बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

अनुबंध - भाग २


टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


ज्या क्षणी तुम्ही "लग्न ठरलं.." असं म्हणालात तेंव्हा "काळजाचा ठोका चूकने" असं काहीतरी म्हणतात ना अगदी तसंच झालं होतं, त्यातूनही मी एक आशेचा किरण शोधत होतो, मी विचारलं "कोणाचं?" 

माझी अपेक्षा होती की तुम्ही म्हणाल .. "दादाचं..!"

पण तुमच्या पुढच्या उत्तरामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली.. आणि "28 ला साखरपुडा आहे" असं सांगितले तेंव्हा मात्र सर्वकाही संपलं असं वाटू लागलं.. काही क्षण डोळ्यांसमोर आपली संपूर्ण मैत्री उभी राहिली..

स्वतःला अगदी एक दीड वर्ष मागे नेऊन पाहिलं, "तेंव्हाच जर माझ्या मनातलं तुम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आज हा दिवस नसता बघावा लागला", असं कुठेतरी वाटू लागलं होतं, पण पुढच्या क्षणी जाणीव झाली की, आता वेळ आपल्या हातातून निघून गेली आहे, आणि स्वतःला सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला..

मी तुम्हाला त्याबद्दल वेळेत विचारलं नव्हतं कारण त्यावेळेस माझा जॉब कन्फर्म नव्हता महिंद्रामध्ये जरी असलो तरीसुद्धा माझे तीन वर्षांचे ट्रेनी इंजिनिअर म्हणून कॉन्टॅक्ट होतं ते संपणार होतं.. त्यामुळे तुम्हाला विचारण्याचे धाडस कधी केलं नाही, जरी विचारलं असतं आणि तुमच्याकडून होकार जरी आला असता तरी घरच्यांनी प्रश्न उपस्थित केले असतेच ना... "मुलगा काय करतो? परमनंट जॉब आहे का?" हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात असल्यामुळे मी त्यावेळेस विचारण्याचे धाडस केले नाही.. तुम्हाला नेहमीच गृहीत धरून स्वतःला फक्त वेळ देत राहिलो..

खरंतर माझ्या घरामध्ये तुमच्याबद्दल फक्त मोजक्या लोकांनाच माहिती आहे, एक तर सूर्याजी दादा दुसरी म्हणजे ऋचा आणि ज्यांच्यापासून मी काही लपवू शकत नाही असे म्हणजे आमचे सद्गुरु आणि गुरु माता (म्हणजेच आई बाबा)

तुम्ही 28 तारखे बद्दल जेंव्हा बोललात, तेव्हा मात्र मी सगळ्यात पहिल्यांदा ममताला आणि मिनलला सांगितलं की, "माझा खेळ संपला.."

मिनलला तुम्ही नाही ओळखत पण तुम्हाला मिनल चांगली ओळखते.. अर्थातच! का नाही ओळखणार! त्या दोघी सुद्धा नेहमी सांगायच्या... "विचार-विचार, धडक करून विचार नाहीतर नंतर वेळ निघून जाईल.." पण मी त्यांच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करत राहिलो..

ऋचाला आणि सूर्याजी दादाला तर कल्पनाही नव्हती.. तुम्ही साखरपुड्याबद्दल बोलल्या पासून मी ऋचापासून माझा मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करत होतो.. कारण ती तिच्या खट्याळ स्वभावानुसार माझ्या मनातल्या भावनांंबद्दल तुमच्यापुढे काहीतरी बोलली असती तर मात्र प्रॉब्लम झाला असता, म्हणून मी तीच्यापासून मोबाईल दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातूनही माझी नजर चुकून मोबाईल घ्यायचीच आणि तुम्हाला msg किंवा कॉल करण्याचा प्रयत्न करायची..

पुढचे काही दिवस 28-29 तारखेपर्यंत माझ्यात आणि  ऋचामध्ये मोबाईलचा लपंडाव चालू होता.. 28 तारखेला जेव्हा मी आणि सूर्याजी दादा आमच्या काकींना सोडायला सांगलीला गेलो तेव्हा परत येताना काहीतरी विषय निघाला, तेव्हा मात्र मला सूर्याजी दादाला सांगावं लागलं की, "आज तिचा साखरपुडा झाला"...

"सतिश, तुला जर तिला विचारायला जमत नसेल तर मला सांग, मी विचारेन तिला.." असं म्हणून नेहमी माझ्या मागे उभ्या राहणाऱ्या दादाला सुद्धा तितकाच धक्का बसला होता जितका मला बसला..

दादाने एकदम तुमचं नाव घेतलं, "कोणाचा? कीर्ति पाठकचा?".. आणि मी "हो" म्हणालो.. तेंव्हा दादा काही क्षण स्तब्ध झाला.. त्यानंतर जवळपास एक दीड तास, घरी पोचेपर्यंत सूर्याजी दादाकडून मी ऐकत होतो की, "तुला वेळीच तिच्याशी बोलायला काय झालं होतं? मी फोन केला असता.. तुला किती सांगितलं होतं बोल-बोल तरी तू नाही ऐकलं.." ह्या आणि अशा अनेक गोष्टींची आठवण दादा करून देत होता.. मी मात्र शांत बसून शून्य नजरेने समोरच्या काचेपलिकडचा मागे सरकत जाणारा रस्ता पहात शांत बसलो होतो..

मला गावी सगळे नाना म्हणतात.. 29 तारखेला जेव्हा माझा मोबाईल ऋचाच्या हाती लागला तेव्हा तिने WhatsApp स्टेटस मध्ये तुम्ही ठेवलेले स्टेटस पाहिलं, आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली, "नाना.. नानीचा साखरपुडा झाला..?" ऋचाचा प्रश्न  ऐकून मी सुद्धा थोडा गांगरलो, तिला काय उत्तर द्यावं काही सुचेना.. मी फक्त माझ्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणू शकलो, आणि माझ्या नजरेतील ओलावा बघून ती मोबाईल माझ्या हातात ठेवून काहीच न बोलता निघून गेली..

तुमचा साखरपुडा झाला हे कळण्याआधी पर्यंत ऋचाला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, पण मीच काहीतरी कारण देऊन चालढकल करत राहिलो, "आता नाही उद्या करू, कामात असेल नंतर फोन करू." अशी काहीतरी करणं देत होतो..

त्यानंतर एकदा संध्याकाळच्या वेळेस "रडलीस का? आपण आता भेटू शकणार नाही.." वगैरे वगैरे Msg आले होते, ते सगळे ऋचाच करत होही, बाकी काही नाही.. मी बोललो होतो तुम्हाला... तेव्हा बराच वेळ मोबाईल तिच्या हाती असून सुद्धा तिनं मात्र फोन करणं टाळलं..

असो,

आपल्या आयुष्याच्या सारीपाटावर काही पानं उलटी पडली तर त्याला कोण काय करणार. कोणाचं उष्ठ कुठल्या गावी किती सांडावं याचे काही संकेत असतात.. काही वर्षे मागे जाऊन आपल्या मैत्रीची पानं उलटून पहिली तर वाटतं की, जुन्या रेडिओवरच्या सतारीवर काहीतरी झंकारतंय पर्युत्सुक करणारा एक जुना स्नेहगंध दरवळायला लागलाय, हसूही येतं.. रडूही येतं..

या सर्व व्यर्थ शब्दप्रपंचातून मला जे सांगायचं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला, वेळीच सगळं तुम्हाला सांगितलं असतं तर त्यावर तुमचं उत्तर काय असलं असतं याची देखील मला कल्पना नव्हती आणि आजही नाहीय..

मला नक्कीच कल्पना आहे की, आता वेळ निघून गेली आहे.. तरीही  मी बोललोच नाही तर शेवटपर्यंत ही गोष्ट माझ्या मनाला खात राहील, म्हणून हा सगळा खटाटोप..

ज्या गोष्टींची भीती वाटत होती ती पुन्हा वाटू लागली आहे, यासगळ्या नंतर आपली मैत्री तरी कायम राहील ना..??

आणि कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यात आकाशात दूरवर दिसणाऱ्या ताऱ्याचा अंधुक प्रकाश दिसावा असा आशेचा किरण दिसतोय की, नक्कीच आपली मैत्री कायम राहील..!!

राहील ना..?? 🌹🙏🏻😃😀

तुमचा एक मित्र!
एक "शून्य" मी!


.... अपूर्ण 
#SrSatish🎭

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा