सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

चाफ्याचा इंद्रधनुष्य !!

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही मोजक्या गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...

 


संध्याकाळच्या वेळी सूर्य अस्थाला जाण्याच्या तयारीत असताना वाहणाऱ्या हलक्या थंडगार वाऱ्यासोबत घरामोरच्या अंगणातील चाफ्याच्या फुलांच्या दरवळणाऱ्या सुगंधाची मला मुळातच चीड, त्या क्षणी आकाशात तयार होणाऱ्या लालसर भगव्या रंगाच्या छटा सुद्धा मला रंगहीन वाटतात. खरं तर चाफ्याचा सुगंध आणि त्या रंगीत छटांची चीड नाही, पण त्यासोबत वाहणाऱ्या खोट्या खोट्या उत्साही आणि आनंदी भावनांची चीड जास्त..

माझ्या आयुष्यात चाफा मोगऱ्याचा सुगंध जितका सामान्य तितकेच गुलाबाचे काटे काहीसे खास.. आणि रंगांचं काय.. तर इंद्रधनुष्यातील सात रंग सुद्धा मला अशा वेळी रंगहीन वाटतात.

माझ्याबद्दल बोलायचं तर सगळ्यात पहिलं काय सांगू.. मी कशी आहे? कशी दिसते? आजपर्यंत कोणीच मला "तू खूप सुंदर दिसतेस!" असं बोललं नाही.. पण आई म्हणते की, मी ओले मोकळे केस सोडून डोळ्यात काजळ लावून हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस घालून तयार होते, तेंव्हा अगदी एखाद्या परी सारखी दिसते.. पण आई ती आईच ना.. कधी कधी चपाती भाजता भाजता म्हणायची, "कोणी कॉलेजमध्ये पसंत आहे का? असेल तर सांग.. तुझ्या बाबांशी बोलते मी."

.. मी आईच्या बोलण्याकडे गमतीनेच बघायचे... "का बरं.. तू तुझ्या लाडक्या लेकीसाठी एक चांगला मुलगा नाही शोधू शकत का?"

"काय फायदा.. तुझं लग्न जुळवायचं झालं तर तुझ्या लग्नाचा खर्च आणि होणारं मानपान... पेलणार आहे का तुझ्या बाबांना.."

आईच्या बोलण्यात माझ्या लग्नाविषयीची चिंता स्पष्ट दिसायची.. माझे बाबा एका खाजगी बँकेत अकाउंटंट आहेत. काही महिन्यांपूर्वी बँकेच्या एका संचालक मंडळाच्या सदस्याने काहीतरी अफरातफर केल्याची बातमी होती.. तेंव्हा पासून बँकेचे बरेचसे व्यवहार RBI काढून बंद केले होते.

"म्हणून तूच तुझ्या पसंतीचा मुलगा शोध, तेवढाच खर्च कमी होईल तुझ्या बाबांचा.."

एका सामान्य कुटुंबातील मुलीचं लग्न म्हणजे किती मोठी जबाबदारी असते हे त्या घरच्यांशिवाय कोणीच समजू शकत नाही... सूर्याचं तेज एकाएकी जसं कमी व्हावं तशीच काहीशी परिस्थिती होती बाबांवर.

"माझ्या लग्नाची काळजी तू नको करू, त्यासाठी मी पैसे साठवलेत.." मी आईचं टेन्शन दूर करण्यासाठी गमतीने म्हणायची, "माझ्या गल्ल्यात आहेत पूर्ण साडेसात हजार रुपये, तेवढ्यात होईल ना मानपापन सगळ्यांचा?? तेवढा खर्च पुरेसा होईल ना..?"

हे ऐकून आई खळखळून हसू लागायची आणि आईला हसताना बघून माझ्या चेहऱ्यावर सुद्धा हलकसं हसू उमटायचं. दर चार आठ दिवसांनी असंच हसत हसत एखादी चपाती जळून जायची.

अरेरे.. या सगळ्यात माझं नाव सांगाचं राहून गेलं.

मी कल्याणी.. Agriculture Business Management ची विद्यार्थीनी आहे, आणि पुढे आधुनिक शेती विषय घेऊन Masters करायचंय.. भविष्यात सामान्य शेतकऱ्यांना शेती विषयक योग्य मार्गदर्शन आणि सल्ला मिळण्यासाठी एक Consultancy Firm सुरू करण्याचा विचार आहे. तसं तर पुण्यात जाऊन संस्कृत विषय घेऊन PhD करण्याचा सुद्धा विचार होताच की माझा.. पण इथे सांगलीतच घरापासून १५-२० मिनिटांच्या अंतरावर विश्रामबाग कॉलनीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात ऍडमिशन घ्यावं लागलं होतं.

कोणाचं उष्ठ कुठल्या गावी किती सांडावं, याला काही अंतर नाही..

पुण्यात नाही तर नाही म्हणून काय मी स्वप्न बघणं सोडून देऊ का? अजिबात नाही..!! शीतल.. माझी अगदी जवळची मैत्रीण.. तिचं म्हणणं आहे की, मी एक नंबरची भांडखोर आणि खट्याळ मुलगी आहे. आणि ते तर आहेच.. ज्या दिवशी माझा मूड खराब असेल तेंव्हा तर मी माझ्या स्वप्नांशी पण भांडण करेन.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट... जानेवारी फेब्रुवारीचे ऐन थंडीचे दिवस.. पहाटे लवकर उठण्याच्या नावानेच मला अजूनच थंडी भरते.. आणि त्यात थंड पाण्याने अंघोळ करायची म्हणजे आनंदच! तरी सुद्धा त्या दिवशी मी सकाळी सकाळी लवकर उठून सर्व आवरून बाल्कनीत पोहचले, अगरबत्ती पेटवून तुळशी वृंदावनाजवळ जाऊन तुळशीला पाणी देत होते. तेवढ्यात खालून वर्तमान पत्राची एक घडी उडत उडत येऊन माझ्या हातावर आदळली. हातातील पाण्याचा तांब्या हातातून निसटून जमिनीवर आदळला, आणि जळत्या अगरबत्तीने माझ्या ओढणीचा ठाव घेतला.. दोन छिद्र पाडून अगरबत्ती ओढणीच्या आरपार निघाली.

मी रागातच बाल्कनीतून खाली पाहिलं, कोणीतरी नवीन पेपरवाला होता.. त्याची नजर माझ्यावरच होती.

मी रागाने त्याला विचारलं, "ओ दिसत नाही का?" २४-२५ वर्षांचा तो मुलगा तिथेच उभा होता, पण काही बोलला नाही. लांब सडक नाक, निळसर डोळे, थोडा सावळा वर्ण... त्याचा चेहरा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता.

"माझी ओढणी जळाली ना मूर्खा.." त्याला रागातच मी बोलले.. पण तो मात्र शांतच होता.

"काय झालं? काहीतरी बोलशील का..?"

तो माझ्याशी बोलण्याऐवजी आपली सायकल फिरवू लागला.

"अरे ए.. एक मिनिटं थांब.. बघतेच तुला.." असं बडबडत मी आत जिन्याकडे धावले.. पण मी गेटपर्यंत पोहचताच तो सायकल घेऊन खूप लांब निघून गेला होता.

माझा एवढा दंगा ऐकून आईने किचनमधून आवाज दिला, "काय झालं ग..?"

"काही नाही.. सकाळी सकाळी कोणतरी माझा संपूर्ण दिवस खराब करून गेला.."

"कोण.?" आईने विचारलं.

"अगं हा पेपरवाला... नवीन दिसतोय.. माझी ओढणी सुद्धा जळाली.. हे बघ ना.." आईसमोर ओढणी पसरवत मी म्हणाले.

"ठेवून दे.. मी रफू करून देते त्याला.. सकाळी सकाळी एवढ्याशा गोष्टीसाठी सगळं घर डोक्यावर घ्यायची काही गरज नाही.."

मी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले, "काय निर्लज्ज मुलगा आहे.. सॉरी सुद्धा म्हणाला नाही.. उलट मलाच रागाने बघून निघून गेला. नक्कीच त्याने मुद्दामूनच केलं असेल.. त्याला बघतेच मी एकदा.. सापडेलच कधीतरी.."

दुसऱ्या दिवशीपासून मी सकाळी सकाळी अभ्यास सोडून त्या पेपर वाल्याची वाट बघत बाल्कनीत उभी असायचे, पण कधी तो पेपर टाकून निघून जायचा कळायचंच नाही, मी पुढचा तासभर त्याची वाट बघत उभी असायची. सलग तीन दिवस वाट बघत राहिले, पण तो पेपर टाकून कधी जायचं कळतच नव्हतं. त्यानंतर मी माझे प्रयत्न सोडून दिले.

एके दिवशी संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर शीतल आणि मी एकत्रच घरी जायला निघालो. लहानपणापासून आम्ही एकत्र शिकलो, एकत्रच वाढलो.. तिचं घर सुद्धा माझ्या घराला लागूनच.. त्यामुळे कुठे जायचं तिकडे आम्ही दोघी एकत्रच.. शाळा.. क्लास.. कॉलेज.. मार्केट.. सगळीकडेच एकत्र..

कॉलेज सुटल्यावर घरी जाताना विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या बाजूच्या रस्त्याने आम्हाला घरी जायला थोडं जवळ पडायचं. पण त्या रस्त्याने जाताना तिथे असणाऱ्या काही टपोरी मुलांमुळे सर्व मुलींना खाली मान घालून जलद पावलांनी ते अंतर पार करावं लागायचे.. म्हणून कॉलेजमधून परतताना आम्ही सुद्धा त्या रस्त्यावरून जाणं शक्यतो टाळायचो.. पण आमच्या नेहमीच्या रस्त्यावर काहीतरी काम चालू असल्यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता.

त्या दिवशी त्या रस्त्यावरून जाताना त्या टपोरी मुलांचा वात्रटपणा त्यांच्या त्या विचित्र Comments काहीच कानावर पडत नव्हतं.. म्हणून मी हळूच मागे वळून पाहिलं तर तिथे काही जणांचा घोळका भिंतीवर स्टिकर चिटकवून येणाऱ्या - जाणाऱ्या लोकांकडून वर्गणी गोळा करत होता. माझी नजर त्या भिंतीवरच्या स्टिकरवर पडली. 'रक्तदान शिबिरासाठी निधी द्यावा' असं काहीतरी लिहिलं होतं.

मी शितलला ते पोस्टर दाखवत म्हणाले, "बघ.. सगळं सोडून हे लोक आता समाजकार्य करत आहेत.."

तेव्हा शितल हसली, "तू अजून लहान आहेस, तुला नाही कळणार.. लोकांना असंच काहीतरी कारण सांगून संध्याकाळच्या पार्टीची तयारी चालू आहे त्यांची.. शंभर दोनशे रुपये खर्च केलेत त्यांनी या स्टिकरसाठी, आणि वरच्या पैशांची संध्याकाळी पार्टी असणार.."

तेवढ्यात एका मुलाकडे शीतल बोट दाखवत म्हणाली, "तो मुलगा तुझ्याकडे असा का बघतोय.. ओळखतो तुला ?."

"कोण मुलगा?" असं म्हणून मी मागे वळून पाहिलं तर त्या सगळ्या गर्दीमध्ये एक नजर माझ्यावरच टिकून होती. तीच ती नजर ज्या नजरेने यापूर्वी पण माझ्याकडे पाहिलं होतं.. तिथेच एका भिंतीला टेकून उभा होता तो.

"अगं टपोरी आहे एक नंबर चा.." मी म्हणाले.

"तू ओळखतेस का त्याला?" शीतलने विचारलं.

"नाही तर, आमच्या कॉलनीत पेपर वाटतो तो.."

"तर मग.." शीतल म्हणाली.

"मग काय ? उद्या भेटू! चाल बाय.!!" मी विषय बदलण्याच्या स्वरात म्हणाले.

शीतल किंवा इतर मुलींप्रमाणे नव्हते मी, किंवा मी त्यांना समजू शकत नव्हते. आणि आम्ही आमच्या वाटेला लागलो.. मी माझ्या घरी निघाले आणि शीतल मार्केटच्या दिशेने निघून गेली. मी हळूच मागे पाहिलं तर तो मुलगा माझ्या पाठी येत होता. माझी नजर मागे आहे बघताच, त्याने हात उचलून इशारा केला.. माझ्या हृदयाचे ठोके आपोआपच वाढले.. थंडीचे दिवस असल्याने ६ वाजण्याआधीच काळोख झाला होता. रस्ता सुद्धा मोकळा होता. मी झप झप पावलांनी घराकडे जात होते. तेवढ्यात मागून येणारी एक स्कूटर थेट माझ्या शेजारी येऊन थांबली. बाबांना तिथे बघून मला थोडा धीर वाटला.. अथांग सागरात एकट्या उडणाऱ्या पक्षाला अचानक किनारा दिसावा तसं काहीसं वाटलं.

याआधी बाबा काही विचारतील.. मी पटकन स्कूटरवर बसले.

बाबांनी विचारलं, "तुला एवढा दम का लागलंय..?"

"बाबा पटकन घरी जाऊया, मला जरा अभ्यास आहे आज.." असं म्हणत मी मागे वळून पाहिलं, तर तो पेपरवाला मागे फिरला होता.

घरी पोहोचताच घरातल्या कामाच्या गडबडीत संध्याकाळची ती गोष्ट डोक्यातून निघून गेली होती. पण रात्री बिछान्यावर पडताच पुन्हा त्या विचारांनी डोक्यात काहूर माजवलं.. आणि मला स्वतःवरच राग येऊ लागला.. आज कळलं की, मी स्वतःला जितकं कणखर समजत होते तेवढी मी नाहीय.. स्वतःबद्दल अजून किती गैरसमज बाळगून आहे मी.. काय माहिती..?? कशी पळून आले? ते ही एका पेपरवल्या पासून, पुढच्या वेळी तो भेटूच दे.. त्या वेळी बघतेच त्याला.. विचार करता करता कधी झोप लागली कळलं नाही.

एका आठवड्यानंतरची गोष्ट आहे. सकाळी सकाळी मी आणि शीतल तिच्या स्कुटी वरून क्लाससाठी निघालो होतो. स्कुटी मी चालवत होते. अचानक मला काहीतरी आठवलं आणि मी स्कुटी सांगली रेल्वे स्टेशनकडे वळवली.

"इकडे कुठे चालली आहेत?" ... शीतलने विचारलं.

"थोडं फिरून जाऊ ना, थोडा उशीर झाला तर असं कोणतं ब्रम्हज्ञान निसटणार आहे.." .. मी Rear View Mirror मधून मागे बघत म्हणाले.

शहरातील सर्व पेपरवाल्यांचे पेपर त्यांना इथेच स्टेशनच्या परिसरात मिळतात.

आम्ही दोघी तिथेच थांबून एका टपरीवर चहा प्यायला लागलो. तेव्हढ्यात मला आमच्या कॉलनीतील तो पेपरवाला दिसला. आपल्या सायकलच्या कॅरियरवर तो पेपरचा गठ्ठा बांधत होता.

"चल पटकन.." .. चहावाल्याचे पैसे देत मी शीतलला म्हणाले. स्कूटर चालू करून आम्ही दोघीही त्या पेपरवल्याच्या दिशेने निघालो.

एक तर थंडीचे दिवस... धुक्याने नीट दिसत नव्हतं.. रस्ता ओला... त्यात ब्रेक कमी लागला... आणि स्कुटी उजव्या बाजूने त्या सायकलला जाऊन धडकली.

जेवढा विचार केला होता.. त्यापेक्षा धडक थोडी जोरातच बसली होती.. माझ्या मनात एक विचार येऊन गेला... मी कसतरी स्कुटीला सावरलं, पण तो पेपरवाला तिथेच आडवा झाला.

सायकल एका बाजूला आणि कॅरियर वरचा पेपरचा गठ्ठा रस्त्याकडेच्या नाल्यात... स्कुटीला स्टॅण्डवर लावून आम्ही दोघी त्याच्याकडे धावलो.

शीतलने त्याला उठवत विचारलं, "तुम्हाला जास्त लागलं तर नाही ना?"

सायकलचं पेडल लागल्याने त्याच्या पायातून थोडं रक्त येत होतं. तो एकीकडे.. त्याच्या चपला एकीकडे, तरीही त्याची नजर मलाच पाहत होती.. त्या नजरेतील भाव मी ओळखू शकत नव्हते.

सायकलचं मागचं चाक अजूनही कर कर करत फिरत होतं. बरं झालं की त्याला फारसं लागलं नाही.. मी त्याच्या दूर पडलेल्या चपला आणायला धावले.

कसातरी तो उठून उभा राहिला होता. शीतलने त्याची सायकल उचलली, मी माझ्या बॅगेतून एक बँडेड काढून त्याला दिल. पहिल्यांदाच मी त्याला इतक्या जवळून पाहत होते. मला वाटलं की, मी हा चेहरा कुठेतरी आधी पहिलाय. तेवढ्या वेदनेत सुद्धा त्याच्या चेहर्‍यावर एक निराळचं हास्य होतं.. तो स्माईल करत म्हणाला.. "thank you!"

त्याचं ते हसणं, त्याचं ते शांत राहणं, त्याचे ते निळसर निरागस डोळे.. जसे की मला काहीतरी सांगत होते. मी शीतलला म्हणाले, "चल आपल्याला उशीर होतंय.. निघू आपण."

तेवढ्यात तिने मला काहीतरी खुणावलं.. मी त्या पेपरवाल्याकडे न बघताच त्याला म्हणाले, "रस्ता ओला होता, ब्रेक पण नाही लागला.. सॉरी!!"

एवढं बोलून मी वळून स्कुटीकडे निघाले. शीतलसुद्धा माझ्या मागे धावत आली.. "कल्याणी.. काय झालंय? खरं खरं सांग का केलंस तू अस?" ... तिने विचारलं.

"का मी काय केलं? ... रस्त्यावर Accident होत नाहीत का..?" मी स्वतःला सावरत म्हणाले.

"हो का! जसं की मला कळलं नाही की तू मुद्दामूनच चुकीचा इंडिकेटर दिला.." शीतल म्हणाली..

कदाचित शीतलच्या लक्षात आलं होतं की मी मुद्दामून त्याला धडकले.

"त्याच्यामुळे माझी ओढणी जळाली होती, आणि तू पाहिलं नाही का.. कसा बघत होता तो माझ्याकडे.. नंतर माझा पाठलाग पण करत होता.." ... मी म्हणाले.

"मग काय.. त्याचा बदला तू असा घेणार का..?" ... शीतल म्हणाली. "एक तर त्याला लागलं, त्याचं ७०० - ८०० रुपयांचं नुकसान झालं.."

शीतलच्या बोलण्याकडे मी दुर्लक्ष केलं.. तिला काहीच उत्तर दिलं नाही. आम्ही दोघीही तिथून निघून गेलो.

संध्याकाळी घरी आई आणि मी हॉलमध्ये TV बघत बसलो होतो, आई रात्रीच्या जेवणाची तयारी म्हणून कांदे चिरत होती.

"आई आत जाऊन काप ना कांदे, डोळे जळतायेत माझे.." मी म्हणाले.

"का, काय झालं तुला?" आई स्वतःचे डोळे चोळ म्हणाली.

"काही नाही.."

"थोडा मूड खराब दिसतोय तुझा." ..आई म्हणाली.

काय माहिती आईला कसं लक्षात यायचं. पण ती खरं बोलत होती.. तिला जाणवत होतं की, माझं वर वर शांत बसणं हे माझ्या मनातील चाललेल्या वादळाचं प्रतिबिंब होतं..

माझं मलाच काही कळत नव्हतं, मी शून्य नजरेने TV बघत होते आणि लक्ष कुठे दुसरीकडेच. बऱ्याच वेळा शांत बसलेल्या शरीरातील मन मात्र मनोवेगाने सैरावैरा धावत असतं.. कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही आईच्या नजरेतून सुटत नाही.

अचानक सकाळची घटना लक्षात आली, आणि माझ्या बेचैनीचं कारण माझ्या लक्षात आलं. माझं मलाच वाईट वाटत होतं, चुकीचं केलं होतं मी त्या पेपरवाल्या सोबत.

त्या रात्री स्वप्नात एक अनोळखी नगर माझ्या समोरून निघून गेली, मी विचारलं, "एक मिनिटं आपण ओळखतो का एकमेकांना..?"

उत्तरादेखल त्या नजरेत फक्त हसू दिसलं, त्या हसण्यातून माझ्या अवतीभवती उभ्या आडव्या रेषांचं एक चित्र तयार झालं आणि त्या रेषांमधून एक अंधुकसा ओळखीचा चेहरा. त्या नजरेत सामावला होता एक रंग.. स्वच्छ निळ्या आकाशाचा रंग..

मी स्वतःलाच म्हणाले, "हा काय वेडेपणा आहे!"

पुढच्या क्षणी मला जाग लागली. असं म्हणतात की आपण स्वप्नात तेच पाहतो जे आपल्या मनाच्या कोनाड्यात कुठेतरी सतत चालू असतं... एखाद्या गोष्टीचा विचार करू नये म्हणून कितीही प्रयत्न केला तरीही मन सतत त्याच गोष्टीकडे धावत राहतं.. पण काय हवं होतं माझ्या मनाला? काहीच कळत नव्हतं..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी क्लास वरून घरी पोहोचले होते.. घरी आईने आरतीचं ताट तयारच ठेवलं होतं.. त्या दिवशी माझा वाढदिवस होता.. इतर लोकांसाठी त्यांचा वाढदिवस म्हणजे खूप खास दिवस.. पण माझा विचार थोडा वेगळा, इतर दिवसाप्रमाणे हा सुद्धा दिवस तितकाच सामान्य, त्यासाठी काय सेलिब्रेशन वगैरे करायचं..

खरं आहे..! ज्या व्यक्तीला चाफ्या मोगऱ्याचा सुगंध सुद्धा फिका आणि आकाशातील इंद्रधनुष्य सुद्धा रंगहीन वाटतो त्या व्यक्तीला स्वतःच्या वाढदिवसाचं ते काय कौतुक...

आरतीचं ताट बघून मी आईला म्हणाले.. "आज काय विशेष.."

"तुला जरी तुझा वाढदिवस साजरा करायला आवडत नसलं तरी आम्हाला आमच्या लेकीचा वाढदिवस साजरा करायचा आहे..." ... आई आरतीच्या ताटातील निरांजन पेटवत म्हणाली.. "जा पटकन हात पाय धुवून ये.. औक्षण करून घेते.."

मी आई बाबांच्या इच्छेसाठी तयार होऊन आले.. तेवढ्यात दारावरची घंटी वाजली..

दारात तोच होता... पेवरववला.. या आधी मी त्याला काही विचारेन.. तोच म्हणाला.. "Happy Birthday कल्याणी.. 💐🎂... बाबा आहे का घरी..?"

त्याने Wish केल्याचं बघून मला पुढे काय बोलावं सुचलं नाही.. तरीही माझ्या मनातील एक शंका माझ्या ओठांवर आली..

"अरे हा तक्रार करायला तर घरापर्यंत आला नसेल ना? आणि हसतोय जसा की आम्हीच त्याला आमंत्रण दिलंय.." मी मनातच म्हणाले. चांगलं हेच होत की मी त्याला दारातूनच परत पाठवीन..

"thank you so much for your kind wishes!! पण हे बघा मी तुम्हाला सॉरी बोलले होते ना.. आणि तुमचं किती नुकसान झालं, मी देते, तरीही तुम्हाला वाटलं तर तुम्ही सांगा बाबांना." ... मी थोडं धाडस गोळा करून म्हणाले..

"नाही नाही तुम्ही मला चुकीचं समजताय, ब्लड डोनेशन कॅम्प बद्दल तुमच्या बाबांना काहीतरी बोलायचं होतं माझ्याशी, म्हणून त्यांनी बोलावलं.. आणि योगायोग असा की आज तुमचा वाढदिवस पण आहे.. म्हणून आलोय मी.. आणि त्यादिवशी जे घडलं तो तर फक्त Accident होता, कोणाचीच काही चूक नव्हती.."

"हो का? तुलाही माहिती आहे, नक्की चूक कोणाची होती.." मी मनातच म्हणाले.

तेवढ्यात मागून बाबांचा आवाज आला, "अरे अनुज.."

"अच्छा यांचं नाव अनुज आहे तर ! पण हा बाबांना कसा ओळखतो?" ... मी विचार करत आत गेले..

"हो काका, तुम्हाला वेळ आहे का?" .. आत येत अनुज म्हणाला.

बाबांनी त्याला बसायला सांगितलं.. त्यानंतर आईने माझं औक्षण केलं, घरीच कुकरमध्ये बनवलेला केक कापला.. त्या क्षणी आई बाबांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाला मोल नव्हतं..

बाबा आणि अनुजचं बोलणं चालू होतं.. मग मी पहिल्यांदा पाणी.. नंतर केक.. नंतर चहा.. नंतर पुन्हा एकदा पाणी... असं कारण काढून चार वेळा त्यांच्या समोर गेले, पण दोघांच्याही बोलण्यातून त्यांच्या भेटीचा नेमका अर्थ लागत नव्हता. जवळपास तासाभराने अनुज निघून गेला. तो जाताच मी बाबांना विचारलं, "तुम्ही कसं ओळखता याला?"

"कोण अनुज.. हे बघ इथे फार कोणाला माहिती नाही.. पण हा पुण्याच्या देशपांडे काकांचा मुलगा आहे." ... बाबांनी असं सांगितलं जसं की ते काही गुप्त रहस्य सांगत आहेत.

"कोण देशपांडे, तुमचे मित्र ते हिऱ्यांचे व्यापारी?" आईने किचन मधूनच विचारलं..

"हो तेच!" बाबा म्हणाले.

"मला एक सांगा, करोडपती देशपांडेंचा मुलगा पेपर का टाकतो..? तेही पुणे सोडून इथे सांगलीत.." मी चेहऱ्यावर कोणतरती निराळाच भाव ठेवून बाबांना विचारलं.

"अगं.. देशपांडेंना वाटतं की, अनुजने त्यांचा व्यवसाय पुढे चालवावा.. पण अनुजने इलेक्ट्रॉनिक्स मधून नॅनो Technology मध्ये M.Tech केलंय, आणि पुढे PhD करायला परदेशी जायचंय म्हणे त्याला.. यावरूनच बाप लोकाचं जरा खटकलं आणि देशपांडे रागात जरा जास्त बोलून गेले, त्यात अनुजचं गरम रक्त, तो तरी कसा शांत बसेल..? निघाला घर सोडून !!"

एका श्वासात बाबांनी सगळा इतिहास सांगितला... आणि म्हणाले, "तसं तर तुम्हीही अनुजला त्याच्या बहिणीच्या लग्नात भेटलाय की.. आठवतंय ना ?"

आईचं माहिती नाही.. पण मला देशपांडेंच्या मुलीचं लग्न आठवलं होतं. इतक्या दिवसापासून अनोळखी असणाऱ्या त्या नजरेला आता चेहरा, रंग, रूप, आवाज सगळं काही मिळालं होतं..

आई बाबांचं बोलणं चालूच होतं.. "मग आता नेमकं म्हणणं काय आहे दोघांचं?" आईने विचारलं..

"अनुजच्या आईच्या मध्यस्थीने एक तोडगा निघालाय.." बाबा म्हणाले, "त्यांचं म्हणणं आहे की, अँप्लिकेशन नंतर ३ महिन्याच्या आत जर Michigan University मधून त्याला संपूर्ण स्कॉलरशिपसह ऍडमिशन नाही मिळालं, तर तो तुमचा व्यवसाय जॉईन करेल.."

"म्हणजे अजून इथे कोणा पाहुण्यांकडे राहोतोय का..?" ...आई ने विचारलं

"नाही नाही.. तो इथे बॅचलर्समध्ये राहतो आणि या विदेशी युनिव्हर्सिटी साठी जो खर्च आहे तो बघता इथे घरोघरी पेपर टाकतो. त्याच्या वडिलांचं नाव खराब न व्हावं म्हणून तो पुणे सोडून इथे सांगलीत येऊन राहिलाय... जिथे त्याला कोणी ओळखत नाही.. कळलं का? जा आता.. जरा चहा ठेव.." समोरच्या टेबलवरील पेपर उचलत बाबांनी आईला ऑर्डर दिली..

"बरं ठेवते.." असं म्हणून आई किचनमध्ये गेली. चहाचं भांड गॅसवर ठेवत आईने विचारलं, "मग तुम्हाला हा कुठे आणि कसा भेटला?"

"मागच्या आठवड्यात त्याच्या वडिलांचा फोन आला होता, त्यांनीच सगळं सांगितलं. ते म्हणाले याबद्दल अनुजला काही बोलू नका, फक्त जरा वडीलधारे म्हणून लक्ष असुद्या.." हातातील पेपर खाली ठेवत बाबा म्हणाले..

"त्यानंतर मी पण त्याला क्लब हाऊसमध्ये भेटलो होतो, तेंव्हा जरा चौकशी केली तेंव्हा तो पण सगळं बोलून गेला.. फार गुणी आहे मुलगा, हे रक्तदान शिबीर तोच आयोजित करतोय.." बाबा बोलत होते..

आई चहाचा कप घेऊन बाहेर आली.. "अच्छा! तरीच तो तुम्हाला भेटायला आला होता घरी.."

दीड दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, देशपांडे काकांनी एके दिवशी सकाळी सकाळी त्यांची गाडी पाठवली होती. त्यांनी बाबांना खूप आग्रह केला की, सहकुटूंब तुम्हाला यावच लागेल.. तेंव्हा आम्ही सगळे सांगलीहुन पुण्याला त्यांच्या थोरल्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो ... अनुज आला होता गेस्ट हाऊसला आम्हाला घ्यायला. तिथेच पहिल्यांदा आम्ही त्याला भेटलो होतो.

कुडता पायजमा.. गालांवर थोडी दाढी.. डोळ्यांवर नजरेचा चष्मा.. त्या वेळी तो खूप वेगळा दिसायचा.. आता तर उन्हात फिरून फिरून रंग सुद्धा थोडा सावळा झालाय त्याचा.. डोळे अजूनही तसेच आहेत.. निळसर आणि निरागस..

लग्नात मी फारसं कोणाला ओळखत नव्हते, तरी पण दोन चार लांबचे चुलत मावस बहीण भाऊ भेटले.. त्यांच्यासोबत पूर्ण वेळ घालवला.

माझ्या लक्षात आलं की सगळ्यांना चुकवून अनुजची नजर माझ्यावरच टिकलेली असायची. नजरानजर होताच पटकन नजर फिरवून दुसरीकडे पाहायचं. जसं की काही झालंच नाही..

नजरेला नजरेशी बोलताना त्यांना एकमेकांना शोधावं लागत नाही.. आपोआपच नजरा एकमेकांना भिडतात..

मधून मधून पाहूनचाराच्या नावाखाली खास आग्रहाचं लाडू, जिलेबी, सरबत आमच्याकडे घेऊन यायचा.. सरळ भाषेत सांगायचं तर लाईन मारायचे सगळे उपाय चालू होते.. त्याचं नशीब खराब की, या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नव्हता..

शितल आणि बाकीच्या मुलींना या सगळ्या गोष्टी वाटत असतील cute आणि romantic.. पण मी त्या सगळ्याकडे लक्ष देत नव्हते. आता इतक्या दिवसांनी त्या सगळ्या गोष्टी लक्षात नव्हत्या..

दोन दिवसानंतर मला आणि बाबांना माझ्या कॉलेजमध्ये जावं लागलं होतं.. माझ्या फॉर्म भरण्यासाठी.. तिथलं काम संपवून आम्ही निघतच होतो तेवढ्यात मागून आवाज आला, ... "काका, एक मिनिट थांबा."

अनुज होता, आज पुन्हा तो माझ्यासमोर आला होता. बाबांपासून नजर चुकवून त्याने माझ्याकडे पाहिलं.. कदाचित काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता.

त्याला आमच्या कॉलेजमध्ये बघून बाबा म्हणाले.. "तू इथे!"

"मी रोज येतो काका. इथे सेंट्रल लायब्ररीत माझ्या कामाची सर्व पुस्तक आहेत. तर इथेच बसून अभ्यास पण करतो.." मग थोडं थांबून म्हणाल, "एक मदत हवी आहे तुमच्याकडून. मला काही एप्लीकेशनसाठी Permanent Residence Document हवयं, कसं करता येईल.."

"पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा अजून काही तुझ्याकडे आहे का आता..?" बाबांनी विचारलं..

"आहे!" अनुज म्हणाला..

"मग ठीक आहे, होऊन जाईल! तेथे जवळच आमच्या ओळखीचे आहेत. त्यांचं ऑफिस जवळच आहे, ते करून देतील... कल्याणी, तुला माहितीच आहे ना त्यांचं ऑफिस.. जा अनुज सोबत!" ... माझ्या होकार नकाराची वाट न बघताच बाबा निघून गेले..

नाविलाजाने मला अनुज सोबत जावं लागलं. असंच न बोलता एकत्र चालणं जरा विचित्र वाटत होतं. मग मीच न राहून बोलायला सुरुवात केली. पण तो असा की काही उत्तरच देत नव्हता..

"जिभेवर फोड आलाय का तुझ्या..?" मी उपरोधाने विचारलं.

आमची जुनी ओळख असल्याचं मला लक्षात आलं होतं.. म्हणून "तुम्ही" वरून "तू" वर यायला मला फार विचार करावा लागला नाही..

"नाही तर, काय झालं?" तो म्हणाला.

"मग काहीच बोलत नाहीस.."

"मला बोलायला भीती वाटते." तो हसतच म्हणाला

"मी तुला चांगलंच ओळखते, अजून वेळ आहे... सुधर जरा." मी जरा अधिकार वाणीने चढ्या आवाजातच बोलले.

"एक विचारू का?" अनुजने पुन्हा हसत हसत प्रश्न केला..

"हा बोल.."

"ना मी तुला कधी छेडलं, ना तुला त्रास दिला, ना फोन करून तुला सतावत होतो.. मग.."

"मग काय...?? अरे.. एखाद्या मवाल्यासारखं बघत तर होतास ना.." मी म्हणाले..

"म्हणजे फक्त बघण्याची एवढी मोठी किंमत.."

"हो यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते."

"म्हणजे बघायचं सुद्धा नाही..?" तो म्हणाला..

"हो तर ! अजिबात नाही.. अरे पुण्यापासून सांगलीपर्यंत नुसता बघत तर आहेस, बोलत तर काहीच नाही.." ... मी एवढेच पटकन बोलून गेले आणि पुढच्या क्षणी दोघेही गप्प झालो..

पुढच्या क्षणी विषय बदलण्यासाठी म्हणून मी काहीतरी बोलत राहिले.. "बरं झालं तू दाढी केलीस, नाहीतर अगदी डाकू वाटायचास.."

यावर तो काहीच बोलला नाही, फक्त हसत राहिला. काय माहिती आता त्याच्या मनात नेमकं काय चालू होतं... मी मनातल्या मनात म्हणाले, "काय विचित्र मुलगा आहे हा!"


दोन दिवसानंतर आम्ही दोघे पुन्हा एका रक्तदान शिबिरात भेटलो. रक्तदान करून मी बाहेर येताच त्याने माझ्या हातात एक पाकीट दिलं. बिस्किटं, फळं, ज्युस असं काही होतं त्यात..

"हे घे, सगळ्या रक्तदात्यांना दिलं जातं."...

तिथून निघताना मी त्याला म्हणाले, "तू पेपर का टाकतोस? काही दुसरं काम नाही का करू शकत?"

"का? त्यात काय झालं?" तो म्हणाला... "स्वतः अब्दुल कलाम सुद्धा पेपर टाकत होतेच की! .. तसं तर पेपर टाकून मी महिना आठ दहा हजार नक्कीच कमवतो.. आता तुला मी कुठलं काम लहान-मोठं यावर लेक्चर नाही देणार.. पण स्वतः मेहनत करून काही पैसे कमावले तर त्यातून मिळणारा आनंद आणि आत्मविश्वास तो वेगळाच असतो ना.. तू सुद्धा प्रयत्न करून बघ.."

रात्रभर त्याचा तो चेहरा, त्याचं बोलणं सगळं सारखं सारखं डोळ्यांसमोर येत होतं. घरी पोहोचल्यावर अनुजने दिलेलं ते पाकीट उघडून पाहिलं तर त्यात एक हलक्या गुलाबी रंगाची ओढणी आणि एक चिट्ठी होती... अनुजने कल्याणीसाठी लिहिलेली...

"इकडचं तिकडचं बोलणं मला फारसं जमत नाही.. म्हणूनच मी फार कमी बोलतो. पहिलं तर तुझी ओढणी जाळल्याबद्दल सॉरी! मला वाटतंय की तुला आवडेल हा ओढणीचा रंग, माहिती नाही की तुझ्या आवडीचा रंग निवडू शकलोय की नाही.. आणि हो.. पुण्याहून सांगलीला यायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी आणि तेथील प्रोफेसर, जे मला माझ्या प्रोजेक्टसाठी गाईड करणार होते.. आणि छोटासं कारण म्हणजे तू सुद्धा होतीसच.. ताईच्या लग्नानंतर तुला बऱ्याच वेळा तुझ्या घरी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या वडिलांच्या भीतीने मी टाळत होतो. पण आता जरा मला हिंम्मत आली आहे.. तुझ्याकडून ओरडा खाऊन खाऊन.. म्हणून आता विचारण्याचं धाडस करतोय.. एका पेपरवाल्या सोबत मैत्री करायला आवडेल का तुला.."

पत्रातील शब्दांसोबत माझ्या नजरेतील ओलावा अजूनच दाट होत होता. ...आणि खाली दोन चार स्मायलीज काढून लिहिलं होतं...

"पुढच्या महिन्यात १२ जूनला US ला चाललोय, MSU मधून कॉल आलाय."

ते पत्र तसंच हातात घेऊन मी तशीच बसून राहिले. का माहिती नाही, पण हृदयाचे ठोके जरा वाढले होते. एक वेगळीच भावना तयार झाली होती.. आनंद आहे की उत्साह काहीच कळत नव्हतं.

टप टप च्या आवाजाने मी खिडकीकडे वळाले.. वळवाचा पाऊस चालू झाला होता. अचानक पडणाऱ्या पावसामुळे काय माहिती कित्येक दिवसांचं मनावर साचलेलं मळभ अचानक दूर झालं होतं. कदाचित मी सुद्धा शीतल आणि बाकीच्या मैत्रीणींप्रमाणे त्यांच्या सारखीच होते. पण मी स्वतःला थोडं वेगळं समजत होते.

मी खिडकीत उभी राहूनच समोरच्या चाफ्याच्या झाडाकडे बघत शीतलचा नंबर डायल केला. चाफ्याच्या फुलांवरून पावसाचं पाणी असं काही खाली टपकट होतं जसं की, आकाशातून पांढऱ्या शुभ्र मोत्यांचाच पाऊस पडतोय.

शीतलच्या मोबाईलची रिंग कानात ऐकू येत होती, आणि मनात वेगळाच विचार चालू होता.. मोबाईलची रिंग वाजून वाजून कधी बंद झाली मला कळलंच नाही.. त्या वेळी नजरेसमोर दिसणारं चाफ्याचं झाड, कानात ऐकू येणारी मोबाईलची रिंग आणि मनात चालू असलेले विचार यांची एकमेकांसोबत सांगड घालणं केवळ अशक्य होतं....

"१२ जुन..!! म्हणजे फक्त दोनच महिने.. काय माहिती या दोन महिन्यात आमची मैत्री होईल की नाही.." .... .... हाच विचारात मी बराच वेळ खिडकीपाशी तशीच उभी होते...

चाफ्याचा सुगंध आणि रंगहीन दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे सात रंग मला पुन्हा आवडू लागतील की नाही.. माहिती नाही...



...अपूर्ण


#SrSatish🎭

   

३ टिप्पण्या: