टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...
काल आमच्या शेजारच्या विंगेतील जोशी आजींचा ७५ वा वाढदिवस साजरा झाला म्हणे..
त्याचाच केक घेऊन जोशी आजींची थोरली नात अनघा आमच्याकडे संध्याकाळी साडेआठच्या सुमारास आली होती. घरी कोणीच नव्हतं.. मी एकटाच हॉलमध्ये TV पहात भाकरी खात बसलो होतो..
माझ्या ताटातील भाजी जवळपास संपली होती, भाकरीच्या २-४ तुकड्यांसाठी स्वयंपाकघरात जाऊन पुन्हा भाजी घेऊन येण्याचे कष्ट मला निरर्थक वाटत होते..
मग काय.... योगायोगाने अनघा केक घेऊन आलीच होती, उचलला प्लेटमधील केकचा एक तुकडा.. आणि उरलेली भाकरी त्या केक सोबत संपवली..
त्यावेळी मी अनघाकडे पाहिलं नाही, पण जर पाहिलं असतं तर तिच्या चेहऱ्यावर मला हाच प्रश्न दिसला असता.. "ईईईई.... काय हा विचित्र.. भाकरी सोबत केक खातोय.."
मी जास्त विचार केला नाही, माझी भाकरी संपली हे महत्त्वाचं..
पण.. दुसऱ्या दिवशी माझ्या केक आणि भाकरीची रेसिपी संपूर्ण कॉलनीत पसरल्याची जाणीव मला कॉलनीतील प्रत्येकाची प्रश्नार्थक नजर पाहून होत होती..
"हाच तो.. केक आणि भाकरी खाणारा.."
पण असो, माझी भाकरी संपली हे महत्वाचं होतं, आणि केक सोबत भाकरीची नवीन चव चाखाणार मी एकटाच असेन, हे देखील तितकंच नाविन्यपूर्ण..



