मी घरी सोफ्यावर उलटा पडून कानात Earphones अडकवून मोबाईलवर गाणी ऐकत WhatsApp Chatting करत पडलो होतो.. तेवढ्यात आई हातात १०० रुपयांची नोट घेऊन काहीतरी पुटपुटत समोर येऊन उभी राहिली..
मी हातानेच इशारा करून विचारलं, "काय?"
तेंव्हा तिचा लाल झालेला चेहरा पाहून लक्षात आलं की, ती पुटपुटत नव्हती.. काहीतरी बोलत होती, पण माझ्या कानात Earphones असल्यामुळे मलाच ऐकू येत नव्हतं..
मी पटकन एका कानातून Earphone काढलं आणि पुन्हा (नम्रतेने) विचारलं, "काय झालं आई ?"
"अरे! दिवेलगणीच्या वेळी लोळत काय पडलायस? जा.. जरा दुकानात जाऊन वेलची घेऊन ये."
आईचं ते बोलणं पूर्ण होतं न होतंच दुसऱ्याही कानातून Earphone काढलं आणि तिथेच सोफ्यावर टाकून तिच्या हातातील नोट घेऊन मी गडबडीत निघून गेलो..
दुकानात शिरताच काउंटरवर दुकान मालक ओठ चावत (स्वतःचेच) पान खात नोटांचं बंडल मोजत खाली मान घालून बसला होता.. मालकापासून थोड्या अंतरावर एक सेल्समन समोरच्या काचेवर मोबाईल ठेऊन अगदी दोन्ही हातांनी WharsApp वर chatting करत आरामात बसला होता, बहुदा त्याची गर्लफ्रेंड किंवा बायको असावी.. करण मोबाईलच्या स्क्रीनवर लाल लाल बदाम (नवी पिढी ज्याला Heart म्हणते), लाल लाल ओठांचे ठसे, अगदी लांबून सुद्धा ठसठशीत दिसत होते.. माझी नजर स्क्रीनवर पडताच त्याने मोबाईल लपवला.. आणि म्हणाल, ..... "क्या चाहीये?"
समोरच्या कपाटात काचेपलीकडे असणाऱ्या Bourn Vita च्या ३० रुपयांच्या पाकिटांकडे पाहत मी म्हणालो, "वेलची द्या.."
त्याचवेळी माझ्या मनात आणखीन एक समांतर विचार चालू होता, ... "घरातील Bourn Vita संपलं आहे, तर मग ३० रुपयांचं पाकीट घेऊ, की अर्धा किलोचा डब्बा घेऊ?"
तेवढ्यात सेल्समनने प्रश केला, .... "कितनी इलायची चाहिए?"
त्याचा तो प्रतिप्रश्न ऐकून माझ्या डोक्यातून Bourn Vita चा विचार एकदम निसटला आणि मी भानावर आलो, "अरे! Earphones च्या नादात किती वेलची आणायची ते आईने सांगितलंच नाही.."
मी हातातील शंभराची नोट पाहिली, थोडा विचार केला, आईने दिले तर आहेत १०० रुपये मग थोडी जास्तच घेऊन जाऊ वेलची.. पुन्हा पुन्हा यायला नको तेवढ्यासाठी.. आणि म्हणालो, .... "अर्धा किलो द्या.."
माझे शब्द ऐकताच काउंटरवर खाली मान घालून पैसे मोजत बसलेल्या मालकाने हातातील पैशांचं बंडल न मोजतात ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि तो जागेवरच ताडकन उठून उभा राहिला.
माझ्या मनात मात्र Bourn Vita चं ३० रुपयांचं पाकीट घेऊ की अर्धा किलोचा डब्बा घेऊ, हा गोंधळ चालूच होता.. जागेवरच उठून उभ्या राहिलेल्या मालकाने माझ्यावर डोक्यापासून पायापर्यंत दोन वेळा नजर फिरवली.. आणि तोंडातील पानाची पिंक एका गालातून दुसऱ्या गालात ढकलत जड आवाजात म्हणाला, .... "बेटा, इलायची सोने से भी महंगी है.."
पुन्हा मी भानावर आलो, "सोन्यापेक्षा महाग! म्हणजे आजचा सोन्याचा भाव बघता, अर्धा किलोसाठी २० लाख रुपये कुठून आणायचे?" आणि ३० रुपयांच्या Bourn Vita च्या पाकिटाची जागा आता या विचारांनी घेतली..
तेवढ्यात मालक म्हणाला, "५६ रुपये का दस ग्राम मिळता है इलायची."
पुन्हा एकदा १०० च्या नोटकडे बघून मनात आलं की, फक्त १०-१५ ग्राम वेलची आणण्यासाठी म्हणून आईनं १०० रुपये दिले असावेत, आणि हातातील पैसे पुढे करत म्हणालो, .... "द्या मग ५० रुपयांची.."
तिकडे सेल्समनने माझ्याकडे नजर टाकली आणि, याला तर वेलचीचा भावही माहिती नाही, म्हणजे हा आपल्यापेक्षाही अडाणी दिसतोय, असा काहीतरी विचार करून पुन्हा मोबाईल काढला आणि आपल्या (chatting च्या) कामाला लागला..
मालकाने Calculator काढून काहीतरी गणितं मांडली, आणि तराजूत एक-एक वेलचीचे दाणे टाकून वजन करू लागला.. काही केल्या वेलचीचे योग्य माप भरत नव्हतं. कधी ८ ग्रॅम कधी १० ग्रॅम तर कधी साडेदहा ग्रॅम.. तेवढ्यात मी मोबाईलवर हिशोब करून पाहिलं ५६ रुपयांना १० ग्रॅम असेल तर मग ५० रुपयांची कितीशी वेलची मिळेल.. जवळपास ९ ग्रॅम वजनाच्या नादात मालकाने चार - पाच वेळा अयशस्वी प्रयत्न करून पाहिले.. शेवटी कंटाळून ११ ग्रॅमवर आपली मेहनत थांबली आणि पुडी एक पुडी बांधून उरलेले ५० रुपये आणि वेलचीची पुडी माझ्या हातात दिली..
... अपूर्ण
#SrSatish
#SrSatish
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा