गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

श्रीयुत गंगाधर टिपरे - एक आठवण

एकदा एका वृत्तवाहिनीच्या फोन-इन कार्यक्रमात दिग्दर्शक केदार शिंदे आले होते. तेव्हा मी त्यांना फोन करून विचारले की आम्हांला ‘टिपरे’, ‘हसा चकटफू’ सारख्या मालिका पुन्हा कधी बघायला मिळतील? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, “’टिपरे’ हा चमत्कार होता! बाकी मालिका होत राहतील पण टिपरे मालिका परत बनवणे कठीण काम आहे.

खरंच, आजही ती मालिका आठवते. दिलीप प्रभावळकर यांच्या ‘अनुदिनी’ या पुस्तकावर ती आधारित होती. सुदैवाने युट्यूबवर त्याचे जुने भाग आहेत, ते बघता येतात. टिपरे ही कौटुंबिक, विनोदी आणि सहज मनोरंजन करणारी मालिका होती. 

आजचे जे विनोदी कार्यक्रम/मालिका चालतात ते आपल्याला ठरवून हसवायचा प्रयत्न करताहेत असं वाटतं. एखाद्याच्या शारीरिक व्यंगावरून टिप्पणी करणे हे अगदी नॉर्मलच झालंय, लोकांना पण ते आवडतं! म्हणजे एखादा उंचीने कमी असणाऱ्या कलाकाराचा स्कीट मध्ये उपयोग करून घ्यायचा आणि येताजाता त्याच्या उंची वर ‘पंचेस’ मारायचे की ‘लाफ्टर’ मिळतो! एखाद्या टक्कल असलेल्या कलाकाराला त्याच्या डोक्यावरून चिडवायचं, एखाद्या वर्णाने काळ्या असणाऱ्या कलाकारावर त्याच्या रंगाचा उल्लेख करायचा की आणखी ‘लाफ्टर’ मिळतो! पुरुष विनोदी कलाकाराने स्त्री चा वेश घ्यायचा आणि वाटेल तसे चेहरे आणि आवाज करून ‘जोक’ मारायचे (फेमिनिस्ट वाल्यांना असले प्रकार बरे चालतात!), मध्येच काहीतरी यमक जुळवून चारोळ्या करायच्या, असं काही केलं की अर्धी स्क्रिप्ट झाली. किती सोप्पं आहे हे! एकदा एका हिंदी कार्यक्रमात शोले चित्रपटावरून असेच थिल्लर विनोद चालू होते तेव्हा पाहुण्या कलाकार म्हणून आलेल्या हेमा मालिनी यांनी त्यावर जागीच आक्षेप घेतला होता आणि त्या निघून गेल्या होत्या. शोले सारखे चित्रपट म्हणजे बऱ्याच विनोदी लोकांना राखीव कुरणच वाटतं. 

अंगविक्षेप, अश्लील विनोद, अश्लील शब्द पूर्ण न उच्चारता त्याचा आभास निर्माण करणं आणि लोकांनी तो ओळखून हसणं म्हणजे आजचा विनोद. हा प्रकार सगळीकडे चालू आहे. विनोदी मालिका/कार्यक्रम/स्टँडअप कॉमेडी, सोशल मीडिया आणि टिकटॉक सारख्या प्रकारांनी सगळं सोप्पं करून टाकलंय! पुढच्या पिढीला आपण फार चांगलं विनोदी वाङमय दाखवतोय.


सद्ध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात हसवण्याचं महत्व ओळखून हे सगळे ‘शोज’ आपलं चालवून घेतात. अर्थात सगळे असेच आहेत असं नाही. काही चांगले कार्यक्रमही आहेत. पण अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारखे. हे सगळं बघून टिपरे सारख्या मालिकांचं महत्व लक्षात येतं. आज त्या मालिकेचा सीक्वेल काढला किंवा परत तेच एपिसोड जरी दाखवले तरी बाकीच्यांचे ‘टीआरपी’ कमी होतील. लोकांना आपलेपणा वाटेल अश्या मोजक्या मालिकांपैकी ती एक होती. 

मुंबई सारख्या धावत्या शहरात राहणारं सरळसाधं मध्यमवर्गीय कुटूंब, फार काही विचित्र विषय न काढता सामान्य माणसाला रोजच्या जगण्यात येणाऱ्या समस्या आणि त्यावर त्या कुटुंबाची रिअँक्शन, इतका त्या मालिकेचा स्कोप होता. त्यात मग सण उत्सव आले, तात्कालिक विषय आले, काही सामाजिक, जागतिक विषयही आले. पण मालिकेची गोडी काही कमी झाली नाही, उलट ती आणखी वाढली. मालिकेचं श्रवणीय शीर्षक गीत लागलं की पुढे हातातला रिमोट कंट्रोल अर्धा तास हलणार नाही याची खात्री होती. 

दिलीप प्रभावळकर आहेत म्हटल्यावर त्या मालिकेचा दर्जा आधीच उंचीवर नेऊन ठेवला होता. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या माणसाची भूमिका करताना ती एकाचवेळी विनोदी, हळवी आणि आपली कशी वाटेल हे काम त्यांनी सहजपणे करून दाखवलं. कॉलनीमधल्या लोकांना मध्येच टपली मारणे, नातवाला एखादी गोष्ट समजावून सांगणे अशी चौफेर फटकेबाजी त्यांनी केली. त्यांच्या कामाचं मोजमाप आम्ही करणे हाच एक विनोद आहे! राजन भिसे यांनी रोज ऑफिसला जाणाऱ्या मुंबईकराची सकाळच्या वेळेची घाई अगदी योग्य पद्धतीने दाखवली. घरात वावरताना बऱ्याचदा बनियन वर राहून अगदी घरगुती ‘फील’ त्यांनी आणला. नाहीतर बाकी बऱ्याच मालिकांमध्ये भरजरी कपडे आणि दागिने घरात अगदी झोपताना सुद्धा घालायची प्रथा आहे. कौटुंबिक मालिका म्हणतात पण सामान्य माणसाशी त्यांचा काही संबंध नसतो. शुभांगी गोखले यांनी गृहिणी हा सुद्धा एक जॉब कसा आहे हे दाखवून दिलं! शलाका उर्फ रेश्मा नाईक हिने स्वतः एक आधुनिक मुलगी असूनसुद्धा घरचे संस्कार आपल्यावर आहेत हे दाखवलं. म्हणून ऑस्ट्रेलिया ला जाऊन येऊन सुद्धा तिचे पाय जमिनीवर राहिले. शिऱ्या उर्फ विकास कदमने टिपिकल मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे आपलं क्रिकेट चं वेड दाखवलं. केदार शिंदेंनी स्वतःचं क्रिकेटचं अर्धवट राहिलेलं स्वप्न शिऱ्याच्या पात्रात दाखवलं होतं. धडपड्या मुलगा असतानाच स्वतःच्या बहिणीची काळजी घेणारा भाऊ ही भूमिका त्याने चोख बजावली. सामान्य मुलाला जशी नोकरी मिळू शकते तशी ती जाऊ पण शकते आणि क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकत नसेल तर सरळ नोकरी धरण्याचा मार्ग पत्करावा हे वास्तवसुद्धा यात दाखवलं गेलं. काही संवाद रात्री जेवणाच्या टेबलवर एकत्र बसून (हे चित्र हल्ली कमी होत चाललय), आबा आणि शिऱ्या मधले काही संवाद ते बेडवर झोपून बोलतायत असं दाखवल्याने ते नैसर्गिक वाटले. बाकी पात्रांनी सुद्धा आपल्या भूमिका जास्तीत जास्त नैसर्गिक कशा होतील हे बघितलं.


अधूनमधून या मालिकेत मुक्ता बर्वे, क्षिती जोग, ऋषिकेश जोशी, सुनील बर्वे असे कलाकार येऊन गेले आणि आणखी चारचाँद लागले. 

आजोबा आणि नातू यांचं नातं. भाऊ–बहिणीचं नातं, मुलगा-वडिल यांचं नातं, घरातले संस्कार हे सगळं दाखवताना एखादा एपिसोड हळूच डोळ्यात पाणी आणायचा. शलाकाचं बाहेर ‘चालू’ आहे हे कळल्यावर घरातल्या सदस्यांना थोडं टेन्शन येणं, त्याकाळी कॉम्प्युटरवर अमेरिकेहून आलेला ईमेल बघून आनंद होणं हे टिपिकल मध्यमवर्गीय घरातलं चित्र बघितल्यावर ते कोणालाही आपलंसं वाटायचं. समाजात घडणाऱ्या घटनांवर एखादा एपिसोड हळूच टिप्पणी करून जायचा. 

आज असंख्य चॅनेल्सवर अगणित मालिका चालू आहेत. वर्षानुवर्षे सोमवार ते शनिवार एपिसोडसचा रतीब घातला जातोय. एक्सट्रा मॅरिटल अफेअर, दोन-तीन लग्न, पुनर्जन्म, अपहरण, मारामारी, नात्यातल्या लोकांनी एकमेकांच्या कानाखाली मारणे, बंदूक काढणे हे असलं काहीतरी दाखवून आमचं मनोरंजन केलं जातं. लोकांशी नाळ तुटेल अशी भीती वाटली कि मधेच एखादा ‘महाएपिसोड’ प्रदर्शित होतो. महारविवार चा महाएपिसोड! एखादी मोठी घटना आजच्या भागात घडेल असं काहीतरी जाहिरातीत दाखवून लोकांना एक तास आणि कधी कधी दोन तास बसवून ठेवलं जातं. मग लोकं पण ‘महागाई’ सारखे दैनंदिन जीवनातले प्रश्न विसरून हे ‘महाएपिसोड’ बघत बसतात. बाकी महागायक, महागायिका, महाविजेता, सूरांचं महायुद्ध(!) यावर वेगळा लेख लिहावा लागेल! तरुणांनी वेब सिरीज मुळे यातून सुटका करून घेतलीय. 

‘टिपरे’ ला कधी महाएपिसोड ची गरज पडली नाही. कारण काल्पनिक काहीतरी न दाखवता आपल्याला थेट भिडणाऱ्या गोष्टी यात दाखवल्या गेल्या. म्हणूनच ‘टिपरे’, ‘वागले कि दुनिया’ सारख्या काही मोजक्या मालिका लोकांच्या कायम लक्षात राहतात.

“मालिका कधी थांबवणार” यापेक्षा “का थांबवली?” असं लोकांनी विचारावं या हेतूने मर्यादित भाग करून ही मालिका संपली. आजही जवळपास १५ वर्ष झाली तरी ती लोकांच्या लक्षात आहे हेच त्या मालिकेचे यश आहे ! 

-  अनिकेत केणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा