अस्वीकरण
या कथेतील सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंब स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. मात्र कथेला भावनिक स्पर्श देण्यासाठी त्यात काल्पनिक रंगाचा वापर करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.
🎭 नांदी..!! नव्या अंकाची सुरुवात 🎭
नोव्हेंबरचे सुरुवातीचे दिवस असल्यामुळे वातावरणात एक सुखद गारवा होता. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाकाठी थंड झुळूक सुटली होती आणि तिथल्या फुलझाडांमधील बकुळीच्या फुलांचा सुगंध त्या गारव्यात मिसळून संपूर्ण परिसर दरवळून निघाला होता.
रंकाळा परिसरातील "सदाफुली" अपार्टमेंट्सच्या तळ मजल्यावरील एका छोट्याश्या फ्लॅटमध्ये "गॅलेक्सी इव्हेंट्स" नावाच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या ऑफिसमध्ये दिवाळीची सजावट करताना सखी थोडी थकून गेली होती. ऑफिसमधील रेडीओवर मंद स्वरात वा. रा. कांत यांनी शब्दबद्ध केलेलं, खळे काकांचं अजरामर गाणं ऐकू येत होतं... "बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात"
संध्याकाळची सहाची वेळ... ऑफिसच्या भिंतीवरील घड्याळाचे काटेही परस्पर-विरोधी दिशा दाखवत होते; जणू तिच्या वैयक्तिक आयुष्याप्रमाणेच एकमेकांना १८० अंशात छेदणारे!
दिवाळीचे दिवस असल्यामुळे परिसरातील रस्ते बाजारपेठांनी सजलेले होते. महालक्ष्मी मंदिर भाविकांनी गजबजले होते, पण सखीच्या मनात मात्र एक वेगळीच शांतता नांदत होती.
सखीला लहानपणापासूनच मराठी संगीत रंगभूमीची विलक्षण ओढ होती. तिचे आजोबा कृष्णराव देशमुख स्वतः बालगंधर्वांच्या नाटक मंडळीत पेटीवादक होते; बालगंधर्वांच्या सुरावलींना ते आपल्या पेटीच्या साथीने अधिकच नटवत असत. तिचे वडीलही प्रभाकर देशमुख एक निष्ठावान नाट्य कलाकार होते. त्यामुळे सखीचे संपूर्ण बालपण खाडीलकरांची नाटके वाचण्यात, बालगंधर्वांची, दीनानाथ मंगेशकरांची पदे ऐकण्यात आणि वडिलांकडून मिळालेल्या नाट्यशास्त्राच्या धड्यांत गेले होते. पण आज तिची ही कलेची आवड फक्त आठवणींपुरतीच उरली होती. ४-५ वर्षांपूर्वी ज्याने तिला ही पदे पुन्हा ऐकवली, ज्याने तिच्या आयुष्यात एखाद्या मंगल "नांदी"सारखा प्रवेश केला होता, तोच आज तिची ही जीवनरूपी नांदी अर्धवट सोडून निघून गेला होता. नाटकाचा प्रयोग अर्धवट असतानाच नियतीने अचानक पडदा पाडावा, तसा तो कायमचा दूर झाला होता.
त्याच्या जाण्याने तिच्या आयुष्यातील संगीत हरवले होते... आणि उरला होता तो फक्त रंकाळ्याच्या काठावरील थंड वाऱ्यासारखा एक रितेपणा. ऑफिसच्या भिंतीवरचे ते १८० अंशात छेदणारे काटे जणू तिला रोज सांगत होते की, तिचे भूतकाळातले स्वप्न आणि वर्तमानकाळातील वास्तव आता कधीच एका रेषेत येणार नाहीत.
सदाफुली अपार्टमेंट्समध्येच चौथ्या मजल्यावर सखी आणि तिचं कुटुंब राहत असल्यामुळे संध्याकाळचा गारवा लक्षात घेऊन, सखीची आई थर्मासमधून चहा घेऊन तिच्या ऑफिसमध्ये आली... "सखी, अगं किती वेळ अजून सजावट करणार आहेस?" ...आईने हातात वाफाळलेला गुळाचा चहा देत मायेने विचारले.
"आई, नको गं..." ...सखीने चहाचा कप मागे सरकवला... "आता तर सवय झाली आहे. गेली चार - पाच वर्षे मी या आयुष्याच्या रंगभूमीवर एकटीच माझा प्रयोग सावरतेय, आता मला कोणाच्या साथीची अपेक्षा उरली नाहीये. सुजय परत येणार नाही, हे मी मनापासून स्वीकारलं आहे." ...सखी शून्यात बघत म्हणाली.
"सखी, किती दिवस स्वतःला असा त्रास करून घेणार?" आईच्या स्वरातली काळजी सखीला अस्वस्थ करून गेली.
सखी क्षणभर थांबली आणि जुन्या आठवणीत हरवून आईला म्हणाली, "आई, तुला आठवतंय? लहानपणी जेव्हा तू तुझे सोन्याचे दागिने गहाण ठेवले होतेस, तेव्हा मी तुला तुझ्या बांगड्यांविषयी विचारलं होतं. तू हसून म्हणाली होतीस, 'अगं, त्याच त्याच सोन्याच्या बांगड्यांचा कंटाळा आला होता म्हणून या नव्या रंगीत काचेच्या बांगड्या घेतल्या!' ...आपलीच जुनी आठवण सखीकडून ऐकताना आईचे डोळे पाणावले!
"आई, आज सुजयच्या बाबतीत मीदेखील तेच करतेय..." आईच्या डोळ्यांतील ओलावा बघून, तिच्या नजरेला नजर न मिळवता हातातील काम आवरता आवरता सखी बोलत राहिली... "माझ्या आयुष्यातील सोन्यासारखं प्रेम हरवलंय हे मला लपवायचं नव्हतं, पण तुम्हाला माझं दुःख दिसू नये म्हणून मी फक्त माझ्या 'काचेच्या बांगड्या' किती रंगीत आहेत, हेच जगाला दाखवत राहिले."
"सुजय!" हे नाव घेताच सखीच्या नजरेसमोर कोल्हापूरच्या रंकाळ्यावरची ती शेवटची संध्याकाळ उभी राहिली. नाशिकला जाण्यापूर्वी सुजयने म्हटलेले ते शब्द आजही तिच्या मनात एखाद्या बेसूर स्वरासारखे टोचत होते— "सखी, वडिलांच्या व्यवसायासाठी मला तिथेच स्थायिक होणं भाग आहे. आपण यापुढे फक्त मित्र म्हणूनच राहू शकतो." ... एखाद्या नाटकाचा शेवटचा अंक संपण्यापूर्वीच प्रेक्षकांनी उठूनजावं, तसं ते नातं एका क्षणात विखुरलं गेलं होतं.
सखीचे शब्द ऐकून आईचे डोळे पाणावले, ती बाहेर निघून गेली. मायेने आणलेला चहाचा कप मात्र तिने तिथेच ऑफिसच्या टेबलवर ठेवला होता.
सखीने ऑफिसच्या खिडकीतून बाहेरनजर टाकली. समोर रंकाळ्याचा अथांग विस्तार पसरला होता आणि काठावर दिवे लुकलुकू लागले होते. तिने हळूच आपल्या ड्रॉवरमधून एक जुनी डायरी काढली, ज्यात तिने संगीत नाटकातील काही पदांच्या ओळी स्वतःच्या हातांनी लिहिल्या होत्या. त्या डायरीच्या पहिल्या पानावर सुजयने लिहून दिले होते — "तुझ्या आयुष्यातली नांदी नेहमीच सुरांनी सजलेली असावी." ...सखीच्या ओठांवर एक कडवट हसू उमटले. ज्याने नांदी लिहिण्याचा शब्द दिला होता, त्यानेच तिच्या आयुष्यात "भरतवाक्य" वेळेआधीच लिहिले होते.
अचानक तिच्या फोनची रिंग वाजली. गॅलेक्सी इव्हेंट्ससाठी एका मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची ऑर्डर आली होती — "मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास" या विषयावर आधारित एक भव्य सादरीकरण! ज्या आठवणींपासून ती पळू पाहत होती, त्याच आठवणी आज एका नवीन जबाबदारीच्या रूपाने तिच्या दारात येऊन उभ्या राहिल्या होत्या. तिने डोळे पुसले, चहाचा एक घोट घेतला आणि विचार केला की, आता रंगमंचावर पुन्हा एकदा पडदा उघडणार... पण यावेळी ती केवळ एक पात्र नव्हती, तर आपल्या आयुष्याची दिग्दर्शक असणार होती.
काही दिवसांनंतर, कोल्हापूरच्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सखीची मैत्रीण रेश्माचा विवाहसोहळा संपन्न होत होता. सखी तिथे इव्हेंट मॅनेजर म्हणून संपूर्ण व्यवस्था पाहत होती. रेश्माचा होणारा नवरा कैवल्य हा सुजयचा कॉलेजमधील जिवलग मित्र होता, पण कैवल्यने नाशिकहून सुजयला आवर्जून आमंत्रण धाडले आहे, याची पुसटशी कल्पनाही सखीला नव्हती. स्वागत कक्षात पाहुण्यांना रंगीत गुलाब वाटताना सखीची नजर अचानक समोर स्थिर झाली आणि हातातले गुलाब थरथरले. समोर सुजय उभा होता... तोच चेहरा, तीच नजर. इतक्यात कैवल्यने पुढे होऊन त्याला मिठी मारली आणि उत्साहानेम्हणाला, "अरे सुजय! नाशिकहून खास माझ्या लग्नासाठी वेळ काढून आलास, खरंच खूप आनंद झाला मित्रा !"
सुजयचे लक्ष सखीकडे गेले. दोघांची नजरानजर झाली आणि काही क्षणात सात वर्षांपूर्वीचे रंकाळ्यावरचे ते छोटेसे पारिजातकाचे रोपटं, तो गार वारा आणि ते शेवटचे शब्द दोघांच्याही डोळ्यांसमोर तरळून गेले. सखीने स्वतःला सावरले आणि नजर वळवून ती कामात गुंतल्याचे भासवू लागली; पण तिचे चित्त मात्र विचलित झाले होते.
लग्नाच्या संगीत सोहळ्याचा कार्यक्रम सुरू झाला. इव्हेंट मॅनेजर म्हणून स्टेजची जबाबदारी सखीवरच होती. कार्यक्रमाच्या शेवटी रेश्माने हट्ट धरला, "सखी, तू एवढी छान गातेस, आज माझ्यासाठी एखादे नाट्यगीत म्हणशील?"
सखीला नकार देता आला नाही. तिने माईक हातात घेतला. समोरच्या रांगेत सुजय बसलेला होता. सखीने गायला सुरुवात केली... बालगंधर्वांची तीच अजरामर "संगीत सौभद्र" नाटकातील नांदी, जी कधीकाळी तिने आणि सुजयने एकत्र ऐकली होती.... "नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥"
तिचा आवाज संपूर्ण हॉलमध्ये घुमत होता. सुजय स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होता. त्याला आठवले, नाशिकला जाताना त्याने "फक्त मित्र" राहण्याचा निर्णय घेतला खरा, पण या सात वर्षांत त्याच्या आयुष्यातील संगीत हरवले होते. सखीचं गाणं संपलं, टाळ्यांचा कडकडाट झाला, पण त्या आवाजापेक्षा तिच्या डोळ्यांतील "शांतता" सुजयला जास्त काहीतरी सांगून जात होती.
रात्री उशिरा, जेव्हा गर्दी ओसरली, सुजय गुपचूप हॉटेलच्या गच्चीवर गेला. तिथे सखी एकटीच रंकाळ्याच्या दिशेला पाहत उभी होती. सुजयने मागे उभे राहून हळूच साद घातली, "सखी... नाटकाचा पडदा इतक्या लवकर पडायला नको होता, नाही का?"
सखीला आता सगळी सूत्रे उलगडली होती. सुजय इथे का आला होता, हे जरी समजले असले तरी तिचे मन मात्र अस्वस्थ झाले होते. सात वर्षांच्या काळात सुजय बराच बदलला होता, पण त्याची नजर मात्र आजही तशीच ओळखीची वाटत होती.
"कशी आहेस सखी? या सात वर्षांत कोल्हापूर बरंच बदललंय, नाही का?" ...सुजयने तिच्या जवळ येत संवादाचा पूल बांधण्याचा प्रयत्न केला.
"काळानुसार रंगभूमी बदलते आणि कलाकारही…, सुजय!" ...सखीने अत्यंत कोरडेपणाने उत्तर दिले आणि कामाचे निमित्त काढून ती तिथून निघून गेली.
संध्याकाळी सुजय थेट तिच्या ऑफिसमध्ये आला. तिच्या ऑफिसमधील सजावट आणि तिथली शिस्त पाहून तो भारावून गेला होता. "सखी, कैवल्यकडून कळलं की तू हे "गॅलेक्सी इव्हेंट्स" किती कष्टाने उभं केलंस. तुझं "नेपथ्य" आजही तितकंच नेटकं आणि प्रभावी आहे." ...तो कौतुकाने म्हणाला.
"नेपथ्य नीट असावंच लागतं सुजय, कारण नाटकाचा जिवंतपणा त्यावरच अवलंबूनअसतो. पडद्यामागची मेहनत प्रेक्षकांना दिसत नाही, त्यांना दिसतो तो फक्त शेवटचा प्रयोग." ...सखीने लॅपटॉपवरून नजर न हटवता उत्तर दिले.
सुजयने सखीच्या टेबल समोरची खुर्ची थोडी मागे खेचली... "माझं नाटक मात्र चुकीच्या वळणावर संपलं. नाशिकला गेल्यावर व्यवसायात यश मिळालं, पण आयुष्यातला सूर हरवला. तुला त्या इवल्या पारिजातकाच्या साक्षीने "फक्त मित्र" राहू असं म्हणताना, मी स्वतःशीच खोटं बोलत होतो. वडिलांचा आग्रह आणि जबाबदारीच्या ओझ्याखाली मी मात्र आयुष्याचं संगीत हरवून बसलो." ...तो खुर्चीत बसत म्हणाला.
सखी क्षणभर थांबली. तिने समोर ठेवलेल्या बालगंधर्वांच्या फोटोकडे पाहिले, आणि म्हणाली, "सुजय, संगीत नाटकाचा एक नियम असतो. एकदा नांदी संपली की पुन्हा तीच नांदी गाता येत नाही. आता नाटकाचा दुसरा अंक सुरू झाला आहे."
सुजयने खिशातून एक छोटी डायरी काढली — तीच जुनी डायरी, जिच्यावर सखीने कविता लिहिल्या होत्या. "सखी, दुसरा अंक सुरू झाला असेल, तर या अंकात मला एखादी छोटी भूमिका मिळेल का? अगदी पडद्यामागची असली तरी चालेल. मला तुझा हा एकपात्री प्रयोग सावरण्यासाठी आणि तुझा हरवलेला तो सूर शोधण्यासाठी सोबत द्यायची आहे."
बाहेर रंकाळ्यावर दिवे उजळले होते. सखीच्या मनात चाललेलं द्वंद्व आणि बाहेरची शांतता यात जणू जुगलबंदी सुरू झाली होती. तिने चहाचा कप सुजयच्या समोर सरकवला आणि म्हणाली, "चहा घे... कोल्हापुरी गुळाचा आहे. गोडवा थोडा कमी वाटला, तर समजून घे... कारण आता चवीसुद्धा बदलल्या आहेत!"
"सुजय, तू कैवल्यच्या लग्नासाठी आला आहेस, तर त्या आनंदाचा भाग हो आणि पुन्हा तुझ्या नाशिकला परत जा. माझ्या विखुरलेल्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नकोस," ...सखीने स्पष्ट शब्दांत सुनावले. सुजय काहीच बोलला नाही. त्याने शांतपणे तिचे व्हिजिटिंग कार्ड उचलले आणि तिथून निघून गेला. सखीला वाटलं होतं की या शब्दांनंतर तो कायमचा निघून जाईल, पण सुजयच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दोन दिवसांनंतर, संध्याकाळी सखीच्या फोनवर सुजयचा कॉल आला. "सखी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे... शेवटचं. आज रात्री नऊ वाजता भेटशील का?" ...त्याचा आवाज इतका शांत पण ठाम होता की सखीला नकार देता आला नाही.
पुन्हा एकदा तीच जागा - ऐतिहासिक रंकाळा तलाव. चांदण्यांच्या प्रकाशात रंकाळ्याचे संथ पाणी रात्रीच्या शांततेत अधिकच गूढ वाटत होते. सखी तिथे कठड्याला टेकून, तलावाकाठच्या रंगीत दिव्यांचे पाण्यावर उमटलेले प्रतिबिंब पाहत सुजयची वाट बघत उभी होती. समोरून सुजयला येताना पाहून तिने स्वतःला सावरले आणि मनात दाटलेला जुना सल लपवण्यासाठी, तिने एका वेगळ्याच विषयाने संभाषणाची सुरुवात केली.
"सुजय, तुला माहितीये? दोन वर्षांपूर्वी आपल्या कोल्हापूरचं वैभव असलेलं "केशवराव भोसले नाट्यगृह" जळालं. माझ्या वडिलांनी ज्या रंगमंचावर आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, जिथे मी संगीताचे माझे पहिले सूर लावले, ते आमचं हक्काचं घर आता उरलं नाही. त्या नाट्यगृहाला आग लागलेली पाहताना मला असं वाटलं की, माझ्या आयुष्यातील उरलेलं संगीतही त्या ज्वाळांमध्ये भस्म झालंय," ...बोलताना सखीचा कंठ दाटून आला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.
सुजयने पुढे होऊन तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो फक्त तिच्या शेजारी शांत उभा राहिला. सात वर्षांपूर्वी छोटेसे असणारे ते पारिजातकाचे रोपटं आता रंकाळ्याच्या अथांग पाण्याप्रमाणे बहरले होते. त्याच पारिजातकाच्या झाडाकडे शून्य नजरेने पाहत तो म्हणाला, "सखी, वास्तू जळते पण त्या वास्तूने दिलेले संस्कार आणि ते सूर कधीच जळत नाहीत. केशवराव भोसले नाट्यगृहाचा डोलारा पुन्हा उभा राहीलच, कारण कोल्हापूरकरांच्या रक्तातच नाटक आहे. पण तुझं काय? तू तुझ्या मनाच्या रंगभूमीचा पडदा पुन्हा एकदा उघडायला तयार आहेस का?"
सखीने त्याच्याकडे विस्मयाने पाहिले. सुजय पुढे म्हणाला, "मी नाशिकला व्यवसायात यशस्वी झालो असलो तरी, तिथल्या काचेच्या इमारतींमध्ये मला माझे सूर कधीच गवसले नाहीत. मी इथे फक्त कैवल्यच्या लग्नासाठी आलो नाहीये. मला "केशवराव" पुन्हा उभं राहताना पाहायचं आहे आणि त्यात पहिल्या प्रयोगात तुझे सूर पुन्हा ऐकायचे आहेत."
तिला तिचं व्हिजिटिंग कार्ड दाखवत तो म्हणाला, "हे कार्ड मी माझ्या व्यवसायासाठी नाही, तर तुझ्या आयुष्यात पुन्हा "नांदी" सुरू करण्यासाठी घेतलंय. विचार कर... नाटकाच्या प्रयोगात एखादं नाट्यपद प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं तर आपण "वन्स मोर" घेतोच ना? मग आयुष्यात का नाही?"
रंकाळ्याच्या पाण्यावर शहराच्या दिव्यांचे प्रतिबिंब थरथरत होते. सखीने एक दीर्घ श्वास घेतला. तिला जाणवले की, ज्याप्रमाणे राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा जन्म घेतो, त्याप्रमाणे तिच्या कलेची आणि प्रेमाची राख झालेली स्वप्ने पुन्हा धुमसत आहेत.
"सुजय, संगीत नाटकाचा प्रयोग करण्यासाठी केवळ कलाकार असून चालत नाही, तर त्याला साथ देणारी 'संगत' सुद्धा तेवढीच ताकदीची असावी लागते..." सखीने कठड्यावरचा एक छोटासा दगड उचलला आणि तलावात फेकला; त्यामुळे पाण्यावर उठलेले तरंग सखीच्या मनातील विचारांप्रमाणेच संथ होते.
सुजयच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकेर उमटली. कोल्हापूरच्या त्या गार हवेत, रंकाळ्याच्या काठावर सात वर्षांपूर्वी तुटलेली ती नात्याची तार पुन्हा एकदा सुरात सूर मिसळू लागली होती. तलावातील संथ पाणी साक्ष देत होते की, आता फक्त आठवणींचे पडदे पडणार नाहीत, तर एका नवीन अंकलहरीची "नांदी" वाजू लागणार होती. सखीच्या गालांवरून ओघळणारे ते अश्रू पाहून सुजय क्षणभर स्तब्ध झाला, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले आणि तो तिच्या जवळ आला.
"सखी, त्या नाट्यगृहाची आग विझवणं कदाचित माझ्या हातात नव्हतं, पण तुझ्या मनातील संगीताची ज्योत मी कधीच विझू देणार नाही." ...बोलता बोलता सुजयने आपल्या ओंजळीतली पारिजातकाची फुलं सखीच्या हातावर ठेवली. "सात वर्षांपूर्वी मी नाशिकला गेलो खरा, पण माझं मन मात्र याच रंकाळ्याच्या काठावर आणि तुझ्या सुरांमध्ये अडकून पडलं होतं. वडिलांचा शब्द मला डावलता आला नाही, म्हणून मी तिथल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या; पण मी तिथेही एकटाच होतो. मी लग्न केलं नाही सखी... कारण या धैर्यधराच्या भूमिकेत असणाऱ्या माझ्या भामिनीच्या भूमिकेत कुणा दुसऱ्याला बघणं माझ्या मनाला कधीच मान्य नव्हतं. कैवल्यचं लग्न हे तर फक्त एक निमित्त होतं, मला खरं तर तुलाच पुन्हा शोधायचं होतं,"
सुजयने आपल्या मनातील सात वर्षांची खंत व्यक्त केली. सुजयचे शब्द ऐकत असतानाच अचानक थंड वाऱ्याची एक झुळूक सखीला अलगद स्पर्शून गेली. त्या हलक्या गारव्याने सखीचे अंग थरथरले. ती निशब्द होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात सुजयबद्दल असलेला कडवटपणा त्या संथ पाण्यात हळुवार विलीन झाला होता.
सुजय पुढे म्हणाला, "केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहीलच, पण मला आपल्या आयुष्याचं हे अपूर्ण राहिलेलं "नाटक" सुद्धा पूर्ण करायचंय. सखी, या नवीन अंकासाठी मला पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात प्रवेश करण्याची संधी देशील का?"
रंकाळ्याच्या काठावर, कोल्हापूरच्या त्या सुखद गारव्यात सखीचे डोळे पाणावले. तिने सुजयने दिलेल्या पारिजातकाच्या फुलांचा आपल्या गालांना स्पर्श केला आणि गदगदलेल्या स्वरात ती म्हणाली, "सात वर्षांचा हा मध्यंतर आपल्या दोघांसाठी पुरेसा होता सुजय... माझ्या आयुष्याच्या रंगभूमीवर तुझं पुन्हा येणं मला मनापासून मान्य आहे!"
शहरातील दिव्यांची रोषणाई रंकाळ्याच्या पाण्यात अलगद विसावत होती. पाण्यावर थरथरणाऱ्या त्या प्रकाशरेषा जणू सखी आणि सुजयच्या अंतःकरणात पुन्हा उजळलेल्या आशेचे प्रतिबिंबच होते. गार वाऱ्याने त्यांच्या भूतकाळातील संवेदनांना हळूच स्पर्श केला होता. जणू निसर्गही या पुनर्मिलनाचा साक्षीदार बनून, सात वर्षांच्या मौनानंतर पुन्हा एकदा त्या अपूर्ण संगीताची 'नांदी' गुणगुणत होता.
रंकाळ्याच्या काठावर, एका सहज भेटीच्या निमित्ताने पुन्हा समोरासमोर उभे राहिलेले सखी आणि सुजय — आपापल्या आयुष्याच्या रंगभूमीवर घडलेल्या संघर्षांनंतर आज मात्र एका नवीन अंकाची चाहूल अनुभवत होते. त्या शांत प्रवाहाच्या साक्षीनं, त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या प्रयोगावर विरहाचा नाही, तर विश्वास, संगत आणि नव्या सुरुवातीचा मंगल "सुखांतिकेचा" पडदा हळूच उतरू लागला होता.
आता आठवणी केवळ मागे वळून पाहण्यासाठी उरल्या नव्हत्या, तर पुढच्या अंकासाठीची उजळ चाहूल बनल्या होत्या. त्यांच्या आयुष्याच्या रंगभूमीवर आता तिसरी घंटा वाजली होती. पडदा उघडणार होता एका नव्या सुखांतिकेसाठी !
अपूर्ण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा