रविवार, १८ नोव्हेंबर, २०१८

नाळ

#समीक्षा



आई - मुलाचं निरागस नातं आणि त्यामधील प्रेमळ दुवा डोळ्यांसमोर उभी करणारी गोष्ट म्हणजे नाळ..

मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडविणाऱ्या सैराट चित्रपटाचे छायाचित्रकार (cinematographer) असणारे सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या लेखणीतून उतरलेली ही कथा, आई मुलाचं निरागस नातं पडद्यावर बोलकं करते..

स्वतः सशक्त दिग्दर्शक आणि अभिनेता असणारे नागराज मंजुळे यांनी चित्रपटात साकारलेली सावकाराची भूमिका, यासोबात चित्रपटासाठी लिहिलेले संवाद चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातात..

सुधाकर रेड्डी यक्कंटी यांची दर्जेदार कथा, सोबत मंजुळेंच्या लेखणीतून मिळालेले प्रभावी संवाद सोबत सुधाकर रेड्डी यक्कंटी यांचं छायाचित्रीकरण आणि दिग्दर्शन म्हणेज सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर नव्याने नवी ओळख निर्माण करण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यासाठी संपूर्ण टीमने दिलेलं योगदान सर्व काही चित्रपट पाहताना दिसून येते..

नागराज मंजुळे यांचं दिग्दर्शन या चित्रपटाला नसलं तरीही, "नागराज मंजुळे म्हणजे काहीतरी विलक्षण, काहीतरी वेगळं.." याची प्रचिती नाळ बघताना वारंवार येते.. नागराज मंजुळे यांनी चित्रपटासाठी लिहिलेले संवाद कधी खळाळून हसायला भाग पडतात तर कधी खूप काही विचार करायला लावतात..

चित्रपटासाठी निवड केलेली नागपुरी वर्हाडी भाषा आणि त्यातील गोडवा हा सुधाकर रेड्डी यक्कंटी यांच्या कथेतून आणि नागराज मंजुळे यांच्या संवादातून दिसून येतो..

बाल कलाकार श्रीनिवास पोखले कडून चैत्याची भूमिका करवून घेताना बालपनातील निरागसत्त टिकवून ठेवण्यासाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत सार्थकी लागल्याचं चित्रपटाच्या शेवटी दिसून येत..

आई बद्दलच एक सत्य चैत्याला कळल्यावर त्याची झालेली द्विधा मनस्थिती पाहताना चित्रपटातील काही क्षण मनाला स्पर्श करून जातात..

"..आई, तुला रडता येते का?" असा प्रश्न चैतन्यने आपल्या आईला विचारल्यानंतर आई कडून मिळालेलं उत्तर हे प्रत्येकाला प्रेरणा देणारं वाटतं..

आईच्या भूमिकेत असणाऱ्या देविका दफ्तरदार चा अभिनय तितकाच ताकदीचा.. स्क्रीनवरचा सर्रासपणे असणारा तिचा वावर आणि चित्रपटातील तिची वेशभूषा आपल्याला एका मध्यमवर्गीय निरागस आई डोळ्यांसमोर उभी करते..

एकंदर संपूर्ण चित्रपटात पाहताना त्यात दिसणारे "काही क्षण आणि काही फ्रेम्स का असाव्यात?" असा विचार करायला भाग पडतात.. नागराज मंजुळे यांचं थेट सामाजिक विषयाला हात घालनाच एक निराळं कौशल्य त्याच काही फ्रेम मध्ये पाहायला मिळतं..

शेवटच्या काही क्षणात, "आई ही आई असते, मग ती खरी असो किंवा खोटी.." याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही..

अद्वैत नेमळेकर यांचं संगीत आणि चित्रपटात दिसणारं एकमेव गाणं संपूर्ण चित्रपट आणि त्यातील निरागस भाव दाखवण्यास मदत करते..

सुधाकर रेड्डी यांची उत्तम कथा, नागराज मंजुळे यांचे संवाद सोबत त्यांचा दर्जेदार अभिनय, सुधाकर रेड्डी यांचं दिग्दर्शन आणि छायाचित्रिकरण, बालकलाकार श्रीनिवास पोखले कडून करवून घेतलेला तितक्याच ताकदीचा अभिनय या सगळ्यातून एक अलौकिक अशी कलाकृती निर्माण करणं नाळ च्या टीमला शक्य झाल्याचं दिसून येतं..



...अपूर्ण
#SrSatish🎭


Follow Me