असं म्हणत वरच्या मजल्यावरची माधवी ताई परवा सकाळी सकाळी अचानक घाबरीघूबरी होऊन आमच्याकडे आली..
आई स्वयंपाक घरातून चहाचे कप घेऊन बाहेर आली..
"काय ग माधवी? ये ना, चहा घेऊ या.."
"चहा नको काकू, आधी माझं ऐका!"
माधवी ताई भेदरलेल्या आवाजात आईशी बोलू लागली..
"४-५ दिवस विचार करतेय कसं सांगू तुम्हाला! तेच कळत नव्हतं, शेवटी आज धीर करून आलेच.."
असं म्हणत चहा नको म्हणणाऱ्या माधावी ताईने, आईने माझ्यासाठी म्हणून आणलेला चहाचा कप (ज्यात दूध जास्त असतं) उचलला.. तेंव्हा आईने मला डोळ्यांनीच खुणावले.. "तुला दुसरा चहा देते.."
"आहो त्या समोरच्या बिल्डींग मधून रोज रात्री कोणीतरी आमच्या घरावर पाळत ठेवून असतं हो!"
ज्यांच्या ज्यांच्या कानांवर माधवी ताईचे शब्द पडले त्यांनी एकदम प्रतिक्रिया दिली..
"काय..?" 😳😳
तिकडे टीव्हीमध्ये रामायणात लक्षणाने सुद्धा "काय..??" म्हटल्याचं मला ऐकू आल्यासारखं वाटलं..
चहा वगैरे सगळं बाजूला ठेवून आई म्हणाली, "बस इथे शांतपणे.. आणि सांग नेमकं काय झालं?" आईला सुद्धा काय बोलावं काय करावं काही सुचत नव्हतं.
खाली बसताच प्लेटमधून एकदम दोन बिस्किटं उचलून माधवी ताई सविस्तर सांगू लागली..
"आहो, रोज रात्री किचन आवरून साधारण १० च्या सुमारास मी माझ्या खोलीत जाते तेव्हा समोरच्या त्या घरातून एक माणूस आमच्या घराकडे बघत उभा असतो."
आई एकदम धीरगंभीर होऊन तिचं बोलणं ऐकून घेत होती...
"रात्रभर त्याचा पहारा सुरुच असतो, आणि सकाळ झाली की गायब! मला खूप टेन्शन आलंय हो."
आणखीन दोन बिस्कीटं उचलत माधवी म्हणाली..
"हे गेलेत टूरवर. मी एकटीच आहे सध्या घरी, काहीच सुचत नाहीये मला."
साहजिकच माधवी ताईचं त्या परीस्थितीत हतबल होणं स्वाभावीक होतं.
"बाप रे! आता काय करायचं?"
आईपण फुल्ल टेन्शनच्या सिनमध्ये गेली.. म्हणजे एखाद्या नाटकात एखादं पात्र संवाद विसारल्यावर सोबतच्या सह पत्राला यावं तसं टेन्शन..
त्याच क्षणी तिथेच मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेल्या मला जसं, आर्किमिडीजला पाण्याच्या टबमध्ये पडताच काहीतरी साक्षात्कार झाला आणि तो "युरेक्का युरेक्का" म्हणत धावत सुटला, तसा ACP प्रद्युम्न चा साक्षात्कार झाला..
"आई, माधवी ताई, डोन्ट वरी, I'm only here, you don't be fear! नो टेन्शन, मी बघतो काय ते.." ... असं काहीतरी इंग्लिश आणि मराठीचं लोणचं घालत अगदी confidence मध्ये म्हणालो, आणि लहानगा शिवबा जसा एखाद्या मोहिमेवर जाण्यासाठी जिजाऊंकडे परवानगी मागतोय त्या थाटात आई आणि माधवी ताईसमोर उभा राहिलो..
'लहानसं झुरळ जरी समोर आलं तरी घरभर नाचणाऱ्याचा पण काय तो Confidence!' .. असे काहीतरी माझ्यासाठी कौतुकास्पद शब्द डोळ्यांत ठेऊन आईने माझ्याकडे एक नजर टाकली..
एखाद्या युद्धाला निघालेल्या सैनिकाच्या थाटात मी शेजारच्या केतकीला हाक मारली..
केतकी म्हणजे आमच्या शेजारच्या प्रभू काकांची मुलगी.. प्रभू काका स्वतः सैन्य दलात कुठल्याशा गुप्तहेर खात्यात होते.. ल्यामुळे केतकीला पण खूप हौस डिटेक्टीव्हगीरी वगैरे करायची..
अत्यंत गुप्त आणि गहन अशा चर्चेअंती आमचा मास्टर प्लॅन ठरला. योगायोग असा की केतकीची संगीत क्लासमधील एक मैत्रीण 'सई' त्याच समोरच्या बिल्डिंगमध्ये रहात होती.. तिची मदत घ्यायचं ठरलं..
मी आणि केतकी सईकडे गेलो, तिला विश्वासात घेतलं. तसं सईनेसुद्धा सहकार्य करायचं ठवरलं..
मधवीच्या मते तिच्यावर पाळक ठेवणाऱ्याच्या त्या घरात पाठक आजी आजोबा राहत असल्याचं सईकडून कळलं..
ठरल्या प्लॅनमध्ये थोडी फेरफार केली आणि, 'सईच्या DTH Dish चा काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे आणि पाठक आजींच्या बाल्कनीतून Dish सहज सापडते, तेच बघायचं आहे..' असा काहीतरी प्लॅन ठरला..
आम्ही तिघेही आजींकडे गेलो. केतकी आणि सई छान मैत्रिणी असल्यामुळे सईकडे केतकीचं येणं-जाणं असल्यामुळे केतकीची तोंडओळख पाठक आजींना होतीच.. सईने माझी ओळख, "हा केतकीचा भाऊ सतिश.. Engineer आहे!" अशी करून दिली..
"हो का .. छान, छान!" आजींनी कौतुकानं माझ्याकडे पाहिलं.
"सकाळपासून आमचा TV बंद आहे हो आजी, Dish चा काहीतरी प्रॉब्लेम झालाय वाटतं.."
सई अगदी कॉन्फिडन्सने सगळं सांगू लागली..
"तुमच्या बाल्कनीतून आमची Dish सहज हाताला सापडते ना म्हणून सतिशला बोलावून घेतलं, त्याला काहीतरी कळेल म्हणून.."
"आमच्या घरची पण सगळी दुरुस्तीची कामं हाच करतो".. केतकीने उगाच आपली माझ्या कौतुकाची एक पुडी आजींसमोर सोडली..
तास मी ही थोडा फुललो.. सगळ्या प्लॅनचा विचार डोक्यात ठेऊन सोफ्यावर अंग चोरून बसलेला मी थोडा रिलॅक्स झालो, आणि पाय लांब सोडून हाताची घडी घालत म्हणालो..
"हो ना, मला सगळं येतं.."
तेवढ्यात केतकीने माझ्या खांद्यावर हात ठेवत माझ्या बोलण्याला दुजोरा दिला..
"हो तर, सगळं सगळं येतं हो ह्याला.."
केतकी आणि सई दोघीही हसू लागल्या..
तेवढ्यात आजी मला काहीतरी विचारणार हे सईच्या ध्यानात येताच सईने इष्ट नंबर फिरवत मुख्य विषयाकडे लक्ष वेधलं, आणि पुन्हा Dish चा विषय रुळावर आला..
तसं केतकीने आजींना बोलण्यात गुंतवून ठेवलं, सई आणि मी Dish बघण्याच्या निमित्ताने बाल्कनीकडे निघालो.. आजींची नजर चुकवून त्या रूमकडे वळलो जिथल्या खिडकीतुन माधवी ताईवर रोज रात्री कोणीतरी पाळक ठेऊन असतं..
थोड्या वेळाने ती कामगिरी फत्ते करून आम्ही तिघेही निघालो, आणि थेट आमच्या घरी आलो.. घरी येताच आमच्या चेहऱ्यावर मोहीम फत्ते केल्याचा आनंद आईला स्पष्ट दिसला, आणि ती विजय तिलक वगैरे लावण्याच्या आविर्भावात विचारू लागली,
"काय झालं रे? कोण होत तिथे ?"
"आधी माधवी ताईला बोलाव, तिच्यासमोर सगळा उलघडा करतो" मी सोफ्यासमोच्या टीपॉयवर दोन्ही पाय ठेवत म्हणालो..
आईने पटकन माधवी ताईला फोन केला, तशी पुढच्या क्षणी ती घरी आली..
पाठक आजींच्या त्या खोलीत त्यांच्या नातीचं चार-साडेचार फुटांचं Teddy तिथेच आजींच्या पलंगाच्या शेजारी उभं असलेलं दिसलं.. त्यांच्या खोलीत असलेल्या मोठ्या खिडकीच्या असलेल्या पारदर्शक काचा आणि लहानशी हवेची झुळूक सुद्धा ज्यांना चंद्र चांदण्यांना स्पर्श करण्यासाठी अवकाश झेप घ्यायला लावतील असे पांढरेशुभ्र पडदे.. पाहून आणि माधवी ताईने वर्णन केलेली आभासी दृश्य यांचा परस्पर संबंध माझ्या नजरेतून सुटला नाही..
माझी शंका मी सईकडे बोलून दाखवली, आणि तिने पाठक आजींना त्याबद्दल विचारून सर्व चौकशी करून खात्री करून घेतली..
माधवी ताई सर्व हकीकत ऐकायला उत्सुक होती..
"अगं ताई, तुला जो कोणी तुझ्यावर पाळक ठेवतोय असं वाटतं ना, तर तसं काही नाही, त्या खोलीत पाठक आजी असतात.. आणि त्यांच्या खोलीच्या खिडक्या फार मोठ्या आहेत त्यावर पारदर्शक काचा आणि पांढरेशुभ्र पडदे पण आहेत .."
आई आणि माधवी ताई सगळं उत्सुकतेने ऐकत होती..
"पाठक आजींचं वय झालंय, त्या रात्री १० च्या सुमारास झोपी जातात, त्यावेळी खिडक्या बंद करून पडदे ओढतात, पण पंख्याच्या वाऱ्यामूळे ते पडदे हलत राहतात म्हणून त्यांच्या नातीचा एक teddy खिडकीला टेकवून उभा करतात.. खोलीच्या मंद दिव्याच्या प्रकाशामुळे पलीकडून त्याची फक्त सावली दिसते, जी कोणीतरी खिडकीपाशी उभं असल्याचं आभास निर्माण करते.."
पाठक आजींनी सांगितलेली वस्तुस्थिती माधवी ताई आणि आईला सांगितली आणि दोघीही खळाळून हसल्या..
"अस्संय होय!!" 🤗🤭
माधवी ताईचा चेहरा एकदम खुलला. तिच्या घरावर पाळत ठेवणाऱ्या "व्हरच्युअल माणसाची" केस निकाली काढल्यामुळे आम्ही तिघेही CID टीम म्हणवून घेत संबंध कॉलनीत मिरवत होतो..



