DISCLAIMERया कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. भौतिक जगाकडे उघड्या नजरेने पाहिलेल्या काही घटनांना शब्दरूपी जिवंतपणा देण्याचा प्रयत्न लेखकाकडून या लेखात करण्यात आला आहे. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.
नोव्हेंबरचे दिवस असल्यामुळे हवेत थंडीचा कडाका जाणवत होता. दाट धुक्यामुळे समोरचं नीट दिसत नव्हतं. अनघाची गाडी जशी चौकात पोहचली तोच ट्राफिक सिग्नलचा दिवा लाल झाला. जसं की तो सिग्नल अनघाचीच वाट बघत असावा. ती नेहमीप्रमाणे गडबडीत होती. तिचा चेहरा सुद्धा रागाने लाल झाला, आणि तिने रागात दोन्ही हात स्टिअरिंग व्हीलवर मारले, पण त्यामुळे सिग्नल थोडाच हिरवा होणार होता... तो तर पूर्ण ६० सेकंदांसाठी लाल झाला होता. या उलट तिच्याच हातातील २-४ बांगड्या फुटल्या, हाताला थोडं खरचटलं होतं.
"अरे देवा.. आजचा दिवसच खराब आहे.." ...अनघा स्वतःच बडबडली.
घरातून निघताना सकाळीच दूध सुद्धा खराब झालं, त्यामुळे काळा चहा पिऊन अनघाला निघावं लागलं होतं. जिथे तिला दाट दुधाचा चहा आवडतो, तेही साय घातलेला. त्यामुळेच की काय, अनघाचा आळस अनघाला सोडून जायला तयार नव्हता. त्यात हा लाल सिग्नल... तेवढ्यात गाडीच्या काचेवर एका लहानग्या मुलीने आपले हातांचे दोन्ही पंजे ठेवले. जशी अनघाची नजर तिच्यावर पडली, ती हसली आणि सकाळचं ताजं वर्तमानपत्र तिने काचेवर चिकटवलं.
अनघाने रागातच तिच्याकडे पाहिलं आणि हाताने इशारा करून निघून जा म्हणून सांगितलं. पण ती तिथेच थांबून नाक काचेवर लावून अनघाला चिडवू लागली. अनघाचा राग अजूनच वाढला, तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. अनघाने जोरात हॉर्न वाजवला, ती मुलगी दचकून दोन पावलं मागे झाली. अनघा रागातच गाडी घेऊन निघून गेली. तिला सुद्धा शाळेत जायला उशीरच झाला होता.
इतर मुलींप्रमाणे अनघाचं जीवन नव्हतं, तिला वाचनाची, चित्र काढण्याची खूप आवड होती. रात्री झोपण्यापूर्वी एखादं पुस्तक हातात घेतलं तर ते वाचून संपेपर्यंत अनघा पुस्तक ठेवत नव्हती. त्यामुळे रात्री झोपायला उशीर मग सकाळी उठायला उशीर.. हे नित्याचंच होतं. या सगळ्यातही ती आपल्या नवीन नवीन शिक्षकी नोकरीत खुश होती. माझ्याप्रमाणेच लहान लहान मुलांमध्ये आपलं बालपण शोधण्यात अनघाला खूप आनंद वाटायचा. चौकात सिग्नलवरची ती मुलगी अनघाला दुसऱ्या दिवशी सुद्धा दिसली.. आणि त्याच्या पुढच्या दिवशी सुद्धा.
थोडाफार मळलेला आणि कधीकाळी पांढराशुभ्र असणारा फ्रॉक, थोडासा सावळा रंग, निरागस पण तेजस्वी बोलके डोळे. डोक्यावर तेलाचा विसर पडल्याप्रमाणे कोरडे शुष्क केस.. तरीसुद्धा लाल रेशमी रिबीनीमध्ये बांधलेल्या दोन वेण्या तिच्या निरागसतेत भर टाकत होत्या. हसताना दिसणारे पांढरेशुभ्र दात, तोच नाक काचेवर लावण्याचा खट्याळपणा.. आणि हातात एक पेपरचा गठ्ठा.
ती काचेवर पेपर चिकटवून अनघाला काहीतरी सांगू लागली. अनघा चिडूनच म्हणाली, ..."अगं जा बाई तू.. नको मला पेपर, आमच्या शाळेत पण खूप असतात."
तरी सुद्धा तिने काचेवर ठकठक केलंच, अनघाने काच खाली केली आणि रागात विचारलं, ... "काय आहे?"
"पेपर घे ना दीदी, जगातल्या सगळ्या बातम्या आहेत यात." ... ती अनघाच्या हातात पेपर देत म्हणाली. ... "तुला पण माहिती असायला पाहिजे ना..? जगात काय चालू आहे ते?"
"अच्छा ... मला शहाणपणा शिकवतेस.. जा पळ." ...आणि अनघाने काच वर केली. तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला होता.
शाळेत पोहचताच स्टाफरूम मध्ये टेबलवर असलेल्या वर्तमानपत्रांकडे अनघाचं लक्ष गेलं, आणि ती थांबली. "खरंच मला काहीच माहिती नाही जगात काय चालू आहे ते?" ... ती स्वतःच बडबडली, आणि त्या सिग्नलवरच्या मुलीच्या चेहऱ्यावरील गोड हसू अनघाच्या चेहऱ्यावर सुद्धा उमटलं. अनघाला पुस्तकं वाचनाची आवड जरी असली तरीही तिने आजवर रोजचं वर्तमानपत्रं वाचण्याचे कष्ट कधी घेतले नव्हते.
८-९ वर्षांची असावी ती मुलगी, पण स्वतःच्या वयापेक्षा कितीतरी जास्त समजूतदार पणा तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. असे कितीतरी लोक सिग्नलवर दिसत असतात, पण कुठे कोण लक्षात राहतं. फुलं-गजऱ्याच्या पाट्या घेऊन फिरणाऱ्या मुली.. फुगे वाले.. हार वाले.. असे एक ना अनेक जण.. सिग्नलवर अर्धा एक मिनिट थांबणाऱ्या गाड्यांच्या आसपास फिरताना दिसतात. खरं तर ट्रॅफिक सिग्नलला सुद्धा एक स्वतंत्र विश्वं म्हणावं लागेल.
त्या दिवशी अनघाला सकाळी लवकरच जाग आली. सगळं आवरून झाल्यावर तिची नजर घड्याळाकडे गेली. निवांतपणे घड्याळातील फिरणारे काटे बघण्याचं सुख अनघाच्या वाट्याला कधी कधीच यायचं. शाळेत जायला निघण्यासाठी १०-१५ मिनिटं बाकी होते. म्हणून ती व्हरांड्यात बसून वर्तमानपत्र चाळू लागली. वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर बातमी होती. ..."डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनले होते." ..एक दोन पानांवरच्या ठळक बातम्यांवर नजर टाकून ती निघून गेली होती. त्या दिवशी सुद्धा चौकात सिग्नलवर गाडी थांबली आणि ती मुलगी पुन्हा काचेवर नाक लावून हातात वर्तमानपत्र घेऊन उभी राहिली. अनघाने काच खाली करताच तिला आश्चर्य वाटलं. तिने पेपर पुढे करताच ... "अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प." हेच आहे ना पेपर मध्ये.. चल पळ, मला पण माहिती आहे जगात काय चालू आहे ते.. अनघा म्हणाली.
"त्यांच्या विरोधात कोण होते आणि किती मतांनी ट्रम्प विजयी झाले??".. तिने पेपरची घडी मागे घेत प्रश्न केला.
अनघाच्या नजरेपूढे तारे चमकले, तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि अनघाने भुर्रकन गाडी पळवली. "अरे देवा! किती स्मार्ट मुलगी आहे, प्रत्येक बारीक गोष्टी तिला माहिती असतात". शाळेत पोहचताच अनघाने पुन्हा ती बातमी वाचली.. "डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांचा ८६ मतांनी पराभव केला होता. आणि ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले."
दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी तयार होताना नकळतपणे त्या मुलीचा विचार अनघाच्या मनात आला. चौकात पोहोचताच इकडे तिकडे नजर टाकताच ती मुलगी दुसऱ्याच क्षणी अनघाच्या गाडी शेजारी येऊन उभी राहिली. अनघाने पर्स उघडून पैसे काढले आणि त्या मुलीकडून पेपर विकत घेतला. मुलीला आश्चर्य वाटलं. केवळ एक पेपर विकत घेण्यामुळे कोणी एवढं खुश होईल असं अनघाला कधी वाटलं नव्हतं. ...
"थँक यू दीदी" .... तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
आता ती मुलगी अनघाला चौकात सिग्नलवर रोजच भेटत होती, न चुकता.. आणि अनघा सुद्धा तिच्याकडून रोज पेपर विकत घेत होती, न चुकता. कधी कधी सिग्नल हिरवा जरी असला तरी अनघा गाडीचा वेग कमी करायची, सिग्नलवर जाईपर्यंत सिग्नल लाल होऊन जायचा. आणि दोघांची अलिखित छोटीशी भेट व्हायची. सुरुवाती सुरुवातीला अनघा तिला एक प्रश्न विचारायची आणि ती उत्तर द्यायची. यापेक्षा जास्त वेळ त्यांना सिग्नलवर मिळायचा तरी कुठे?
"काय गं, नाव काय आहे तुझं ?" अनघा ने विचारलं.
"मुक्ता!" ... त्या मुलीने अगदी आत्मविश्वासाने आणि मोठ्याने आपलं नाव सांगितलं.
"अरे वाह! छान नाव आहे की, हे तर माझ्या आवडीचा नाव आहे"..
दुसऱ्या दिवशी अनघाने विचारण्याआधीच मुक्ताने अनघाला विचारलं, ... "तुझं नाव काय आहे दीदी?"
"अनघा!" ... नाव सांगताना अनघाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.
"पण हे नाव माझ्या आवडीचं नाही." ... मुक्ता नाक मुरडत म्हणाली.
"हो का... मग तुझ्यासाठी माझं नाव बदलू मी?" ... अनघाने थोड्याशा खट्याळ स्वरात विचारलं .. मुक्ता उड्या मारत निघून गेली.
सिग्नलवरच अनघा विचार करू लागली, "मी पहिल्यांदाच कोणा अनोळखी व्यक्तीला नाव सांगितलं आहे." ... आता पर्यंतच्या इतक्या प्रवासात तिने कुठे कोणाला आपलं नाव गाव सांगितलं होतं.. ना कोणाला विचारलं होतं.. ती आणि तिची पुस्तकं.. यामध्ये कोणाची विचारपूस करण्याची वेळच आली नव्हती. पण ही लहानगी मुक्ता तिला आपलीशी वाटत होती, खूप मेहनती आणि आत्मविश्वासू. अनघा खूपच प्रभावित झाली होती. तेवढ्यात बेल वाजली. अनघा आपल्या वर्गाकडे निघाली.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये संस्कृत विषय घेऊन PhD करणारी अनघा आज साहित्याची डॉक्टर झाली होती. लहानपणापासूनच भारतीय संस्कृती आणि संस्कृत विषयाबद्दलची गोडी लक्षात घेता तिच्या वडिलांचं स्वप्न होतं की, अनघाने प्राथमिक शाळेवर संस्कृत विषयाची शिक्षिका बनून लहान लहान मुलांना संस्कृतचे धडे द्यावेत. आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून अनघाने कोल्हापूरच्या स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेवर संस्कृत शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली होती.
सिग्नल वरची १ मिनिटांची भेटही आता सातत्याने नियमित होत होती.
"मुक्ता तू शाळेत जातेस का? की असच सिग्नलवर पेपर विकत फिरतेस?" ... अनघाच्या स्वरात मुक्तासाठी काळजी दिसली.
"जाते की दीदी.. बाबांना थोडासा हातभार म्हणून सकाळी सकाळी थोडा वेळ पेपर विकते आणि नंतर शाळेत पण जाते.. पेपर सुद्धा खूप वाचते मी ... आणि शाळेत तर माझा नेहमी पहिला नंबर असतो.." ... मुक्ता अभिमानाने मान उंच करून अनघाला सांगत होती.
"वाह शाब्बास!" .. मुक्ताच्या पाठीवर थाप मारत अनघा म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होता होता अनघाची नजर तिच्या खोलीतील पुस्तकांच्या कपाटावर पडली. तिने एक शब्दकोश, एक कादंबरी आणि काही गोष्टीची पुस्तकं घेतली आणि आपल्या बॅगेत ठेवली. नेहमीप्रमाणे सिग्नलवर भेट होताच बॅगेतून पुस्तकं काढून अनघाने मुक्ताच्या हातात ठेवली. पुस्तकं बघताच मुक्ताच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. तिच्या नजरेमध्ये वाचनाची आवडत दिसून येत होती.
"Thank you दीदी .." ... ती पुस्तकं घेऊन उड्या मारत निघून गेली. आज पेपर द्यायला सुद्धा विसरली होती. मुलं ही मुलचं असतात, अगदी निरागस.. काचेतून बाहेर बघत अनघाने एक्सीलेटर वर पाय ठेवला.
नेहमी घरातून निघताना अनघा एखादा प्रश्न विचार करून ठेवत होती, जो ती मुक्ताला विचारू शकते.. जेणेकरून त्या एक मिनिटांच्या भेटीत ती जास्तीत जास्त मुक्ताला ओळखू शकेल.
"काय ग मुक्ता.. तू इथे जवळपासच राहतेस का? एवढ्या लवकर येतेस पेपर घेऊन.."
"हो दीदी.. त्या रस्त्याच्या पलीकडेच राहते मी".. मुक्ताने कोणत्यातरी दिशेला बोट दाखवत आपल्या घराचा पत्ता सांगितला.
"तू कोणत्या शाळेत शिकवतेस दीदी?" ... कदाचीत मुक्ता सुद्धा एखादा प्रश्न विचार करून येत असावी.
"स्वामी विवेकानंद विद्यालय.." ... अनघाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. सिग्नल हिरवा झाला.. अनघाला वाटलं की, हा सिग्नलवरचा एक मिनिट कधी कधी काही क्षणातच निघून जातो. घरापासून अनघाची शाळा जवळपास ७-८ किलोमीटरवर होती.. आणि मुक्ताची भेट होणारा चौक ४ किलोमीटरवर. म्हणजे अर्धा रस्ता अनघा मुक्ताच्या भेटीची आस ठेऊन जायची तर पुढचा अर्धा रस्ता तिच्यासोबत झालेल्या गप्पांचा विचार करत.
दुसऱ्या दिवशी गाडी थांबताच अनघाने विचारलं.. "तुला कसं कळलं की मी शाळेत शिकवते? मी तर यापूर्वी कधी बोलले नाही तुला."
"अरे! एवढ्या लवकर काय कोण ऑफिसला जातं का? सगळ्या चांगल्या शाळा सकाळी सकाळीच भरतात".. मुक्ता अगदी त्रिकाल ज्ञानी असल्याप्रमाणे बोलली.
"का बरं? तुझी शाळा चांगली नाही का?" अनघाने विचारलं.. "तू तर इथे सिग्नलवर भटकत असतेस.." ... अनघा थोड्या थट्टेने म्हणाली. काही क्षण मुक्ता हिरमुसली, जसं की, एक हलकासा नाराजीचा ढग तिच्या उत्साहावर बरसून गेला असावा. पण रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये काळे ढग निघून गेल्यानंतर पडणाऱ्या इंद्रधनुष्याप्रमाणे पुन्हा मुक्ताच्या चेहऱ्यावर सप्तरंग उमटले.
"नाही नाही... खूप चांगली आहे माझी शाळा.. मी जी शिकते तिथे.. आणि नेहमी पहिली सुद्धा येते.." ...मुक्ताने हसून सांगितलं.. आणि दोघेही खळखळून हसले.
सिग्नलवर मुक्ताला भेटणं आता अनघाची सवय बनून गेली होती. आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही की, ज्या दिवशी त्यांची भेट झाली नाही. किती खडतर परिस्थितीत जीवन जगत होती मुक्ता.. कित्येक दिवसांच्या भेटीमध्ये अनघाच्या लक्षात आलं होतं. मुक्ताशी बोलता बोलता अनघाला कळलं होतं की, तिचे वडील गोकुळ दूध संघात accountant म्हणून काम करत होते. पण एके दिवशी संचालकांनी केलेल्या गैरव्यवहारात मुक्ताच्या बाबांना अडकवल्यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली होती.
अनघा जेव्हा मुक्ताला भेटत असे तेव्हा ती तिची नजर वाचण्याचा प्रयत्न करायची. पण मुक्ता कधीच उदास दिसत नव्हती. जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा उत्साह होता तिच्याकडे. कधी कधी काही सर्वसामान्य दिसणाऱ्या व्यक्तीसुद्धा आपल्याला आपल्या जीवनाकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी देण्याची क्षमता बाळगून असतात.. मुक्ता त्यांमधलीच एक होती.
कधी कधी सिग्नल वरच्या भेटीत प्रश्न उत्तर नसायची तेंव्हा मुक्ता एखादं गाणं गुणगुणत असायची.
"खूप छान गातेस की तू.." ... अनघा कौतुक करायची.
"हो तर! सगळे मला कोल्हापूरची लता दीदी म्हणतात"... ती गाणं मध्येच तोडून म्हणायची... तिचं ते निरागस बोलणं सुद्धा तितकच लाघवी असायचं.
एक दिवस अनघा सकाळी उठली तेंव्हा तिचं अंगं तापाने फणफणत होतं. अनघाची आई तिच्या खोलीत आली तर अनघाला अजून अंथरुणात बघून काळजीत पडली. आईने अनघाच्या कपाळावर हात ठेवला. ... "अनू ... ताप भरलाय की गं.."
"अंगं पण खूप दुखतंय .. आज कदाचित सुट्टी घ्यावी लागेल." .. अनघा बेडवरच उठून बसत म्हणाली.
"नको जाऊ मग" आई बेड वरच्या अंथरुणाची घडी घालत म्हणाली.. "एक दिवस न जाण्याने कूठे शाळा बंद पडणार आहे?"
तेवढ्यात अनघाच्या नजरेपुढे तो चौक उभा राहिला. आज मला न बघून मुक्ता कदाचीत हिरमुसून जाईल. किंवा काय माहिती, तिच्या लक्षातही येणार नाही... विचार करता करता अनघा स्वतःच हिरमुसली.
दोन दिवसांनी पुन्हा सिग्नलवर अनघाला बघून मुक्ताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "कुठे निघून गेली होतीस दीदी? दोन दिवस मी खूप शोधलं तुला."
"थोडी आजारी होते गं.. काय करू मी." ...अनघाने अगदी आपुलकीने मुक्ताला सांगितलं. जसं की कोणी मुल आपल्या आई सोबत बोलत असावं.
"मला वाटलंच की तू विनाकारण सुट्टी नाही घेणार, मी पण नाही घेत. १०० टक्के उपस्तिती असते माझी शाळेत." ...हातातील पेपरची घडी अनघाकडे देत मुक्ता म्हणाली. ..."मागच्या वर्षी तर मला १०० टक्के उपस्तिती साठी शाळेत बक्षीस पण मिळालंय."
"अरे वाह! छान"... अनघाने हसत हसत गाडी पुढे घेतली. मुक्ताच्या बोलण्याने अनघाचं मन भरून आलं. कसं अनोखं नातं तयार झालं होतं दोघांमध्ये. एक अदृश्य अशा साखळीने बांधलेलं आपुलकीचं नातं.
अनघा शाळेत पोहचताच तिने हजेरी पुस्तक उघडलं, आणि तिला पहिल्यांदाच जाणवलं की, तिच्या वर्गात मुक्ता नावाच्या २ मुली आहेत. पण त्यांना ती कधीच बोलली नव्हती की, मुक्ता हे तिचं आवडीचं नाव आहे. रजिस्टर बंद करून अनघा फळ्याकडे वळली. ४०-५० पुलांमधील एकानेही अनघाला विचारलं नव्हतं की, "मॅडम तुम्ही २ दिवस कुठे होता?"
दुसऱ्या दिवशी घरातून निघताना अनघाने फ्रीजमधून काही चॉकलेट सुद्धा घेतली होती. मुक्ताच्या छोट्या छोट्या हातांमध्ये पेपरच्या पैशांसोबत अनघाने चॉकलेट सुद्धा ठेवली. चॉकलेट बघून मुक्ताचा चेहरा खुलला.
"आज काय तुझा वाढदिवस आहे का दीदी?" ... मुक्ताने एका चॉकलेटचे रॅपर काढत विचारलं.
"नाही, आज नाही.. ७ ऑगस्टला असतो.." ..अनघाने सिग्नलवर चालू असलेल्या टाइमरकडे बघत क्लचवर पाय देऊन गियर शिफ्ट करत विचारलं... "तुझा कधी असतो?"
"आजच आहे...".. मुक्ता म्हणाली.
तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. अनघा मुक्ताच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली. मागून गाड्यांच्या हॉर्नच्या आवाजाने ती भानावर आली. आणि तिने गाडी पुढे घेतली. अनघा संपूर्ण दिवसभर याच विचारात होती की, खरंच आज मुक्ताचा वाढदिवस असेल का? की ती उगाच सांगत असावी.
दुसऱ्या दिवशी गाडी थांबताच अनघाने मुक्ताला विचारलं, ..."काय गं.. खरंच तुझा वाढदिवस होता काल? की गंमत करत होतीस माझ्यासोबत?"
"मला नाही माहिती, माझा वाढदिवस कधी असतो. बाबा म्हणतात की, माझ्या जन्माच्या वेळीच आई देवाघरी गेली. त्यामुळे कोणी तारीख लक्षातच नाही ठेवली.." ... मुक्ताचा स्वर गदगदला.
"दीदी, मी ना मोठी होऊन aeronautical engineer बनणार, आणि एक मोठं विमान बनवून देवाकडे जाऊन सगळ्यांच्या आईला परत घेऊन येणार.."
मुक्ताचे शब्द ऐकून अनघाचे डोळे पाणावले. बोलता बोलता पुढच्या क्षणीच मुक्ता हसू लागली आणि म्हणाली, ... "म्हणूनच ज्या दिवशी मला चॉकलेट मिळतात तो दिवस मी माझा वाढदिवस समजते.. मस्त आयडिया आहे ना दीदी?" ... अनघा मुक्ताकडे बघतच राहिली. ती काहीच न बोलता गाडी घेऊन निघून गेली.
पुढच्या दिवशी गाडी थांबताच मुक्ता काचेवर खटखटू लागली... "अगं .. थांब थांब.. काय गडबड आहे?" ... अनघा काच खाली करत म्हणाली.
मुक्ताने आपल्या लहानग्या मुठीतून आणलेली चॉकलेट अनघाच्या हातात ठेवताना तिच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.
"आज माझा बर्थडे आहे का? कशासाठी एव्हढी चॉकलेट?" ... अनघा हातातील चॉकलेट बघत म्हणाली.
"दीदी, आज माझा result लागला. वर्गात पहिली आले मी. सगळ्या विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळालेत." ...आपल्या निकालाबद्दल सांगताना मुक्ताचा आनंद गगनात मावत नव्हता. अनघाला सुद्धा तिच्या या यशाबद्दल फार कौतुक वाटलं.
"खूप मोठी हो... तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत." ... अनघाने मुक्ताच्या डोक्यावर हात ठेऊन तिला तोंड भरून आशीर्वाद दिले.
घरी पोहचताच अनघाने आपल्या आई बाबांना मुक्ताबद्दल अगदी सविस्तर सांगितलं. काही दिवसांपूर्वी सुद्धा ती मुक्ताबद्दल घरी बोलली होती. पण त्यावेळी बाबा थोडे चिडले होते... "लक्ष ठेव नाहीतर कधीतरी गळ्यातून चैन किंवा पर्स हिसकावून निघून जाईल."
...त्यानंतर अनघाने तिच्याबद्दल घरी बोलणंच सोडून दिलं होतं. अनघाचे वडील कोल्हापुरातील नामवंत उद्द्योजक होते त्यामुळे घरी पैसा आणि प्रतिष्ठेला कमी नव्हती.
"बाबा, तुम्हाला मी त्या मुक्ताबद्दल बोलले होते की..." ... अनघाने काही दबक्या आवाजात बाबांकडे विषय मांडला.
"कोण मुक्ता..?" ... बाबांनी चष्मा डोळ्यांवर चढवत विचारलं.
"आहो, ती चौकातील पेपर विकणारी मुलगी... आणि हा तुम्ही पुढे काही बोलणार त्या आधी एक सांगते, मागच्या ६-७ महिन्यात मी रोज तिच्याशी बोलले आहे. कधीच तिने काही बदमाशी नाही केली. ती खूप मेहनती आणि प्रामाणिक आहे बाबा."
"बर मग, तुला नेमकं म्हणायचं काय आहे." ... बाबांनी एक सावध प्रश्न केला.
"बाबा ती तिथेच कोणत्यातरी शाळेत जाते. दिवसभर सिग्नलवर पेपर विकते. शाळेत नेहमी पहिली असते.." ... अनघा मुक्ताचं कौतुक करणात थांबत नव्हती.
"अरे वाह...!!" आता बाबांना सुद्धा मुक्तामध्ये थोडा रस वाटला.
"बाबा मला वाटतं की, मुक्ताने कोणत्या तरी चांगल्या शाळेत शिकायला हवं, खरं तर तीने माझ्याच शाळेत शिकावं.."
"काहीही काय अनु.. अशी कित्येक मुलं सिग्नलवर फिरत असतील.. त्या सगळ्यांचाच विचार आपण नाही ना करू शकत." ... बाबा समजाविन्याच्या स्वरात अनघाशी बोलत होते.
"सगळ्यांचा नाही बाबा, फक्त मुक्ताचा.." ... अनघा बाबांच्या पायाशी बसत म्हणाली.
सिग्नल हिरवा होताच अनघा निघून गेली. शाळेत पोहचताच मुक्ताच्या ऍडमिशन बद्दल बोलणं केलं, लागणाऱ्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या. आता ती मुक्ताच्या ऍडमिशन बद्दल खूपच उत्सुक होती. मुक्ताकडून अनघाला खूप अपेक्षा होती. ती समजू शकत होती की, ज्या परिस्थितीत मुक्ता राहते, त्यात ती फार पुढे नाही जाऊ शकणार. किती दिवस आपल्या इच्छा आकांशांना बगल देऊन ती जगणार. या सगळ्याचाच विचार करून अनघाने मुक्ताला मदत करण्याचा विचार केला होता.
दुसऱ्या दिवशी मुक्ता भेटल्यावर अनघा म्हणाली... "उद्या येताना तुझी सर्व मार्कशीट घेऊन ये.."
"का दीदी..?" ... मुक्ताच्या प्रश्नात तीच निरागसता होती.
"अरे का म्हणजे.. मला पहायचे आहे की, तू खरंच हुशार आहेस की नाही ते.."
"नक्की आणते दीदी.. तू बघच.. मी कधी खोटं नाही बोलत.."
दुसऱ्या दिवशी मुक्ताने रद्दीच्या पेपर पासून बनवलेला एक लिफाफा अनघाच्या हातात ठेवला. घरी जाऊन अनघाने तिची सर्व मार्कशीट बाबांना दाखवली.
"वाह! खरंच हुशार आहे की ही मुलगी." ... बाबा म्हणाले... "तुझं काम होईल. मी बोलतो तुझ्या शाळेच्या ट्रष्टींशी.."
खरंच पहिलीपासून आतापर्यंत तिला ९५% पेक्षा जास्त मार्क मिळाले होते, आणि सोबतच काही निबंध, चित्रकला स्पर्धेची सर्टिफिकेट सुद्धा होती. अनघाचा आनंद आता गगनात मावत नव्हता, तिला वाटत होतं की, कधी मुक्ताचं ऍडमिशन तिच्या शाळेत होईल, आणि ती तिच्याच शाळेत शिकू लागेल.
पुढच्या दिवशी चौकात अनघाने सुद्धा मुक्ताला काही सांगितलं नाही. ती तिला Surprise देणार होती. अनघाने मुक्तासाठी दोन जोड्या शाळेचा युनिफॉर्म, दप्तर, पाण्याची बाटली, डब्बा, बूट सगळं स्वखर्चाने विकत घेऊन ठेवलं होतं. तिच्या शाळेतील एका शिक्षकांच्या माध्यमातून मुक्ताच्या जुन्या शाळेत जाऊन तिला मिळणारी स्कॉलरशिप आणि तीचं होणारं मोठ्या शाळेतील ऍडमिशन याबद्दल मुक्ताला माहिती दिली होती.
१ -२ दिवसात तिच्या ऍडमिशनची सगळी प्रक्रीया पूर्ण झाली होती. पण आश्चर्य याचं होतं की, रोजच चौकात भेटून सुद्धा मुक्ताने अनघाला याबद्दल काही सांगितलं नाही. ती पूर्वीप्रमाणेच पेपर वाटताना दिसत होती. एक दोन गोष्टी त्यांच्यात व्हायच्या आणि अनघा निघून जायची.
कधी कधी अनघा मुक्ताच्या नजरेत शोधण्याचा प्रयत्न करायची की, एखादी आनंदाची लकेर तिच्या नजरेत दिसेल... पण मुक्ता सुद्धा काही जाणवू देत नव्हती.
शाळेचं नवीन वर्ष चालू झालं होतं, आज पहिला दिवस होता. सिग्नलवर अनघा गाडी थांबवून मुक्ताची वाट बघत बराच वेळ उभी होती. पण ती आली नाही. हताश झालेली अनघा शाळेत पोहचली. वर्गात जाऊन तिने हजेरी पुस्तक उघडलं. सुरुवातीची हजेरी होताच ते नाव तिच्या नजरेसमोर आलं, जे तिला खूप आवडीचं होतं.
"मुक्ता पाटील.."
"एस मॅडम.."
"मुक्ता देसाई.."
"एस मॅडम.."
"मुक्ता..." ... आणि हे तिसरं नाव...?? अनघाने मान वर करून पाहिलं.. दुसऱ्या बाकावर पांढराशुभ्र युनिफॉर्म घातलेली, डोक्यावर तेल लावून दोन वेण्या बांधलेली, तिची छोटीशी मैत्रीण उठून उभी राहिली.
"एस मॅडम"
मुक्ताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं होतं. अनघाच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दाटला होता. ती काही बोलणार इतक्यातच मुक्ता म्हणाली.. "कसं वाटलं दीदी माझं Surprise?"
अनघाच्या पापण्या आसवांनी भरून गेल्या होत्या, ते आनंदाश्रू लपविण्यासाठी अनघाने पुन्हा खाली मान घातली, पापण्या मिटताच अनघाच्या डोळ्यांमधून दोन आसवं मुक्ताच्या नावावर पडली होती.
रजिस्टर मधील मुक्ताच्या नावावर पडलेल्या आसवांपलीकडचं मुक्ताचं नाव अगदी मोत्यासारखं दिसत होतं...
...अपूर्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा