शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

शब्दांच्या पलीकडे ..


टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...


जूनचा महिना, जो एखाद्या कंटाळवाण्या जीवनासारखा नको असतानाही खेचला जात होता. उन्हाचा त्रास इतका होता की, घरासमोर असणारा गुलमोहोर आणखीनच लाल झाल्यासारखा दिसत होता. आई सुद्धा तिचं काम आवरून बसली होती. निधी इतक्या कडक उन्हात सुद्धा गच्चीवर जाऊन कोणाचीतरी वाट बघत होती. गच्चीवर उभी राहिल्यामुळे तिला समोरच्या चौकात खेळणाऱ्या मुलांचा गोंधळ ऐकू येत होता. निधी गुलमोहराच्या झाडावर बसलेल्या सुगरण पक्षाला बघत होती... तितक्यात तिला तो आवाज ऐकू आला ज्याची ती आतुरतेने की काय म्हणतात तशी वाट बघत उभी होती.

एक पोस्टमन आपल्या सायकलची घंटी वाजवत तिच्या घराच्या अंगणात येऊन पोहचला होता. निधी धावत वरून खाली उतरली. माठातील थंडगार पाण्याचा एक ग्लास भरून घेतला आणि पोस्टमन काकांजवळ गेली. ओढणीमध्ये धरलेला पाण्याचा ग्लास तिने पोस्टमन काकांसमोर पुढे केला आणि म्हणाली... "काका पाणी.."

पोस्टमन पाणी प्यायले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीत बसले. डोक्यावरची टोपी काढून त्याच टोपीने त्यांनी आपल्या कपाळावरचा घाम पुसला आणि ते निधीला म्हणाले.. "बाळा का बरं तू अशी उन्हात गच्चीवर जाऊन उभी राहतेस ? उन्ह किती वाढलंय दिसत नाही का ?"

"काका माझी काळजी नका करू. मी काय लहान आहे का आता ? ते जाऊ द्या.. माझी पुस्तकं आणली का तुम्ही ?" ... निधी म्हणाली.

"हो तर..!" ... आपल्या सायकलला बांधलेला पुस्तकांचा एक गठ्ठा उचलून निधीकडे देत पोस्टमन काका म्हणाले.

पुस्तकांचा गठ्ठा बघताच लहान मुलं जसं एखाद्या आवडीच्या खेळण्याला बघून खुश होतात, तशी निधी खुश झाली आणि पुस्तकं घेऊन गच्चीवर जायला निघाली.

तेवढ्यात तिच्या आईचा आवाज तिच्या कानावर पडला.. "अजून पुस्तकं ..!" ... खरं तर याच गोष्टीची भीती निधीला होती. आई तेव्हढ्यात व्हरांड्यात पोहचली होती..

"काका आणखीन पुस्तकं आणलीत तुम्ही निधीसाठी..!" ... आई असं म्हणाली जसं की पोस्टमन काकाच जबाबदार होते निधीच्या सर्व पुस्तकांना.. पण काकांना सुद्धा निधीसाठी पुस्तकं आणण्यात खूप काळ लोटला होता, आणि आईची बडबड ऐकून घेण्याची सवय सुद्धा झाली होती.. तेंव्हा ते म्हणाले... "आहो पोस्टात पडून पडून तर ती खराबच झाली असती, मग विचार केला की देऊनच येऊ.. निधीची जुनी पुस्तकं वाचून संपली असतील..."

निधी यावर हसून हाणली... "काका, अजून थोडं पाणी आणू का ?"

"नको बाळा.." काका म्हणाले.. आणि टोपी पुन्हा डोक्यावर ठेवली आणि उठून जायला लागले..

आई पुन्हा काहीतरी बोलणार याआधी निधी वेळ साधून वर निघून गेली.. गच्चीवर तिचं स्वतःच वेगळं विश्व होतं. गच्चीच्या एका कडेला काही फुलांची झाडं रांगेत सजवली होती.. तिथेच एका भिंतीकडे एक छोटंसं छप्पर बनवलं होतं.. आईकडून जुन्या गाद्या घेऊन बसण्यासाठी जागा केली होती... या सगळ्यातुनच तिने स्वतःच वेगळं विश्व तयार केलं होतं... तिथेच शेजारी एक जग भरून पाणी आणि एक मोठी बरणी भरून चिप्स सोबतीला घेऊन निधी दुपारच्या भर उन्हात सुद्धा पुस्तकं वाचत बसत होती... तिचं पुस्तकांचं कपाट पुस्तकांच्या वजनाने दबून चाललं होतं तरी पण निधी आणखीन पुस्तकं ठेवायला त्यात जागा करायची..

तिच्या त्या वेगळ्या विश्वात तिला एकटीला सुद्धा प्रसन्न वाटायचं... ना तिथे आईची कटकट ना तिथे तिला बाबांचा उदास चेहरा नजरेस पडायचा... आईला नेहमी गच्चीवर चढ-उतर करणं जमत नव्हतं... पण बाबा मात्र कधी कधी गच्चीवर जायचे... निधीचं ते वेगळं पुस्तकांचं विश्व बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळंच उदासीन हसू उमटायचं...

तसं तर निधीने BA च्या शेवटच्या वर्षी ऍडमिशन घेतलं होतं... पण बाबांना मात्र त्यांची लेक अजून मोठीच नाही झाली असं वाटत होतं... जसं की, तिचं बालपणातील भातुकलीचं घर आता मोठं होऊन हे पुस्तकांचं विश्व तयार झालं आहे... जिथे तिच्या वयाच्या मुली तिच्या मैत्रिणी नटून थटून स्वतःच्या लग्नाची तयारी करत होत्या तिथे निधी मात्र आपला साधा पेहराव आणि पुस्तकातून बाहेर येण्यास तयार नव्हती...

काही दिवसांपुर्वी शेजारी राहणाऱ्या नेहाचं लग्न ठरल्यानंतर निधीच्या आईला बोलायला संधीच मिळाली... निधी आणि नेहा जिवलग मैत्रिणीच... लहानपणापासून त्यांचं शिक्षण एकत्र झालं होतं... दोघी घट्ट मैत्रीणी जरी असल्या तरीही दोघांच्या स्वभावात मात्र खूप फरक होता... जिथे निधी पुस्तकात रमून जायची तिथे नेहाला मात्र पुस्तकांपासून तितकीच चीड... नेहाने शाळा कॉलेजमध्ये अभ्यासाची पुस्तकं ती सुद्धा जुलूमानेच वाचली असावीत.. पण नटनं सजनं नेहाला खूप आवडायचं... घरी.. कॉलेजमध्ये.. कॉलनीत कोणताही कार्यक्रम असो... पूजा असो... सगळ्यात पहिला नेहाला जायचं असतं ... नवीन नवीन कपडे शिवून नेहा थेट निधीच्या गच्चीवर जायची, ... "बघ ग निधी जरा हा ड्रेस.. कसा दिसतोय? आणि ही लिप्स्टीक ?"  

"नेहा! अगं तुला आईने नाही सांगितलंय ना लिप्स्टीक वगैरे लावायला.. मारेल ना ती तुला.." ... निधी नेहाला समजवायची.

"अगं पण, मी घरी कुठे लावून जाणार आहे.. तुझ्याजवळ इथे ठेऊन जाणार ना.." ... नेहा निधीला सांगायची..

नेहाच्या सजण्या सवरण्याच्या आरशाला आता निधीच्या पुस्तकांच्या कपाटात जागा मिळाली होती.. नेहा फॅशन मॅगझीन वाचायची आणि निधी.. कादंबरी, साहित्य, नाटकं वाचायची... पुलं... काळे... दांडेकर... फडके यांपासून ते थेट शेक्सपियर, जोआन रोलिंग आणि टेनेसी विल्यम्स पर्यंत सगळ्यांची जवळपास सगळी पुस्तकं वाचून झाली होती... काही दिवसांपासून निधी थोडं थोडं लिहायला सुद्धा लागली होती.. निधीला स्वतःला खूप वाटत होतं की, तिने खूप शिकावं.. पण निधीच्या आईला मात्र BA चा निकाल हाती येता येता निधीचे हात पिवळे व्हावेत असं वाटत होतं...

"आम्ही काय शिक म्हणून जबरदस्ती करतोय का तुझ्यावर ? तुज्या वर्गातील कित्येक मुलींची लग्नं पण जमली. अगं तू MA जरी केलं तरी मुलींना चूलच फुंकावी लागते आयुष्यभर.." ... त्या वेळी आईचा राग बघून निधीच्या अंगावर शहारे यायचे..

"आई मला Ph.D करायची आहे, लेखिका बनायचं आहे.." निधी आईला समजवायची..

"काय तर म्हणे लेकीका बनायचं... मोठी आली Ph.D करणारी..." ... असं म्हणून आई भाज्यांची टोपली तिच्यापुढे सरकवायची... "हे घे... जरा नीट करून ठेव ह्या भाज्या. आणि संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर.."

माय लेकीच्या त्या सगळ्या संभाषणात बाबा मात्र गप्प पेपर वाचत बसलेले असायचे.. त्यांना मुलीच्या स्वप्नांची पूर्ण कल्पना होती आणि याची जाणीव पण होती की, त्यांना निधीला इतकं पुढे शिकवणं पेलणारं नव्हतं... त्यांची रिटायरमेंट जवळ आली होती.. निधीचं लग्न जर नोकरी असताना झालं असतं तर लग्नासाठी लोन सुद्धा सहज मिळवता आला असता... याच सगळ्याचा विचार करून ते आईच्या बोलण्याला ना विरोध करत ना निधीच्या पाठीशी ठाम उभे राहत...

एके दिवशी निधीची आई नेहाच्या होणाऱ्या नवऱ्याचं कौतुक ऐकूण धरी आली, तेंव्हा निधी पुस्तक घेऊन व्हरांड्यातच बसली होती. तिच्या पुस्तकांचा आईला आधीच राग... त्यात पुस्तक घेऊन बसलेल्या निधीला समोर बघून आईचा पारा चढला. तिने निधीच्या हातातील पुस्तक खेचलं... आणि ओरडली... "उद्याच रद्दीवाल्याला बोलावून सगळी पुस्तकं रद्दीत देऊन टाकते.."

"आई... नको ना Please.." ... निधी रडवेल्या स्वरात म्हणाली. "ठीक आहे, मी आता पुन्हा पुस्तक घेऊन नाही बसणार.. पण तू पुस्तकं नको देऊ रद्दीत.."

"जा तर मग स्वयंपाकाची तयारी कर.. बाबा येतच असतील.." ... आईने एक अलिखित तह करत नेहाला स्वयंपाक करायला लावला.

संध्याकाळी बाबा घरी आले तेंव्हा घरातील वारे वेगळ्या दिशेला वाहत होते. निधी पुस्तक सोडून स्वयंपाक घरात जेवण बनवत होती. ... "वाह! वाह!! आमची लाडली आज जेवण करते.. वाह, खूप छान.." ... बाबांच्या चेहऱ्यावर आनंद बघून निधी अजूनच हताश झाली..

"आज पासून संध्याकाळचं जेवण आता निधीच करणार रोज.." .. आईने बाप लेकीला ठणकावून सांगितलं..

"रोज...?" ... बाबांनी प्रश्नार्थक नजरेने विचारलं...

"हो रोज ..! माहिती आहे का, नेहाचं लग्न ठरलंय... मुलगा पाटबंधारे खात्यात इंजिनियर आहे म्हणे ... तिची आई लाडू वाटत सगळ्या गावाला सांगत होती.. आणि आपल्याकडे... आपल्याकडे काय...? लेकीला धड जेवणतरी बनवता येतं का ? ... देवाने जे रंग रूप दिलंय त्याची पण काळजी नाही तिला... थोडं नटून थटून नीट राहावं असं काहीच नाही... बघावं तेंव्हा त्या पुस्तकात डोकं घालून बसलेली असते..."

त्या रात्री निधी गच्चीवर गेली तेंव्हा तिने आपली पुस्तकं उचलण्याऐवजी नेहाचा आरसा उचलला...

आज कित्येक दिवसांनी लाईटच्या मंद प्रकाशात तिने स्वतःला आरशात पाहिलं होतं. दोन टपोऱ्या डोळ्यांनी आरशातून तिला निरखून पाहिलं. दिसायला इतकी पण वाईट नव्हती निधी... मोठे टपोरे डोळे... गोल निरागस चेहरा... लांब सडक केस... नाक थोडं छोटं आणि ओठ तुलनेने थोडे मोठे ...

निधी आरास घेऊन बसलीच होती तेवढ्यात नेहा तिच्या गच्चीवरून टपकन उडी मारून निधीजवळ आली... रात्रीचं जेवण झाल्यानंरत दोघी मैत्रिणी एकत्र गच्चीवर गप्पा मारत बसत..

"तुझं लग्न काय ठरलं... माझं तर जगणं नकोसं झालंय." ... निधी नेहाला बघून म्हणाली.

"तू एक काम कर.. तुझ्या आईचा राग शांत नाही होत तोपर्यंत तिच्या सगळ्या अटी मान्य कर.." ... नेहा म्हणाली.

"आहाहा...!! काय मान्य कर... ती तर माझं लग्नच लावून देईल या वर्षी... काय तर म्हणे अटी मान्य कर..." ... निधी थोड्या चिडक्या स्वरात म्हणाली. निधीला नेहाचं म्हणणं अजिबात मान्य नव्हतं..

त्या दिवसापासून निधीचं संपूर्ण रुटीन बदलून गेलं होतं.. संध्याकाळी आई निधीकडून जेवण बनवून घ्यायची आणि रात्री नेहा तिला गच्चीवर बाहुलीप्रमाणे सजवायची... नेहाला जितकी काही कला येत होती, ती सर्व निधीला शिकवण्याचा प्रयत्न नेहा करत होती... स्वतःच्या लग्नासाठी कपडे शिवायला जाताना नेहा निधीला सुद्धा सोबत घेऊन जायची..

असेच दिवसामागून दिवस निघून जात होते आणि नेहाचं लग्न जवळ येत होतं..

"निधी... माझ्यासाठी काहीतरी लिही ना ग... मी सोबत घेऊन जाईन..." ... एके दिवशी नेहा अगदी उदास मनाने निधीला बोलली.. तेव्हा निधीने काहीतरी लिहून आपल्या पुस्तकात ठेवून दिलं..

काही दिवसातच डिसेंबरचा तो दिवस उजाडला ज्या दिवशी नेहाचा साखरपुडा होता... नेहाच्या जवळच्या पाहुण्यांची ये - जा चालू झाली होती.. डिसेंबरच्या थंडीत पाहुणे मंडळींना उन्हाचा आनंद घेता यावा म्हणून गच्चीवर बसण्यासाठी खुर्च्या आणि सोफा मंडला होता..

"तू जरा लवकरच ये हा.." ... नेहाने निधीला प्रमाणे सांगितलं.. आपल्या जिवलग मैत्रिणीचं म्हणणं निधीतरी कसं टाळू शकेल... त्या दिवशी निधीने आपल्या आईची फिकट गुलाबी रंगाची जरीची साडी नेसली होती... तयार होऊन आपल्या गच्चीवर गेली आणि हळूच डोकावून नेहाच्या गच्चीकडे बघू लागली.. लहानपणापासून दोघींचा हाच तर मार्ग होता एक दुसऱ्याच्या घरी जाण्याचा.. पलीकडे डोकावून बघतानाच तिचा पदर भिंतीतील एका खिळ्याला अडकला ...

"थांब तिथंच जरा..." ... निधीच्या कानांव एक अनोळखी आवाज पडला.. ती थोडी बावचळली.. ऊन थोडं जास्त असल्याने हलक्या पापण्या झापूनच तिने समोर पाहिलं... पलीकडे खुर्चीत तीन चार लोक बसले होते.. नेहाचे कोणीतरी पाहुणे असावेत.. त्यातील एकजण उठून निधीच्या दिशेने येत होता... निधीजवळ येताच खिळ्यात अडकलेला पदर काढण्यासाठी ती व्यक्ती वाकताच आपुलकीचा एक हलका सुवास तिथे दरवळत असल्याचं निधीला जाणवलं.. सूर्यकिरण थेट डोळ्यांवर पडत असल्यामूळे निधीला त्या व्यक्तीचा चेहरा दिसला नाही.. "Thank You" म्हणून स्वतःला सावरत चेहरा फिरवून डोळे पूर्ण उघडून पाहते तोपर्यंत ती व्यक्ती जिन्यावरून खाली निघून गेली होती.. निधी पण धावत जिना उतरून खाली आली पण तिला कोणीच दिसलं नाही...

नेहाची आई निधीला बोलवत होती... "कुठे राहिली नेहा ? अजून किती वेळ लावणार आहे ती तयार व्हायला? .. जा ग निधी जरा जाऊन बघ तिला..."

निधी गेली आणि थोड्या वेळाने नेहाला तयार करून बाहेर घेऊन आली. मुलाकडचे पाहुणे पोहोचलेच होते.. आपल्या अल्लड मैत्रिणीला होणाऱ्या नवऱ्याला समोर बघून लाजताना पाहून निधीला हसू आलं...

तिकडे नेहाच्या साखरपुड्याच्या विधी होत होत्या आणि नेहा सोबत बसलेल्या निधीला मात्र सारखं असं वाटत होतं की, कोणीतरी तिच्याकडे एकटक बघत आहे. इकडे तिकडे मान फिरवून तिने खात्री करण्याचा प्रयत्न केला.. तरीही तिला असं कोणी दिसलं नाही... मग आपल्याला भास होत असावेत असं म्हणून तिने दुर्लक्ष केलं...

त्या रात्री जेंव्हा नेहा निधीच्या गच्चीवर गेली तेंव्हा निधी पुस्तक घेऊन एकटीच उदास होऊन बसली होती... "दोन चार दिवसांनी तू निघून जाणार ना.. पुढे कधी आपण भेटलो तरीही असा वेळ कुठे आपण एकत्र घालवणार.." ... निधीचे स्वर थोडे डोळ्यांतील आसवांप्रमाणे भिजल्यासारखे होते... निधीच्या डोळ्यातील ओलावा बघून नेहाच्या डोळ्यात सुद्धा पाणी तराळलं...

"इथे सखे न सोबती... कोणी इथे कोणी तिथे..." ...पुलंच्या दोन ओळी आपसूकच निधीच्या ओठांवर उमटल्या... तेवढ्यात नेहाच्या गच्चीवरून एक हलका आवाज दोघींच्याही कानावर पडला... "अब के बिछड़े हम तो शायद कभी ख़्वाबों में मिलें... जैसे सूखे हुए फूल किताबों में मिलें.."

निधीच्या चेहऱ्यावरचे भाव तिला काही बोलू देतील त्याआधीच नेहाने आपली हलकी नजर तिच्या गच्चीकडे वळवली आणि म्हणाली ... "सतिश दादा ..!"

सतिश दादा हळुवार पावलांनी चालत पुढे आला तेंव्हा निधीच्या गच्चीवरील लाईटचा हलका मंद प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला... निधीला चष्म्याच्या पलीकडे लपलेले सतिशचे डोळे दिसले नाहीत पण तिला तो भास जाणवला जो तिला आज संध्याकाळी नेहाच्या साखरपुड्यात झाला होता...

सतिश गच्चीच्या कंपाऊंडची भिंत ओलांडून पलीकडे आला तेंव्हा तिला तो सहवासाचा गंध सुद्धा जाणवला.. आणि ती मनातच म्हणाली.. "तर हेच होते ते दुपारी.."

नेहाने ओळख करून दिली... "निधी, हा माझा सतिश दादा... मिशिगन युनिव्हर्सिटीत इंग्लिश साहित्याचा प्रोफेसर आहे.. आता काही दिवसांपूर्वीच US हुन आलाय... आणि दादा.. ही माझी मैत्रीण ...निधी.."

सतिश काहीच न बोलता निधीच्या पुस्तकांकडे वळला.. निधी स्वतःला त्या मंद सहवासाच्या सुगंधातून सावरू शकली नव्हती.

"गच्चीवरील लायब्रररी..!" ... सतिश म्हणाला.

"गच्चीवरील लायब्रररी नाही दादा ... चोरीची लायब्ररी म्हण.." .. नेहा थट्टेने म्हणाली.

"का बरं ? तुझी मैत्रीण चोर आहे का ? चेहऱ्यावरून तर नाही वाटत .." दोघा बहीण भावाचं बोलणं ऐकून निधीचा चेहरा हिरमुसला.

"नाही दादा पण ती चोरून पुस्तकं वाचते ना .." नेहा म्हणाली.

"चोरून ?" .. सतिशने प्रश्नार्थक नजरेने विचारलं.

"हो ना..! निधीच्या आईला तिच्या वाचनाचा छंद आवडत नाही म्हणून चोरून वाचते ती.." ... नेहाने खुलासा केला.

"असं काही नाही हा नेहा .. मी नेहमी पुस्तकं घेऊन बसते म्हणून आईला ते आवडत नाही इतकंच.." ... निधीने खालच्या स्वरात स्वतःची बाजू मांडली.

"दादा.. निधी लग्नासाठी तयार होत नाही ना म्हणून तिची आई तिला ओरडते.. निधीला इतक्यात लग्न नाही करायचं... तिला Ph.D. करून लेखिका बनायचं आहे.. पण आईचा मात्र हट्ट आहे तिने वेळेत लग्न करावं.." नेहा सतिशला सांगत होती... नेहाचं बोलणं ऐकून सतिश थोडा हळवा झाला आणि काहीतरी विचार करत म्हणाला..

"... आणि जर लग्नानंतर पण शिलायला मिळाल तर...?"

निधीला काहीच न बोलू देता पटकन नेहा म्हणाली... "अरे दादा! मग तर ही धावत तयार होईल लग्नाला... पण असं नाही ना होत दादा... कुठे मिळणार असा मुलगा ?"

"हा... कुठे मिळणार असा मुलगा..?" सतिश स्वतःशीच म्हणाला आणि काही तरी विचार करत निघून गेला..

सतिश तर निघून गेला.. पण, निधीला जसं की एकटं पाडून गेला.. कोण जाणे काय होतं त्या छोट्याश्या भेटीत की, निधीला नेहमी सतिश शेजारच्या घरात असल्याचा भास रात्रभर होत होता.

तासाभराची भेट.. दिवसभराची सोबत.. बस या सगळ्यातच निधीला असं वाटत होतं की मागची संपूर्ण आयुष्याची पानं कोरी राहिलीत आणि हेच ते पान ज्यावर काहीतरी लिहिलं होतं.. निधी स्वतःच थोडी गोंधळल्यासारखी झाली होती..

दुसऱ्या दिवशी हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम होता संध्याकाळच्या वेळी संगीत आणि गाण्याच्या आवाजात पाहुणे मंडळींनी घर भरू लागलं होतं ... मावश्या... आत्या... दादा... काका... मामा... सगळेच... कोणी झिंगाट लावून नाचत होतं तर कोणी अजून काही... अशामध्ये नेहा कुठे शांत बसणार होती... तिने निधीला आवाज दिला...

"तू पण ये ना .." ... तेंव्हा निधी लाजतच उभी राहिली .. आणि लाजत लाजत का होईना पण त्या दिवशी तिने दोन चार हात पाय मारले होते.

निधीची नजर ना राहून सतिशला शोधत होती.. "बराच वेळ दिसले नाहीत ते" ... असा विचार करत होती तेव्हढ्यातच एका कॅमेराचा फ्लॅश लाईट निधीच्या डोळ्यावर पडला ... तिने पाहिलं तर सतिश कॅमेरा घेऊन तिचाच फोटो काढा होता... निधी थोडी गडबडली ... तिला वाटलं की तिची चोरी पकडली गेली असावी.

"दादा फोटो दाखव ना..." ... नेहा म्हणाली.

"अरे पहिला तुमचा कार्यक्रम तरी आटोपून घ्या.. माझ्या खोलीत लॅपटॉप आहे त्यावर नंतर दाखवेन.." ... असं म्हणत "ही पोरी साजूक तुपातली..." गाण्यावर नाचणाऱ्या एका काकीकडे सतिशने कॅमेरा फिरवला.

मेहंदी लावायला सुरु झाली तेंव्हा प्रत्येकजण स्वतःच्या आवडीची नक्षी सांगत होता.. नेहा तर म्हणाली.. "मला तर यांचं नाव माझ्या हातावर काढून हवंय... एक बाजूला सागर एक बाजूनं नेहा.."

"निधी तू काय लिहिणार आहेस हातावर..?" कोणीतरी निधीला विचारलं.. तेंव्हा निधीची नजर आपल्या आसपास असणाऱ्या सतिशकडे वळली.. सतिशसुद्धा तिच्याकडेच बघत होता... तिने पटकन आपली नजर खाली घेतली... "अरे देवा ! दुसऱ्यांदा चोरी पकडली..." निधी स्वतःचीच म्हणाली.

"अगं बोल की निधी.." ... नेहाने पुन्हा एकदा विचारलं..

"अरे पुस्तक काढा तिच्या हातावर.." .. सतिश हसत हसत अगदी गमतीने म्हणाला.. "मग पुस्तकं वाचायची चोरी नाही करावी लागणार.."

त्या संध्याकाळपासून मनात चाललेल्या गोंधळामुळे निधी थोडी बेचैन होती. बस्स सतिशच्या इतक्याशा बोलल्याने निधीचे डोळे पाणावले जसं की, पावसाच्या धारा जमिनीवर पाडाव्यात.. तिच्या डोळ्यातून असावं वाहत होती.. आणि ती बाहेर व्हरांड्यात निघून गेली. जे काही तिच्या मनात चालू होतं ते सर्व तिच्या नजरेतून वाहत होतं.. तिला काही कळत नव्हतं नेमकं काय होतंय? का तिला सतिशचं बोलणं इतका मनाला लागला होतं?

तेवढ्यात तिला मागून आवाज आला... "I am Sorry.." ... सतिश न जाणे कधी तिच्या मागे येऊन उभा राहिला होता. त्याचा चेहरासुद्धा गंभीर झाला होता. जसं की निधीचं दुःख त्याला निच्या नजरेतच कळलं होतं.

सतिशने स्वतःच्या खिशातील रुमाल निधीला दिला तेंव्हा तो रुमालसुद्धा त्याच सुवासाने मोहरून गेला होता जो तिला सतिश सोबत असल्याचा आभास करून देत होता..

निधीने डोळे पुसले.. तिच्या नकळतच डोळ्यातील काजळ तिच्या गालांवर पसरलं होतं.. हे बघून सतिशला हसू तर आलं होतं, पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला ... "माझा रुमाल..."

"धुऊन देते उद्या.." .. असं म्हणत निधी धावतच वर निघून गेली.

बराच वेळ स्वतःच्याच विचारात निधी हरवून गेली होती. तिने रुमाल एका पुस्तकामध्ये सांभाळून ठेवला, आणि कधीच खोटं न बोलणाऱ्या निधीने हे सुद्धा ठरवलं होतं की, सतिशने जर रुमाल मागितलाच तर सांगायचं की, "रुमाल हरवला त्यांचा.."

दुसऱ्या दिवशी निधी तयारच होत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला... नेहाचा फोन होता. "अगं लवकर ये ना... कालचे फोटो बघायचे आहेत की नाही.."

निधी नेहाच्या घरी पोहचली तेंव्हा नेहाचा आवाज आला. "निधी इकडे ये.. सतिश दादाच्या खोलीत आहे मी.." ... नेहा सतिशचा लॅपटॉप मांडीवर घेऊन बसली होती.. "अगं किती फोटो आहेत तुझे निधी..!" एक एक फोटो पुढे सरकवत नेहा म्हणाली. निधी काही बोलणार त्याआधीच खोलीत एका कोपऱ्यात पुस्तक वाचत बसलेला सतिश म्हणाला.. "खूप फोटोजनीक आहे तुझी मैत्रीण.. जेव्हढा चांगला चेहरा नाही त्यापेक्षा फोटो छान येतात तिचे..." ... निधी थोडी गालातच हसली... काल संध्याकाळनंतर निधीचं मन थोडं सावरलं होतं आणि सतिशची मस्करी करण्याची सवय सुद्धा तिच्या लक्षात आली होती.

निधीने सतिशकडे पाहिलं तर तो पुन्हा पुस्तकात मग्न झाला होता. पहिल्यांदा असं झालं असावं की, निधीला एखादं पुस्तक बघून त्याबद्द कुतूहल वाटलं नसावं. तिला वाटत होतं की, सतिशने स्वतःहून काहीतरी बोलावं.. पण काय..? खरंतर निधी नेहा सारखी मुळीच नव्हती, बोलायला विषय नसला तरीही तासभर बोलत बसेल.

निधीला शांत बघून सतिशची पुन्हा एकदा नजर तिच्याकडे गेली.. "हे पुस्तक वाचून संपतंय माझं.. जायच्या आधी मी तुला देऊन जाईन.." असं म्हणून आपल्या हातातील पुस्तक सतिशने निधीच्या हातात ठेवलं. निधी ते पुस्तक उघडून बघू लागली. काही काही पानांवर सतिशने पेनाने काहीतरी लिहिलं होतं. त्या अक्षरांवर हात फिरवताना निधीला वाटत होतं की, ती सुद्धा त्या अक्षरांमध्ये विलीन होऊन जात आहे. पुस्तकाची पानं पलटून बघता बघता काहीतरी पुस्तकातून पडलं... निधीने उचललं तेंव्हा तिला आश्चर्य वाटलं.. ते तिचंच बुकमार्क होतं. ज्यावर तिने बालिशपणा करत स्वतःचच नाव कितीतरी वेळा आडव्या तिडव्या अक्षरात लिहिलं होतं. "हे ह्यांना कुठून मिळालं..??" ... निधी स्वतःशीच बोलली... ती काहीतरी विचारणार इतक्यात सतिशने निधीच्या हातातून बुकमार्क काढून घेतला.. "हा... मी माझा बुकमार्क विसरून आलो म्हणून तुझ्या पुस्तकातून काढून घेतला त्या दिवशी... I hope its okay with you.." ... असं म्हणत बुकमार्क खिशात ठेवला आणि निधी काही बोलणार त्याआधीच सतिश खोलीतून निघून गेला.

नेहा लॅपटॉप बाजूला ठेऊन दोघांचं बोलणं ऐकत होती. सतिश निघून जाताच नेहाने निधीचा हात पकडला आणि म्हणाली, "निधी तुला सतिश दादा आवडतो ना..?"

निधीने "नाही" म्हणत मान हलवली...

"नाही काय ? तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय मंद... आणि त्याच्या सुद्धा.." असं म्हणत नेहाने लॅपटॉप निधीकडे वळवला. लॅपटॉपच्या स्क्रीनवर त्या वेळचा फोटो होता जेंव्हा निधी हळदीच्या कार्यक्रमात रडत बाहेर निघून गेली होती. तिच्या काजळ घातलेल्या डोळ्यातून दोन मोठे मोठे अश्रुंचे थेंब वाहत गालांवर आले होते जे फोटो मध्ये मोत्यासारखे चमकत होते.

आज नेहाचं लग्न... लग्न होऊन नेहा निघून जाणार, हा विचारच निधीला अस्वस्थ करत होता. कुठेतरी अस्वस्थता  आणखीन होती की, नेहाच्या लग्नानंतर सतिश सुद्धा निघून जाणार. त्या दिवशी पहिल्यांदाच नेहाला तयार करताना निधीला वाटलं की, तिनेसुद्धा नवरी सारखं नटावं... तिलासुद्धा कोणाचीतरी प्रतीक्षा असावी... नेहाच्या हट्टामुळे निधीने सुद्धा हात भरून बांगड्या घातल्या होत्या. डोळ्यात काजळ घातलं होतं, आणि फिकट आकाशी रंगाची साडी नेसली होती.

निधी नेहाला घेऊन तिच्या खोलीतून निघाली तेंव्हा तिथे तोच ओळखीचा आणि आपुलकीचा सुगंध दरवळला. कालपर्यंत जीन्स आणि टी-शर्ट घालणारा सतिश आज कुडता आणि पायजमा घालून उभा होता. सतिशची नजर आपल्याकडे आहे.. हे लक्षात येताच निधीने स्वतःला सावरून घेतलं. 

सतिश चष्म्याच्या पलीकडे असलेल्या डोळ्यांनी निधीला न्याहाळत होता, हे निधीच्या लक्षात आलं होतं.. एकीकडे नेहाच्या लग्नाचे विधी चालू होते.. तिचे सप्तपदीचे फेरे चालू होते.. आणि दुसरीकडे निधी स्वतःच्याच अबोल बंधनाला स्वतःभोवती आसपास फिरताना बघत होती... तिला सारखं वाटत होतं की, सतिश जवळ जावं.. त्याच्याशी बोलावं... त्यांच्यातील ती अबोल भिंत तोडून टाकावी... पण काय बोलायचं? आणि कसं??

नेहाचं लग्नकार्य होऊन ती सासरी जाण्यासाठी तयार होत होती... तेव्हढ्यात निधीला आठवलं की, ती चिठ्ठी.. जी तिने नेहासाठी लिहिली होती आणि गच्चीवर पुस्तकांच्या कपाटात ठेवली होती.. निधी धावत गच्चीवर गेली... तेंव्हा तेच झालं जे निधीने मागच्या वेळी साडी नेसली होती तेंव्हा झालं होतं... तिचा पदर पुन्हा त्याच खिळ्याला अडकला.. न जाणे सतिश कधी लग्नकार्यातून बाजूला होऊन गच्चीवर आला होता... त्याने निधीचा पदर त्या खिळ्यातून काढला आणि कदाचित काहीच न बोलता तो निघूनही गेला असता... तेवढ्यात निधीने कुटून कसा धीर केला आणि सतिशच्या कुडत्याचा एक कोपरा मुठीत घट्ट घरून ठेवला.. सतिशने आश्चर्याने वळून तिच्याकडे पाहिलं.. तिचा छोटासा झालेला चेहरा पाहून सतिशला हसू आलं.. आणि कुडता पकडलेला निधीचा हात आपल्या हातात घेऊन तो म्हणाला .. "मला पण वाटतं की तुझ्याशी लग्न करावं ... पण विचार करतोय की त्याआधी पुस्तकांच्या कपाटासाठी जागा करून घ्यावी ...!!"

सतिशचे शब्द ऐकून निधीला अंगणातील गुलमोहर पुन्हा एकदा बहरल्यासारखं वाटलं...







...अपूर्ण
#SrSatish🎭
   








--
अभिप्राय लिहा 

७ टिप्पण्या: