DISCLAIMER
या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक असून, लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रतिबिंबं स्वरुपात या लेखात उमटल्या असू शकतात. काही घटना भावनीक स्पर्श देण्यासाठी काल्पनिक रंग देऊन रेखाटण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग असेल.
कोण म्हणतं निर्जीव गोष्टी बोलत नाहीत? "निर्जीवा"तही "जीव" असतोच की! किती आणि काय काय बोलत होतं ते शाळेचं अंगण माझ्याशी. त्या भिंती किती गप्पा मारत होत्या. तिथल्या मातीचा कण अन् कण माझ्याशी बोलत होता. एक-दोन नाही, तर तब्बल १०-१२ वर्षांचा काळ तिथल्या हवेत आजही झुळझुळत होता.
या १५ ऑगस्टला तब्बल २०-२५ वर्षांनी आम्ही शाळेतले सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र भेटलो होतो. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या आठ तासांत, मागच्या २५ वर्षांची कसर भरून काढायचा प्रत्येकाचा आटोकाट प्रयत्न सुरू होता. शाळेत पाय ठेवताक्षणी आठवणींचा एक जोरात झोत अंगावर आला आणि शब्द अचानक हळवे झाले. डोळे शाळेतल्या जुन्या ओळखीच्या खुणा शोधू लागले.
आम्ही शाळेत असताना अगदी प्रवेशद्वाराशीच केशरी-पिवळ्या फुलांनी बहरलेलं एक गुलमोहोराचं मोठं झाड होतं. आमचं हसणं-खिदळणं, मस्ती, आरडाओरडा झेलत आणि आमच्या सायकलच्या घंट्यांच्या आवाजात डुलत ते आमची वाट बघत उभं असायचं. आता तिथे सिमेंटची भिंत उभी होती, पण आमच्या पाणावलेल्या डोळ्यांत मात्र आजही त्याच गुलमोहोराचं प्रतिबिंब लख्ख होतं…
त्या अंगणातली माती, त्या मातीचा स्पर्श इतक्या वर्षांनीसुद्धा किती आपलासा वाटत होता! जसा लहानपणी बाबांच्या रांगड्या पण मायेच्या हातांचा स्पर्श असायचा ना, अगदी तसाच! प्रवासाचा सगळा शीण त्या स्पर्शाने एका क्षणात निघून गेला. "बरे आहात ना रे मुलांनो? विसरला तर नाहीत ना मला?" ती माती जणू आम्हाला विचारत होती… आमचे वर्ग, शाळेची ती घंटा, स्टाफ रूम, मुख्याध्यापकांचं ऑफिस (जिथे जाताना आजही मनात थोडी धडधड झालीच), प्रयोगशाळा, वाचनालय, खेळाचं मैदान आणि ते तळघर... जिथे गॅदरिंगच्या नाटकाची तालीम चालायची. प्रत्येक कोपरा न कोपरा आमच्याशी बोलत होता.
वर्गातल्या एका जुन्या बाकाजवळून जाताना, माझ्या खिशात तिथे असलेला एक खिळा अडकला. जणू त्या बाकाने मला हक्काने थांबवलं आणि विचारलं, "इथे तू तुझं जड दप्तर अडकवून ठेवायचास, आठवतंय? आणि सर फळ्याकडे वळले की मित्राच्या डब्यातली पोळी चोरून खाऊन गुपचूप पाणी प्यायचास, ते आठवतंय का?" तो बाक माझ्या कानात हळूच कुजबुजला आणि मी नकळत हसलो.
शाळेचा तो रंगमंच - जिथे मी आयुष्यात पहिल्यांदा 'एकपात्री' प्रयोग सादर केला होता आणि पहिलं बक्षीसही मिळवलं होतं - त्या रंगभूमीला मनोभावे नमस्कार करताना माझं मन भरून आलं. "कसा आहेस मित्रा?" असं विचारत त्या रंगभूमीने मला एका अदृश्य मिठीत घेतलं होतं. ती म्हणाली, "आयुष्याच्या रंगभूमीवर सुद्धा असाच हिमतीने ठाम उभा राहा. लक्षात ठेव, जो कला जपतो, तोच खरा कलावंत. खूप मोठा हो आणि पुन्हा ये या रंगभूमीवर तुझा नवा ठसा उमटवायला." ... त्या रंगभूमीचा तो आशीर्वाद मनाला एक नवी उभारी देऊन गेला.
संध्याकाळी शाळेतून पाय निघत नव्हता. परतीच्या वाटेवर, घाटातून पुन्हा एकदा गाव दिसला आणि शाळेची ती इमारत दिसली... जिला लोक 'निर्जीव' म्हणतात, पण जिने आमचं अख्खं बालपण आजही आपल्या अंगाखांद्यावर तितक्याच मायेने जपून ठेवलंय.
खरंय, आपण वयाने मोठे होतो, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबतो, पण आपल्यातलं ते निष्पाप लहान बाळ या शाळेच्या भिंतींनीच जिवंत ठेवलेलं असतं. आपण कदाचित संसारात त्यांना विसरून जातो, पण त्या भिंती मात्र आजही आपली नावं हृदयाशी धरून आमची वाट पाहत असतात. आज मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवलं - आम्ही फक्त शाळा सोडली होती, शाळेने मात्र आम्हाला कधीच सोडलं नव्हतं.
"काळ कोणासाठी थांबत नाही हे खरं असलं, तरी काही ठिकाणी पोहोचल्यावर काळाची चक्रे उलटी फिरतात. शाळेचं ते अंगण, तो बाक आणि तो रंगमंच... यांनी आजही आपलं बालपण जपून ठेवलेलं आहे. आपण त्यांना 'निर्जीव' म्हणतो, पण त्यांच्याशी संवाद साधला की कळतं, की आपल्या आठवणींचा श्वास तिथेच गुंतलेला आहे."




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा