शनिवार, २ डिसेंबर, २०१७

आयुष्याची शाळा

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

लहानपणी पावसाळ्यामध्ये जरा रिमझिम पाऊस असेल तेव्हा कागदी होड्या बनवून रस्त्यावरच्या साठलेल्या पाण्यात सोडणे आणि मग प्रवाहाबरोबर तरंगत जाणार्‍या त्या होड्यांमागे शक्य असेल तिथवर चालत किंवा धावत जाणे हा आम्हा मुलांचा सर्वात आवडता उद्योग!! जरा मध्यम जोरात सर आली की घराच्या खिडकीत बसून भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा आणि गूळ किंवा गरमागरम भाजलेलं मक्याचं कणीस खात बाहेरचा पाऊस बघत बसायचं!! आई-दादा तिथेच आलं-गवती चहा घातलेला गरमगरम वाफाळता चहा घेऊन गप्पा करत बसायचे. ऊबदार घरटं म्हणतात ते हेच!! कसली काळजी नाही, कसली चिंता नाही की कसली फिकीर नाही!! आजी-आजोबा स्वेटर घालून बसायचे आणि मग जुन्या गप्पा-आठवणी असा कार्यक्रम सुरू व्हायचा. कधी-कधी आम्ही दोघेही बहिणी भाऊ तिथेच कॅरम खेळत बसायचो.


बाळांनो, मैदानी खेळांनी जसा शरीराला व्यायाम होतो, तसा या खेळांनी मनाला व्यायाम होतो, आजी सांगत होती.


मनाचा व्यायाम? ‘मन’ या शब्दाची व्याप्ती न कळणारं वय होतं ते, त्यामुळे मनाचा व्यायाम हा तर त्याहून न झेपणारा विचार होता आमच्यासाठी.

हो! कॅरम खेळताना काय करतो आपण? काळ्या पांढऱ्या सोंगट्यांच्या मागे जणू हात धुऊन लागतो, जास्तीत जास्त सोंगट्या आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात एक प्रयत्न असाही, राणीला आधी कोण जिंकतो! बरोबर ना?

‘हो, मग?’ मी विचारलं...

‘आयुष्यात नाती अशीच जपावी लागतात. एका नात्याचा दुसर्‍या नात्याला कुठेही त्रास न होऊ देता जो जास्तीत जास्त नाती जोपासतो, तोच आयुष्यात जिंकतो!’ आजी म्हणाली.

‘आणि राणीचं काय?’


हे आयुष्य कधी कधी कोडं मांडतं आपल्यापुढे. तेव्हा वेळप्रसंगानुसार आपल्या मनाला काही क्षणांपुरतं झोका देऊन उंच हवेत भिरकावून द्यायचं, मग सांडलेली विखुरलेली नाती पटकन गोळा करून आपल्या पदरात टाकायची आणि मग भिरकावलेलं मन पटकन मुठीत पकडायचं. कधी रिबाऊंड स्ट्रोक ने तर कधी राणीला हलका स्पर्श करून जास्तीत जास्त सोंगट्या आपल्याशा करायच्या, आणि हे ज्याला जमलं तो जिंकला, कळलं?


थोडं कळलं आणि बरचसं डोक्यावरून गेलं म्हणून आम्ही हसायचो.

‘कळेल, कळेल, आयुष्य ही सगळ्यात मोठी शाळा आहे. आणि आपली इच्छा असो किंवा नसो, या शाळेत सगळं काही शिकतो आपण आपोआप.’


‘आत्ता तुमचं हसायचं-खेळायचं-बागडण्याचं वय आहे, अशाच सुखात-आनंदात राहा रे पोरांनो’ आमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत आजी म्हणायची..


...अपूर्ण
#SrSatish🎭

Follow Me
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा