच्या पगड्यांमुळे कित्येक स्त्रियांचे आयुष्य दुर्धर होऊन बसताना आम्ही बघतो. कोणताही सण समारंभ अथवा यात्रा असेल तर त्यातील आनंद अनुभवायचा सोडून ‘तेव्हा माझी पाळी तर येणार नाही ना’ याच विचारात ह्या स्त्रिया चिंतातूर होतात. मग पाळी लांबवण्याच्या गोळ्या सतत घेणे सुरु होते. स्त्रियांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने या गोळ्या सारख्या घेणे हानिकारक असते.कधी कधी तर ह्या सगळ्याला कंटाळून ‘गर्भपिशवी काढून टाका’ अशीही मागणी स्त्रिया करताना दिसतात. या मानसिकतेतून समाजाला बाहेर काढायलाच हवे.

साधारणपणे पाळी चालू असताना खास विश्रांतीची काही गरज नसते. बिचाऱ्या कामावर जाणाऱ्या महिला सगळी कामे निमुटपणे करत असतात; फक्त देवाचा विषय आला की मग ह्या समजुती उफाळून येतात. हे सगळे कर्मकांड करणाऱ्यांचा सोयीचे आणि कमालीचे दांभिक आहे.

मला असे वाटते की मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या स्त्रियांनी ह्याही विषयाला वाचा फोडावी आणि ह्या बुरसटलेल्या हीन अंधश्रध्दांना मूठमाती देण्यासाठी जनजागरण करावे. 



© डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग व वंध्यत्वतज्ञ, पुणे

गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

श्रीयुत गंगाधर टिपरे - एक आठवण

एकदा एका वृत्तवाहिनीच्या फोन-इन कार्यक्रमात दिग्दर्शक केदार शिंदे आले होते. तेव्हा मी त्यांना फोन करून विचारले की आम्हांला ‘टिपरे’, ‘हसा चकटफू’ सारख्या मालिका पुन्हा कधी बघायला मिळतील? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “’टिपरे’ हा चमत्कार होता! बाकी मालिका होत राहतील पण टिपरे मालिका परत बनवणे कठीण काम आहे.

खरंच, आजही ती मालिका आठवते. दिलीप प्रभावळकर यांच्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावर ती आधारित होती. सुदैवाने युट्यूबवर त्याचे जुने भाग आहेत, ते बघता येतात. टिपरे ही कौटुंबिक, विनोदी आणि सहज मनोरंजन करणारी मालिका होती. 

आजचे जे विनोदी कार्यक्रम/मालिका चालतात ते आपल्याला ठरवून हसवायचा प्रयत्न करताहेत असं वाटतं. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरून टिप्पणी करणे हे अगदी नॉर्मलच झालंय, लोकांना पण ते आवडतं! म्हणजे एखादा उंचीने कमी असणाऱ्या कलाकाराचा स्कीट मध्ये उपयोग करून घ्यायचा आणि येताजाता त्याच्या उंची वर ‘पंचेस’ मारायचे की ‘लाफ्टर’ मिळतो! एखाद्या टक्कल असलेल्या कलाकाराला त्याच्या डोक्यावरून चिडवायचं, एखाद्या वर्णाने काळ्या असणाऱ्या कलाकारावर त्याच्या रंगाचा उल्लेख करायचा की आणखी ‘लाफ्टर’ मिळतो! पुरुष विनोदी कलाकाराने स्त्री चा वेश घ्यायचा आणि वाटेल तसे चेहरे आणि आवाज करून ‘जोक’ मारायचे (फेमिनिस्ट वाल्यांना असले प्रकार बरे चालतात!), मध्येच काहीतरी यमक जुळवून चारोळ्या करायच्या, असं काही केलं की अर्धी स्क्रिप्ट झाली. किती सोप्पं आहे हे! एकदा एका हिंदी कार्यक्रमात शोले चित्रपटावरून असेच थिल्लर विनोद चालू होते तेव्हा पाहुण्या कलाकार म्हणून आलेल्या हेमा मालिनी यांनी त्यावर जागीच आक्षेप घेतला होता आणि त्या निघून गेल्या होत्या. शोले सारखे चित्रपट म्हणजे बऱ्याच विनोदी लोकांना राखीव कुरणच वाटतं. 

अंगविक्षेप, अश्लील विनोद, अश्लील शब्द पूर्ण न उच्चारता त्याचा आभास निर्माण करणं आणि लोकांनी तो ओळखून हसणं म्हणजे आजचा विनोद. हा प्रकार सगळीकडे चालू आहे. विनोदी मालिका/कार्यक्रम/स्टँडअप कॉमेडी, सोशल मीडिया आणि टिकटॉक सारख्या प्रकारांनी सगळं सोप्पं करून टाकलंय! पुढच्या पिढीला आपण फार चांगलं विनोदी वाङमय दाखवतोय.


सद्ध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हसवण्याचं महत्व ओळखून हे सगळे ‘शोज’ आपलं चालवून घेतात. अर्थात सगळे असेच आहेत असं नाही. काही चांगले कार्यक्रमही आहेत. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. हे सगळं बघून टिपरे सारख्या मालिकांचं महत्व लक्षात येतं. आज त्या मालिकेचा सीक्वेल काढला किंवा परत तेच एपिसोड जरी दाखवले तरी बाकीच्यांचे ‘टीआरपी’ कमी होतील. लोकांना आपलेपणा वाटेल अश्या मोजक्या मालिकांपैकी ती एक होती. 

मुंबई सारख्या धावत्या शहरात राहणारं सरळसाधं मध्यमवर्गीय कुटूंब, फार काही विचित्र विषय न काढता सामान्य माणसाला रोजच्या जगण्यात येणाऱ्या समस्या आणि त्यावर त्या कुटुंबाची रिअँक्शन, इतका त्या मालिकेचा स्कोप होता. त्यात मग सण उत्सव आले, तात्कालिक विषय आले, काही सामाजिक, जागतिक विषयही आले. पण मालिकेची गोडी काही कमी झाली नाही, उलट ती आणखी वाढली. मालिकेचं श्रवणीय शीर्षक गीत लागलं की पुढे हातातला रिमोट कंट्रोल अर्धा तास हलणार नाही याची खात्री होती. 

दिलीप प्रभावळकर आहेत म्हटल्यावर त्या मालिकेचा दर्जा आधीच उंचीवर नेऊन ठेवला होता. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाची भूमिका करताना ती एकाचवेळी विनोदी, हळवी आणि आपली कशी वाटेल हे काम त्यांनी सहजपणे करून दाखवलं. कॉलनीमधल्या लोकांना मध्येच टपली मारणे, नातवाला एखादी गोष्ट समजावून सांगणे अशी चौफेर फटकेबाजी त्यांनी केली. त्यांच्या कामाचं मोजमाप आम्ही करणे हाच एक विनोद आहे! राजन भिसे यांनी रोज ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकराची सकाळच्या वेळेची घाई अगदी योग्य पद्धतीने दाखवली. घरात वावरताना बऱ्याचदा बनियन वर राहून अगदी घरगुती ‘फील’ त्यांनी आणला. नाहीतर बाकी बऱ्याच मालिकांमध्ये भरजरी कपडे आणि दागिने घरात अगदी झोपताना सुद्धा घालायची प्रथा आहे. कौटुंबिक मालिका म्हणतात पण सामान्य माणसाशी त्यांचा काही संबंध नसतो. शुभांगी गोखले यांनी गृहिणी हा सुद्धा एक जॉब कसा आहे हे दाखवून दिलं! शलाका उर्फ रेश्मा नाईक हिने स्वतः एक आधुनिक मुलगी असूनसुद्धा घरचे संस्कार आपल्यावर आहेत हे दाखवलं. म्हणून ऑस्ट्रेलिया ला जाऊन येऊन सुद्धा तिचे पाय जमिनीवर राहिले. शिऱ्या उर्फ विकास कदमने टिपिकल मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे आपलं क्रिकेट चं वेड दाखवलं. केदार शिंदेंनी स्वतःचं क्रिकेटचं अर्धवट राहिलेलं स्वप्न शिऱ्याच्या पात्रात दाखवलं होतं. धडपड्या मुलगा असतानाच स्वतःच्या बहिणीची काळजी घेणारा भाऊ ही भूमिका त्याने चोख बजावली. सामान्य मुलाला जशी नोकरी मिळू शकते तशी ती जाऊ पण शकते आणि क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकत नसेल तर सरळ नोकरी धरण्याचा मार्ग पत्करावा हे वास्तवसुद्धा यात दाखवलं गेलं. काही संवाद रात्री जेवणाच्या टेबलवर एकत्र बसून (हे चित्र हल्ली कमी होत चाललय), आबा आणि शिऱ्या मधले काही संवाद ते बेडवर झोपून बोलतायत असं दाखवल्याने ते नैसर्गिक वाटले. बाकी पात्रांनी सुद्धा आपल्या भूमिका जास्तीत जास्त नैसर्गिक कशा होतील हे बघितलं.


अधूनमधून या मालिकेत मुक्ता बर्वे, क्षिती जोग, ऋषिकेश जोशी, सुनील बर्वे असे कलाकार येऊन गेले आणि आणखी चारचाँद लागले. 

आजोबा आणि नातू यांचं नातं. भाऊ–बहिणीचं नातं, मुलगा-वडिल यांचं नातं, घरातले संस्कार हे सगळं दाखवताना एखादा एपिसोड हळूच डोळ्यात पाणी आणायचा. शलाकाचं बाहेर ‘चालू’ आहे हे कळल्यावर घरातल्या सदस्यांना थोडं टेन्शन येणं, त्याकाळी कॉम्प्युटरवर अमेरिकेहून आलेला ईमेल बघून आनंद होणं हे टिपिकल मध्यमवर्गीय घरातलं चित्र बघितल्यावर ते कोणालाही आपलंसं वाटायचं. समाजात घडणाऱ्या घटनांवर एखादा एपिसोड हळूच टिप्पणी करून जायचा. 

आज असंख्य चॅनेल्सवर अगणित मालिका चालू आहेत. वर्षानुवर्षे सोमवार ते शनिवार एपिसोडसचा रतीब घातला जातोय. एक्सट्रा मॅरिटल अफेअर, दोन-तीन लग्न, पुनर्जन्म, अपहरण, मारामारी, नात्यातल्या लोकांनी एकमेकांच्या कानाखाली मारणे, बंदूक काढणे हे असलं काहीतरी दाखवून आमचं मनोरंजन केलं जातं. लोकांशी नाळ तुटेल अशी भीती वाटली कि मधेच एखादा ‘महाएपिसोड’ प्रदर्शित होतो. महारविवार चा महाएपिसोड! एखादी मोठी घटना आजच्या भागात घडेल असं काहीतरी जाहिरातीत दाखवून लोकांना एक तास आणि कधी कधी दोन तास बसवून ठेवलं जातं. मग लोकं पण ‘महागाई’ सारखे दैनंदिन जीवनातले प्रश्न विसरून हे ‘महाएपिसोड’ बघत बसतात. बाकी महागायक, महागायिका, महाविजेता, सूरांचं महायुद्ध(!) यावर वेगळा लेख लिहावा लागेल! तरुणांनी वेब सिरीज मुळे यातून सुटका करून घेतलीय. 

‘टिपरे’ ला कधी महाएपिसोड ची गरज पडली नाही. कारण काल्पनिक काहीतरी न दाखवता आपल्याला थेट भिडणाऱ्या गोष्टी यात दाखवल्या गेल्या. म्हणूनच ‘टिपरे’, ‘वागले कि दुनिया’ सारख्या काही मोजक्या मालिका लोकांच्या कायम लक्षात राहतात.

“मालिका कधी थांबवणार” यापेक्षा “का थांबवली?” असं लोकांनी विचारावं या हेतूने मर्यादित भाग करून ही मालिका संपली. आजही जवळपास १५ वर्ष झाली तरी ती लोकांच्या लक्षात आहे हेच त्या मालिकेचे यश आहे ! 

-  अनिकेत केणी

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

शब्दांच्या पलीकडे ..


टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...