शनिवार, १७ ऑगस्ट, २०२४

🌺 सोनचाफा 🌺

DISCLAIMER

या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.

डिसेंबर अखेरचे दिवस असल्यामुळे हवेतील गारवा सहज जाणवत होता. सकाळी सहा साडेसहाची वेळ असूनही सूर्याची किरणं अंगणात यायला तयार नव्हती. हवेतील गारवा आणि धुकं यांमुळे नजरेला पाच सहा फूटांवरचं सुद्धा स्पष्ठ दिसत नव्हतं. त्याच धुक्यात आणि गार वातावरणात कीर्ति मात्र अंगावर मलमली शॉल गुंडाळून आपल्या बंगल्याच्या आवारात देवपूजेसाठी झाडांची फुलं तोडत होती.

"काय गं, तू आज परत आलीस..?"

फुलं तोडता तोडता कीर्तिची नजर बंगल्याच्या फाटकापलीकडे गेली. तितक्या दाट धुक्यातही फाटकापलीकडे उभ्या असलेल्या त्या सात आठ वर्षांच्या चिमुरडीचा चेहरा कीर्तिला स्पष्ठ दिसत होता.

थोडाफार मळलेला आणि कधीकाळी पांढराशुभ्र असणारा फ्रॉक खांद्यावर थोडा फाटला होता. पायात कदाचीत आईची किंवा थोरल्या बहिणीची स्लीपर... निरागस पण तेजस्वी बोलके डोळे... डोक्यावर तेलाचा विसर पडल्याप्रमाणे कोरडे शुष्क केस.. तरीसुद्धा लाल रेशमी रिबीनीमध्ये बांधलेल्या दोन वेण्या तिच्या निरागसते मध्ये भर टाकत होत्या. हातात एक लहान कापडी पिशवी... इतक्या थंडीत सुद्धा तिच्या अंगावर निव्वळ फ्रॉक होता.. गरिबी माणसाला कोणत्याही परिस्थितीत धिटाईने जगायला शिकवते.

"ताय... वंजळभरच पायजेती फुलं देवासाठी... द्या की वं..." ...तिने हातातील कापडी पिशवी कीर्ति पुढे पसरली.

"तुमच्या झाडाला हायती बी.. म्हणून मागत्या मी. इथं कुठच येवढी फूलं नायती... फकस्त तुमच्याच बंगल्यात हायती."

तिच्या शब्दांमध्ये कमालीची हतबलता होती. ती सत-आठ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन कीर्तिकडे तिच्या बंगल्यातील चाफ्याची फुलं मागत होती.

"नाही म्हणून सांगितलं ना... जा इथून!"... असं म्हणून कीर्तिने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.

"कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?" कीर्ति स्वतःशीच बडबडत फुलं तोडत होती.

तेवढ्यात तिची आई अंगणात आली. "काय गं काय झालं? कोणाला बडबडतेस? इथे कोणीच दिसतच नाहीय?"

"काही नाही गं आई.. गेले चार दिवस झाले एक मुलगी चाफ्याची फुलं मागायला रोज येतेय. देवाला पाहिजेत म्हणे.. एवढीच हौस आहे तर घ्यायची ना विकत."... कीर्ति थोड्या चिडक्या स्वरात बडबडत होती.

"अगं ती फुलच तर मागतेय ना. द्यायचीस की मग... तसंही चाफा किती बहरलाय फुलांनी."... झाडाकडे बघत आई म्हणाली.

"हो फुलं खूप लागली आहेत, पण त्याच्या मागे माझे किती कष्ट आहेत.. अख्ख्या कॉलनीत कोणाच्याच अंगणात झाडाला एवढी फुलं नाहीत, फक्त आपल्याच झाडाला आहेत." कीर्तिच्या स्वरात थोडा अहंकार दिसत होता.. "आणि खूप निगा राखावी लागते झाडांची, फुकट नाहीत येत फुलं. खत-पाणी सगळं वेळेत करावं लागतं.. तुला माहिती आहे ना... मी रोज पूजा करताना देवाला भरपूर फुलं वाहते. देवांच्या फोटोंना ताजे हार घातल्याशिवाय पूजा केल्याचं समाधान नाही मिळत." कीर्तिने झाडाची २-४ रंगीत फुलं तोडून आपल्या ताटात टाकली.

"अगं, एक फूल वाहिलं तरी देवाला पुरेसं असतं.. दिलीस चार फुलं त्या मुलीला तर जाणार आहेत देवाच्याच चरणांशी ना.." आई कीर्तिला समजविण्याच्या प्रयत्नात होती.. "तू वाहीली काय, अन् त्या छोट्या मुलीने वाहिली काय.. देव तर एकच आहे की.."

"तू जा गं आई तुला नाही काही कळत. माझे कष्ट आहेत त्यामागे.".. कीर्ति पुन्हा चिडक्या स्वरात म्हणाली.

"एक सांगू का..?" आई कीर्तिला पुन्हा समजावू लागली.. "असं दारातून रिकाम्या हाताने पाठवू नये कोणाला.. आणि काय फुलं तर मागतेय ना.. तिने कूठे तुझ्याकडे जेवण किंवा पैसे मागितले.. आपल्याकडे आहे त्यातलं थोडं द्यायला मनही तेवढं मोठं असावं लागतं.."

"बरं.. उद्या आली मागायला तर देईन चार फुलं.. तेही तू सांगतेस म्हणून." कीर्तिला आईचं म्हणणं थोडं पटलं होतं.

"बरं पण जरा प्रेमाने दे.. रागे नको भरू त्या छोट्या मुलीला.." कीर्तिचं बोलणं ऐकून आईच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी अंगणात ती मुलगी पुन्हा उभी.. कीर्तिला तर राग आला होता पण आईसाठी तिने स्वतःला सावरलं.

"ए मुली.. थांब तिथंच देते फुलं." तिच्या पिशवीत कीर्तिने दहा पंधरा फुलं तोडून टाकली.. आणि तिच्याजवळ जात म्हणाली.. "उद्यापासून यायचं नाही फुलं मागायला.."

"ताय ते आठ दिस फुलं पायजेती.. देशीला का?".. फुलांची पिशवी उराशी धरून ती म्हणाली.

"आठ दिवस.. रोज... कशाला?"

"ते कोपऱ्यावर महादेवाचं देऊळ हाय बघा तिथं द्याला.. माय ला पायजे व्हती."

तिची नजर खाली कीर्तिच्या पायावर होती.. चेहऱ्यावर निर्विकार भाव.. आवाज खूप लाघवी.. आणि ती बोलत होती.. "माय देवाला बोलली हाय आठ दिस ताजी फुलं पायाशी घालीन."

"देवाला अर्पण करायला लोकांकडे मागून फुलं वाहतात का.." कीर्तिचा स्वर थोडा उंचावला होता.. ती चढ्या आवाजातच त्या पोरीशी बोलत होती.. "घे जा ना विकत देवळाच्या बाहेर मिळतात पाच दहा रुपयांत."

मुलीचा चेहरा खाडकन उतरला. "ताय.. ते.. पैसं रोज... एवढं.." मुलीला पुढे काय बोलावं सुचेना.

"कळलं.. नाहीत ना पैसे. मग बोलताच कशाला गं असं देवाला..".. कीर्तीचा स्वर तसाच होता.

ती लहानगी काहीच न बोलता फुलांची पिशवी घेऊन खाली मान घालून निघून गेली.

कीर्तिला मात्र आपण जरा जास्तच बोललो ह्याची सल मनाला लागली. "उद्या येईल का ती परत? नाही येणार बहुतेक.. किती बोलले मी.. ते ही फुलांसाठी." कीर्ति स्वतःशीच विचार करत म्हणाली.

आज ताजी असणारी फूलं नाही तोडली तर उद्या सुकून कोमेजून तर जाणार आहेत. तिनं झाडाकडे एक नजर टाकली.. चाफाही थोडा नाराजच दिसला. "जावू दे.. उद्या च उद्या पाहू." असं म्हणत ती कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी सकाळी दारात ही बया उभीच.. कीर्तिला थोडं हायसं वाटलं.. आली बाई आज परत.

"ताय..." तिने हाक मारली.

"हो आले.. देते फुलं.." कीर्ति हातातलं काम बाजूला ठेवून बाहेर आली.. "कुठं राहतेस गं.."

"गावाच्या बाहेर पडकी साळा हाय तिथ." कुठल्यातरी एका दिशेला बोट दाखवत त्या मुलीने आपला पत्ता सांगितला.

"घरात कोण कोण आहे" फुलं तोडून तिच्या पिशवीत टाकताना कीर्तिने प्रश्न विचारला.

"माय, बा, मोठी भन, दोन भाव. आज्जी बी हाय पण ती लाम गावी असत्या.." असं म्हणून त्या पोरीने बोट अगदी आकाशाकडे दाखवलं.

"बरं बरं. घे फुलं आणि जा.."

"जी ताय.."

फुलं मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर घेउन ती निघून गेली.

आठ दिवस न चुकता ती मुलगी फुलं न्यायला येत होती. आपण खूप मोठं काम करतोय, दानधर्म वगैरे.. कीर्तिच्या चेहऱ्यावर किंचितशी अभिमानाची लकेर उमटली... स्वतःशी हसत विचार करत होती.

"मी रोज फुकट फुलं दिली म्हणून तिच्या आईचा नवस पूर्ण झाला. नाहीतर तिला विकत फुलं घेणं शक्यच नव्हतं.. देव ही नकळत आपल्यावर खूष असणारच." कीर्ति एकटीच बोलत होती.

इतक्यात तिची आई तिथेआली. "काय झालं.. एकटीच गालातहसत आहेस." आईने विचारलं.

"काही नाही.. ती मुलगी फुलं न्यायला आठ दिवस न चुकता येत होती पण आता ह्या काही दिवसात कुठे आलीच नाही." बाहेरच्या चाफ्याच्या झाडाकडे बघत कीर्ति म्हणाली.

"अगं.. आता कशाला येईल..? तिला आठच दिवस फुलं हवी होती ना!" आई म्हणाली. "तसंही तुला तीचं फुलं मागणं आवडत नव्हतच की.."

"तरी पण एकदा परत येवून आभार तरी तिने मानायचे ना.." डोळ्यात अहंकाराची लकेर ठेऊन कीर्ति बोलत होती. "लोकं केलेले उपकार असे विसरतात म्हणून कोणाला काही देवू नये. तू म्हणालीस म्हणून न चिडचिड करता फुलं दिली आठ दिवस रोज..."

कीर्तिचं बोलणं ऐकून आईला हसू आलं.

"काय झालं...?" ...कीर्तिने विचारलं.

"काही नाही."

तेवढ्यात बाहेरून हाक आली.. "ताय.. व ताय!"

हा तर त्या मुलीचा आवाज. दोघीही बाहेर आल्या तर दारात ती मुलगी उभी होती.

"काय आज पण फुलं पाहिजेत का ?" ...प्रश्नार्थक नजरेनं कीर्तिने विचारलं.. "आधीच सांगते.. नाही देणार आज फुलं.. थोडी कमीच लागली आहेत.. मला लागतील पूजेसाठी."

"फुलं नको ताय... ते.... हे... हे.." हातातलं मळकट फडकं कीर्तिपुढे करत ती म्हणाली.

कीर्तिने त्या फडक्याकडे बघितलं.. "काय... ते... हे... हे ..."

"ताय.. ते माझी मोठी भन बाळतपणाला आल्या.. यवस्थित बाळ हु दे म्हणून माय नवस बोलल्याली माहदेवाला." ... त्या मुलीच्या नजरेतील ओलावा कीर्तिला दिसत होता.

"तुम्ही फुलं दिली... आयचा नवस पुरा झाला. परवा दिशी मुलगा झाला. यवस्थित हाय सगळं.." असं सांगताना मुलीच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.. "माझा बा दगड फोडतो आणि मुरत्या बनीवतो.. बा नं हे बनीवलं हाय तुमच्यासाठी.." हातातलं फडकं कीर्तिकडे देत ती म्हणाली.

"बा म्हणाला, तुमचं उपकार जनमभर नाय इसरणार.. अन् माय म्हणली कुणाचबी काय फुकटच घेवू न्हाय. आपल्या परीनं परत करावं.. म्हणून हे.. घ्या..."

कीर्तिने ते मळकट फडकं हातात घेतलं. उघडून पाहिलं. अतिशय सुरेख, सुंदर, रेखीव दगडापासून घडवलेली विठ्ठल रखुमाईची मुर्ती होती. किती तेजस्वी आनंदी, सात्विक आहे ही मुर्ती. कीर्ति आनंदून गेली.

"अगं ऐक..." ...हातातील मूर्तीवरची नजर उचलून समोर बघत कीर्ति म्हणाली.

पण ती मुलगी नव्हती तिथं. पटकन मुर्ती देवून निघूनही गेली. कीर्तिचे आभाराचे दोन शब्द ऐकायलाही नाही थांबली. कीर्तिचे डोळे पाण्याने डबडबले.

🌺 सोनचाफा 🌺
आपण किती खुजे, संकुचीत.. एका क्षणात खूप लहान ठरलो हिच्यापुढे. कीर्तिचा सगळा गर्व अभिमान एका झटक्यात गळून पडला होता. एखाद्याची पात्रता ठरवणारे आपण कोण..? का हिने न बोलताच आपल्याला आपली पात्रता दाखवली. 

कीर्तिला तिची चूक उमगली होती आणि त्या क्षणी चाफ्याचा सुगंध साऱ्या अंगणात दरवळला.. तो रोजच्यापेक्षा जास्तच टवटवीत बहरलेला वाटला.. 🙏🏻🌹

🌸🌺🌼🌻🌹🍃🌷🍀☘️🍁🍂
📚📖🖋️🙏🏻🌹

... अपूर्ण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा