DISCLAIMER
या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.प्रस्तावना -या कथेतील "सारंग " ही केवळ एक व्यक्ती नसून संपूर्ण जगातील त्या प्रत्येकाचा तो एक चेहरा आहे ज्याने कधी ना कधी कोणावर तरी प्रेम केलं असेल,आणि प्रत्येक सारंगची कोणीतरी मधुरा असेल.
(या कथेमध्ये काही ठिकाणी विनोदी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला गेला असून त्यामागची विनोदबुद्धि आपणास समजली नाही तर त्यासाठी लेखक जबाबदार राहणार नाही.)
संध्याकाळी ६ वाजता जसं घड्याळातील २ काटे काही क्षणांसाठी का असेना दोनाचे एक होऊन जातात, तसंच एक होऊन जायचं होतं त्या दोघांना.
सांगलीच्या विश्रामबाग कॉलनीत राहणारी मधुरा दिसायला तशीच होती जशी एखादी जुनियर कॉलेजमध्ये १२वीत शिकणारी एक तरुणी. थोडी सरळ, थोडी हुशार, थोडी शांत आणि थोडी खट्याळ. खरं तर मुली स्वतःमध्येच थोडे थोडे का होईना पण सर्व गूण बाळगून असतात. आणि मुलांना तोच थोडकेपणा योग्य वेळी दिसून येत नाही, आणि कधी दिसला तर समजू शकत नाहीत.
विश्रामबाग कॉलनीपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या पटवर्धन पॅलेसच्या आवारात राहणारा सारंग मधुरासोबत १२वीच्या Chemistry क्लासमध्ये शिकतो. तो सुद्धा तसाच दिसायचा जसा की एखाद्या जुनियर कॉलेजमध्ये शिकणारा एक तरुण. अंगापिंडाने अगदी भक्कम नसला तरीही डोक्यावर असणारया अस्ताव्यस्त केसांमुळे त्याचा बारीक सडपातळपणा सहज कोणाच्या नजरेत येत नव्हता. तो केसांना नेहमी ओलाचिंबं ठेवायचा कधी तेलाने तर कधी पाण्याने.
असं तर सारंग मित्रांमध्ये बोलताना आणि त्यांच्यात वावरताना एकदम बिनधास्त असायचा, पण मुली समोर येताच एकदम रिव्हर्स गियर पडल्याप्रमाणे शांत - संयमी, धीर - गंभीर होऊन जायचा. मधुरासमोर येताच अभ्यासात तितका उजवा नसलेला सारंग अगदी हुशार scholar वगैरे वगैरे होऊन जायचा.
त्याची संध्याकाळ ही संद्याकाळ प्रमाणेच असायची, उन्हाळ्यात सूर्य संध्याकाळी ७ नंतर क्लास सुटल्यावर मावळायचा तर थंडीमध्ये तोच सूर्य संध्याकाळी ७ च्या आधीच रजा घेऊन निघून जायचा.
रोज संध्याकाळी क्लासला जाण्यापूर्वी सारंग त्याचा मित्र सुरजच्या घराजवळून जायचा. सुरजचे घर दुसऱ्या मजल्यावर होते, आणि सारंग खालूनच ओरडायचा.
"सुरज, ए सुरज... सुरज्या.. ए सुरज्या.."
सारंगचा आवाज ऐकताच सुरजचे बाबा गॅलरीत येऊन सारंगला शांत करत.
"अरे हो, येतोय तो थांब जरा.." ...आणि बाबांना बघून सारंग दात काढून हसायचा.
तेवढ्यात सुरज सायकल घेऊन बाहेर यायचा... "बाबा घरी असताना ओरडतो कशाला रे?"
"तुझे बाबा बाल्कनीत येतात तेंव्हा त्यांच्या टकल्यावर ऊन पडतं तेंव्हा चकाकणारं टक्कल बघायला मला खूप मज्या येते.." ...सारंग खट्याळपणे म्हणायचा.
क्लासची वेळ ठरलेली असायची, संध्याकाळी ५ ते ७. क्लासचे देशपांडे सर तसे तर खूप चांगले होते, पण महिन्याच्या पहिल्या तारखेला सगळ्यांची फी नाही जमा झाली तर त्या दिवसापासून त्यांचा मूड तोपर्यंत बिघडायचा जोपर्यंत क्लासमधील प्रत्येकाची फी जमा होत नाही.
देशपांडे सर हे पुण्यातील एका मोठ्या कॉलेजमधून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले असल्यामुळे त्यांचा रसायनशास्त्र विषयातील अभ्यास खूप दांडगा होता. सोबतच त्यांना मुला - मुलींमधील chemistry चं सुद्धा चांगलंच ज्ञान होतं, त्यामुळे त्यांनी क्लासमध्ये मुला - मुलींची बॅच वेगवेगळी ठेवली नव्हती. त्यामुळेच की काय, क्लासचा वर्ग नेहमीच भरलेला असायचा. काही मुलं chemistry शिकायला यायची, तर काही स्वतःची chemistry जुळवायला.
सुरुवाती - सुरवातीला सारंग आणि सुरजचे क्लासमध्ये हजर राहण्याचे कारण म्हणजे क्लास मधल्या मुली होत्या, त्यानंतर सारंगचं क्लासमध्ये जायचं एकच कारण राहिलं होतं, ते म्हणजे मधुरा... याउलट मधुराचं क्लासमध्ये जायचं एकच कारण होतं, ते म्हणजे अभ्यास... ती आपल्या गुलाबी रंगाच्या सायकलवर पाठीवर पुस्तकांचं ओझं घेऊन यायची आणि कोणाशी नजरेला नजर न मिळवताच क्लास सुटला की निघून जायची.
खरंतर छोट्या शहरांमधलं जग हे अगदी लहान असतं. अशा ठिकाणी प्रेम व्यक्त करायला आणि नजरेला नजर मिळवायला सुद्धा खूप काही दिव्यं करावी लागतात.
क्लासमध्ये टोटल ७ मुली यायच्या. क्लासच्या सुरुवातीला सारंग आणि सुरज दोघांनाही सर्व सातही मुली आवडायच्या. पण काही काळाने सारंगला फक्त मधुरा आवडू लागली होती. पण सूरज मात्र बाकीच्या साही मुलींमध्ये गोंधळून गेला होता.
देशपांडे सर नेहमी क्लासमध्ये आदल्या दिवशीच्या शिकवणीवर प्रश्न विचारायचे, तेंव्हा मधुरा आणि इतर सर्व मुली नेहमी सगळी उत्तरं द्यायची. दुसरीकडे सारंग आणि सुरजसोबत वर्गातील इतर मुलं खाली मान घालून... "सॉरी सर, उद्या नक्की वाचून येऊ.." ...अशी रोजची ठरलेली उत्तरं द्यायची.
"अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय ना मी, वाचून या जरा ...नाहीतर बोर्डाच्या परीक्षेत माझा जप करत बसाल.." ...मुलांची उत्तरं ऐकून सर चिडून म्हणायचे. पण या गोष्टीचा कोणताच परिणाम कोणा मुलावर कधी झाल्याचं सरांना तरी कधी दिसलं नाही. रोजचा दिवस त्यांच्यासाठी एक सारखाच असायचा.
मधुरा आणि इतर सगळ्या मुली रोज क्लास सुरु होण्याआधी १५-२० मिनिटं लवकर यायच्या, आणि बाहेर ओठ्यावर बसून आदल्या दिवशीची उजळणी करायच्या. असच एके दिवशी चुकून का होईना पण सारंग आणि सुरज क्लास सुरु व्हायच्या थोडा वेळ आधी आले. मधुराकडे बघताच सारंग म्हणाला... "एक बोलायचं होतं बऱ्याच दिवसापासून.."
"हा, बोल की ..." ...सुरज सायकलचा स्टॅन्ड लावत म्हणाला.
"पण तू कोणाला बोलणार नाहीस ना.." ...सारंग सुरजकडे बघत म्हणाला.
"एवढा विश्वास नसेल तर नको सांगू ना मग.." ...सुरज आपल्या हाताच्या चार बोटांनी केस सारखे करत म्हणाला.
दोन जिवलग मित्रांमध्ये विश्वासावर प्रश्न उमटत असेल तर ती मैत्री कसली..??
"मला मधुरा खूप आवडते.." ...सारंग फार विचार न करता थोडा लाजतच म्हणाला.
"हो का..?? मला पण आवडते.. खरं तर मला सगळ्याच मुली आवडतात.." ...सुरज अगदी खळखळून हसला.
"गप्प रे.. मला ती तशी आवडते..." ...सारंग सुरजच्या हसण्यावर थोडा चिडला.
"तशी आवडते म्हणजे.." ...सुरजने विचारलं.
"अरे तशी म्हणजे.. प्रेम.. खरं प्रेम वगैरे असतं ना... तशी आवडते मला ती.." ...सारंगने जसं जमेल तसं फोडून सांगितलं.
हे ऐकताच सुरज पुन्हा खळाळून हसला, आणि म्हणाला.. "आणि ती कॉलेजमधली नेहा पण तुला आवडायची की..."
"हो आवडायची... पण ती मला शोभणारी नव्हती.." ...सारंगने स्वतःची बाजू मांडत खुलासा केला.
"का...? कारण जेंव्हा तू तिच्याकडे नोट्स मागायला गेलास तेंव्हा तिने आपल्या भावाकडे तुझी तक्रार केली होती... आणि तिचा भाऊ येऊन तुला चांगल्याच नोट्स देऊन गेला होता ...हणूनच ना..?" ... सुरज सारंगला आठवण करून देत बोलला. "हे बघ सारंग, जेंव्हा प्रेम करायचं असेल ना तेंव्हा मार खायची पण मानसिक तयारी ठेवावी लागते.. समजलं..?? ...मुलीच्या भावापासून ते मुलीचा एखादा मित्र, किंवा मुलीच्या आसपास राहणारा कोणीही ज्याला मुलगी तर भाऊच मानते पण तो तिला काय मानतो हे माहिती नसतं, असा कोणीही येऊन हाणून जाऊ शकतो.. प्रेम तर करायचं आणि मार पण नाही खायचा, असं नाही ना होत मित्रा."
सुरजने एका श्वासात प्रेमावीषयीचं तत्वज्ञान सारंगला देऊन त्याच्या हृदयात चालू असलेला प्रेमाचा ज्वालामुखी थोडा शांत केला होता. पण जे थंड पडेल ते प्रेम कसलं...?
काही क्षण शांत राहिलेला सारंग पुन्हा नव्या उमेदीने म्हणाला.. "हो हो आहे मी पण तयार सगळ्यासाठी."
"मेंदूला मुंग्या आल्यात का तुझ्या..?" ...सुरज चेहऱ्यावर कोणताच भाव न दाखवता बोलला.
"तसं समज हवं तर, पण तू हे सांग की मी पुढे काय करू...? मला ती खूप आवडते..." ... सारंग फक्त आता सुरजसमोर गुडघ्यावर बसायचा बाकी होता.
एकंदर सारंगचा स्वभाव बघता आता हा आपलं काही ऐकणार नाही ..असं लक्षात येताच सुरज थोड्या गंभीरतेने म्हणाला, "अरे, मुली इतक्या सहज प्रेमात नाही पडत .."
"मग..?" ..सारंगने प्रश्न केला तेंव्हा त्याच्या नजरेत ५६ सस्यांची व्याकुळता दाटलेली होती.
"अरे मग काय... पहिलं तुला मैत्री पासून सुरुवात केली पाहिजे.." ...सुरजने सारंगच्या खांद्यावर हात ठेवला.
"ते कसं करायचं..?" ... सुरज स्वतः लव्ह गुरु असल्यासारखा सारंग त्याला विचारत होता.
"बघ.. मधुरा रोज १५-२० मिनिटं लवकर येते ना..? मग तू पण ये लवकर, आणि तिच्याशी बोलणं चालू कर.."
"काय बोलू..." ...आता सारंगच्या नजरेतील व्याकुळ सस्यांची संख्या दुप्पट झाली होती. त्याचा प्रश्न ऐकताच सुरज चिडून म्हणाला .. "अरे सगळं मीच सांगू का..? मग प्रेम पण मीच करतो की.."
"जाऊदे सोड, संध्याकाळी क्लास सुटला की जाता जाता वडापाव खात बोलू आपण.."
त्या दिवशी सारंगचं क्लासमध्ये अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष संध्याकाळी ७ च्या ठोक्याकडे लागून राहिलं होतं. क्लास सुटल्यावर सुरज त्याला मैत्री ते प्रेमापर्यंत पोहचायचा मार्ग सांगणार होता. क्लास सुटताच सुरजने सारंगला आठवण करून दिली की, "आपल्याला वडापाव खायला जायचे आहे आणि ते ही तुझ्या पैश्याने.." ...दोघेही आपापल्या सायकलवरून कोपऱ्यावरच्या चव्हाण काकूंच्या "शुद्ध तेलात तळलेले वडे" अशी पाटी असणाऱ्या हॉटेल वजा टपरीवर गेले.
"काकू २ वडापाव द्या.." म्हणत सारंगने पैसे पुढे केले.
"मला लस्सी पण पाहीजे रे ." ...तेवढ्यात मागून सुरज म्हणाला.
सारंगने मन मारून खिशातून आणखीन एक नोट काढून पुढे केली आणि मनातच म्हणाला.. "काही हरकत नाही, मधुराच्या प्रेमासाठी ह्या लहान सहान गोष्टी व्यर्थ आहेत.."
वडापाव खात खात सुरजने मूळ विषयाला हात घातला.. "हे बघ सुरवातीला तुलाच पुढे होऊन मधुरा सोबत बोलणं चालू केलं पाहिजे.."
"हे तर मला पण माहिती आहे रे, पण सुरुवात कशी करू..?" ...सारंग वडापावचा एक घास खात जड आवाजात म्हणाला.
"हे बघ, तुला असं दाखवायला लागेल की, तू पण एक हुशार मुलगा आहेस.. आणि तिच्याकडे तिच्या नोट्स मागण्याच्या निमित्ताने सुरुवात कर.. काही शंका विचार..." ... सुरजने विषय अगदी सहज समजावून सांगितला, आणि सारंगला तो समजला देखील.
"बर मग, झालं तर..." ...सारंगने मनोमनीच दुसऱ्या दिवशीचं नियोजन चालू केलं.
दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ उजाडली. (खरं तर दिवस उजाडतो, पण इथे सारंगचा उत्साह इतका दांडगा होता की, संध्याकाळ उजाडली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही...)
असो..
तो क्लास जवळ ३० मिनिटं आधीच जाऊन पोहचला होता. आणि त्या दिवशी पहिल्यांदाच सारंग आदल्या दिवशीची उजळणी करून आला होता. नेहमीप्रमाणे क्लास सुरु होण्यापूर्वी ठीक १५ मिनिटं आधी मधुरा आली.. तिने आपली गुलाबी सायकल तिथे उभी केली जिथे सर्व मुलींच्या सायकल उभ्या केल्या जायच्या. त्यावेळी क्लासमध्ये सर्व मुलं मुली वेगवेगळे बसत तर होतेच, पण त्यांच्या सायकल सुद्धा वेग वेगळ्या ठिकाणी उभ्या केल्या जायच्या.
मधुरा सायकल उभी करून क्लासच्या बाहेर असलेल्या एका बाकावर जाऊन बसली.. आणि आपली वही काढून आदल्या दिवशी शिकवलेलं उजळणी करू लागली. सारंगने सुद्धा ठरवलंच होतं की, आज तर तो मधुराशी बोलणारच, तो जसा मधुरा पुढे पोहचला तेवढ्यात क्लास मधील इतर मुली सुद्धा तिथे पोहचल्या. तरीही सारंग धिटाईने पुढे झाला.. प्रत्येक पावलासोबत तो स्वतःलाच समजाऊ लागला की, मधुराशी बोलण्यासाठी तो पूर्णपणे तयार आहे.
मधुरा जवळ पोहचताच त्याने तिला हाक मारली.. "मधुरा.."
बोलणं तर सोडाच.. पण मधुराने आपल्या वहीतून मान वर करून सारंगकडे पाहिलं देखील नाही.
सारंगने पुन्हा एकदा प्रयत्न केला, त्याने सावध पणे हाक मारली ... "मधुरा..."
त्यावेळी मधुराने नजर वर केली आणि सारंगकडे रागातच पाहिलं... "काय पाहिजे ...?"
सारंग मधुराचे ते रागाने भरलेले "काय पाहिजे..?" शब्द ऐकताच घाबरून गेला, खूप हिम्मत करून देकील पुढे काही बोलण्याच्या मनस्थितीत नाही राहिला. तो घाबरून दोन पावलं मागे सरकला.. "पोटात गोळा येणे", "तोंडातून ब्र देखील न निघणे", या सगळ्या वाक्प्रचारांचा अर्थ त्याला संदर्भासहीत मिळाला होता.
"नाही, काही नाही.." ...म्हणाला आणि तसाच वळून जायला लागला, तेवढ्यात बाकी मुलींचा हसण्याचा आवाज त्याच्या कानांवर पडला.. त्यामुळे सारंग अगदी शरमेने चिंब झाला होता.
सारंग तिथून निघत होताच तेवढ्यात मुलींच्या हसण्याचा आवाज ऐकून देशपांडे सर क्लासमधून बाहेर आले. विषय समजून न घेताच सारंगकडे रागात बघत म्हणाले.. "तू भेट क्लास सुटल्यावर मला ...”
सारंगला आजवर इतकं वाईट कधीच वाटलं नव्हतं. एकतर मधुराने चारचौघात त्याच्याशी बोलणं टाळलं होतं आणि दुसरं म्हणजे क्लासच्या इतर मुलींसमोर त्याचा उघड अपमान झाला होता. अरे अरे अरे.. खरंतर सर्व मुलं अशा प्रकारे अपमानित व्हायला खूपच घाबरतात. त्यापेक्षा असं म्हणता येईल की, अशा प्रकारेच अपमानित व्हायला खूप घाबरतात. आणि तो अपमान आज सारंगने कमावलाच होता.
बाकी तसं म्हटलं तर एक दोन मित्र सोबत घेऊन जग जिंकण्याची हिम्मत बाळगणारा सारंग मुलींसमोर मात्र हतबल रहायचा. प्रेम करणं आणि प्रेम व्यक्त करणं या परस्पर भिन्न गोष्टी, ज्यात सारंगला मधुरासमोर व्यक्त होणं तितकं जमत नव्हतं, प्रेम करण्यात सारंगने विद्वत्ता तर मिळवली होतीच पण ते व्यक्त करण्याच्या बेसिक परीक्षेत मात्र तो पूर्ण नापास होऊन जायचा.
क्लासमध्ये कसा-बसा सारंगने वेळ घालवला, त्या दिवशी तो कोणाच्याही नजरेला नजर द्यायची हिम्मत करत नव्हता. क्लासमध्ये संपूर्ण वेळ त्याला असं वाटत होतं की, अजूनही बाकीच्या मुली त्याच्यावर हसत आहेत. कशी-बशी त्या दिवशीची वेळ निघून गेली, क्लास सुटला. सरांनी ठीक ७ वाजता सर्व मुलींना जायला सांगितलं, आणि सगळ्या मुलांना तिथेच थांबवलं. सर्व मुली निघून जाताच सर अगदी दात ओठ खात सारंगकडे बघत म्हणाले, ..."आज जे तुम्ही केलं आहे ना, ते इथे नाही चालणार. मुलींच्या घरचे पूर्ण विश्वासाने माझ्याकडे क्लाससाठी पाठवतात.. त्या विश्वासाला बट्टा लागलेला मला नाही चालणार.. तुमच्यामुळे माझ्या क्लासचे नाव खराब होईल असं तुमचं वागणं मी अजिबात खपवून घेणार नाही.."
सारंग आणि सुरज खाली मान घालून गप्प ऐकत होते. बाकी मुलांना नेमका विषय काय ते कळायला थोडं जड जात होतं. त्यांना अंदाजही नव्हता, की का बरं सर आज इतके चिडले आहेत. शेवटी सरांनी आपलं मत मांडलं. ते सारंगकडे बघत म्हणाले.. "सारंग उद्यापासून क्लासला नाही आलास तरी चालेल! ...आणि तुझ्या बाबांचा नंबर दे.. मी बोलतो त्यांच्याशी.."
सरांचे शब्द ऐकताच सारंग पूर्ण घाबरला.. काय करावं त्याला सुचेना .. केवळ एखाद्या मुलीसोबत बोलणं म्हणजे इतकी मोठी चूक आहे? त्याने सरांचं बोलणं ऐकून बराच वेळ सरांची माफी मागितली आणि त्यांना विश्वास दिला की, पुन्हा असं काही नाही होणार.. आणि तो इथून पुढे क्लास मधल्या प्रत्येक टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवून दाखवणार.
सारंगच्या बऱ्याच प्रयत्नांनंतर सरांना सुद्धा त्यांच्या एका विध्यार्थ्याच्या मासीक फी चा विचार आला आणि त्यांनी सारंगला एक संधी द्यायची ठरवलं. सगळं रामायण झाल्यानंतर क्लास मधून निघून सारंग आणि सुरज वडापाववाल्या काकूंच्या दुकानाबाहेर असणारया लाकडी बाकड्यावर जाऊन बसले. जाईपर्यंत सारंग काही बोलला नाही.. झाला सगळा प्रकार बघता त्या दिवशी सुरजनेच वडापावचे पैसे पुढे केले.. सुरजने सारंग कडून सर्व समजून घेतले की, नेमकं झालं काय..? आणि म्हणाला, "आता तरी प्रेमाचं भूत उतरलं ना डोक्यावरून..?"
त्यावर सारंग वडापावमध्ये थोडी हिरवी चटणी टाकत म्हणाला, "नाही, आता तर पुर्विपेक्षा अजून जास्त मानसीक तयारी झाली आहे.."
त्यानंतर दोघेही घरी निघून गेले. सारंगला झाल्या प्रकाराबद्दल खूप वाईट तर वाटत होतं, आणि त्याने मनात विचार करून ठेवला होता की, त्या खडूस मधुराला एक दिवस धडा शिकवायचा.
आता सारंग क्लास सुरु होताच ५ मिनिटांनी वर्गात यायचा आणि क्लास सुटताच इथे तिथे न बघताच खाली मान घालून निघून जायचा. काही दिवस असेच निघून गेल्यानंतर सरांनी एके दिवशी क्लासमध्ये टेस्ट घ्यायचे ठरवले..
टेस्ट झाली आणि दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे पेपर देऊ लागले तेंव्हा मधुरा म्हणाली.. "सर या वेळी पण मीच पहिली आले आहे ना?"
सर मधुराचा पेपर तिच्याकडे देत म्हणाले.. "हो, आतापर्यंत तरी तूच पहिली दिसतेस मला, २० पैकी १७ मिळालेत तुला.. पण अजून २-३ पेपर तपासायचे बाकी आहेत."
उरलेल्या पेपरमध्ये एक पेपर सारंगचा होता आणि एक सुरजचा.. सरांनी सुरजचा पेपर तपासला, त्याला २० पैकी साडेसात मार्क मिळाले होते.. त्यांनी रागाने सुरजचा पेपर त्याच्याकडे देताच बाकीच्या मुली हसू लागल्या. आता शिल्लक राहिला होता तो सारंगचा पेपर.
सरांनी शेवटचा पेपर तपासला, आणि म्हणाले... "अरे वाह...! या वेळी तर कमालच झाली.. सारंगला २० पैकी १९ मार्क मिळालेत."
सारंगचा पहिला नंबर येताच मधुराचा चेहरा पडला. ती शेजारी बसलेल्या मुलीला रागाने चिमटा काढत म्हणाली, "आता बघच, पुढच्या वेळी नाही येणार तो पहिला.."
तेव्हढ्यात त्या मुलीने मधुराचा हात झटकला आणि म्हणाली... "मग मला का चिमटा काढतेस..म्हशी ?"
क्लासमधील हुशार मधुराला सारंगने एका क्षणात मागे टाकलं होतं.. आयुष्य कधी कधी सरळ धावणाऱ्या रस्त्यावरून अचानक यू-टर्न घेऊन मागे जाऊ लागते असं काहीसं मधुराच्या बाबतीत झालं होतं.
त्या टेस्टनंतर सारंग आता पूर्वीसारखा नॉर्मल झाला होता. पहिल्यांदाच पहिला आल्याबद्दलची पार्टी सुरजने सारंगकडून उकळली होती. मधुरा मात्र मागच्या टेस्टमध्ये झालेला अपमान विसरली नव्हती.. ती पुढच्या टेस्ट ची वाट बघत होती. पुढची टेस्ट झाली. निकाल नेहमीप्रमाणे अनपेक्षित होता.
सुरज २५ पैकी साडेआठ. त्याची एका मार्काने का होईना पण प्रगती झाली होती.
मधुरा २५ पैकी २१
आणि सारंग २५ पैकी २४
वर्गात हुशार असणाऱ्या मुलींसाठी इतर मुलं ही त्यांच्या बरोबरीची कधीच नसतात. पण हुशार मुलांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो.
एके दिवशी कॉलेजमध्ये मुलींचं काही Function असल्यामुळे एकही मुलगी क्लासमध्ये गेली नव्हती. तरीही सरांनी त्या दिवशी पुढचं प्रकरण शिकवलं होतं. दुसऱ्या दिवशी जेंव्हा सर्व मुली क्लासला गेल्या तेंव्हा त्यांनी हट्ट धरला की, "सर काल शिकवलेले पुन्हा शिकवा please.."
त्यावर सर म्हणाले, "आधी तुम्ही कोणाची तरी वही घेऊन सर्व नोट्स लिहून काढा, मग पुन्हा समजावून सांगेन तुम्हाला.."
नोट्स कोणाच्या घ्यायच्या याबद्दलची खस खस पिकायला लागताच मधुराच म्हणाली, "सारंगच्या नोट्स ठीक राहतील, तोच सध्या पहिला येतोय ना क्लास मध्ये.."
हे ऐकताच सुरजने सारंगकडे बघून डोळा मारल्याचं मधुराने पाहिलं होतं. सारंगने काहीच न बोलता आपली वही मधुराकडे दिली. त्या संध्याकाळी सारंगने वही मधुराला दिल्याच्या आनंदात सुरजने त्याच्याकडून २ वडापाव आणि एक ग्लास लस्सी उकळली. वडापाव खाऊन झाल्यावर लस्सीचा ग्लास ओठांना लावत सुरजने पहिल्यांदाच मधुराचा उल्लेख मधुरा वहिनी असा केला, आणि म्हणाला... "मधुरा वहिनी पण तुझ्या प्रेमात पडली वाटतं .."
मधुराने घरी जाताच सारंगची वही उलट्या बाजूने उघडली. खरंतर वह्यांमध्ये खऱ्या कामाच्या गोष्टी पहील्या नाही तर शेवटच्या पानांवर कोरलेल्या असतात.
एखाद्याच्या मनातलं ओळखायचं असेल तर त्याची वही किंवा डायरी शेवटच्या बाजूने उघडून शेवटची २-३ पानं वाचावीत, जिथे शब्द कमी आणि भावनांचा ओलावा अधिक दिसून येतो.
मधुराने पाहिलं, सारंगच्या वहीमध्ये शेवटच्या काही पानांवर तिचं नाव बऱ्याच ठिकाणी लिहीलं होतं, आणि खोडलं होतं. पण एक दोन ठिकाणी सारंग मधुराचं नाव खोडायला विसरला होता. सारंगच्या वहीत आपलं नाव वाचून मधुरालाही छान वाटलं.. अशा तऱ्हेचं छान वाटणं हे तिच्यासाठी पहिल्यांदाच झालं होतं.
दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मधुरा लवकर येऊन क्लास जवळ आपली सायकल उभी करत होती तितक्यात सारंग सुद्धा तिथे पोहचला.. ति बॅगेतून सारंगची वही काढून त्याच्याकडे देत म्हणाली, "थँक यू सारंग, आणि त्या दिवशी साठी सॉरी..!"
सारंगच्या मनात तर लाडूच फुटत होते, पण त्या फुटणाऱ्या लाडवांचा आवाज बाहेर येऊ न देता सारंग म्हणाला.. "ठीक आहे.. काही हरकत नाही..." ... काही क्षण शांत राहिल्यानंतर सारंगला वाटलं की, मधुरा काही बोलेल, मधुराला वाटलं की सारंग काही बोलेल. पण दोघेही काही बोलले नाही.
सुरुवातीच्या अशा भेटीत बऱ्याचदा दोघांमधल्या शांततेलाच एक मेकांशी सर्व काही बोलावं लागतं. दोघांनाही बोलायचं होतं.. पण दोघही शांतच होते.
तेवढ्यात मधुरानेच विषय काढला.. "एक दोन ठिकाणी तुझं अक्षर काही समजलं नाही, क्लास सुटल्यावर सांगशील का ..?"
"हो हो नक्कीच .. सात नंतर भेटू क्लास सुटल्यावर.."
त्यानंतर सारंग क्लासमध्ये प्रत्येक मिनिटाला घड्याळातील काटे बघत होता, कधी ते काटे एकत्र येऊन ७ वाजवतील आणि कधी तो मधुराशी बोलेल. मधुराचं देखील वेगळं काही नव्हतं, कधी नव्हे तसं तीचं सुद्धा लक्ष त्यादिवशी क्लासमध्ये नव्हतं. तसही अक्षर तर तिला सर्व समजत होतं, फक्त तिला सारंग सोबत बोलायचं होतं.
क्लास सुटल्यावर सुरजने सारंगला हाक मारली पण काही कारण काढून सारंग सुरजला "तू पुढे हो.." म्हणाला.
सर्व मुली एक एक करून निघून गेल्या. पण मधुरा मात्र तिथेच थांबली होती. सारंगने सर्व मुलं निघून जाण्याची वाट पाहीली. त्याला वाटत नव्हतं की, त्याला आणि मधुराला एकत्र बोलताना कोणी पहावं. सगळे निघून जाण्याची वाट बघता बघता त्याला थोडा उशीर झाला.
सारंग समोर येताच मधुरा म्हणाली.. "७ वाजता म्हटलं होतं ना, आता तर सव्वासात झालेत."
"सॉरी, मी ते सर्व जाण्याची वाट बघत होतो.." ...सारंग खांद्यावरची बॅग नीट करत म्हणाला.
"का..?" मधुराने थोडंसं आश्चर्याने विचारलं.
"अरे जाऊ दे ना.." ...सारंग म्हणाला.
"नाही, सांग ना.." मधुराही तितक्याच हट्टाने म्हणाली.
"मला नव्हतं वाटत की आपल्याला कोणी बोलताना पहावं, म्हणून.." ...सारंग थोडं संकोचून बोलला.
हे ऐकून मधुरा हसली, आणि म्हणाली.. "मला बोलण्यासाठी इतका नको कोणाचा विचार करू, समजलं..? तुला वाटलं बोलावसं बिनधास्त बोल." ...असं म्हणत मधुराने आपल्या घरचा टेलिफोन नंबर लिहिलेला एक कागद सारंगच्या हातात ठेवला.
सारंग थोडा लाजतच म्हणाला "ठीक आहे."
"बरं, तुला कुठे अक्षर समजलं नाही..?".. सारंग आपली वही मधुराकडे देत म्हणाला.
वही बघताच मधुरा थोडी बावरली.. आणि पुढच्या क्षणी स्वतःला सावरत वहीत तिला न समजलेलं अक्षर शोधण्याचं नाटक करू लागली. नंतर वहीतून नजर वर करून म्हणाली.. "आता सापडत नाहीय .. एक काम करते, घरी जाऊन पुन्हा बघते आणि खुणा करून उद्या क्लास सुटला की विचारते.."
"ठीक आहे.." ..सारंग म्हणाला.
दोघांचं बोलणं तसं संपलं होतं.. पण दोघेही तिथून निघायला तयार नव्हते... "तुला काही बोलायचे आहे का ?" ..सारंग बोलणं सुरु रहावं म्हणून बोलला.
"नाही" ..मधुरा काही क्षणांचा विचार करून बोलली. "आणि तुला तर काही बोलायचं नाही ना ?"
"हो काही बोलायचं आहे मला."
"हा बोल ना." ...मधुरा क्षणाचाही विलंब न करता बोलली.
"उद्या सांगेन.." ...सारंग म्हणाला.
"आताच सांग ना." ...मधुरा तितक्याच लाडिक हट्टाने म्हणाली.
"नाही नको, उद्या नक्की सांगतो."
"ठीक आहे, पण उद्या नक्की सांग.. उद्या ठीक ७ वाजता भेटू.."
त्यानंतर दोघेही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता भेटले.. पुढच्या दिवशीही आणि त्याच्या पुढच्या दिवशीही. रोज दोघेही कोणती ना कोणती गोष्ठ अपूर्ण सोडायचे, ज्या कारणाने ते पुन्हा दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटत. आता सारंगचेही मार्क चांगले येत होते, त्यामुळे सरांनी सुद्धा त्याला मधुराशी बोलताना कधी अडवलं नव्हतं. रोज जेवढा वेळ सारंग आणि मधुरा एक मेकांशी बोलत तेवढा वेळ सुरज मात्र बाजूच्या रोड वर सारंगची वाट बधत सायकल वर बसून असायचा.
संध्याकाळी ६ वाजता जसं घड्याळातील २ काटे काही क्षणांसाठी का असेना दोनाचे एक होऊन जातात, तसंच मधुरा आणि सारंगला रोज भेटावसं वाटायचं, त्याच क्लासच्या बाहेर जिथे आजही मुलं आणि मुलींच्या सायकल वेगवेगळ्या उभ्या केल्या जायच्या.
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा