शनिवार, २३ मे, २०२०

ताज महाल ..

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

फेब्रुवारी २००७


संध्याकाळच्या वेळी सूर्य आपली नेहमीची ड्युटी संपवून अस्थाला जाण्याच्या तयारीत होता तेंव्हा आपल्या घराच्या दारात येऊन सोहम बाहेर बघत होता... तो दरवाजा उघडून बाहेर जायचा... चहू बाजूला नजर टाकायचा... आणि पुन्हा उदास मानाने घरात जायचा... 

आग्र्याच्या 'हजरत अली' परिसरात राहणार १३ वर्षांचा सोहम म्हणजेच सोनू आपला भाऊ आणि वडिलांसोबत रहात होता... सोनूचा भाऊ मधुकर दिवसातील ८ - १० तास अशा ठिकाणी घालवतो... जिथे शेकडो मैल प्रवास करून आलेले लोक लांबच लांब रांगेत उभे राहून एका मोठ्या गेट मधून आत जाऊन काही वेळ तिथे घालवतात... फोटो काढतात... आणि पुन्हा निघून जातात आपापल्या घरी... 

निदान मधुकरसाठी तरी ताजमहालची हीच व्याख्या होती... ताजमहालच्या परिसरात मधुकर एक Security Guard ची नोकरी करतो... तिकडेच सोनूसुद्धा त्या परिसरातील एका सरकारी शाळेत ८ वित शिकतो...

असं म्हणतात की, सोनूच्या पाच सहा पिढ्यांआधीचे पूर्वज ताजमहाल बांधणाऱ्या शिल्पकारांमधील एक शिल्पकार होते.. त्यांच्याकडूनच त्यांची संगमरवरी दगड कोरण्याची कला वारसा हक्काने सोनूच्या वडिलांकडे आली होती... सोनू आणि त्याचे वडील ताजमहाल परिसरात लहान लहान संगमरवरी दगडांवर त्यांची कला कोरून लहान लहान ताजमहाल तयार करून येणाऱ्या पर्यटकांना विकायचे... पण दोघे भाऊ वडिलांच्या या कामात त्यांचा साथ देत नव्हते... बारावीत एक विषय राहिल्यानंतर मधुकरने शिक्षण सोडून Security Guard ची नोकरी धरली... आणि सोनूला तर शाहजहानच्या खऱ्या ताजमहालमध्ये काही स्वारस्य होतं.. ना त्याच्या वडिलांच्या लहान लहान ताजमहालमध्ये... प्रेमाच्या या प्रतिकापेक्षा सोनूला त्याच्या खऱ्या खुऱ्या प्रेमातच काय ते स्वारस्य होतं...

तेच प्रेम जे सोनूला बालपण संपताच आणि तारुण्याच्या उंभरटयावर उभं असताना झालं होतं... त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मिनल सोबत... सगळेच प्रेमी आपल्या "तिला" एका खास नावाने बोलावतात... तसाच सोनूसुद्धा मिनलला "मिनू" म्हणून बोलवायचा... तसही सोनू आणि मिनलचं एकमेकांसोबत बोलणं फक्त एकदाच झालं होतं.. ते सुद्धा मागच्या वर्षी... जेंव्हा पुढच्या बाकावर बसलेल्या मिनलच्या केसांमधील लाल रंगाचा Hair Band सोनूने खेचला होता... तेंव्हाच मिनल झर्रकन मागे वळून म्हणाली होती... "अरे.. बावळट! अक्कल नाहीय का? Hair Band दे माझा..."

मिनलची आई ताजमहालच्या परिसरात असणाऱ्या मुमताज बाजारमध्ये स्वतःच्या हाताने बनवलेल्या बांगड्या, पैंजण आणि कानातले विकून चार पैसे कमावते आणि त्यातूनच ती मिनलला सुद्धा शिकवते...

इकडे दारात उभ्या असलेल्या सोनूला तो व्यक्ती दिसला ज्याची तो वाट बघत होता... अंगणात सोनूचा भाऊ मधुकर उभा होता, ज्याला घरी यायला थोडा उशिरच झाला होता... तो बुट काढत दरवाज्यात उभ्या असलेल्या सोनूला बघून म्हणाला.. "असा वटवागळासारखा दारावर का लटकला होतास रे..?"

"दादा.. मी तुझीच वाट बघत होतो.." ... सोनू थोड्या दबक्या आवाजात म्हणाला...

"माझी.. का बरं? काय झालं ?.. पैसे वगैरे संपले का..?" ...मधुकर अगदी चेष्ठेने म्हणाला...

"नाही दादा, मला उद्या तुझ्यासोबत यायचं आहे... ...ताजमहाल बघायला.." ... एक मोठा श्वास घेऊन सोनू म्हणाला.

बुटांची नाडी सोडत असणाऱ्या मधुकरने एक बूट हातात घेतला आणि ओरडून म्हणाला... "डोकं ताळ्यावर आहे का तुझं? इथेच बनवूया ना तुझं थडगं... त्यासाठी ताजमहालमध्ये कशाला जायला हवं.. गप्प आत जा आणि अभ्यास कर.. ताजमहाल बघायचा आहे म्हणे ..."

बिचारा सोनू निघून तर गेला, पण त्याची इच्छा पूर्ण न झाल्याचं दुःख त्याच्या डोळ्यातून बाहेर येऊ लागलं होतं..

खरं तर मिनलचं प्रेम मिळविण्यासाठी सोनू रोज कोणाकडून तरी सल्ले घेत होता. कोणीतरी सोनूला सांगितलं होतं की, "ते दोघे जेंव्हा शाळेत एकाच बाकावर एकत्र बसतील तेंव्हा दोघांमध्ये प्रेम होईल.." पण वर्षभराच्या लाख प्रयत्नानेसुद्धा सोनू मिनल सोबत एकाच बाकावर बसू शकला नव्हता...

कोणीतरी सांगितलं होतं की, मिनलच्याच आईकडून शंभर पैंजण विकत घेऊन ते मिनलला द्यावेत... पण शाळेच्या बाहेर चिंचा कैरी विकणाऱ्या फरहानने एक वेगळाच सल्ला सोनूला दिला होता.. तो म्हणाला होता की, ... "ताजमहालच्या परिसरातील कोणताही एखादा संगमरवराचा तुकडा जर तोडून तो मिनूला दिला तर, ती पण तुझ्यावर प्रेम करू लागेल.. त्याचं म्हणणं होतं की ताजमहाल बघायला जाणारा प्रत्येकजण तेवढ्यासाठीच तर जातो... म्हणून तर तिथे इतके सगळे पोलीस उभे असतात.. नाहीतर सगळेच जर ताजमहाल तोडून घेऊन जाऊ लागले तर, एक दिवस ताजमहाल पूर्ण गायब होऊन जायचा..."

सोनूला खात्री होती की, बाकी कोणाचा सल्ला कामी येणार नाही.. पण, त्या चिंचा कैरी विकणाऱ्या फरहानचा सल्ला मात्र नक्की कामी येणार... कारण मिनू नेहमी त्याच्याकडूनच कैरी घेऊन खायची...

सोनूच्या डोक्यात विचार आला की, 'सगळे लोक ताजमहालच्या तुकड्यासाठी इतका आटापीटा करतात ते काम त्याच्यासाठी तर एकदम सोप्प आहे.. कारण त्याचा भाऊच तिथे Security Guard आहे..' पण सोनूचा भाऊ सोनूला घेऊन जाणार हे केवळ कठीण वाटत होतं..

दुसऱ्या दिवशी सोनू शाळेचा युनिफॉर्म घालून घरातून निघतो खरा... पण तो शाळेत नाही तर ताजमहाल बघायला जाण्याच्या तयारीत होता... त्याने चेहऱ्यावर रुमाल बांधला होता.. जेणेकरून त्याचा भाऊ त्याला ओळखू शकणार नाही... नंतर सोनूला एका भल्यामोठ्या रांगेत उभं राहावं लागलं... त्याला सांगितलं गेलं की ताजमहालमध्ये जाण्यासाठी त्याला एक तिकीट घ्यावं लागेल... तब्बल अर्ध्या पाऊण तासाने सोनूने ताजमहालच्या गेटमधून आत प्रवेश केला... त्याने पहिल्यांदाच ताजमहालचं ते विलोभनीय दृश्य डोळ्यात सामावून घेतलं होतं... त्याच्यासमोर संगमरवराची अशीच वास्तू होती जसी त्याचे वडील रोज बनवत असत... पहिल्या नजरेत त्याला वाटलं की, 'कोणीतरी पौर्णिमेच्या चंद्रावर छिनी हातोडी चालवून ही सुंदर वास्तू तयार केली आहे...'

तो जसजसा मोठ्या दरवाज्यातून पुढे पुढे जात होता तस तसा समोरचा ताजमहाल मोठा.. अजून मोठा होत होता.. जसा की ताजमहाल त्यालाच बोलावत आहे... वडिलांनी बनविलेले लहान लहान ताजमहाल तो रोजच बघत होता... पण पहिल्यांदा खरा खुरा ताजमहाल बघून त्याला वाटलं की, तो यापूर्वी का नाही आला इथे..?

तिथे दूर दूर वर रंगीबेरंगी फुलं होती... जसं की कोणीतरी फुलांची चादर संपूर्ण जमिनीवर अंथरली आहे... मधोमध वाहत पाणी.. त्यामध्ये उंचच उंच उडणारे पाण्याचे कारंजे ज्याच्या पाण्याचे तुषार हिरवीगार गवती चादर अंथरलेल्या जमीनीवर पडत होते... आणि समोर दिमाखात उभा ताजमहाल... ज्याच्या दोन्ही बाजूला चार मिनारे होती.. ज्यामध्ये दोन मिनार त्याला स्वतःचे हात तर दोन मिनार मिनूचे हात वाटले... जे की एकमेकांना मिठी मारायला कित्येक वर्षे प्रतीक्षेत होती... त्यावेळी सोनूला सगळ्यात जास्त त्याच्या आईची आठवण आली होती... लहानपणी त्याला तिनेच स्वर्गाच्या गोष्टी सांगितल्या होत्या.. जिथे असंच फुलं, बगीचे, वाहत पाणी, कारंजे सगळं होतं... तिच्या जाण्यानंतर सोनूला पण असंच वाटलं की त्याची आई अशाच कुठेतरी ठिकाणी बसून त्याला बघत असेल...

थोडं आत गेल्यावर एका बाकावर बसून ताजमहाल समोर कोणीतरी फोटो काढताना सोनूने पाहिलं... एक मुलगा एका मुलीचा हात पकडून चालत असताना त्याला मिनूची आठवण आली... आणि एकदम त्याच्या हे लक्षात आलं की, तो इथे फोटो काढायला आणि ताजमहाल पहायला आला नाही.. तर, ताजमहालचा तुकडा मिळविण्यासाठी आला आहे... पण तिथे असलेली गर्दी.. चारही बाजूंनी पहारा... भावाने बघण्याची भीती... या सगळ्यात ताजमहालचा तुकडा मिळवणं त्याला कुठेतरी अशक्य वाटत होतं...

सोनू ताजमहाल मधून मोकळ्या हाती परतला नव्हता, आपल्या लाडक्या बायकोच्या प्रेमासाठी ज्या शाहजहानने ताजमहाल बनवला त्याला डोळ्यांसमोर ठेऊन तो जरा जास्तच रोमँटिक होत होता... तो विचार करत होता की, मिनल जिचं नाव त्याने त्याच्या प्रत्येक वहीच्या शेवटच्या पानावर लाल पेनाने लिहिलं होतं... तिच मिनल जिने त्याला दिलेल्या चॉकलेटच्या रॅपरला त्याने आजपर्यंत सांभाळून ठेवलं होतं... तिच मिनल जिच्यासोबत बोलण्यासाठी तो दररोज आरश्यासमोर उभा राहून तयारी करत असे आणि मिनल समोर येताच विचार करायचा की, 'तो आज नाही उद्या बोलेल'.... सोनूच्या मनात असाच विचार आला की, तोसुद्धा प्रेमाचं प्रतीक म्हणून मिनलच्या नावाने अशीच  एक भव्य वास्तू बनवेल... पण त्या आधी ती त्याचं प्रेम स्वीकारू तरी दे...

त्याला खात्री होती की, ताजमहालच्या तुकड्याचा प्रयोग एकदा का पूर्ण होऊ दे.. मग तर मिनू त्याचीच.... पण प्रेमाच्या लढाया इतक्या सोप्या तरी कुठे असतात... आणि घरी परत येताच त्याने एका वहीच्या शेवटच्या पानावर एक शायरी लिहून ठेवली ....

"ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजिये, ये इश्क नहीं आसान बस इतना समझ लीजिये, सामने ताजमहाल खडा हैं, बस तोड़के लाना हैं.." ... आणि त्याखाली स्वतःचं नाव लिहिलं एक मोठा बदाम काढला बदामाच्या आरपार जाणारा एक बाण काढला आणि त्याखाली लिहिलं... मिनू !!


दुसऱ्या दिवशी सोनू तयार होऊन शाळेला जायला निघाला.. तेवढ्यात तो आपल्या भावाला बघून बावचळला.. भावापेक्षाही सोनूला भावाच्या हातात असलेल्या वहीची जास्त भीती वाटत होती... तिच वही जिच्या शेवटच्या पानावर त्याने शायरी लिहिली होती...

"काय रे..? काय गडबड आहे हि..? बॉम्ब वगैरे तर नाही ना लावत तू ताजमहालमध्ये.." ... मधुकरने वहीमधील शायरी वाचत विचारलं...

"नाही दादा... ते असंच लिहिलं होतं.." ... सोनूने घाबरतच उत्तर दिलं ..

"आणि वहीच्या प्रत्येक पानावर काय हे मिनू.. मिनू.. लिहून ठेवलं आहे..?" ...मधुकरने जरा चढ्या आवाजात विचारलं..

"हे बघ.. ही अशी नाटकं करू लागलास तर ताजमहालच्या घुमटावर उलटा टांगेन तुला..."


थोड्या वेळाने सोनू परीस्थिती सावरत म्हणाला... "मी काल एक स्वप्न पाहिलं होतं दादा.. ताजमहालचा एखादा तुकडा स्वतःजवळ ठेऊन परीक्षा दिली की खूप मार्क मिळतात.. मला हवाय एक तुकडा... तू आतच असतोस ना.. मग एक तुकडा तर तू आणूच शकतोस.."

पहिलं तर सोनूच्या बोलण्यावर मधुकर हसला आणि बोलला.. "हल्ली खूप स्वप्नं बघू लागला आहेत तू.. हे असं काहीही नसतं... त्यापेक्षा तू नीट अभ्यास कर..."

"दादा तू माझ्यासाठी एक तुकडा नाही का अणू शकत..?" ... सोनू रडवेल्या आवाजात बोलला..

भावाच्या बालमनातून उपजलेल्या या कल्पनेवर हसतच मधुकर निघून गेला.. सोनू सुद्धा गेला.. तिकडेच जिकडे तो शिकण्यासाठी कमी तर मिनूला बघायला जास्त जातो.... शाळेत!!

त्या रात्री सोनू घाबरून मधुकरला काही विचारू शकला नाही.. ...दुसऱ्या दिवशी सकाळी जेंव्हा सोनू तयार होऊन शाळेत निघाला तेंव्हा मधुकरने आपल्या लहान भावाच्या हातात ठेवला एक पांढऱ्याशुभ्र संगमरवरी दगडाचा तुकडा... तोच तुकडा जो सोनूला कित्येक दिवसापासून हवा होता...

मधुकरकडून सोनूला फक्त एक ताजमहालचा तुकडा नव्हता मिळाला.. तर त्यापेक्षही खूप काही मिळालं होतं. त्याला वाटलं की, बादशहा शाहजहान आणि मुमताजच्या प्रेमाला या ताजमहालमुळे ओळखलं जातं... तसंच त्याच्या आणि मिनूच्या प्रेमाला याच ताजमहालच्या तुकड्यावरून ओळखलं जाईल... फरक फक्त इतकाच असेल की, त्यांची प्रेमकथा ताजमहालच्या सोबत अमर झाली आणि सोनू आणि मिनूची प्रेमकथा मात्र याच तुकड्यामुळे सुरु होणार आहे ..

दुसऱ्या दिवशी सोनू मस्त तयार होऊन निघाला मिनूला तो तुकडा देण्यासाठी, आणि त्याला खात्री होती की, मिनूच्या हातात हा तुकडा ठेवताच मिनू त्याची होईल... आददि आयुष्यभरासाठी..!!

एका वेगळ्याच आनंदात निघालेला सोनू जेंव्हा मुमताज बाजार परिसरात पोहचला तेंव्हा त्याने पाहिलं की, तिथे असलेली कच्ची घरं जमीनदोस्त झाली आहेत आणि शंभर एक मजूर तिथला परिसर साफ करत आहेत... त्याला आठवत होतं की, इथे असलेल्या चिंचेच्या झाडासमोर तर मिनूचं घर होतं... कित्येक वेळा सोनू चिंचा तोडण्याच्या हेतूने तिथे येऊन मिनलच्या खिडकीतून नजर टाकून निघून जायचा.. पण तिथे आज ना ते झाड होतं... ना मिनलचं घर होतं.. ना त्याची मिनल होती... त्याला वाटलं की, तो चुकून रस्ता विसरून दुसरीकडे तर गेला नाही ना..? ...तेव्हड्यात त्याला त्याच्या वडिलांचे मित्र अकबर च्याच्या येताना दिसले.. त्यांनी सोनूला बघून त्यांची स्कूटर थांबवली.. आणि म्हणाले.. "काय रे सोनू ? तू इकडे कसा ?"

"काही नाही च्याच्या मी तर इथे चिंचा तोडायला आलो होतो.. पण ते झाडचं इथे दिसत नाहीय..." सोनू वेळ सावरत प्रश्नार्थक नजरेने म्हणाला...

अकबर च्याच्यानी एक मोठा श्वास घेतला... आणि म्हणाले.. "अरे.. माहिती नाही का तुला...? सर्व झाडं तोडली आहेत इथली.. काही कच्ची घरं होती.. ती पण तोडलीत.. ..इथून एक मोठा ६ पदरी रस्ता जाणार आहे म्हणे.. लडाख पर्यंत... तुला माहिती आहे का.. हा रस्ता भारताच्या दक्षिणेतून येत आहे.. कन्याकुमारीपासून.."

रस्त्याबद्दल ऐकताच सोनूने हातातील संगमरवराचा तुकडा लपवत विचारलं.. "आणि इथे त्या मुमताज बाजार मधील कारागिरांची वस्ती होती... त्याचं काय झालं..?"

"सर्व वस्ती तर हटवली बाळा. सगळे कारागीर निघून गेले... आपापल्या गावी.."

"आणि इथे ती मिनलची आई होती ... ती..?" ... सोनूने डोळ्यातील पाणी डोळ्यातच लपवत विचारलं.

"मिनलची आई तर मिनलला घेऊन निघून गेली... आपल्या भावाकडे.."

सोनूच्या डोळ्यात आता पाणी तराळलं होतं.. तो तिथून निघाला.. पण त्याला काहीच कळत नव्हतं... कुठे जावं? काय करावं? त्याला काहीच कळत नव्हतं... त्याने हातात असलेल्या संगमरावरच्या त्या तुकड्याला घट्ट मुठीत आवळलं आणि घरी निघून आला..

घरी पोहचताच त्याने तो हातातील संगमरवरी तुकडा घराच्या अंगणात रागाने फेकून दिला.. आणि आता असलेल्या चौथऱ्यावर चादर घेऊन झोपी गेला.. काही वेळाने चादरीचा काही भाग सोनूच्या आसवांनी भिजून गेला होता.. मिनू त्याच्या आयुष्यातून आता निघून गेली होती.. आसवांनी भिजलेली चादर त्याने बाजूला केली आणि उठून बसला... त्याने एका कागदावर स्वतःचं लिहीलं, सोहम..! त्याखाली एक मोठा बदाम काढला त्याखाली मिनू लिहिलं, आणि मिनलने दिलेली चॉकलेटचं रॅपरसुद्धा त्यात ठेऊन त्याची घडी करून आपल्या अंगणात एक खड्डा काढून त्यात ते जमिनीत गाढून टाकलं..

त्याचा विचार होता की, प्रेमाच्या या आपल्या थडग्यावर तो कधीतरी इथे एक ताजमहाल उभा करेल...

संध्याकाळी सोनूचे वडील घरी येताच त्यांनी तो अंगणात पडलेला संगमरवरी तुकडा पाहीला आणि म्हणाले.. "अरे हा तुकडा इथे कोणी फेकला? काही दिवसांपूर्वी मधू हा दुकानातून घेऊन आला होता... तेंव्हा पासून गायब आहे.. बरं झालं सापडला .."

वडिलांचं बोलणं ऐकून सोनू आतमध्ये मोठ मोठ्याने रडू लागला.. त्याला वाटलं की, दादाने हा ताजमहालचा म्हणून खोटा तुकडा त्याला दिला म्हणूनच मिनू त्याच्यापासून दूर गेली होती..

वडिलांनी तो तुकडा उचलला आणि त्यावर काही खुणा आखून सोनूला आवाज देऊन छिनी हातोडी आणि बाकीची अवजारं घेऊन यायला सांगितली...

सोनू बाहेर आला... आणि म्हणाला, "बाबा मला पण शिकायचं आहे.. ताजमहाल बनवायला.."

त्याला स्वतःलाच दिलेला शब्द जो पाळायचा होता.. मिमूच्या आठवणीत एक ताजमहाल जो बनवायचा होता...

वडिलांनी त्याला संगमरवरावर छिनी आणि हातोडी चालवायला शिकविली.. मग काही दिवासांनी सोनू त्या तुकड्यावर छिनी हातोडी चालवून त्याला आकार देऊ लागला... आपल्या नाजुक बोटांनी त्या तुकड्याला घासून चमक देऊ लागला .. निरनिराळ्या रंगाच्या बारीक दगडांचे तुकडे जोडून त्या दगडाची चमक वाढविण्यासाठी त्याला बारीक पॉलीश करून करून सोनूने त्या संगमरवरी तुकड्यापासून एक ताजमहाल बनवला होता...

त्याचे वडील या गोष्टीसाठी अदागी खुश होते की.. उशिरा का होईना पण त्यांचा सोनू आता त्यांच्या कामात लक्ष द्यायला तयार झाला होता ..

असं म्हणतात की, सोनूने बनविलेला ताजमहाल त्यांच्या दुकानातील आतापर्यंत विकल्या गेलेल्या ताजमहालांपैकी सगळ्यात जास्त किमतीला विकला गेला होता.

हळू हळू सोनू वडिलांच्या कामात गुंतून गेला.. आणि येणा-जाणाऱ्या पर्यटकांपर्यंत मिनूच्या प्रेमाची निशाणी पोहचवत राहिला होता.. छोट्या छोट्या ताजमहालच्या रूपाने...

सोनू एका गोष्टीसाठी खुश होता की, त्याची प्रेमकथा पण एका बादशहाच्या प्रेमकथेपेक्षा वेगळी नव्हती.. बादशहा शाहजहानने त्याच्या प्रेमाचं प्रतीक ताजमहाल कारागिरांकडून बनवून घेतला होता... पण सोनूने मात्र मिनलच्या प्रेमाच्या आठवणींचा ताजमहाल स्वतःच्या हाताने बनवला होता...




...अपूर्ण

#SrSatish🎭

   


--
अभिप्राय लिहा