शुक्रवार, ८ मे, २०२०

चांदण्यात फिरताना ...


टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...




संध्याकाळी साडेचारची वेळ... आकाशात हळू-हळू काळ्या ढगांची छटा दाटून सूर्य अंधारू लागला होता. गॅसवर चहासाठी पाणी ठेवून चहापावडर टाकत समिधाच्या आईने समिधाला हाक मारली...

पुणे विद्यापीठात संस्कृत विषय घेऊन Ph.D करणारी समिधा सहस्त्रबुद्धे नेहमीप्रमाणे कॉलेज आणि क्लास करून दुपारी घरी पोहचली होती. दुपारी थकून भागून घरी आल्यानंतर थकलेल्या शरीरापेक्षा थकलेल्या मनाला आरामाची जास्त गरज असते नाही... फेब्रुवारीच्या मध्याचे दिवस असल्यामुळे हवेतील गारवासुद्धा तिच्या थकलेल्या मनावर थंडगार वाऱ्याची हळुवार फुंकर मारण्यासाठी पुरेसा होता. दोन अडीजच्या सुमारास पलंगावर आडवी पडताच केंव्हा डोळा लागला तिचं तिलाच कळलं नव्हतं.

आईची हाक ऐकण्याआधीच ढगांच्या कडकडाटामुळे समिधाला जाग आली होती. समोरच्या खिडकीतूनच काही क्षणात काळ्या ढगांमुळे अंधारून आलेलं क्षितिज बघत ती पलंगावरच उठून बसली. निसर्गाची सुद्धा अगदी कमाल असते नाही... अर्ध्या तासातसुद्धा संपूर्ण चित्र बदलून जातं. पांढऱ्याशुभ्र असणाऱ्या मोकळ्या आकाशात पावसाचे काळे ढग एकाएकी जमावेत तसंच काहीसं मळभ समिधाच्या मनावरसुद्धा काही दिवसांपासून दाट धुक्याप्रमाणे साचलेलं होतं.

डोळ्यांमध्ये अर्धवट झोप असलेल्या समिधाच्या कानांवर आईचे शब्द पडले, "समिधा.. बाळा... उठ, उठ लवकर, वर जा, कपडे काढ, जा पटकन, पाऊस येईल थोड्या वेळात."

आईच्या गुढगेदुखीच्या त्रासामुळे कपडे वाळत घालणं, छतावरच्या फुलझाडांना पाणी घालणं... ही नित्याची कामं समिधालाच करावी लागत होती. पण अर्धवट झोपेत असलेल्या समिधाला आईचं म्हणणं त्यावेळी ऐकायची इच्छा अजिबात नव्हती.

काळ्याभोर झालेल्या आकाशात आपापल्या घरट्याकडे परत जाणाऱ्या पक्षांचा थवा बघत बसलेल्या समिधाचा छतावर जाऊन कपडे गोळा करण्यामागे स्वतःचा एक स्वार्थ होता. धुतलेल्या कपड्यांमध्ये अर्ध्याहून अधिक कपडे तिचेच होते. पावसामुळे ते पुन्हा भिजले असते तर तिचाच तोटा होता... हाच विचार करून समिधा जड डोळे घेऊन उठली आणि तितक्याच जड अंतःकरणाने तिने खुर्चीत पडलेली ओढणी अंगावर टाकली आणि छतावर गेली..

पाऊस सुरू होण्याआधी वाहणारा थंडगार बोचरा वारा स्वतःसोबत सर्वकाही वाहून घेऊन जाण्याच्या तयारीत होता. छतावर पोहचताच वाऱ्यामुळे उडणारे केस आणि ओढणी कशी - बशी सावरीत समिधा गडबडीतच दोरीवरचे कपडे गोळा करू लागली, पण तेवढ्यातच दुसऱ्या दोरीवरचा बाबांचा त्यांच्या वाढदिवसासाठी घेतलेला गुलाबी चौकटीचा पांढरा शर्ट वाऱ्यासोबत उडून शेजाऱ्यांच्या छतावर जाऊन पडला होता.

समिधाच्या शेजारचं घर गेल्या ७ - ८ महिन्यांपासून बंद होतं. दोन्ही घरांच्या छतामध्ये फक्त तीन - साडेतीन फुटांची भिंत होती. त्या घराचे मालक म्हणजे डॉक्टर पुराणीक, फर्ग्युसन कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयाचे एक सिनियर प्रोफेसर होते. रिटायर झाल्यानंतर घर बंद ठेऊन स्वतःच्या मुलीकडे अमेरीकेत गेले होते.

पावसाच्या काळ्या ढगांच्या छटा हळू हळू गडद होत चालल्या होत्या. पाऊस आला तर बाबांचा नवा शर्ट खराब न व्हावा यासाठी पलीकडे कोणालातरी आवाज द्यावा, असं समिधाला वाटलं, 'पण गेले ७ - ८ महिने बंद असलेल्या घरातून कोण मदतीला येणार?' याची जाणीव होताच त्या तीन - साडेतीन फुटांच्या भिंतीवरून समिधाने पलीकडच्या छतावर उडी मारली. तिथे पडलेला शर्ट उचलून मागे वळताच ती एकदम दचकली आणि ओरडली... तिथेच एका कोपऱ्यात समोरच्या टेबलवर पाय ठेऊन आरामात खुर्चीत पाठ टेकवून कोणीतरी पुस्तक चेहऱ्यावर ठेऊन निवांत झोपला होता...

समिधाचा आवाज ऐकून तो सुद्धा दचकून उठला, दोघे एकमेकांकडे बघत राहिले... दुसऱ्यांच्या छतावर चोरून गेल्याचं कोणाच्यातरी लक्षात आल्याबद्दल लाज वाटून घ्यावी की, ७ - ८ महिने बंद असलेल्या घरी अचानक कोणीतरी नवखा माणूस बघून आश्चर्य व्यक्त करावं... समिधाला काहीच कळत नव्हतं... ती जशी आली तशी पुन्हा भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेली... तेवढ्यात खुर्चीत बसलेल्या त्या व्यक्तीने आवाज दिला...

"आहो मॅडम, हे कोणासाठी सोडून जाताय ?" ...समिधाचाच एक फिकट गुलाबी रंगाचा टॉप दाखवत तो म्हणाला..

समिधाने मागे वळून भिंतीच्या त्या बाजूनेच हात लांब करून झटकन टॉप त्याच्या हातातून खेचून घेतला आणि धावतच खाली उतरली.

समिधाची ती नवीनच राहायला आलेल्या शेजाऱ्यासोबतची पहिलीच भेट होती. जिथे दोघांना एकमेकांचं नावही माहिती नव्हतं... आणि त्याच भेटीनंतर फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीप्रमाणे रोमांचीत करणारे भाव तिच्या गुलाबी गालांवर उमटले होते...

त्या संध्याकाळी समिधा त्या २ - ३ मिनिटांच्या विचित्र भेटीबद्दल सतत विचार करत होती. तीन फूट उंच भिंतीवरून उडी मारून जाताना स्वतःला बघत होती. पुस्तक चेहऱ्यावर ठेऊन निवांत झोपलेल्या त्या व्यक्तीचं अचानक दचकून जागं होणं तिला सतत दिसत होतं. त्या सगळ्या विचारांमधून थोडं सावरून स्वतःला आरशात बघताना ती स्वतःशीच बोलत होती...

"नाही, नाही! इतकी पण वाईट दिसत नव्हते मी... मग काय झालं जर लाल रंगाच्या कुडत्यावर पिवळ्या रंगाची ओढणी घेतली तर... मग काय झालं झोपेतून उठून घाईने छतावर गेल्यामुळे विस्कटलेले केस चेहऱ्यावर अस्ताव्यस्त पसरले होते तर... म्हणून काय झालं की, एका पायात माझी तर दुसऱ्या पायात आईची चप्पल घातली होती तर".. कदाचित समिधा स्वतःलाच समजविण्याचा केविलवाणा प्रयन्त करत होती.

"तसही मुलं थोडी बावळटच असतात, त्यांना कुठे लक्षात येणार की, कोणत्या रंगाच्या कुडत्यावर कोणती ओढणी चांगली दिसले"... आरशा समोर उभं राहून समिधा स्वतःशीच बोलत होती.

हळू - हळू समिधा छतावरील त्या विचित्र भेटीबद्दल विसरण्याचा प्रयत्न करत होती. पण फेब्रुवारी महिन्यातील थंडगार वाऱ्यासोबत पडणारं कोवळं ऊन त्या थंडीमध्ये एक वेगळ्या उबदार मायेचा आभास करून देत होतं. त्यातूनच समिधाच्या मनात एका वेगळ्या ऋतूचा वर्षाव सुरु झाला होता.

समिधा आता परीक्षेच्या तयारीला लागली होती. संध्याकाच्या वेळी मावळत्या सूर्य किरणांच्या छायेत थोडा वेळ घालवला तर संबंध दिवसभराची थकावट काही क्षणात निघून जायची म्हणून ती संध्याकाळी छतावर जाऊन तिच्या छोट्या कुंड्यांमधील फुलझाडांशी गप्पा मारायची.. त्यातूनच कधी कधी शेजारच्या छतावर असलेल्या नवीन शेजाऱ्याशी नजरानजर होताच तिच्या गुलाबी गालांवरची लाली अजूनच गडद होऊन जायची.

आश्चर्य तर तेव्हा होते, जेव्हा समिधाच्या घरामध्ये नवीन राहायला आलेल्या त्या शेजाऱ्याबद्दल काही चर्चासुद्धा नव्हती. काय माहिती कित्येक महिने बंद असलेल्या त्या घरामध्ये नवीन कोणीतरी रहायला आले आहे याबद्दल त्यांच्या संपूर्ण कॉलनीत कोणाला माहिती होती नव्हती.. कोणाला काहीच कल्पना नव्हती. एक वेळ पार्किंगवरून भांडणं झाली असती तर, लक्षातही आलं असतं. पण, त्यांच्या गेटसमोर असलेल्या गुलमोहराच्या झाडाखाली समिधाची गाडी नेहमीप्रमाणे आरामात पार्क होत होती... आणि तो बिना गाडीवाला नवीन शेजारी समिधाच्या गाडीमागे दुर्लक्षितच राहत होतो.. तो शेजारी कोणाच्या लक्षात आला असेल नसेल, पण समिधाच्या नकळतच ती मात्र त्याच्या नजरेत आली होती हे समिधाला जाणवत होतं..

एका संध्याकाळी समिधा छतावर जाऊन फुलझाडांच्या कुंड्यांमधील कोमेजलेली फुलं बाजूला काढत असताना पलीकडच्या छतावरून तिच्या कानावर आवाज आला... समिधाने मागे वळून बघितलं... 

जवळपास सहा फुटांची उंची, थोडासा सावळा रंग, एखाद्या राजकुमाराप्रमाणे तेजस्वी चेहरा, अंगात गळ्याभोवती कॉलर असलेला पांढऱ्या रंगाचा टि-शर्ट, कमरेवर Casual Jeans आणि डोळ्यांवर बारीक काड्यांचा चश्मा....

"ऐकता का ? तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुळशीचे रोप आहे का ? थोडी तुळशीची पानं हवी होती मला.. काढा करायचा आहे, थोडं बरं वाटत नाहीय.." समिधाच्या कुंड्यांमधील कोमेजलेल्या फुलांपेक्षाही कोमेजलेल्या आवाजात तो शेजारी बोलला.

समिधाने काहीच न बोलता तुळशीची काही पानं एका कागदावर घेतली आणि त्याच्याकडे दिली..

"मी सारंग... सारंग सरनोबत.. कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधून फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही दिवसांसाठी आलो आहे, इथल्या मुलांना Creative Writing शिकवण्यासाठी." ...तुळशीच्या पानांकडे बघतच सारंग समिधाशी त्याच हलक्या आवाजात बोलत होता..

"या घराचे मालक फर्ग्युसन कॉलेजमधील कोणीतरी सिनियर प्रोफेसर होते म्हणे, ते आता इथे रहात नाहीत, म्हणून कॉलेजच्या ट्रस्टीने माझी सोय काही दिवसांसाठी इथेच केली आहे.."

एवढं बोलून सारंग तुळशीची पानं घेऊन वळणारच होता, तेवढ्यात समिधा म्हणाली.. "ती पानं द्या माझ्याकडे, मीच देते काढा करून.."

अनोळखी शेजाऱ्या सोबतची छतावरील ती पहिली भेट, त्यानंतर काढ्याच्या निमित्ताने झालेली ओळख.. हीच कारणं त्यांच्या मैत्रीच्या नात्याला सुरुवात करून देणारी होती.. समिधाच्या घरी तिच्या आई-बाबांना तर त्यांच्या या नवीन मैत्रीबद्दल काही कल्पनाही नव्हती. छताच्या त्या तीन साडेतीन फुटांच्या भिंतीच्या आरपार बहरू लागलेली मैत्री आता मिळून मिसळून राहण्याच्या परंपरेला सोबत घेऊन तुळशीच्या काढ्यापासून ते चहापर्यंत आणि पुस्तकांपासून ते पुढे जाऊन मनातल्या गोष्टी एकमेकांसोबत Share करण्यापर्यंत वाढली होती...

आता कॉलेजमधून परतल्यानंतर काही वेळासाठी का असेना पण समिधा छतावर एक चक्कर मारून नक्कीच यायची. वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी आणि कुंडीतील झाडांना पाणी देण्यासाठी फार - फार तर पंधरा मिनिटं पुरेशी असायची... पण आता मात्र ती पंधरा मिनिटं दूर क्षितीजाच्या पलीकडे पक्षी आपल्या घरट्याकडे परतू लागली तरीसुद्धा पूर्ण होत नव्हती. सारंग जेव्हा जेंव्हा समिधासमोर यायचा तेव्हा नव्याने त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व समिधासमोर उलघडायचे. त्याच्याशी बोलताना देश - विदेशातील चर्चा व्हायच्या.. पुस्तकांपासून चित्रपटांपर्यंत सर्व काही गोष्टी Share केल्या जायच्या.. राजकारण, अर्थकारण, धर्म, मैत्री या सगळ्यांसोबत त्याच्याशी बोलताना एक वेगळा आत्मविश्वास समिधामध्ये निर्माण होत होता.

समिधाच्या मनामध्ये असलेला दुबळेपणाचा भाव तिच्याकडे असलेला एक न्यूनगंड सारंगसोबत बोलताना आता कुठेतरी कमी व्हायला लागला होता. पौर्णिमेच्या रात्रीच्या चंद्राप्रमाणे समिधाच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज झळाळू लागलं होतं.

काही दिवसांपासून समिधाचं छतावर जास्त वेळ घालवणं आता तिच्या आईच्या ध्यानात येऊ लागलं होतं. ती कधी कधी चिडूनच समिधाशी बोलत होती.. "हल्ली तुला इतका वेळ का बरं लागतोय दोरीवरचे कपडे काढायला आणि झाडांना पाणी द्यायला ?"

समिधा आईचा विषय टाळण्यासाठी म्हणून इकडच्या तिकडच्या गोष्टी करून वेळ मारून न्यायची...

"आई आता नव्यानं बहरलेल्या फुलांसोबत गप्पा मारायला छान वाटतं, रातराणीची फुलं दिवस मावळू लागला की बहरू लागतात आणि त्यांचाच सुगंध मला तिथेच थांबवून ठेवतो. निरनिराळ्या रंगांच्या गुलाबाच्या फुलांचा सुवास दरवळायला लागला की, त्यांचा सुगंध घेण्यासाठी आकाशात चंद्र - चांदण्या वेळेआधीच चमकायला लागतात आणि माझ्याशी गप्पा मारत आहेत असं वाटतं.. तिकडे मोगरा सुद्धा त्याचा सुगंध सृष्टीमध्ये पसरवायला मीच कारणीभूत आहे असं मला सांगतोय असं वाटतं... त्यांचं सगळं ऐकून घेत असताना त्या गप्पा मध्येच सोडून जाणं बरं दिसतं का आई.."

समिधा फुलांच्या गोष्टी करून वेळ मारून नेत होती. खरं तर ती कुठे सांगू शकत होती की, नव्यानं उमलणारी फुलं छतावरच्या कुंड्यांमध्ये नसून तिच्या हृदयात उमलत आहेत.

समिधा आता तिच्या वेगळ्याच विश्वात गुंतून राहायची. ती आता निराळ्याच मार्गाने चालू लागली होती. सारंगच्या प्रेमात पडणं आणि एखाद्या काळ्याकुट्ट गुहेमध्ये सोनेरी सूर्यकिरण शोधणं तिच्यासाठी एकसारख्याच अशक्य गोष्टी होत्या.. तिला थोडी जरी जाणीव असती तर तिने स्वतःला सावरलं असतं... तिने स्वतःला समजावलं असतं की, अनोळखी मार्गाने प्रवास करताना गाडीमध्ये एकाच बाकड्यावर बसलेले दोन प्रवासी एकमेकांसोबत फक्त ते बाकडं आपापसात वाटू शकत होते, आपल्या आयुष्यातील क्षण नाही. तिला ती जाणीव असती तर तिने विचार केला असता.. एका अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणं हे कितपत योग्य अयोग्य.. पण ती जर सावध असती तर ती प्रेमातच का बरं पडली असती..

एक दिवस समिधा संध्याकाळी झाडांना पाणी देण्यासाठी म्हणून छतावर येऊन वेळ काढत होती. पावणेपच वाजेपर्यंत सारंग छतावर यायचा आणि सोबत त्याच्या हातचा चहा सुद्धा समिधाला मिळायचा. पण, त्यादिवशी मात्र पाच वाजले.. साडेपाच वाजले.. पण सारंग छतावर आला नव्हता. खालून आई समिधाच्या मोबाईलवर सारखा फोन करत होती... तिचं म्हणणं होतं की, 'बराच वेळ झाला आता ये खाली..' पावणेसहा वाजता समिधा निराश होऊन पलीकडे एक नजर टाकून जायला निघाली... तेवढ्यातच सारंग येताना दिसला.

तिला वाटत होतं की, सारंग उशिरा आल्याबद्दल त्याच्यावर तिनं चिडावं.. रागवावं.. त्याच्याशी भांडावं.. पण त्यांच्यामध्ये असं कोणतच नातं नव्हतं की ज्याच्या आधारे ती त्याबद्दल सारंगशी हक्काने बोलू शकेल. तरीसुद्धा समिधाचं सारंग विषयी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी यासारख्या काही अबोल शब्दांनी तिच्याच छतावर तिला बांधून ठेवलं होतं... जसं की रेशीम किडा स्वतःच्याच रेशमी कोशामध्ये स्वतःला अडकवून घेतो..

सारंग छतावर येताच पलीकडून समिधाला बघून छान हसत होता. समिधानेसुद्धा स्वतःला सावरत त्याला 'हॅलो' म्हटलं..

"झाली का पुस्तकं वाचून ?" सारंगने अगदी आपुलकीने प्रश्न केला...

"नाही, एक पुस्तक थोडं वाचायचं राहिलंय"... समिधाने हलक्या आवाजात उत्तर दिलं. सारंगवरचा खोटा राग तिच्या त्या आवाजात स्पष्ट दिसत होता..

"देते एक दोन दिवसात.." ... समिधा म्हणाली.

"हो लवकर दे, कॉलेजच्या लायब्ररीची आहेत ना, जायच्या आधी परत करावी लागतील."... सारंग म्हणाला.

"सुट्टीवर जाताय का ?"... समिधाने विचारलं..

"नाही.. परत चाललोय कोल्हापूरला... पुढच्या आठवड्यात Deputation संपतंय माझं." ...सारंग म्हणाला.

समिधाला वाटलं की, तिच्या नकळतच तीने मांडलेला भातुकलीचा खेळ कोणीतरी येऊन उधळून टाकला आहे... ती पूर्ण विसरून गेली होती की, काही दिवसांसाठी आलेला हा शेजारी कधी ना कधीतरी निघून जाईल, तेही इतक्या लवकर..?

"तुम्ही निघून जाणार ?"... समिधाच्या डोळ्यांमधील ओलावा तिच्या शब्दांमध्ये स्पष्ट दिसत होता.

"हो, जावं तर लागेल, तू फेसबूकवर आहेस ना ? मी आजच Request पाठवतो." ...सारंग म्हणाला.

समिधाचा फोन पुन्हा वाजला. आईने पुन्हा एकदा मिसकॉल दिला होता.. समिधाला सारंग सोबत खूप काही बोलायचं होतं. मनातल्या भावना त्याच्यासमोर व्यक्त करायच्या होत्या पण त्यांच्यामध्ये असं कोणतच नातं नव्हतं की ज्याचा आधार घेऊन ती सारंग सोबत बोलली असती. कोणतच नातं नसताना ती तिच्या नजरेतील भाव कसे दाखवू शकली असती.. ती डोळ्यांतील ओलावा चेहऱ्यावर न दाखवताच तशीच निघून गेली. आईच्या मिसकॅलने तिला कदाचित वास्तवाची जाणीव करून दिली होती.

समिधा आता तिच्या Ph.D च्या अभ्यासासाठी थोडी गंभीर झाली होती. सकाळचा बराचसा वेळ क्लास आणि अभ्यासात निघून जायचा. संध्याकाळचा वेळ स्वतःच्या करियर आणि भविष्याबद्दल विचार करत काहीतरी बनून दाखवीण्याची जिद्ध ठेऊन ती अभ्यासात मन रमवायची. खरं तर समिधाला ते प्रेम विसरून जायचं होतं जे की प्रेम वगैरे काही नव्हतच.. तिच्यापेक्षा साधारण ६ - ७ वर्षे मोठ्या असलेल्या सारंगसोबत प्रेमाचं नातं जोडण्यासाठी तिच्याकडे ठोस असं कोणतच कारण नव्हतं.. त्या बाबतीत विचार करताना तिचं स्वतःचं मन सुद्धा तिच्या विरोधात तिच्या समोर उभं रहायचं.. त्याच प्रयत्नात ती स्वतःला अभ्यासात गुंतवून घ्यायची... त्यासाठी पुस्तकं तर समोर घेऊन बसायची पण तीच मन मात्र सारंगचाच विचार करण्यात गुंतून राहायचं...

छतावर झालेल्या त्या अनोळखी भेटीनंतर समिधा स्वतःला सारंगच्या अगदी जवळ बघत होती.. तिला यापूर्वी कधीच कोणाबद्दल इतका जिव्हाळा आपुकी वाटली नव्हती...

तिला ठाऊक होतं की, सारंग एक नाटकामधील पाहुणा कलाकार आहे, जो काही क्षणातच कायमचा रंगमंच सोडून निघून जाणार आहे.. तरीसुद्धा समिधा सारंगच्या त्या भूमिकेकडे तिच्या स्वतःच्या आयुष्यातील नायकाच्या भूमिकेत बघत होती. तिला कधी कधी वाटायचं की, सारंगसमोर आपलं प्रेम व्यक्त करावं.. सगळं त्याला सांगून मोकळं व्हावं, ती सारंगसोबत स्वतःच्या भावी आयुष्याची स्वप्नं बघता बघता भानावर यायची आणि तिला जाणीव व्हायची की, ती समिधा आहे, समिधा सहस्त्रबुद्धे आणि तो सारंग, सारंग सरनोबत... दोन अडीजशे किलोमीटर दूर राहणारा... जो कित्येक शहरांमध्ये कित्येक कॉलेजमध्ये Deputation साठी जात असणार... आणि माहित नाही कोणकोणत्या शहरात कितीशा समिधासारख्या शेजारण्या सारंगच्या प्रेमात पडत असतील..

समिधाने त्याबद्दल Google Search केलं होतं. सारंग सरनोबत नावाचा एक प्रोफेसर कित्येक देशांमध्ये - शहरांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजमध्ये Creative Writing शिकविणारी एक निराळीच व्यक्ती होती... याउलट समिधा तर Creative Writing च्या नावाखाली एखादं Creative Love Letter पण ती लिहू शकत नव्हती.

सारंग इथून गेल्यानांत त्या दोघांच्या वाटा एकमेकांना पुन्हा कधी काटकोनात छेदतील... ते दोघे पुन्हा कधी कुठे कसे एकमेकांना भेटतील याची काहीच शक्यता समिधाला दिसत नव्हती. तिचं पहिलं प्रेम सुरु होण्याआधीच संपणार होतं... पण एका छोट्याशा घटनेने तिचं न होऊ शकलेलं प्रेम तिच्या हृदयात अनादी काळापर्यंत अमर होऊन गेलं..

समिधाने आता छतावर जाणं खूप कमी केलं होतं, कपडे सुकत घालण्यासाठी तिने समोर अंगणातच दोरी बंधन घेतली होती... आई जेंव्हा छतावर कपडे सुकत घालण्यासाठी सांगायची तेंव्हा समिधा म्हणायची की, "उन्हाळ्यात तर कपडे कुठेही सुकतात ना आई.. छतावरच कशाला टाकायला हवेत ?"

एक दिवस तर समिधा छतावरच्या सर्व झाडांच्या कुंड्या छतावरून खाली अंगणात घेऊन आली होती... तसही उन्हाळ्यातील प्रखर उन्हाच्या झळा कुंड्यांमधील फुला पानांना आता उमळून टाकत होत्या... सारंगच्या नुसत्या विचारानेच समिधा कुंड्यांमधील फुलांपेक्षाही जास्त कोमेजून गेली होती. छतावर न जाण्याचं कोणतही कारण आता तिला चालणार होतं. छतावर जाऊन सुद्धा तिला काय बघायला मिळणार होत.. कुंड्यामधून सांडलेली लाल काळी माती... कोमेजलेली फुलं आणि सुरु होण्याआधीच तुटलेल्याप्रेमाच्या आठविणी?

एक दिवस क्लास वरून येऊन समिधा मोबाईल चार्जिंगला लावत होती.. तेव्हड्यात तिच्या आईने तिच्या हातात एक बंद पाकीट ठेवलं...

"शेजारचा सतिश आला होता, सांगत होता की, 'कुरियर वाल्याने चुकून ह्या पार्सलची डिलिव्हरी त्यांच्याकडे केली होती..' पत्ता तर बरोबर आहे.. तू काही ऑर्डर केलं होतं का ?"... आईने विचारलं...

समिधाने फक्त "हो" म्हणून मान हलवली, आणि आईच्या हातातील ते पाकीट घेतलं.. पाकिटावर सारंगच्या हस्ताक्षरात पत्ता लिहिला होता. ब्रेल लिपी वाचावी तशी समिधा ते हस्ताक्षर डोळे बंद करून सुद्धा वाचू शकत होती...

"कुरियर फक्त निमित्त होतं.. सारंगने नक्कीच माझ्यासाठी......."

काहीतरी विचार तिच्या मनात येताच पाकीट अर्धवट उघडून तिने तसंच टेबलवर ठेवलं, आणि आईची किचनमध्ये जाण्याची वाट बघू लागली..

समिधासाठी जेवणाचं ताट करून देण्यासाठी आई किचनमध्ये गेली..

"कदाचीत माझ्यासाठी सारंगने एखादी चिट्ठी लिहिली असावी." ...असा विचार करत समिधाने पाकीट उघडलं.. तर त्यात चिट्ठीच होती.. सारंगने समिधासाठी लिहिलेली.. तिने बाथरूममध्ये जाऊन वाचली होती ती चिट्ठी...

"समिधा, तुला आपली छतावरील पहिली भेट आठवतेय का ? त्याच पहिल्या भेटीला मी सर्वकाही विसरून तुझ्या प्रेमात पडलो होतो. मी जेव्हढं तुला आजपर्यंत ओळखलंय त्यावरून एक अनोखं नातं तयार झालं होतं आपल्यामध्ये... पण काही नातीच अशी असतात की, त्यांचं आयुष्य हे तुझ्या कुंड्यांमधील फुलांपेक्षाही कमी काळ टिकणारं असतं.. ही नाती जितकी लहान असतात तितकीच ती सुंदर, निरागस असतात... या अशा नात्यांना कोणतंच नाव नाही देता येत... आणि मला याचीही कल्पना आहे की तू नकळत का होईना पण प्रेमात पडली होतीस... पण आपलं हे नातं पुढे घेऊन जाऊन तुझं भविष्य अंधारात नव्हतं टाकायचं मला..."

समिधा अगदी शून्य नजरेने बाथरूमच्या वॉशबेसिन जवळ उभी राहून चिट्ठी वाचत होती.. त्या चिठ्ठीमधील प्रत्येक शब्दासोबत ती स्वतःला सारंगपासून वेगळी होत असल्याचं तिला जाणवत होतं...

"समिधा... आजपर्यंत मी तुला बोललो नव्हतो. पण आता मात्र नाही बोललो तर माझं मन शेवटपर्यंत मला खात राहील... समिधा... मला Pancreatic Cancer आहे... जो आता कधीही बरा न होणारा.."

समिधाच्या पायाखालची जमीनच सरकली... तिच्या काळजाची धडधड काही काळ थांबल्यासारखं तिला वाटलं... चिठ्ठी वाचताना तिच्या डोळ्यांमधील आसवं चिट्ठीवर पडल्यामुळे चिठ्ठीतील काही अक्षरं मिटू लागली होती...

"नेहमी आनंदी रहा... रातराणी आणि गुलाब मोगऱ्याच्या झाडांना पाणी घालत रहा.. कोण जाणे, कोण कुठला अनोखा अनोळखी व्यक्ती त्याच फुलांच्या सुगंधाला स्वतःचं अस्थित्व समजून जीवनाचा अर्थ शोधत जगत असावा... कोण जाणे त्याच फुलांचा सुगंध घेण्यासाठी त्या सगळ्या चंद्र चांदण्या त्यांचं स्वतःचं अस्थित्व बाजूला ठेऊन तुझ्याच अंगणात एकत्र जमा होतील. तुझी Ph.D पूर्ण कर... तुझ्या नावापुढे  "डॉक्टर " लागलेलं मला पहायला आवडलं असतं ... पण....."
-सारंग

सारंगने शेवटी "पण" शब्द लिहून ती चिठ्ठी अर्धवटच ठेवली होती... "तहानलेल्याला पाणी मिळू नये, हा तर नियतीचा लाडका खेळ.." त्याला कोण काय करणार? कदाचीत समिधाचं डॉक्टर झालेलं सारंगने बघणं नियतीला मान्यच नसावं...

समिधा वॉशबेसिन जवळ कितीतरी वेळ उभी राहून बंद मुठीत चिठ्ठी घेऊन रडत उभी होती... तिने त्या पहिल्या आणि शेवटच्या Love Letter ला एका मगमध्ये पाणी घेऊन तोपर्यंत बुडवून ठेवलं होतं जोपर्यंत त्या पात्रातील शाही पाण्यात पूर्ण विरघळून जात नाही.. कागदावर उमटलेली मोत्यासारखी अक्षरं समिधाच्या मनावर आणि हृदयावर जशीच्या तशी केंव्हाच छापली होती.. मग त्या निर्जीव कागदाची तरी तिला काय गरज होती...

आईने दोन वेळा दरवाजा ठोकल्यानंतर आपल्या बंद मुठीत त्या पहिल्या Love Letter चे निर्जीव अवशेष घेऊन समिधा सुजलेल्या डोळ्यांमधील स्वप्नं त्याच मगमध्ये पत्रावरील अक्षरांसोबत विसर्जित करून बाथरूमच्या बाहेर आली...


समिधाला आता तिच्या छतावर तिच्या कुंड्यांमधील फुलांचा सुगंध घेण्यासाठी एकत्र जमा होणाऱ्या चंद्र चांदण्या कधीच दिसणार नव्हत्या... सारंग गेल्यानंतर तिच्या दारातील गुलमोहर कधी बहरलाच नाही...


...अपूर्ण

#SrSatish🎭