शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

सिग्नल

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...



"अरे एsss, XXXX दिसत नाय का? एsss??" रस्त्यावर "एकमेकांची गळाभेट" झालेल्या त्या दोन दुचाकीवाल्यांच्या "प्रेमळ" संवादाची सुरुवात!!

दोन-तीन महिन्यांपूर्वी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये आमचा नेहमीप्रमाणे प्रयोग होता. प्रयोग सकाळचाच असल्याने मी आणि आमची नाटक मंडळी रंगमंदिरकडे जाण्यासाठी निघालो असताना कोथरूड चौकात सिग्नलला थांबलो होतो . कोथरूडचा चौक म्हणजे पुणे शहरातील अत्यंत गजबजलेला ट्रॅफिक सिग्नल. प्रचंड रहदारी. सकाळी नऊच्या सुमारास तर काही विचारायलाच नको. त्या दिवशी तिथे घडलेला हा प्रसंग....

कोथरूड चौकातून पुढे मंडईकडे जाणारा सिग्नल सुटला होता पण उजवीकडे सारस बागेकडे जाणारा सिग्नल अजून सुटला नव्हता. मंडईकडे जाणारा सिग्नल सुटल्यावर त्या दिशेने जाणारी सगळी वाहने सुसाट धूम-५ स्पीडने सुटली. सकाळी ९ म्हणजे भर ऑफिसची वेळ. तेव्हा 'वेळेत ऑफिस गाठणे' यापेक्षा दुसरा विचार करायला वेळ आहे कुणाला? ब्रुम-ब्रुम करत निघाले सगळे. आणि त्याच भानगडीत एक मोटर सायकलवाला समोरच्या दुचाकीला जाऊन धडकला. इतका धाडकन की दोघेही तोल जावून जमिनीवर आडवे..! झालं..!!

मग काय.... एका क्षणात ट्रॅफिक जॅम!! प्याs प्याs पॉssss हॉर्न वाजायला सुरुवात. मध्येच एका रिक्षावाल्याचा हॉर्न खराब कि काय म्हणून तो स्वतःच रिक्षातून हॉर्नचं काम करत होता, "अरे भाई, रास्ता छोडके झगडा करो ना"..

अशा प्रसंगी सगळ्यात पहिली घटना पहायला मिळते ती म्हणजे भुईसपाट झालेल्या उभयपक्षातील "स्त्री - नातेवाईकांचे" अत्यंत जोशपूर्ण आवाजात उत्स्फूर्तपणे एकमेकांना तातडीने "स्मरण" करुन देणे!! (इथे या बाईक स्वारांनी काय पराक्रम केला आहे याची कल्पनाही नसलेल्या त्या माय-भगिनींचा उध्दार का केला जातो हे खरंच कळत नाही)

तर, दोघेही वाहनचालक हेल्मेट घालून तावातावाने भांडत होते. इतक्यात, हवेतून जमिनीवर लँड होताना पक्षी किंवा विमान जसे दोन पायांवर उतरतात तशा पाय फरपटत एक चाळीस-पन्नाशीतील काकू तिथे स्कूटी स्लो-डाऊन करत येउन थांबल्या. "एका बाजूला जावून भांडा की, उगाच लोकांचा खोळंबा कशाला!" खास पुणेरी स्टाईलमध्ये एक (फुकटचा सल्ला) तडाखा देऊन त्या पुढे निघून गेल्या. मग चेहऱ्यावर स्कार्फ नामक 'मुसक्या' बांधलेली एक सुंदर तरुणी (स्कार्फ बांधला होता म्हणजे सुंदरच असणार, उगीच उन्हाने काळी बिळी झाली तर.. असो, आपल्याला काय... जिचे फक्त डोळेच लुकलुकत होते…) 'आपल्याला काय देणं-घेणं?' या थाटात तिथून त्या घडलेल्या प्रसंगकडे बघत निघून जात होती, नशीब की तिने वेळीच समोर पाहिलं, नाहीतर ती स्वतः तिच्या स्कुटीसह जाऊन एका कारवर धडकणार होती. असो...

"ओ, बाजूला घ्या ना राव गाड्या.." मॉर्निंग वॉकला आलेले एक आजोबा जाता-जाता ज्ञान पाजळून गेलले. बहुदा त्यांची मॉर्निंग सकाळी ९ नंतर चालू होत असावी, नाहीतर सव्वानऊ -  साडेनऊच्या सुमारास कोण वॉकला जाणार?

असो, दोघेही चालक जरा सावरल्याने हेल्मेट काढून भांडायला सरसावले. आणि हेल्मेट काढताक्षणीच - "सागर, तू?"

"अरे, युवराज? अरे सॉरी मित्रा, माझीच चूक - ब्रेक लागलाच नाही"

"ओके यार, ठीक आहे, रस्तेच साले डेंजर झालेत, आणि मी पण जरा मधेच उभा होतो रे, सॉरी सॉरी"

"जाऊदे रे, या निमित्ताने का होईना, किती वर्षांनी भेटलो आपण, कसा आहेस, कुठे असतोस हल्ली, काय करतोस, आई-बाबा कसे आहेत ?"

हेल्मेटच्या आत दडलेले ओळखीचे चेहरे दिसताच दोघेही आतापर्यंतचा कडवटपणा विसरून जमिनीवर सांडलेल्या दोन्हीही बायका (बाईकचे अनेकवचन म्हणजे "बायका" उगाच गैरसमज नसावा.) उचलून गळ्यात-गळे घालून जवळच्याच टपरीवर चहा प्यायला सरसावले.

काहीच "मनोरंजक" घडत नाही, हे पाहून बघ्यांची गर्दी सुद्धा पांगली. 

रहदारीच्या वेगाशी आयुष्याचा वेग जुळविण्यात माणसं हरवून गेली आहेत आणि स्पीड ब्रेकर्स आणि खड्ड्यांमद्ध्ये माणुसकी कुठेतरी अडखळून पडते आहे असं वाटतं कधी कधी. पण जीवनाच्या वेगवान रहदारीत केव्हातरी कुठेतरी अशी हरवलेली माणसं अचानक भेटतात तेव्हा काळाला ओव्हरटेक केल्याचा आनंद होतो ना?

असो... जे होते ते चांगल्यासाठीच, प्रत्येकाच्या आयुष्यात स्पीड ब्रेकर्स आणि खड्डे असतात, त्यांना पार करून जो पुढे जातो तो जिंकला म्हणायचं...

तसं पाहिलं तर मोठमोठ्या शहरांमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी होतच राहणार..!! हो ना?



...अपूर्ण
#SrSatish🎭
Follow Me